चकवा अंतिम भाग 6
तासभर दम खावून ते उतरणावरून पुढे निघाले. गावकुसाजव्ळ गेल्यावर कोंबड्याची बांग ऐकू आली. आता चांगलं फटफटायला लागलेल होतं. दमा दमाने अंदाज घेत ते पुढे निघाले नी थोड्या अंतरावर वहाळ लागला. एकाने परिसर ओळखला...... ह्यो नाडणचो व्हाळ सो वाटता....... म्हंजे आमी विजेदुर्गाकडे न जाता उलट्या दिशेन नाडणात इलव.... म्हंजे आमका बत्ती दिसली ती गडारची नव्हती..... देवगडची हुती.....अंदाज खरा होता. ते नाडणात आले होते. आता चांगलं दिसत होत. त्यानी चांभारघाटीच्या दिशेने मोहरा वळवला. तासाभराने परबाचं होटेल उघडलं. चुकार माकार माणस यायला लागली होती. सकाळच्यावेळी हे शिख़ इथे कसेकाय आले ? म्हणून माणसं वळून वळून त्यांच्याकडे पहात होती. आता त्यानी बेत बदलला. विजयदुर्गा ऐवजी देवगड गाठून तिथून बोटीने मुंबईला रवाना व्हायच ठरवलं. चहा बटर खावून ते वाटेला लागले. तासाभराने वाडातर गाठून तरीने पलिकडे होवून त्यानी देवगड गाठल.
अवेळ होवून गेला तरी बाबु दुध घेवून आला नाही म्हणताना त्याचा
धाकटा भाऊ बागेत आला. बाबु निसूर झोपलेलाच होता. त्याला ढोसून ढोसून जागा केल्यावर महत प्रयासाने तो उठून बसला. वासरं नी गायी हंबरत होत्या. गुरानी नाचून नाचून शेणाचा नुसता राडा झालेला होता. भावाने दुभत्या ढोराना एकेक करून पडवीत बांधून दुधं काढली . आता मशेरी लावून तोंड धुवून बाबू आला. गुरं सोडून दोघानीही गोठा झाडून काढला नी घरची वाट धरली. त्यांच्या मागोमाग कुत्रा निघाला. " बाबु दुसरो कुत्रो खंय दिसत नाय......." भाऊ म्हणाला. त्यावर बाबु उत्तरला "गेलोअसात वाडीत .... राती हुतो " कटात सामिल असणारांपैकी गाडीवाला सकाळची न्हेरी खाल्ल्यावर मुंबईकरांसाठी चटणी भाकरीची शिदोरी घेवून गाडी जुंपून गडावर जायला निघाला. पुरळ तिठ्ठा आल्यावर गवळदेवाजवळ गाडी थांबवून मुंबईकरांची वाट बघायला लागला, अर्धातास वाट बघून त्याने गवळदेवाच्या आजुबाजूला खूप शोध घेतला पण काय मागमूस लागेना. तेंव्हा ते कदाचित रस्त्यात गाठ पदटील म्हनून तो विजयदुर्गापर्यंत गेला. संध्याकाळी बोट सुटून गेली तरी त्यांचा मागमूस लागेना म्हणताना चितागती होत तो गावाकडे निघाला.
सकाळी कोणालातरी मळ्यात मरून पडलेला कुत्रा दिसला. त्याचे पोट फाटलेले होते म्हणताना बघणाराला काय उलगडा होईना. कटात सामिल असणाराना बाबु शाबूत आहे, त्याच्या केसालाही धक्का लागलेला नाही हे कळल्यावर ठरलेला बेत कसा काय बारगळला याचा काहीच अंदाज लागेना. रात्री विजयदुर्गात गेलेला गाडीवाला आल्यावर तर कटकऱ्यांची बेचैनी भलतीच वाढली. रात्री उत्तरादाखल त्यानी इशारत दिली त्याअर्थी ते मळ्यात आलेले होते हे नक्की...... पुढे त्यानी ठरलेल्या बेताप्रमाणे बाबुवर हल्ला कां केला नाही.....? जात्या बोटीसाठी ते विजयदुर्गात कांआले नाहीत....... बरं अन्य कुठेही त्यांचा मागोवा लागत नाही म्हणताना नेमकं काय घडल असावं कसलाच अंदाज लागेना. चार दिवसानी अकल्पितपणे चांभार घाटी जवळचा तानाजी परब देवधर दुकानावर कोणाशी तरी बोलताना कटकरांपैकी एकाने ते ऐकलं. त्या दिवशी पाच शिख उजाडताना नाडणाच्या वाटेने चांभार घाटीवर थांबले होते. परबाच्या हॉटेलात चहा बटर खावून ते वाडातरीकडे चालत गेले. हे ऐकल्यावर ऐकणाराला खूण पटली. काही कारणाने बेत बदलून ते देवगडला गेले असा अंदाज त्याने बांधला. म्हणजे बेत पार पडला नाही तरी ते सुखरूप मुंबईला रवाना झाले हे त्याने ओळखले.
शुक्रवारी देवीचा संचार आला. एरव्ही कूड काहीच वदत नसे पण या वेळी देवळाला प्रदक्षिणा घालून देवी समोर आल्यावर कुड बोलायला लागली..... “माजी कुड , तेका मारूक हुंबयचे पाच मारेकरी ‘मान्ता’ करून बांदिलकी करून अवसे रोज इलेले हुते ...... तेका मारून इनामत जमिनीवर कब्जो घेव साटना तेच्याच वसातले ल्वॉक फिरून पडले......पूर्व सत्तेन तेका वाचवल्यान..... कुत्र्याचा रगात देवन् ‘मान्ता’ पुरी झाली.....” फार तपशिल ऐकणाराना आकळला नाही....... आरत झाल्यावर मराठ्यानी जाबसाल घातली. " भवानी माते तुजी इनामत जमिन , पण ती कुळानी खाल्लानी....... तु तेंका काय्येक आरेख़ घतलंस नाय.... आमी काय करणार? राज सतीपुढे कोणाचाच इलाज चालत नाही. " त्यावर देवीचा संचार वदला, " तुमी ह्येच्या संबंदात माका कदी सांगणा करून जाब घतलास काय? तुमी जाब घाला मगे मी फुडचो विलाज करीन नी माजी इनामत सोडवून घ्येयन......" आरत संपल्यावर जमलेल्या मंडळीनी देवीला जाब घातला." भवानी माते, तुजी इनामत , त्येतूसून तुकाच भायरी करून जे बळकावून बसलेहत तेंका तू धडो शिकव......" पुढच्या महिनाभरात कशी काय सूत्रं फिरली देवीच जाणे! पण ज्यानी गैर मार्गाने इनामत जमीन बळकावलेली होती त्यानी बिन बोभाट कबजा सोडून इनामत मोकळी करून दिली.
शिमग्यात कटातले दोघेजण गावी आले नी त्यानी साथीदारांकडे सगळा उलगडा केला. येण्यापूर्वी बंगाली पंचाक्षरी गाठून त्यानी 'मान्ता' केलेली होती म्हणून ते शाबूत राहिले. सगळ्यानीच भवानीला नारळ ठेवून चुक कबूल करून नाक तोंड घासून माफी मागितली. गावोगाव लोकवार्तांमधून अशी जागृत देवस्थाने सर्वश्रुत झालेली असतात. त्यांच्या चतु:सिमेत कोणी काही आगळिक केली तर संबंधिताला त्याचे दुष्परिणाम फलस्वरूप भोगावे लागतात. नी हे चक्र हजारो वर्षे अव्याहत सुरु राहून प्रत्यंतर देत रहाते. काही गावात अशा जागृत देवस्थानांच्या परिसरात असणारा समाज सहसा पिढ्यानुपिढ्या रूढ झालेल्या संकेतांचा भंग करू धजावत नाही. चुकून माकून अशी आग़ळिक झाली तर क्षमायाचना केल्यावर संबंधिताला कठोर परिणामांपासून सुटका मिळते. म्हणून रूढ संकेतांच्या विरुद्ध जावून जावून त्याचे देवस्थानाच्या जागृतीची प्रचिती घेण्याच्या फंदात सूज्ञ माणूस सहसा पडत नाही.
(समाप्त)
*********