चाळीतले दिवस भाग 13
माझी चिंचवड दूरध्वनी केंद्रातली नोकरी सुरु होऊन एक महिना उलटून गेला होता.आमच्या केंद्राचे प्रमुख कृष्णासर होते. त्यांना ऑफिसने दिलेले घर आमच्या केंद्राच्या आवारातच होते त्यामुळे घराच्या बाल्कनीत बसूनच कोण ऑफिसला उशीरा आले ते त्यांना समजायचे.
सकाळी सातच्या ड्युटीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे.स्वभावाने अत्यंत खडूस असलेल्या या साहेबांकडून सकाळी सात वाजून पाच मिनिटाने जरी ऑफिसला पोहोचलो तरी वॉर्निंग लेटर मिळायचे.असे तीन मेमो मिळाले की एक रजा वजा व्हायची.
येरवडा ते चिंचवड सायकल कितीही जोरात दामटली तरी सातच्या ड्युटीवर पोहोचायला उशीर व्हायचा.नवीन असल्याने जास्त करून हीच ड्युटी माझ्या वाट्याला यायची.सुपवायझरसुद्धा भरपूर फायरिंग करायचे त्याचा त्रास व्हायचा.
एक दिवस माझ्याकडे माझ्यापेक्षा सहा महिने आधी नोकरीला लागलेला पटवर्धन नावाचा मुलगा आला.तो पुणे स्टेशन जवळच्या कॅन्टोन्मेंट दूरध्वनी केंद्रात नोकरी करत होता.मी त्याला ओळखत नव्हतो,पण माझ्या नावाची चौकशी करत तो माझ्याकडे आला होता.
पटवर्धन ड्युटीसाठी पिंपरीत राहून पुणे स्टेशनला सायकलवर जात होता आणि माझ्यासारखाच प्रवासाला वैतागला होता.मला त्याने त्याच्याबरोबर अदला बदली करणार का असे विचारले.
अशी एकमेकात बदली होऊ शकते हे मला माहीतच नव्हते! मी त्याला माझ्या अज्ञानाबद्दल कबुली देऊन टाकली. पटवर्धन कानडीभाषिक होता. आमच्या खात्यात बरेचसे अधिकारी कानडी तेलगू किंवा मल्याळी होते, त्यामुळे त्याची वरच्या बऱ्याच अधिकाऱ्यांशी ओळख होती.मी फक्त त्याने लिहून आणलेल्या अर्जावर सही करायची होती,बाकी सगळ्या गोष्टी तो करणार होता.माझ्यासाठी ही उत्तम संधी होती मी आनंदाने त्याने आणलेल्या पेपरवर सही करून टाकली.
तीन चार दिवसांतच माझी त्याच्या जागेवर आणि त्याची माझ्या जागेवर बदली झाल्याची ऑर्डर निघाली आणि पुढच्या दोन दिवसांत मी नवीन केंद्रात कामावर हजर झालो!
आता मला ऑफिसला जाण्यासाठी नागपूर चाळ ते पुणे कॅन्टोन्मेंट असा फक्त सात किलोमीटर प्रवास करावा लागणार होता.माझे अर्धवट राहिलेली बी एस्सीची सेमिस्टरसुध्दा पूर्ण करणे शक्य होणार होते.कुठली तरी अज्ञात शक्ती मला मदत करते आहे असा विश्वास अजूनच दृढ झाला होता.
चिंचवडचे केंद्र छोटे होते त्या मानाने कॅन्टोन्मेंट केंद्र खूपच मोठे होते.इथे चिंचवडपेक्षा जास्तच कडक शिस्त होती.मुख्य सुपरवायझर महाडिक मॅडमचा प्रचंड दरारा सगळ्या स्टाफवर होता.मी पहिल्या दिवशी ड्युटीसाठी मॅडमसमोर गेलो तेव्हा मला वरपासून खालपर्यंत न्याहाळात म्हणाल्या. ..
“ मिस्टर दुधाळ,कशाला सुखाचा जीव दुःखात घातलात.चिंचवडला काम काहीच नव्हते,इथे मात्र खूप काम करायला लागेल! ”
“ हो मॅडम. ”
मी त्यांना उत्तर देऊन मला दिलेले काम सुरु केले.
पहिल्याच दिवशी मॅडम जे म्हणाल्या त्याचा प्रत्यय यायला लागला.इथे प्रचंड काम होते.
मला मुळातच नवीन गोष्टी शिकायला आवडत त्यामुळे साधारण पंधरा दिवसांतच सगळे काम शिकून मन लाऊन मी माझी ड्युटी करू लागलो.
महाडिक मॅडमच्या हाताखाली पाच सुपरवायाझर होते त्यांनाही मॅडम सोडायच्या नाही.कुणाचीही त्या गय करत नसत.वेळेच्या बाबतीत त्या खूप काटेकोर होत्या.ड्युटीला उशीरा येणे, कामात चूक करणे, एकमेकांत गप्पा मारणे या बाबीं त्या मुळीच खपवून घ्यायच्या नाही. त्या कायम फायरिंग मोडवर असायच्या त्यामुळे आमच्या सुपरवायाझर्ससहीत सगळे त्यांना घाबरायचे.
इकडे बदली झाल्यामुळे माझा प्रवासाचा वेळ वाचायला लागला होता.मी केलेले काम महाडिक मॅडमना आवडायला लागले आणि लवकरच माझ्यावर विश्वासाने त्या महत्वाची कामे सोपवू लागल्या.
दुपारची शिफ्ट घेऊन मी सकाळी कॉलेजच्या प्रॅक्टिकल्सला हजेरी लावू लागलो. सकाळी सहाला नागपूर चाळीतून सायकलवर गरवारे कॉलेजला प्रॅक्टिकल्स,जमले तर एखादे लेक्चर आणि जेवायच्या वेळेला ऑफिसचे कॅन्टीन, इथली स्वस्त राईस प्लेट खाऊन दोन वाजता ड्युटी आणि रात्री नऊ नंतर पुन्हा नागपूरचाळ अशी दैनंदिनी सुरु झाली.
सकाळी सातची ड्युटी लागली की प्रथम ऑफिसला आणि दुपारी कॉलेजला अशी दौड व्हायची.कधी कधी संध्याकाळी पाच ते सकाळी सात अशी डबल ड्युटीही करायचो.अशी डबल ड्युटी केली की त्या दिवशीच्या सकाळी सात पासून दुसऱ्या दिवशीच्या पाच पर्यंत सुट्टी!
मग ते दोन्ही दिवस मंडळाच्या पोरांच्याबरोबर सिनेमा,कुठे कुठे भटकंती व्हायची.
कमी पगाराची का होईना,पण सरकारी नोकरी मिळाल्याने जीवनाच्या लढाईत दोन हात करण्यास आवश्यक असलेला आत्मविश्वास हळूहळू वाढायला लागला होता.
(क्रमश:)
प्रल्हाद दुधाळ