Chakva - 5 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | चकवा - भाग 5

Featured Books
Categories
Share

चकवा - भाग 5

चकवा भाग 5 

ती सात एकर जमिन दोन एकर गुरवाकडे,दोन एकर देवस्थानला  तेल घालायचा मोबदला म्हणून रावताकडे आणि तीन एकर देवीची कुड  असलेल्या कोकाट्यांच्या ताब्यात होती. कोकाट्यांची पिलग़ी वाढून वीस उंबरे झाले होते . पण त्यापैकी पाच मुख्य घरवडींकडे  जमिनीचा ताबा होता.  स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसच्या राज्यात कुळकायदा आला. त्याचा फायदा घेवून मराठ्यांच्या ताब्यात असलेली जमिन कुळाना कसायला दिलेली होती ती बरीचशी कुळानी बळकावली. पुजारी मराठ्यांच्या ताब्यातली बरीच जमिनही अशीच कुळानी बळकावली. पण त्यातही काही  पापभीरू कुटुंबानी  आपला ताबा सोडला. गुरव , तेली नी कोकाट्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीही अशाच कसणारानी बळकावल्या. मात्र  बाबूने त्याच्या ताब्यात असलेली एक एकर जमिन  आपल्या नावावर लावून न घेता ती देवीच्या नावे पूर्वापार होती तशीच सोडलेली होती. तो म्हणे , "देवीचो संचार मी सांबाळतंय तवसर मी कसणार नी मी देवीचा वारा बंद केलय्  की  ताबो सोडणार.... मगे कोकाट्याच्या घरवडीत जी कोण कूड उबी ऱ्हवात तेका जमिनीचो ताबो मिळॉने. "

                भावकीतल्या लोकानी त्याला मथवायचा बराच प्रयत्न केला पण बाबु बधला नाही. बरं तो वार्षिक सोडायलाही तयार होईना तेंव्हा भावकीतल्या मुंबईवाल्यानी त्याचा काटा काढायचा बेत योजला. दिवाळी नंतर  मुंबईतून  गुंड घेवून मुंबईवाले येणार होते. कोणी ओळखू नये म्हणून ते दाढ्या वाढवून शिखांसारखे पागोटी बांधून येणार होते. रात्री बोट विजयदुर्ग बंदरात  आल्यावर  खाली उतरून ते   मैलभर अंतरावर गोडावून पर्यंत जावून थांबणार होते. भावकीतल्या गाडीवाल्याबरोबर पुरळ तिठ्यावर येवून तिथे ते दडून रहाणार होते. संध्याकाळी गावात जावून बाबुला अर्धमेला करून रातोरात परत विजय्दुर्ग गाठून तिथे  लपून राहणार होते नी  संध्याकाळी बोटीने मुंबईला परत जाणार होते. बाबु ला काहीतरी खायच्या वस्तूतून किंवा पानातून भांगेची गोळी घालून बेशुद्ध होईल अशी योजना गावातले दोघेजण करणार होते. मार्गशीर्षातली अवस हा दिवस मुक्रर झाला. त्यावेळी बोटीचे पॅसेंजर आणायला कोकाट्यांच्या गाड्या विजयदुर्गात जायच्या. कटात सामिल असणारा ठरलेल्या दिवशी बैलगाडी घेवून गेला. रात्री बोट आल्यावर पाच शिख पॅसेंजर पडावातून उतरल्यावर गाडीवानाने ओळखले. भावकीतले नित्य परिचयाचे दोघे त्या जथ्यात होते पण शिखांच्या वेषात तो त्याना ओळखू शकला नाही. बंदरावर उतरल्यावर ते चालत सुटले. त्यांच्या मागोमाग कोकाट्याची गाडी सुटली. 

                सड्यावर गोडावून च्या पुढे आल्यावर कोकाट्याने शिखाना खूण केली नी गाडीत घेतले. गाडी पुरळ तिठ्यावर आल्यावर ते खाली उतरले.   कटात सहभागी असलेल्या गावातल्या भाऊबंदाना  मुंबईवाले आल्याची वर्दी दिली. बाबू वस्तीला घरी न थांबता अर्धाकोस लांब शेतघरात थांबायचा. त्यांची गुरं बारमास तिथेच असायची. सकाळी उठून दुध  काढल्यावर गुराना चरायला सोडल्यावर बाबु दुध पोचवायला घरी जायचा . असा बारमास शिरस्ता होता. बेत ठरला त्या दिवशी कटकरांपैकी दोघानी  बाबुशी संगनमत करून बागेत कोंबडा रांधून खायचा बेत योजलेला होता. ठरल्याप्रमाणे  रात्री  तिघेही पोटभर जेवले. बाबुला मटणातून चिंचोक्या एवढी भांगेची गोळी दिलेली होती. जेवण झाल्यावर पान खाता खाता , "मटाण खावन्  माजा प्वॉट तटी लागला. माका नीज करता......" बाबू म्हणाला.  सवंगडी उठून घरी निघाले नी बाबू  उघड्या पडवीतच   खाटेवर आडवा झाला. मळ्यातल्या वाटेने वाडीत जाताना  साखरेच्या बांधाजवळ जावून एकाने  भालू ओरडते तसा "हुकी हूऽऽऽ......' असा आवाज काढला. लगेच व्हाळाकडून सोबत्यांचा प्रतिसाद आला, खूण पटली  नी खुशीत दोघेही घरी गेले.  

             " हुकी हू ऽऽऽ....." आवाज ऐकल्यावर मुंबईकरानी संकेत ओळखला. जरा रात्र होईपर्यंत तासभर वेळ काढून ते बाबु च्या बागेकडे निघाले. ते कवाडी जवळ पोचतात  एवढ्यात  बाबुचा कुत्रे भुंकत पुढे आले . दोघांच्या हातात गुप्त्या होत्या. तिघांकडे दांडे होते . दांडेवाला पुढे सरसावल्यावर  कुत्रे धावत मागे गेले नी तिथून  वारीक वाडीच्या दिशेला तोंड करून ते जीव खावून भुंकायला लागले. हाकेच्या अंतरावर  वारीक वाडी होती. बाबुच्या कुत्र्याचे भुंकणे एकल्यावर दहाबारा कुत्र्यांची फरड जीव खावून भुंकत मा6गराच्या रोखाने धावत सुटली. मारेकऱ्यानी पडवीत निसूर झोपलेल्या बाबूला शोधी पर्यंत कुत्रे दात विचकीत त्यांच्या रोखाने दबत दबत पुढे यायला लागले. बॅटरीच्या झोतात  अर्धवर्तुळाकार  घेराव घालीत कुत्रे पुढे येताना दिसल्यावर मात्र मारेकऱ्यानी  बाबुवर हल्ला करण्या  ऐवजी जीव वाचवून पळ काढायचा  बेत योजला.  

                 जथ्यात असलेल्या  भावकीतल्या लोकाना परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात आले. त्यानी मुंबईकर दोस्ताना सावध सुचना दिली. " अब अलग अलग भागोगे तो ये कुत्ते पिछे दौडकर हमला करेंगे...." तोंडाने हाड हाड करीत जमिनीवरचे दगड गोटे सकेरा जमवून कुत्र्यांच्या दिशेने फेकून त्यानी माघार घ्यायला सुरवात केली.  आता कुत्रेसावध अंतरावरून त्यांच्या मागून भुंकत येत होते. अर्ध्या मळ्यात आल्यावर गावकर वाडीच्या दिशेने पाचसहा कुत्र्यांची फरड  भुंकत त्यांच्या दिशेने येवू लागली. मग मारेकऱ्यानी गवळदेवा कडे जाण्याऐवजी  वस्ती टाळून देवराईतून  मारुतीच्या घाटी कडून चिचाळ्यावर जावून लांबचा भोवाडा मारून गवळदेवाकडे  जायचा बेत योजला. माणसं माघार घेताहेत हे लक्षात 

 आल्यावर कुत्र्याना जरा अधिक जोर आला. तसेच दरम्याने गावकर वाडीतले कुत्रेही जवळ येवून पोचलेले होते. आता कुत्र्यानी जुपी करून हल्ला करायचा प्रयत्न केला. ते जवळ भिडायला येताना बघितल्यावर जन्या कोकाटे म्हणाला, " आता सकेर दगड पुंजवून न भियाता कुत्र्यांका पिटाळूया नायतर ते पाट सोडणार नाय. नी एकाम पाचव बेटऱ्यो  पेटवू नुको.... मसालो पुरोक हवो हा " मग पाचही जणानी  उलटा मोहरा वळवून कुत्र्यांच्या दिशेने दगडांचा सडाका सुरू केला . आता कुत्रे उलट दिशेने जीव खावून पळायला लागले. 

              तास दोन तास एकाच जाग़ी थांबून  कुत्रे जवळ भिडायला आले की रेवा सडकावायचा , नी कुत्रे लांब गेले की  थोडं मकाण गाठायचं अशी हुलकावणी देत मारेकरी देवराईजवळ पोचले. आता बाबूचे   दोन्ही कुत्रे आणि   अन्य दोन असे  चार कुत्रे मात्र अद्यापी त्यांच्या मागावर होते. बाकीचे बरेचसे कुत्रे निघून गेलेले होते. त्यानी योजून दगडाचा मारा थांबवल्यावर बाबुचा कुत्रा त्याना भिडायला आला. तो सधारण माऱ्याच्या टप्प्यात आल्यावर  दोघानी फोकस टाकून त्याला दिपवला  नी  गुप्तीवाल्याने  गुप्ती फेकली. मारेकरी सराईत नेमबाज होता. गुप्ती कुत्र्याचे पोट फाडून आरपार होताच कुत्रा प्राणघातक केकाटत आडवा झाला. आता मात्र बाकीच्या कुत्र्यानी मोहरा वळवून पळ काढला. कुत्रा थंड झाल्यावर गुप्ती उपसून काढून निगडीच्या पाल्याने रक्त पूसून ते वाटेला लागले. मारेकऱ्यांसोबत आलेले मुंबईकरी त्या भागात वहिवाटलेले होते. तरीही दोन तीन तास चाल मारूनही  चिचाळं येईना. सड्याचा माथावळा आल्यावर त्यानी अंदाज घेतला. लांब क्षितिजाजवळ  दीपगृहाचा फोकस मारलेला दिसायला लागला. " ती बग गडारची बत्ती...... " एकजण म्हणाला नी मग त्यानी बत्तीच्या रोखाने चाल धरली. सडा पार करून उतरणाची घसारी सुरु झाली. आपण नेमके कुठे जाणार याचा काहीच अंदाज लागत नव्हता. (क्रमश:)