Chakva - 2 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | चकवा - भाग 2

Featured Books
Categories
Share

चकवा - भाग 2

चकवा भाग 2

           गुरं परतीला लागली त्यांच्या मागोमाग मायलेकरं चालत निघाली नी थोड्याच वेळात घाटीचं उतरण आलं. ही कुठची वाडी काय त्याची ओळख पटेना. पण थोड्याच वेळात घरं दिसायला लागली. पहिल्यानेच लागले त्या घराकडे अनशी निघाली. घरातला कोणतरी बापया आंगणात उभा होता. "भावजीनू , मी  चिचेबुडच्या देवू  परटाची मागारीण..... माजा म्हायार चवान वाडीत बाबू हडकराकडे...... परत येताना आमी वाट चुकॉन हय उतरलंव......." त्यांच हे बोलणं सुरु असताना घरातून दागिन्यानी मढलेली गोरी बाई पुढे आली. " तू  चिचे बुडच्या साईत्र्ये परटीणीची सून ना ग्ये? तुजी सासू  येवची आमच्या कडेन. तुजो घोव पण जीवत आसताना कवटां घेवन् येयाचो. मी  सुमा नार्येकरीण ...... दारूवालो ठकसेन नार्येकर आयकॉन म्हायत आसात तुका, मी तेची दुसरी मागारीण......" 

        आता ओळख पटली.  दारुवाल्या ठकसेन नार्वेकराला दशक्रोशीतले लोक  ओळखीत. साताठ वर्षामागे त्याने दुसरी देखणी बायको केलीन हे पण अनशीला  माहिती होते. ते तिचे कवठाचे नी  कोंबड्यांचे हुकमी गिऱ्हाईक होते. दर महिन्याला  विठू घाडी  टःकसेना साठी  मोठ्यात मोठा कोंबडा असेल तो चढ्यादराने रोख रुपये देवून न्हेत असे. दारूवाली असली तरी त्या माणसांची ख्याती चांगली होती. सुमाने तिला हात धरून न्हेवून ओट्यावर बसवले. माहेराहून परत येताना तिला चकवा कसा मिळाला हे ऐकल्यावर  सुमा म्हणाली, " तरी बेतान भागला....... खयतरी आराच्या पारा जावन् पडलास नाय  तुमी..... आमी दार्येचो धंदो करतंव ह्यो अल्लग विषय....पन आमी काय मानसात्सून उटलेली नाय...... हैसून  तुमच्या घरी जायसर नाय म्हटला तरी दीड घंट्याची चाल हा...... आता काळवा पडला...... ह्येच्या फुडे तुका वांगड द्येवन्  पाटवली तरी  रात व्हणार....... मी चाय करतंय . तवसर आमच्ये बापये येती. आमच्याहारी बत्ती आसा...... तशी तुमी वस्त्येक हय ऱ्हवलास नी उजवाड्ल्यार ग्येलास तरी दुकु चलात. पण तुजा चेडू नी झील वाट बगीत ऱ्हवती. मी तुका वांगड द्येवन्  घरी पोचवतय......" 

             कोकणात सड्या माळाला विशेषत: घाट्या नी उतरणी सुरु होतात त्या माथावळीना असंख्य ठिकाणी असे चकवे आजही आहेत. ह्या काळेवेळेच्या गोष्टी असतात. पण एकदा माणूस चकव्यात गावला की पायाखालची वाटही परकी होते. मिरगाच्या टायमाला पहिले चार पाच पाऊस झाले की पाण्याच्या व्हावट्यानी नेहेमीच्या पायवाटा उमगेनाशा होतात नी माणसं रानभेरी होतात. तुम्हाला तोंडा समोर दिसणारा नजारा तुम्ही उलटे फिरून दहापावलं गेलात की असा काय बदलतो की आपण याच वाटेने आलो होतो हे ही पटेनासे होते. ऐन पाऊसकाळात  दिशा अंधारून येतात नी झिम्माड पाऊस सुरू होतो त्यावेळी सड्या माळावर फिरताना नेहेमीच्या वाटाही परक्या होतात. दसरा झाल्या झाल्या सराईच्या आरंभी गवतं पिकून आडवी पडली की पायवाटांचा मागमूसही नाहिसा होतो नी माणसं  चकव्यात गावतात . 

               कोनशीच्या सड्यावरचे  टेंबलाईचे  देवस्थान  त्या आसमंतात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध. गावतले लोक सधन. कोकणात अगदी आरंभी हापूस कलम लागवड सुरू केली कोनशीतल्या बापू ठाकुरानी. त्यानी पहिली चारशे कलमांची बाग उठवली. आपल्याला टेंबलाईच्या कृपेने बरकत आली अस त्यांचा विश्वास ! त्यानी बावीस तोळ्याची पुतळ्यांची माळ देवीला घातली. नवरात्रीत नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या रुपात सजवीत. त्यावेळी नऊ दिवस रोज वेगळे दागिने घालून शृंगार केला जाई. ते दोन सुपेभरून सोन्या चांदीचे दागिने असत. देवीची प्रभावळही चांदीची होती. हा सगळा ऐवज  मंदिरातच गाभाऱ्या बाहेर लाकडी पेटीत ठेवलेला असे. सणासुदीला मानकरी पुजारी पेटी  खोलून देवीला साज शृंगार चढवीत नी दुसऱ्या दिवशी तो उतरून पेटीत टाकीत. गावातले म्हार बुद्ध झाले, बरेचसे तरणे पोर  मुंबईला म्युनीसीपालिटीत नोकऱ्या मिळवून कुटुंब कबिला घेवून तिथेच स्थाईक झाले. नी दहा बारावर्षात  टोपल्या करंड्या, सुपे , रोवळ्या.  तट्ट्ये ही आयदणे मिळेनाशी झाली. 

             तालुक्याच्या गावी नुकतेच कर्नाटकातले बुरुड येवून बेळाची आयदणं करून विकायला लागलेले. गावच्या पोलिस पाटलानी तालुक्यातल्या दोन तीन कुटुंबाना कोनशीत बोलावून आणले. इथे आवती मलकी काठ्याही विपुल नी  स्वस्त मिळत. त्यांचा एवढा जम बसला की धंदा आटोपेना. मग त्यानी पाव्हण्याना आवतण दिले, नी पाच वर्षात बुरुडांची  पंचवीस तीस खोपटी उभी राहिली. त्यांची वसाहत वाढली नी गावात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणही वाढले. त्यावर्षी नवरात्राच्या उत्सवात देवीच्या पालखीपुढे बुरुडांचे कलाट (क्लॅरिओनेट) नी  ड्रम वाजपी नव्याने रुजू झाले. बुरुडांमधल्या काही बेरकी  लोकानी देवीचे  शेरावारी सोने चांदीचे दागिने नी महिरप काढून न्यायचा बेत आखला. दसरा झाल्यावर आलेल्या पहिल्या अमावास्येपूर्वी  त्यानी कर्नाटकातून खास माणसं मागवून ठेवलेली होती.  ऐवज लांबवून रातोरात तालुक्याच्या गावी न्यायचा नी तिथून ट्रकात बसून बेळगाव गाठायचा बेत होता. तालुक्याला बुरुड वस्ती जवळ ट्रक उभा करून ठेवलेला होता. 

           अवसेच्या रात्री  देवीचे पुजारी संध्याकाळी दिवाबत्ती करून गेल्यावर पाळतीवर राहिलेले चोर देवळात गेले.देवीच्या अंगावरचे दागिने . महिरप नी पेटीचे कुलुप फोडून आतला सगळा ऐवज, देवीच्या समाराधनेला वापरीत ती तांब्या पितळेची भांडी,  सगळा ऐवज तासा दीड तासात चार पाच पोत्यात  भरून  विंचेस्टरच्या चार सेली बॅटऱ्यांच्या उजेडात चोरानी तालुक्याच्या दिशेने चाल धरली. कोनशीतून तालुक्याला जायला अडीच तासाचे मकाण होते. मध्यरात्री पर्यंत तालुका गाठून  उजाडण्या पूर्वी  फोंडाघाट चढून  गारगोटी मार्गे कर्नाटक हा तुरळक रहदारी असलेला सुरक्षित मार्ग त्यानी निवडलेला होता. दोनेक तास  चाल मारल्यावर आपण कुठपर्यंत आलो याचा अंदाज घेण्यासाठी त्यानी आजुबाजूला बॅटरीचे फोकस मारले. उजव्या बाजुच्या फोकसात देवीच्या मंदिराचे उत्तरेकडचे महाद्वार नी  भिंत दिसली. आपण  गोल गोल फिरून परत मंदिराकडे आलो हे म्होरक्याच्या लक्षात आलं. तो त्या भागात वहिवाटलेला असल्यामुळे आता कोणीही पुढे न जाता सगळ्यानी  आपल्या मागून चालावे असा आदेश देवून तो तालुक्याच्या रोखाने चालु लागला. अवसेची रात्र असल्यामुळे गुडुप अंधारात दिशा उमगत नव्हत्या. दोन अडीच तास मकाण मारल्यावरही रस्ता उमगला नाही तेव्हा काहीतरी घोळ झाला हे म्होरक्याच्या लक्षात आलं. साथीदाराना थांबण्याची खूण करून त्याने चारी दिशानी फोकस मारून पाहिले. या वेळी  ते  गावदरीच्या बाजुने येणाऱ्या पाखाडीने मंदिरासमोर पोचले होते. 

               आता काय करायच? अशा चिंतेत पाचही चोर बुडाले असतानाच  एकेकाच्या बॅटऱ्यांचा मसाला संपत येवून फोकस  मंद व्हायला लागले. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. हे म्होरक्याने ओळखले. देवी जागृत आहे म्हणून गेल्या कित्येक पिढ्या देवस्थानचा मौल्यवान ऐवज गावात कोणा मानकऱ्याच्या घरी  न ठेवता   गावदरी पासून लांब एकवशी असलेल्या या देवस्थानात ठेवण्याचा रिवाज होता. धास्तावलेल्या बुरडानी ऐवज भरलेली पोती तिथेच टाकून  पोबारा केला. ऐवज टाकल्यावर मात्र काही आडमेळा न येता  छाती फुटेतो धाव मारीत भिणभिणण्यापूर्वी चोरटे  पालावर पोचले. याबेतात सामिल असणऱ्याना काहीच कळेना. थोड्या वेळाने सावध झाल्यावर आपण रात्रभर मंदिरा भोवती कसे फिरत राहिलो?  नी शेवटी घाबरून ऐवज तिथेच टाकून आपण पळ कसा काढला हे चोरानी सांगितले. त्यांच्यापैकी ज्याने देवीच्या पाषाणाला हात घालून पुतळ्याची माळ, टिक्का, नथ. चौपदरी मंगळसूत्र काढून घेतले होते त्याला थंडी  खावून आली नी सणसणून ताप भरला. पाच पाच वाकळी घालूनही तो थडाथडा उडत होता. दोन तासानी ताप डोक्यात शिरून तो बरळायला लागला. (क्रमश:)