तिला असे वाटणे पण ही तर एक फक्त शंकाच होती .आणि ती माणसे कोणत्या गावची होती तेही तिला माहित नव्हते .कदाचित ते गाव कोणते आहे हे तेव्हा समजले असते तर सतीश तिकडे गेला आहे का हे तरी बघता आले असते . पण मुळात सतीश जुगारात पैसे हरल्याची आणि त्याला धमकी द्यायला गुंड आले होते ही गोष्ट तर फक्त तिलाच माहित होती. दिवस अतिशय कठीण झाले होते .असाच आणखी एक महिना कसातरी गेला .आता एकूण दोन महिने झाले होते सतीशला बेपत्ता होऊन .तरीही काहीच पत्ता लागत नव्हता .एके दिवशी संध्याकाळी ऊमा ऑफिसमधून नयनासोबत घरी परत येताच ते वृद्ध गृहस्थ म्हणजे त्यांच्या घराचे मालक भाडे मागायला दारात आले .त्या दिवशी बोलल्याप्रमाणे सतीशने दुसऱ्या दिवशी त्यांचे पैसे दिलेच नव्हते .शिवाय त्यानंतर आणखीन दोन तीन महिने पार पडले होते त्यामुळे आता परत भाडे थकीत झाले होते .सतीश कुठे आहे याची ते चौकशी करीत होते .त्यांना त्वरित दोन हजार रुपये भाड्यापोटी हवे होते .कसेतरी इकडचे तिकडचे पैसे गोळा करून तिने थकीत पैसे मालकांच्या हातात ठेवले .ते लगेच ताब्यात घेऊन मालकांनी तिला सांगितले की हे घर सतीशला त्यांनी काही काळासाठीच दिले होते .आता यापुढे ते सतीशला भाडेकरू म्हणून नाही ठेवू शकत .त्यांनी आता जास्ती आणि नियमित व्यवस्थित भाडे देणारा भाडेकरू बघितला होता .पुढल्या महिन्यापासून तो इथे राहायला येणार होता .या महिनाअखेर पर्यंतच सतीश आणि ऊमा इथे राहू शकतील .आणि त्यांना घर सोडताना पण फक्त त्यांचे स्वतःचे सामान न्यायला लागेल कारण इथले फर्निचर बेड टीव्ही या सगळ्या वस्तू त्यांच्या आहेत .तेव्हा त्यांनी या महिन्याभरात हे घर खाली केले तर बरे होईल असे त्यांनी ऊमाला स्पष्टच सांगितले .घरातल्या सर्व वस्तू घरमालकांच्या आहेत हे ऐकल्यावर ऊमा चकितच झाली .आणि त्यानंतरचे घरमालकांचे निर्वाणीचे बोलणे ऐकुन त्या क्षणी जणू ऊमाच्या पायाखालची जमीन सरकली . जास्ती काहीही न बोलता तिने घरमालकांना होकार दिला .घरमालक गेल्यावर तिने दार बंद करून घेतले आणि ओक्साबोक्शी रडु लागली .आता हे घरच जर तिला कायमचे सोडायला लागले तर काय करणार होती ती ?छोटया नयनाला घेउन कोठे जाणार होती? आणि सतीशचा कधीच जर पत्ता लागलाच नाही तर काय होईल आपले ? या आणि अशा अनेक विचारांनी तिच्या पोटात खड्डा पडला .तिची झोप तर कधीचीच उडाली होती .ती रात्र मात्र तिने अक्षरश: कशीतरी ढकलली .आता या वेळेस पण तिला मोहनचा सल्ला घ्यायला हवा असे वाटत होते .त्याच्याशिवाय आधार वाटावा असे कोणीच नव्हते तिचे आता .आणि यातुन काय मार्ग काढायचा हे मोहन सांगेल अशी तिला खात्री होती .दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला पोचताच क्षणी तिने मोहनला फोन केला .आणि त्याला भेटायची इच्छा बोलून दाखवली .काय झाले आहे हे त्याने फोनवर विचारले पण ती गोष्ट फोनवर सांगता येणार नव्हती .त्या वेळी तरी त्याला भेटायला येणे जमणार नव्हते पण त्याने संध्याकाळी मात्र तिला भेटायचे कबुल केले .संध्याकाळी ठरल्याप्रमाणे नेहेमीच्या हॉटेलमध्ये ती दोघे गेली .काल घडलेला सर्व प्रकार ऊमाने मोहनच्या कानावर घातला .हे ऐकुन मोहनने तिला विचारले,“ वहिनी एवढेच घडले आहे ना मग तुम्ही एव्हढ्या का घाबरला आहात ?आज ना उद्या मोहन नक्की येईलच की परत .किती दिवस आणि कुठे जाऊ शकणार आहे तो ?मागे पण दोन तीन वेळेस असाच गायब झाला होता तेव्हा परतला होताच की तो .आताही येईल काही दिवसात कदाचित परत .तोपर्यंत आपण दुसरी जागा पाहू ना तुमच्यासाठी .दोन खोल्यांची जागा सहज मिळेल .माझ्या बघण्यात आहेत अशा काही जागा भाडे जास्त जर असेल तर मी मदत करेन थोडी पैशाची ..”आत मात्र हे ऐकुन ऊमाच्या डोळ्यात पाणी आले .खरी गोष्ट जी आहे ती मोहनला सांगायची आता वेळ आली होती .ती म्हणाली, ऐका मोहन आता मी जे सांगते आहे ते आजपर्यंत मी कोणालाच सांगितले नाहीये .आज तुम्हाला सांगते आहे .ऊमाच्या शांतपणाचा बांध आता फुटला होता .ती भडाभडा बोलत राहिली .. मागच्या वेळचे सतीशचे गायब होणेत्यानंतर ते गुंड लोक घरी येणे त्यांच्याकडून सतीशच्या जुगारात हरण्याविषयी समजणे मग त्या गुंडांची धमकी , त्यावेळी सतीशचे घाबरून जाणे त्या लोकांनी जुगारात हारलेली रक्कम परतफेडीसाठी दिलेला पंधरा दिवसाचा अवधी ..हे सगळे ऊमाने विस्ताराने सतीशला सांगितले व ते पैसे परत करण्यासाठीच कदाचित सतीशने पैशाचा अपहार केला असावा अशी तिला वाटलेली शंकाही बोलून दाखवली .हे सर्व ऐकल्यावर मात्र मोहन विचारात पडला आणि म्हणाला ,“ या गोष्टी मला आत्तापर्यंत माहिती नव्हत्या ..पण आता हे सगळे ऐकून मीच विचारात पडलो आहे .प्रॉब्लेम असा आहे की आता सतीश जरी परत आला तरी या त्याच्या कित्येक दिवसांच्या अनियमितउपस्थिती मुळे त्याची नोकरी जायची पण शक्यता आहे .दुसरे म्हणजे ही जुगाराची त्याची ही सवय पण सुटणे थोडे अशक्यच आहे अशा परिस्थितीत वहिनी तुम्ही आता ते घर सोडुन नयनाला घेऊन तुमच्या काकांकडेच राहायला जाणे योग्य ठरेल .तुमची आत्ताची परिस्थिती विचारात घेता आणि नयनाच्या पालनपोषणाचा मुद्दा लक्षात घेता तुम्हाला तुमच्या काकांचाच आधार घ्यायला लागेल .आता मात्र ऊमाने त्याला सांगितले की ,“अद्याप तिने सतीशच्या या सर्व गोष्टींविषयी काकांना अंधारातच ठेवले आहे .त्यांच्या वयोमानामुळे आणि मनाच्या हल्लक अवस्थेमुळे त्यांना कदाचित हे सगळे सहन होणे अशक्य आहे म्हणूनच तिने ते त्यांच्यापसून लपवले होते .मागे नुसता सतीशच्या ऑफिसमधल्या अफरातफरीचा विषय ऐकून ते मनाने खचले होते .मग हे सगळ जर त्यांना कळले तर ते ऐकून काय होईल त्या दोघांची अवस्था ..”मोहन म्हणाला ,“वहिनी आता त्याला काही इलाज नाही .हे सगळे आता त्यांना सांगावेच लागेल .त्यानंतर जे काय घडेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी ठेवावी लागेल .मोहनचा हा सल्ला योग्य होता ....वेळकाळ पाहून हे सर्व खरेच काका काकूंना सांगायचे रमाने पक्के केले .आणखी पंधरा वीस दिवसात तिचे रहाते घर तिला सोडायला लागणार होते .त्या दृष्टीने मात्र तिने दुसऱ्या दिवशी पासून हळूहळू आवराआवरी सुरु केली .तसे ते घर दोन खोल्याचेच होते .थोडीफार भांडीकुंडी ,मेघनाची खेळणी इतकेच होते .टीव्ही ,बेड व इतर फर्निचर मालकांचे होते असे मालकांनीच सांगितले होते .त्यात आजकाल ऊमा तर काकांकडेच असायची घरी फक्त झोपेपुरती येत असे .थोडेफार सामान, धान्य,किराणा ,नयनाची खेळणी हे आवरून तिने एकेक पिशव्या बांधुन ठेवायला सुरवात केली . पुढील आठवड्यात मात्र हे काकांना सांगायलाच हवे होते .त्या रविवारी काकांकडे जेवण झाल्यावर नयना आणि काकू खेळत बसल्या होत्या तेव्हाच रमाने विषय काढला ..क्रमशः