चकवा भाग 4
जरा हुषारी आल्यावर त्याने चौफेर नजर फिरवली. तुरीची ढाकं पुरुषभर उंच वाढलेली होती. तटक्यांवर सोडलेले चवळी, तोवशीचे वेल फुलायला कागले होते. तोवशीच्या वेलावर वीतभर लांब कोवळ्या काकड्या धरलेल्या होत्या. त्याने दोन काकड्या काढल्या. त्या पिशवीत टाकल्या नी कोवळी शिसं (अगदी छोट्या काकड्या) चावीत इकडे तिकडे बारीक नजरेने न्याहाळताना ओथंबून धरलेला पडवळीचा वेल दिसला. धाकुची खरी म्हणतात ती हीच हे त्याच्या लक्षात आले. खरीचा सध्याचा रत्नू कुंभार गेले पंधरा दिवस तीस चाळीस पडवळांचा भारा बांधून गावात नेवून विकीत असे . त्याने दोन पडवळी मोडून ती पिशवीत भरली. खरीतले जित्रब बघून त्याचे डोळेच फाटले. आता तो माघारी जायला निघाला. तो बेळ्यापर्यंत आला नी चार पावलांवरून पिवळाधम्मक साप सरसरत गेला. बबन चरकला. त्याने वाट बदलून डाव्या अंगाने चाल धरली . तिथे गडगा सखल होता त्यावर चढून बाहेर पडायचा त्याचा बेत होता. त्याने सहज खाली नजर केली. पिवळा धम्मक साप फडा उंचावून त्याच्याकडे बघित होता. त्याच्या फडेवरचा आकडा स्पष्ट दिसत होता. बबनने वाटा बदलून चार पाच वेळा बाहेर पडायचे प्रयत्न केले पण दरवेळी मोक्याच्याक्षणी साप त्याला आडावून धरीत असे. उन्हाच्या कडाक्यात फिरून फिरून त्याच्या डोळ्यापुढे रंगाचे ठिपके नाचायला लागळे नी समोरचे काही दिसेनासे झाले. घाशाला कोरड पडली. एक पावूलही पुढे टाकायचे त्राण उरले नाही. जाणीवेच्या अखेरच्या क्षणी खरीची ख्याती त्याला अंधूकशी आठवली. त्याच जाग़ी बसकण मारीत त्याने पिशवीतले पडवळ्याचे तुकडे नी काकड्या बाहेर काढून टाकल्या. पण गडबडीत पडवळ्याचा टोकाकडचा चार आंगळाचा तुकडा पिशवीत मोडून पडलेला होता . पाच मिनीटं इस्वाटा घेतल्यावर जीवाच्या कराराने उठून चालू लागला . आता तीन दिशानी तीन सर्प त्याच्या दिशेने येवू लागले. सत्तरी उलटलेला बबन जीवाच्या कराने वाट फुटेल तिकडे पळताना ठेचकाळून खाली पडला. तोंडातून फेस यायला लागला. त्याला उर्ध्व लागला नी तासाभरात त्याचे प्राणोत्क्रमण झाले.
दुपारचे साडेबारा वाजून गेले तरी नवऱ्याचा पत्ता नाही म्हणताना गडबोलीने देवाची पुजा उरकून घेतली. दीड वाजेतो वात पाहून नवरा येतानी कदाचित दांडेकरांच्या घराकडून यायला निघाला असेल तर त्या माणसानी त्याला जेवायला थांबवून घेतले असेल असा तर्क करून वैश्वदेव उरकून तीने जेवून घेतले. मग तासभर आडवी होवून मागिलदारी बसून ती नवऱ्याची वाट बघित राहिली. साडेतीन पर्यंत तो आला नाही म्हणताना तेने वाडीत जावून विठ्या तांब्याला बोलावून आणले नी वस्ताच्या दुकानापर्यंत जावून चौकशी करून यायला सांगितले. विठ्या वस्ताच्या दुकानावर गेला. बबन सामान घेवून साडेदहाला बाहेर पडला असे कळले. येताना तो दांडेकरांच्या घरावरून चौकशी करून आला. बबन तिथे गेलेलाच नव्हता. तो कुठे गेला, कोणालाच काही तर्क करता येईना. चतुर्थीत त्याचा मुंबईतला मुलगा येवून गेला. त्याने आपल्या मुक्कामात गावभर सगळ्या घरी जावून शोध चौकशी केली पण काही धागादोरा लागला नाही. दसरा झाला नी सराई सुरू झाली. गवतं पिकली. नाचण्याची धाटं सुकली. कुंभाराची माणसं नाचण्याची कणसं वेटायला खरीत गेली.
एक दळा वेटून पुरा होता होता पलिकडच्या दळ्यातून दोन तरस पाय ओढीत धावत सुटले. उजव्या अंगाला गडग्याच्या कोपऱ्यावर पुढे आलेल्या खडपावर चढून ते खरी बाहेर गेले. माणसे कुतुहलाने शोध घ्यायला पुढे गेली तो धोतराचा शेव दिसला. जरा पुढे गेल्यावर दोन अडीच वाव भागात मळवट घातलेली दिसली. धोतराला मध्ये मध्ये कुरतडल्या सारखे धोबळे पडलेले होते. बाजुला फाटलेला सदरा, गंजीफ्रॉक नी नाडीची पट्टेरी डिझाईनची चड्डी नी तपकिरी रंगाची लोकरीची संघिश्ट टोपी होती. बबन गोडबोल्याचा पेहेराव त्याना आठवला. "म्हंज्ये हय येवन् म्येलो गोडबोलो .... कोणीतरी शिक्कामोर्तब केले. त्यानी गावात वर्दी दिल्यावर तासाभरात गावातली जाणती मंडळी जमली. सरपंच नी पोलिसपाटील पोलिसाना घेवून आल्यावर पंचनामा झाला. फक्त हाडे शिल्लक होती. मनगटाच्या हाडावर घड्याळ होते. बोटांच्या हाडात सोन्याची आंगठी, चांदीचे वळे , गळ्यातली चेन नी कानातली भिकबाळी सापडली. शर्टाच्या छातीवरच्या खिशात चष्म्याचे पाकीट त्यात थेवलेली वस्ताकडे घेतलेल्या सामानाची यादी, पिशवीत केंडशी आलेली डाळ, चार पाच मोड आलेले वाळून कोळ झालेले बटाटे , फरसाणाच्या पुडीचा तेलकट कागद, पैशाच्या बटवीत प्लॅस्टिकच्या पाकिटात तीनशे सहासष्ट रुपये, जुनमध्ये डॉ. मराठ्यानी दिलेली प्रिस्क्रिप्शन असा मुद्देमाल हाती लागला. कपडे नी अन्य वस्तू यावरून बबन गोडबोल्याची ओळख पटली. सगळ्या सामानाची गठळी बांधून लोकानी ती गोडबोल्याच्या घरी नेवून पावळीत उंच टांगून ठेवली. कोणीतरी पोस्टमास्तरांकरवी बाबनच्या मुलाला बंकेत फोन लावला. तो दुसर् दिवशी दुपारनंतर बायको मुले नी मुंबईतच असलेल्या दोन्ही बहिणीना घेवून आला. संध्याकाळी भटजीनी स्मशान विधी करून हाडांच्या गाठोळ्याला अग्नि दिला. मग सारी भरणे, बारावे वगैरे सगळे और्ध्वदेहिक विधी उरकून मुले मुंबईला रवाना झाली. पेपरातल्या बातमीमुळे "धाकू कुंभाराची खरी " जिल्हाभर प्रसिद्ध झाली.
कोकाट्याच्या बाबुवर भवानीचं वारं यायचं. गावातली भवानी ही इनामी देवता. अर्धा गाव देवीला इनाम दिलेला. पेशव्यांच्या काळापासून देवीला सरकारातून वार्षिक १२५ रुपये तेलबत्तीसाठी म्हणून मिळत. पुढे पेशवाई गेली तरी सरकारी इनाम चालूच राहिलं. अगदी आजही मामलेदाराकडून रक्कम आदा केली जाते. देवीचे मुख्य मानकरी गोडबोले, देवीचा संचार व्हायचा ती पाटण्यांची घरवड आणि पूर्वसत्तेची पुजा देखभाल करणारी गुरवाची घरवड , देवीसमोर भोत जाळण्यासाठी तेल काढ्होन द्यायचा मान असलेली रावतांची घरवड त्याखेरीज गेल्या सात पिढ्या वंश परंपरेने देवीची पूजा करणारे मराठे हे देवीचे मुख्य मानकरी.
मंदिरात मुख्य गाभाऱ्यात दीडहात उंच काळ्या पाषाणाची शाळुंका होती ती स्वयंभू भवानी, तीला राजसत्ता म्हणत. गाभाऱ्यासमोर सभामंडपाच्या एका कोपऱ्यात चार हात औरस चौरस चबुतरा होता. त्याच्या मध्यभागी दीड वीत उंच शाळुंका होती ती पूर्वसत्ता, आकारी.तुच्या पुजेचा मान गुरवाकडे असायचा.
दर शुक्रवारी संध्याकाळी देवीची आरती व्हायची. त्यावेळी कोकाट्यावर भवानीचं वारं यायचं. आरत सुरु होण्यापूर्वी आकारीच्या बाजुला असलेल्या खांबाला तीन हात लांब मोठ्या कवड्यांची माळ लटकाऊन थेवलेली असायची . ती गळ्यात घालून तो आकारीच्या उजव्या कोपऱ्या हातभर उंच जीता वाळवीचा भोंबाडा होता. त्याच्या टोकाकडची नखभर ओली माती नखलून ती कपाळावर लावी. मग तो घुमायला लागे, पाचेक मिनिटं आकारीच्या पुढ्यात पिंगा घातल्यागत घुमल्या नंतर आकारीच्या समोर असलेला पाचमणी लोखंडी गोळा छाती अगळ उचलून दण्णकन खाली टाकी नी मोहरा वळवून धावत पोवळीत जावून मंदिराला प्रदक्षिणा घालून येत असे. लोखंडी गोळादोन दांडग्या गड्यानाही मुष्किलीने भुईसांड व्हायचा इतका जड होता. पण संचार झाल्यावर बाबू तो उचली, ही देवीचा संचार झाल्याची साक्ष मानीत. मंदिराला प्रदक्षिणा घालून बाबु आत आला की, मानकरी मोरपिसांचा कुंचला आणून त्याच्या हातात देत. त्याने तो भवानीला वारा घालायला लागला की आरत सुरू होई. आरत्या संपल्यावर पुजारी देवीच्या अंगारा लावून त्याच्या हातावर तीर्थ घालीत. तीर्थ घेवून तो परत आकारीच्या समोर जावून गल्यातली कवडीची माळ काढून खांबाला लटकावी तेव्हा कुड मानव कळेत येई.
मळ्यात देवीला इनामत दिलेली जमीन होती. त्यापैकी पंचवीस एकर मातब्बर तुकडा त्याला देवीचे भाटले म्हणत. त्यातली दोन एकर पुजेचा मेहनताना म्हणून मराठ्याच्या ताब्यात होती नी उरलेली देवस्थानचा उत्सव, वार्षिके नी इतर देखभाली साठी गोडबोल्यांच्या ताब्यात होती. दुसरा तुकडा मळ्याच्या पश्चिम अंगाला होता त्याला मुगडी म्हणत. (क्रमश:)