Reunion - Part 15 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्मिलन - भाग 15

Featured Books
Categories
Share

पुनर्मिलन - भाग 15

मोहनच्या बोलण्याने आलेले डोळ्यातले पाणी पुसून ऊमाने त्या पैशातील दोन लाख रुपये मोहनच्या ताब्यात देऊन ती रक्कम त्याने ऑफिस मध्ये भरावी असे सुचवले  .पण मोहन म्हणाला, “ वहिनी मी सांगतो ते आता नीट ऐका ..हे बघा हे पैसे तुम्ही उद्या ऑफिसमध्ये येऊनस्वतःच साहेबांच्याकडे द्या आणि त्यांना सांगा की  घरीच हे मोहनने ठेवले होते . पैसे बँकेत भरण्यासाठी आणले असणार आणि नंतर कदाचित तो विसरला असावा  .कपाटातले हे पैसे मी ताबडतोब ऑफिसमध्ये घेऊन आले आहे .असे जर सांगितले तर ते जास्त सयुक्तिक ठरेल. आणि सतीशचा हेतू चांगला होता याची ऑफिसमध्ये खात्री होईल .पुढच्या सर्वच दृष्टीने हे योग्य ठरेल “मोहनच्या बोलण्यात दूरदर्शीपणा होता तो ऊमाला पटला .प्लानप्रमाणे मोहन आधी ऑफिसला निघून गेला .नंतर तासाभराने ऊमा ऑफिसमध्ये येऊन साहेबांना भेटली .ऊमाने ती रक्कम साहेबांना देऊन सांगितले की, “सदर रक्कम बँकेत भरण्यास मोहनला उशीर झाला असावा म्हणून म्हणून त्याने ही रक्कम घरी आणली असावी .रक्कम घरातच होती ,तिने शोधल्यावर ती सापडली होती .”खुद्द सतीशची पत्नी असा जबाब देत होतीतशात ती एक महिला असल्याने व रक्कम पण ताब्यात आल्यामुळे साहेबांनी ते मान्य केले .व सदर प्रकरण मिटवले गेले . त्यानंतर ऊमाने पुन्हा पुन्हा मोहनचे आभार मानले .खरेच हे प्रकरण मोहनच्या सहकार्याने आणि मध्यस्थीने कसेतरी मिटले होते दुसऱ्या दिवशी मोहन परत ऊमाला येऊन भेटला आणि म्हणाला ,“हे बघा वहिनी सतीशला नाहीसा होऊन आता तीन चार दिवस होऊन गेलेत .आता थांबून चालणार नाही.  तो हरवल्याची पोलीस तक्रार करायला हवी .नाहीतर सगळे संशयास्पद होऊ शकते .आणि त्याची बायको म्हणून संशय तुमच्यावरच येऊ शकतो .”पोलिसांचे नाव काढताच ऊमाला परत “हबकी” बसल्यासारखे झाले .ऊमाची ती अवस्था पाहून मोहन म्हणाला ,“वहिनी तुम्ही काळजी करू नका मी येतोय तुमच्यासोबत...बाईमाणसाने एकटे पोलीस स्टेशन मध्ये कधीच जायचे नसते   आज आपण दोघे जाऊन सतीश हरवल्याची पोलीसात तक्रार नोंदवून टाकू .त्याचे म्हणणे बरोबर होते .शिवाय या प्रकरणात काकांच्या जीवाला त्रास देण्यात अर्थ नव्हता .त्यांचे वय आणि मनाची हल्लक अवस्था पहाता अशा गोष्टीत त्यांना गुंतवता येणार नव्हते .त्यामुळे ऊमा मोहनसोबत पोलीस चौकीत गेली .ऊमाच्या मोबाईल मध्ये सतीशचा फोटो होताच .तो दाखवून तिने सतीश हरवल्याची पोलीस तक्रार नोंद केली  .पोलिस स्टेशनमध्ये मोहनची ओळख असल्याने ऊमाला फारसे प्रश्न विचारले गेले नाहीत .ऊमा तर इतकी बुजली होती की तिच्या वतीने बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मोहननेच दिली .आता घरी जा ,पत्ता लागला की कळवतो असे पोलिसांनी सांगितले.मग दोघे तेथुन बाहेर पडले . ऊमाच्या डोळ्यात पाणी आले ती मोहनला म्हणाली ,’मोहन खुप करता आहात हो तुम्ही माझ्यासाठी .मोहन म्हणाला, “वहिनी मला जे जे शक्य होते ते तुमच्यासाठी मी केले .काळजी करू नका आणखी काहीही मदत लागली तर सांगा .आता तुमचा भाऊ मानले आहे न तुम्ही मला “!!!घरी परत आल्यावर या दागिने विक्री व्यवहारातले दोन लाख रुपये जे ऑफिसात परत केले ते वजा जाता उरलेली रक्कम  तिने काकुच्या ताब्यात दिली आणि म्हणाली,“ काकू हे आता उरलेले पैसे ठेव काम झाले आहे ते सारे सध्या प्रकरण आता मिटले आहे ..तुझी आणि काकांची खुप मदत झाली ..नाहीतर मी काय करणार होते अशा कठीण वेळी ?”त्यावर काकू म्हणाली ,“पोरी असे बोलु नकोस ग आम्हाला जे शक्य होते ते केले आम्ही “मग ऊमाने सतीशच्या हरवण्याची तक्रार पोलिसात नोंदवल्याचे काका काकूंना सांगितले .या सर्व गोष्टीत मोहनची फार मदत झाली असे ऊमाने सांगितल्यावर काका काकु पण गहिवरून गेले  ..काका म्हणाले,” खरेच मोहनच्या रूपाने एक देवदूतच तुझ्या मदतीला आला ग !त्याचे उपकार कधीच फिटणार नाहीत आपल्याकडून “नयनाला घेऊन ऊमा आपल्या घरी निघून गेली .या दोन दिवसात घडलेल्या घटनांनी ती फारच अस्वस्थ झाली होती .झोप तर आता कायमचीच उडाली होती .येणारा रोजचा दिवस काय काय घेऊन येईल सांगणे मुश्कील होते .रात्री फक्त डोळे बंद करून घेणे इतकेच तिच्या हातात होते आता  .त्यानंतर रोजचे रुटीन सुरु होतेच .सकाळी नयनाला काकुकडे सोडुन ती ऑफिसला जात असे .ऑफिस झाले की संध्याकाळी परत नयनाला घेऊन घरी ..सतीश नसल्याने काकु तिला घरी परत जाताना जेवून जायचा आग्रह करीत असे .एकटीसाठी तरी ती घरी काय करणार होती ?आणि घरात तिला एकटीला घासही गिळत नव्हता .त्यामुळे ती सर्व आवरूनच घरी येत असे.घरी आल्यावर आणि नयना झोपल्यावर एकटीला ते घर खायला उठत असे .तशात आजूबाजूस शेजापाजार पण नव्हता .एरवी बाबाचा खूप लळा असणार्या आणि सतत त्याच्याबरोबर खेळणाऱ्या  नयनाने या दिवसात अजिबात बाबाचे नावसुद्धा घेतले नव्हते .हे मात्र खूपच नवलाचे होते .वर्ष सव्वा वर्ष वय असलेल्या त्या अजाण मुलीला काय वाटत होते कोण जाणे नयना खरेच अतिशय शांत आणि समजूतदार होती .कोणालाच त्रास देत नसे .पण हल्ली मात्र ती एकटी असली की रडायला सुरु करीत असे .तिला कायम आजूबाजूला माणसे हवी असत .म्हणून ऊमा रविवारी पण नयनाला घेऊन काकुकडेच थांबू लागली.दिवसे दिवस नयना आणखी चलाख होऊ लागली होती .सतीशने वाढदिवसाला दिलेली तीनचाकी सायकल ती आता हळूहळू चालवायला लागली होती .इतरवेळी कधी नसली तरी सायकल बघितली की ती बाबाचे नाव घेत असे .काका काकूंना पण आजी आबा असे स्पष्ट हाक मारायला लागली होती .अगदी नक्षत्रासारखी मुलगी ...पण तिचे कौतुक म्हणावे तसे होत नसे .त्या तिघांचेही मन सतत नाराज आणि धास्तावलेले असायचे .त्यांनासुद्धा वाईट वाटत होते ,पण नयना मात्र खुष असायची .पोरीचे कौतुक करायला तिचा बाबा हवा होता ..पण बाबाच कुठे परांगदा झाला होता कोण जाणे ..दर आठ दिवसांनी मोहन पोलीस स्टेशनला सतीशच्या चौकशी साठी जात होता पण अजुन काहीच पत्ता लागत नव्हता आता तर एक महिना उलटून गेला होता .अजुन किती दिवस वाट पहायची हे कोणालाच काहीच आकलन होत नव्हते .सतीश जर परत आलाच आला नाही तर काय करायचे हे ही समजत नव्हते .तरी बरे पैशाची व्यवस्था झाल्याने आणि मोहनच्या सहकार्याने बाकीचे संकट तरी टळले होते .मागच्या वेळेस तो असाच बेपत्ता झाला होता तेव्हा जुगारात हरला होता आणि ते पैसे मागायला ते गुंड घरी आले होते .पैसे परत केले नसते तर त्यांनी सतीशला जीवे मारण्याची धमकी दिली होती . ऊमाला का कोण जाणे पण असे वाटत होते की बहुधा हे ऑफिसमधले पैसे घेऊन सतीश त्या गुंड लोकांना परत करायला गेला असावा .क्रमशः