चकवा भाग 3
सकाळी उशिरा कौल प्रसाद घ्यायला सदू गुरव आणि सातेकजण देवळाकडे निघाले. टेंबावरून पुढे येवून चढण संपल्यावर चिरेबंदी पाखाडी सुरु झाली. देवीचे देवूळ नजरेच्या टप्प्यात आले त्यावेळी डाव्या हाताला पाच साखर दाबोटे पडलेले दिसले. मंडळी कुतुहलाने जवळ गेली. पोत्यांचे बंद सोडल्यावर आत भांडी, सामान दिसले. रात्री बहुतेक देवळात चोरी झाली असा तर्क करून स्वत: सदू गुरव चोरीची वर्दी द्यायला गावात गेला. तासाभरात एकेक करीत मंडळी जमू लागली. पोलिस पाटील आणि देवस्थानचे मुख्य मानकरी दत्ताजी भावे यानी तालुक्याला जावून पोलिस स्टेशनला तक्रार करायची, तो पर्यंत कुणीही मुद्देमाल हलवायचा नाही असा निर्णय घेतला. मध्यान्हीपूर्वी पोलिस आले. मग पोती मंदिरात नेली. पोत्यातल्या सामानाची मोजदाद झाली. त्यानंतर गणूभाऊ सातवळेकरानी देवीची पूजा केली.देवस्थानच्या रजिस्टरात सामानाची नोंद होती त्यानुसार असलेल्या सामानाची पडताळणी झाली. दरम्याने तारतम्य राखून मानकऱ्यांपैकी बापू बोंडाळ्यानी आपल्या घरून वीस लोकांचे जेवण मागवले.
दुपारनंतर माणसांची नुसती रीघ लागलेली. सगळे सोपस्कार पुरे व्हायला संध्याकाळ झाली. रजिस्टर प्रमाणे सगळा ऐवज शाबूत होता चोराना एकही वस्तू लांबवता आलेली नव्हती. देवीचे नित्य लेणे वगळता अन्य सोन्या- चांदीचे अलंकार, पंच समक्ष यादी करून ते भाव्यांच्या हवाली करण्यात आले. तो ऐवज कायम त्यांच्या घरी ठेवायचा नी देवस्थानच्या प्रथे प्रमाणे निर्धारित दिवशी मंदिरात आणायचा असे ठरले. बाकीची सगळी भांडीकुंडी पूर्वापार रुढीनुसार देवळातच ठेवायची असे सर्वानुमते ठरले. काळवं पडण्याच्या वेळेला दिवाबत्ती करून , आरत्या करून माणसं घरोघर गेली. देवीच्या पाषाणाला हात घालणाराची अवस्था बघून कटात सामिल असलेले सगळेच कमालीचे धास्तावले. रात्री कोणालाच अन्न गेले नाही. सकाळी सगळे जण विचार करू लागले. देवीला नारळ मानवून चुक कबूल करायची नी नाक तोंड घासून माफी मागायची असे ठरवून मंडळी नारळ घेवून गणुभाऊंच्या दारात गेली. गणुभाऊनी मंदिरात गेल्यावर विहीरीवर जाऊन पाणी काढून आंघोळ केली. ओलेत्याने कळशी भरून देवीच्या पाषाणावर ओतली. मग़ गंध उगाळून आवारातल्या तुळशीच्या टिकशा नी जास्वंद , तगरीची फुले काढून आणून यथासांग पुजा केली आणि नंतर बुरुडांसाठी प्रार्थना केली.
गणूभाऊनी जाबसाल घातली नी "तुम्ही नाक तोंड घासून कायती प्रार्थना करा " असे गणुभाऊनी बुरुडाना सांगितल्यावर त्यानी गाभाऱ्या समोर नाकतोंड घाशीत मनोमन आपण देवीचा ऐवज चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याची कबूली देवून यापुढे अशी आगळिक न करण्याची शपथ खाल्ली. मग बाहेर जावून मंदिरा समोर पाळंदीतला धुरळा चिमटीत धरून तोंडात टाकला नी बोटे कपाळावर पुसली. यावेळी देवीच्या उजव्या हातावर वाहिलेले तगरीचे फुल खाली पडलेले गणुकाकाना दिसले. बुरुड आत आल्यावर "पाषाण राजी झाला," असे सांगून त्यानी ठेवलेले नारळ वाढवून पाषाणावर पाणी ओतून सगळ्या कवडींची काठळी काढून थोडे तुकडे बाहेर नेवून तुळशीवृंदावना समोर ठेवले नी चार दिशानी फेकले. ते आत गेल्यावर एक वेगळा नारळ ठेवीत म्होरक्या म्हणाला," भटजीकाका आमचा योक सवंगडी, सटवाजी, तापानी फनफनल्याला हाय तेच्यासाटना जाब घाला........" गणूभाऊनी गाऱ्हाणं केलं. यावेळी पाषाणाच्या डाव्या खांद्यावरची तुळशीची मंजीरी खाली पडली. पाषाण राजी नाही हे गणुभाऊनी ओळखले. त्यानी नारळ फोडून पाणी पाषाणावर ओतले. सगळ्या नारळांच्या शेंडी कडची अर्धुके प्रसाद म्हणून बुरुडाना परत दिली. बुरुड निघून गेले. ते पालावर पोहोचले तेव्हा पाषाणाला हात घालणारा बुरुड मेलेला होता नी पालावर रडारोय सुरू होती.
देवीचा ऐवज चोरणाराना मिळालेला चकवा देवस्थानच्या जागृतीमुळे मिळालेला, देवीने शिक्षा म्हणून दिलेला होता. मात्र काही ठिकाणं , विशिष्ठ जागा बाधिक असतात तिथे ठराविक वेळी, ठराविक दिवशी जो कोण माणूस कचाट्यात गावेल त्याला तिथला कोण देवचार, समंध असेल तो भोवडवल्याशिवाय सोडीत नाही. अशावेळी जेव्हा तिथल्या दुष्ट शक्ती जागृत झालेल्या असतात तेंव्हा गाई - म्हशी, कुत्रे - मांजरे याना त्याची जाणीव होते नी ते प्राणी त्या शक्तीची चतु:सीमा सोडून त्याबाहेरून पुढे जातात . त्यामुळे हे प्राणी सहसा चकव्यात गावत नाहीत. सड्या माळांवर फिरता सोबत ढोर किंवा कुत्रा मांजर असेल तर माणूस चकव्यात गावत नाही. काहीवेळा अशा काही दुष्ट विकृत शक्तींचा फेरा असतो. त्या आपल्या निर्धारित मार्गाने जात असताना वाटेत कोणी माणूस आडवा आला तर त्याला काहीना काही दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यांच्या फेरीचे मार्ग, दिवस, वेळा पूर्वनिश्चित असतात.
गोठीवऱ्याच्या सड्यावर कुंभारांच्या वाडीवरून पुढे गेले की, कातळी भागात पाच सहा मोठ्या खरी आहेत. एका खरीत दोन पुरुष खोल तळप नी एका अंगाला दरडीसारखा भाग आहे. तिथे पोपटी नी गुलाबी मातीच्या रंगाच्या खणी त्यांच्या मागच्या बाजुला धाकू कुंभाराची खरी आहे. त्या खरीत वाटमार्गी राखणा २४ तास पहाऱ्यावर असतो. त्या खरीतून तुम्ही एक काटूक घेवून निघालेत तरी तो तुम्हाला अडवतो अशी शेकडो वर्षांची वदंता आहे. हा धाकू नेमका कधी हयात होता ह्याची काही माहिती नाही. सध्याचे कुंभार हे आपली नववी पिढी असल्याचे सांगतात. पण महसुली कागदपत्रात क्षेत्राचे नाव धाकुची खरी असेच नोंद आहे. एकूण 22 एकर क्षेत्र तीने व्यापलेले असून सभोवार गळाभार उंच पाषाणी बंधारा आहे. कडेनी मिळून सुमारे तीन चतुर्थांश भाग कातळी आहे. वरच्या अंगाने व्हावटीचे पाणी आत यायला नी सखलवटीकडे पाणी निचरून जायला पन्नासेक मुशी आहेत. जोरगतीच्या पावसाच्या पाण्या बरोबर खळमळ व्हावून येते, ती खरीत थावटते नी पाणी निचरून जाते. जोरगतीच्या पावसातही पाऊलभर पेक्षा जादा पाणी तुंबलेले नसते. मळीचा चांगला खप भात, नाचणीची शेती, आले, हळद नी तुरी, उडीद , मूगाच्या पिकाना मिळतो नी जित्रब फळानी शेंगानी लगडून जाई.
दत्त जयंतीच्या जत्रेत धाकुचा वंशज रत्नू कुंभार बैलगाडीभर आले विकायचा. अगदी पहिल्या पावसाला काकडी, चिबूड, भोपळे, गवार ,भेंडी , पडवळाचे बियाणे घालतात. वेल चढवायला आंजणीची नी चिव्याची पातळ शिरड आंथरून दहा- दहा , वीस- वीस हात लांब तटकी बांधून खरीच्या वरच्या अंगाला कातळात मारलेल्या कायमच्या खड्ड्यात खूट पुरून तटकी बांधून ठेवतात. कातळवटीला वेल अती बेचारत नाहीत. गणेश चतुर्थीच्या दरम्याने जित्रब धरायला लागते. खरीतल्या राखणदाराची ख्याती ठावूक असल्याने वाडीतला कोणीच खरीकडे वळत नाही. वांदर, साळींदर, डुकर यांचाही उपाधी होत नाही. सडावळीला अगदी शेवटी ही खरी असल्यामुळे रंगाची माती न्यायला पंचक्रोशीतली माणसे येवून जातात. पण कोणीच तिकडे फिरकत नाही. त्या दिवशी चतुर्थी आधी आठवडाभर भटवाडीतला बबन गोडबोले वस्ताच्या दुकानातून जिन्नस घेवून घरी जाताना रंगाची माती न्यायला खणीवर आला. त्याने दोन्ही रंगाच्या मातीचे गोळे करून ते चांदाड्याच्या पानात गुठाळून पिशवीत ठेवले. तो हात धुण्यासाठी पाणी शोधायला लागला. आठवडाभर पाऊस तोंड घेवून नायसा झालेला. खचरा खोचरात कुठेच टिपूसभरही पाणी दिसेना. पाण्याचा शोढ घेत तो धकुच्या खरी पर्यंत आला. बेळ्याची तटकी सोडून आत शिरला. खूप मागे गेल्यावर एका डुकम्यात (कातळातला छोटासा खड्डा) साठलेले पाणी दिसले. त्याने हात धुतले. ओंजळ भरून तोंडाला लावली. पाणी स्वच्छ नी थंडगार होते. त्याने अधाशासारखे पोटाला तडस लागेतो पाणी प्याले.(क्रमश:)