Revolver - 3 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | रिव्हॉल्व्हर - प्रकरण 3

Featured Books
Categories
Share

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 3


प्रकरण ३

दहाच्या ठोक्याला ऋता पाणिनीच्या ऑफिसात हजर झाली.

“ कार्तिक कामत ची खबरबात समजल्ये.” पाणिनी म्हणाला.

“ कुठे आहेत ते?” ऋता म्हणाली.

“ त्याचा मला देवनारहून फोन आला होता.मी त्याच वकीलपत्र घ्यावं असं त्याचं म्हणणं आहे.या क्ष ला मी भेटावं आणि एकंदरित त्याचा अंदाज घ्यावा, परिस्थितीचाही आढावा घ्यावा असं त्याचं म्हणणं आहे.हे मी केल्याशिवाय तो त्याच्या शेअरची किंमत नक्की करणार नाही.ठीक आहे ना हे तुझ्या दृष्टीने? ”

“ माझ्या मनात जे होतं त्यानुसार हे नाहीये पण कामत सरांना जे योग्य वाटत असेल त्याला माझी ना नाही.” ऋता म्हणाली.

“ आता ही क्ष व्यक्ती कोण आहे आणि कुठे भेटेल मला हे तू सांगू शकशील का?” पाणिनीने विचारलं.

तिने क्षणभर विचार केला,मग जरा निश्चय केल्या प्रमाणे, म्हणाली. “ त्याच नाव गंधर्व चांडक आहे.त्याला मी ९४८ चर्च रोड वरच्या फ़्लॅट नंबर २११ अग्नेय अपार्टमेंट इथे आज रात्री साडे आठ वाजता भेटायचं ठरलंय.माझ्या वतीने कामत न सांगा की आज मी क्ष ला भेटीन ते फक्त परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे दृष्टीने.” ऋता म्हणाली आणि पाणिनीला शेक हँड करून अचानक बाहेर पडली.

ती गेल्यावर सौंम्या म्हणाली, “ ती अचानक गेली याचा अर्थ तुम्ही तिला काहीतरी विचारणार याची तिला भीती वाटत असावी.” पाणिनी काहीतरी बोलणार तेवढ्यात सौंम्या म्हणाली.,

“ मी बाहेर जाऊन आपल्या गती शी बोलून येते, तिला आपल्या अशीलाबद्दल काय वाटतंय ते.”

बोलता बोलता ती बाहेर गेली.आणि थोड्या वेळाने आत आली तेव्हा तिच्या हातात वर्तमानपत्र होतं. त्यातली बातमी आणि फोटो दाखवत सौंम्या म्हणाली,

“ सर, तिच्या जाण्याचं रहस्य समजलं. कार्तिक कामत चा मुलगा, कुमार, जो ऋता चा मित्र आहे, काल ब्रम्हपूर हून परत आलाय आणि येतांना लग्न करून आलाय, बरोबर आपल्या पत्नीला घेऊन आलाय.”

पाणिनीने बातमी वाचली आणि फोटोही पहिला. “ चांगली दिसत्ये बायको.”

“ ती देवनार मधल्या एका मोठ्या हॉटेलात मॉडेलिंग करायची. कार्तिक कामत चा मुलगा तिला दोन महिन्यापूर्वी प्रथम भेटला असं बातमीत म्हटलंय.”

“ फार पटापट हालचाल केलेली दिसत्ये त्याने.” पाणिनी म्हणाला.

“ त्याने किंवा तिने.” सौंम्या म्हणाली.

“ पटकन डॉल्बी हॉटेल ला फोन करून कार्तिक कामत मागून घे.तो नसला तर वैखरी नावाच्या मुलीला फोनवर घे.कार्तिकला कळवायची व्यवस्था कर की त्याला ज्या व्यक्तीचा तपशील हवा होता त्याचं नाव गंधर्व चांडक, असं आहे आणि पत्ता, ९४८ चर्च रोड अग्नेय अपार्टमेंट नंबर २११. असा आहे.” पाणिनी ची सूचना ऐकताच सौंम्या पटापट फोन लावायला बाहेर गेली. दहा मिनिटात ती परत आली आणि म्हणाली., “ फोन लागला हॉटेल ला पण कार्तिक शी संपर्क नाही झाला.म्हणून मी जिने फोन घेतला, त्या रिसेप्शानिस्ट मुलीला म्हणाले की कार्तिक नसतील तर वैखरी ला द्या फोन.तर ती म्हणाली, मीच वैखरी आहे.मग तिला मी गंधर्व चांडक च नाव सांगितलं.”

पाणिनी पटवर्धन विचारात पडला.

“ सर आता काय करायचं ठरवलंय तुम्ही पुढे?”

“ सद्य स्थितीत ऋता ने गंधर्व चांडकला भेटण्यापूर्वी मी आज संध्याकाळीच त्याच्याशी बोलणे आवश्यक आहे. तू कार्तिक च्या कुमारसाठी काहीतरी भेट पाठव लग्नाबद्दल.” पाणिनी म्हणाला.

“चांडक तुमच्याशी बोलेल का? ” सौंम्या.

“ माहित नाही मला, पण मी त्याच्याशी बोलेन हे नक्की. ” पाणिनी म्हणाला.

**************

बरोबर आठ वाजता पाणिनी फ़्लॅट नंबर २११, गंधर्व चांडक असं लिहिलेल्या दारासमोर उभा होता.त्याने बेल वाजवली.लगेचच आतून आवाज आला. “ कोण आहे?”

“ मी पटवर्धन.”

“ काय काम आहे?”

“भेटायचं आहे. ”

“ कारण काय आहे?”

“ शेअर्स बद्दल आहे.” पाणिनी म्हणाला.

 आतली कडी काढल्याचा आवाज आला.“ येस? ” दार उघडल्यावर आतल्या माणसाने विचारलं.

“ तुम्हीच चांडक?” पाणिनीने विचारलं.

“ हो.”

“ मी कार्तिक कामत चा प्रतिनिधी आहे. ओळखीचं वाटतंय नाव?” पाणिनीने विचारलं.

“ ओह ! आत या मिस्टर पटवर्धन. मला हा शुभ शकुनच आहे.” तो माणूस मागे सरकून पाणिनी ला आत यायला वाट देत म्हणाला.

पाणिनी आत आला.त्याने चांडक कडे निरखून बघितलं.तो साधारण पस्तीशीच्या घरातला माणूस होता.

“ तुम्हाला माझा पत्ता कसा मिळाला?” त्याने आश्चर्याने विचारलं.

“ वकील आहे मी.” पाणिनी म्हणाला. जणू काही त्याच्या या विधानातच चांडक च्या प्रश्नाचं उत्तर होतं.

“ ते ठीक आहे पण माझा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच........ ओह ! तुम्ही अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन तर नाही?”

“ बरोबर आहे.”

 चांडक ने पुढे होऊन पाणिनी चा हात आपल्या हातात घेतला. “ खूप आनंद झाला, काय घेणार तुम्ही?” तो म्हणाला.

“ मी घाईत आहे जरा, काही नको.” पाणिनी म्हणाला.

“ खर तर मी पण जरा गडबडीत आहे. मला बाहेर निघायचंय, आपण मुख्य विषयावर बोलूयाका ?”

“हरकत नाही माझी. ” पाणिनी म्हणाला. “ कंपनीच्या शेअर्स च्या विभागाणीबद्दल तुम्हाला कल्पना आहे का? ” पाणिनीने विचारलं.

“ माझ्याकडे ४५% वाटा आहे.तुमच्या अशीलाकडे १५% आणि ऋता रिसवडकर कडे ४०%”

“ बरोबर ” पाणिनी म्हणाला.

“ आता तुम्हाला डायरेक्ट विचारतो, पटवर्धन, आपला हिस्सा विकायला कामत किती घेईल?” --चांडक

“ तुमचा प्रस्ताव कितीचा आहे?”

“ १५% साठी मी तीस लाख देईन.”

“ त्याची किंमत याहून जास्त आहे.” पाणिनी म्हणाला.

“ यात प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात.मी तीस लाख एवढ्याच साठी म्हणतोय की त्यामुळे मला कंपनीवर ताबा मिळवता येईल, म्हणजे नियंत्रण.” --चांडक

“ माझ्या अशीलाशी मी बोलून पाहीन पण मला नाही वाटत तो कबूल होईल.”  

“ मी जास्तीत जास्त देता येईल तेवढी ऑफर दिल्ये.ती फायनल आहे. आणखी एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, मला रस आहे तो कंपनीवर नियंत्रण मिळवण्यात, त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही मार्गाने ते मिळालं तर माझी ही ऑफर रद्द होईल म्हणजे त्या केस मधे मी कामत चा हिस्सा मला वाटेल त्या किंमतीला खरेदी करीन.”

“ मला नाही वाटत तसं.” पाणिनी म्हणाला.

 “ का?” चांडक ने विचारलं.

 “ कारण अल्पसंख्यांक सुद्धा किती त्रास देऊ शकतात याची तुम्हाला कल्पना नाहीये.”

“ उलट तुम्हालाच कल्पना नाहीये पटवर्धन,तुम्ही कुठल्या प्रकारच्या लोकांशी व्यवहार करताय ते. ” चांडक म्हणाला.

“ हे तुमच्याही बाबतीत होऊ शकतं.तुम्हालाही कल्पना नाहीये की पलीकडील लोक कसे आहेत.”

“ पटवर्धन, वैयक्तिक खुन्नस आपण बाजूला ठेऊन फक्त व्यावहारिक गोष्टी करुया. कारण तुम्ही उगाच दुखावले जाल.”

“ दुखावला वगैरे जाण्याची मला मुळीच भीती नाहीये.मी सहज सहजी भीत नाही कशाला.कोदंड रिसवडकर चा खून झाला, तुम्ही लोकांनी घाबरलेल्या शेअर होल्डर्स चा हिस्सा खरेदी केलात.पण कामत घाबरलेला नाहीये आणि मी सुद्धा.”

चांडक जरा विचारत पडून गप्प बसला. आणि थोड्या वेळाने म्हणाला, “ मला काहीही कटकटी नको आहेत.”

“ मग त्या मागे लावून घेऊ नका.मी निक्षून सांगतो की कामत तुम्हाला त्याचा हिस्सा विकणार नाही, जेणे करून तुम्ही कंपनीवर ताबा मिळवाल आणि रिसवडकर चा हिस्सा तुम्हाला तुमच्या मना नुसार खरीदता येईल.ऋता रिसवडकर सोबतच्या व्यवहाराचा भाग म्हणून आम्ही तुम्हाला कामत च्या हिश्याचा प्रस्ताव देऊ. ” पाणिनी म्हणाला.

 चांडक खुष झाला आणि एकदम म्हणाला, “ आम्ही तिलाही तेवढीच रक्कम देऊ जर तुम्ही......”

तेवढ्यात फोन वाजला. “ सॉरी, मी जरा आधी फोन घेतो.” चांडक म्हणाला. आणि दुसऱ्या खोलीत गेला.पाणिनीला ऐकू आलं की फोन वर चांडक म्हणत होता, “ नाही, नाही, तुम्ही नाही करू शकत.अत्ता नाही.” नंतर तो खूप हळू आवाजात बोलत बसला पाणिनीला आता शब्द ऐकू येत नव्हते. “ मला... मला.. दोन मिनिटं दे.” चांडक म्हणाला आणि त्याने फोन बंद केला तेवढ पाणिनीला ऐकू आलं.

“ माफ करा पटवर्धन, पण मला आता आपली ही मिटिंग संपवून निघावं लागतंय, काही तातडीचं काम निघालय.” चांडक म्हणाला.

“ ठीक आहे ” पाणिनी उठून उभा रहात म्हणाला. “ आपण फोन वर बोलू.मला तुमचा नंबर द्या.”

“ सॉरी, मी नाही देत कुणालाच.”

पाणिनी त्याला प्रत्युत्तर न करता आणि चांडक कडे न बघता, बाहेर जायच्या ऐवजी दाराच्या मुठीवर हात ठेऊन थांबून राहिला.

“७८६५३४११” चांडक चा आवाज त्याने ऐकला आणि पाणिनी बाहेर पडला.पाणिनीच्या लक्षात आलं की जातांना चांडक ने दार ओढून बंद केलं पण त्या दाराला स्प्रिंग चे लॉक नव्हतं. बाहेर येऊन पाणिनी थोडा वेळ आपल्या गाडीतच बसून राहिला त्याची नजर दारावरच होती.अचानक थोड्या वेळाने कार्तिक कामत आपली गाडी घेऊन त्याच अपार्टमेंट मधे येताना दिसला.गाडीचा हॉर्न वाजवून कामत चं लक्ष वेधून घेण्याचा मोह पाणिनीला झाला पण त्याने आपला विचार बदलला आणि काय घडतंय ते पहात राहिला. इमारतीच्या बाहेरचं गेट कामतने आपल्या जवळच्या किल्लीने उघडलं आणि इमारतीत प्रवेश केला. चार पाच मिनिटांनी तो परत इमारतीच्या बाहेर पडला.आपली गाडी काढताना तो वैतागला कारण त्याच्या पुढे एक गाडी त्याच्या गाडीचा मार्ग अडवून उभी होती.आता पाणिनीने दोन वेळा हॉर्न वाजवून त्याचं लक्ष वेधायचा प्रयत्न केला पण कामत आपली गाडी बाहेर काढण्यात एवढा गुंतला होता की त्याचं हॉर्न कडे लक्ष गेलं नाही. कामत कसाबसा पार्किंग च्या बाहेर पडतो न पडतो तोच ऋता रिसवडकर गाडी घेऊन आली. कामत बाहेर पडत असतांना तिने पाहिलं असाव पण फारसे लक्ष तिने दिले नाही.तिने पाणिनी च्या गाडीकडेही पाहिलं नाही आणि ती अपार्टमेंट च्या मेन गेट पाशी गेली.मेन गेट वरची बेल ती दाबणारच होती तेवढ्यात एक चाळीशीची लठ्ठ स्त्री आतून बाहेर येत होती तिने ऋता साठी दार उघडलं.पाणिनी तिथे गाडीत बसून असे पर्यंत फक्त पुढच्या मेन गेट मधून कामत आणि ऋता हेच दोघे आत येतांना आणि ती लठ्ठ स्त्री बाहेर पडतांना त्याला दिसले होते.आता अंधारलं होतं.मिनिटाभराने पाणिनी ने आपली गाडी चालू केली आणि त्या इमारती भोवती फिरून पुन्हा पुढच्या दारापर्यंत आला.ऋता ची गाडी अजून तिने लावली होती तिथेच होती. त्याने पुन्हा गाडीतून इमारती भोवती चक्कर मारायचं ठरवलं.अर्ध्या फेरीत असतांनाच इमारतीच्या मागच्या बाजूच्या जिन्यातून एका स्त्रीची आकृती पळत पळत जिना उतरताना दिसली.पाणिनीने आपल्या गाडीचा वेग एकदम कमी केला. ती स्त्री गल्लीत घुसली.तिथून मुख्य रस्त्यावर आली तिथे उजेड होता.तिने नाईलाजाने आपला वेग कमी केला.पाणिनीने सराईतपणे तिच्या मागून आपली गाडी आणून तिच्या अगदी जवळ उभी केली.

 “ सोडू का तुम्हाला कुठे मिस रिसवडकर?” त्याने विचारलं.

ती स्त्री दचकून एकदम मागे गेली. “ ओह ! मला घाबरवलत तुम्ही !” ती म्हणाली.

“ चला बसा आत मी तुम्हाला तुमच्या गाडी पर्यंत सोडतो.” पाणिनी म्हणाला. “ बर,तुम्हाला ऑफर मिळाली?” सहज बोलतो आहे असं भासवून पाणिनी म्हणाला.

“ हो. तीस लाखाची. तो म्हणाला की तो एवढीच देऊ शकतो. ”

“ रोख स्वरुपात?” पाणिनीने विचारलं.

“ हो. तुम्ही काय करत होता इथे?”

तुम्ही किती वेळ होतात तिथे?” तिने विचारलं.

“ मी चांडक ला भेटलो.” पाणिनी म्हणाला.

  “ किती वेळ होतात तिथे? ”

“ होतो थोडा वेळ.”

“ मला चांडक बोलला नाही तुम्ही भेटलात म्हणून. तुम्हाला ऑफर दिली त्याने?” ऋता म्हणाली.

“ हो.”

“ कितीची?”

“ ते तुला कार्तिक कामत ने सांगण योग्य होईल.”

“ का?” ऋता ने विचारलं

“ वकील म्हणून माहिती मिळवायचं माझं काम आहे.मिळालेली माहिती दुसऱ्याला देणे हे माझं काम नाही.”

“ अच्छा.” ऋता उद्गारली.

“ तू त्याचा प्रस्ताव मान्य केलास?” आपली गाडी पुन्हा हळुवार पणे चालू करत पाणिनीने विचारलं.

“ मुळीच नाही. कसं शक्य आहे ते? मी त्याला म्हणाले की मी पुन्हा फोन करून माझा विचार कळवीन.”

“ पटलं त्याला हे?”

“ अर्थात.” –ऋता म्हणाली.

“ दमदाटी केली?” पाणिनीने विचारलं.

“ छे,छे.”

“ इतर काही भीती दाखवण्याचे प्रकार? ”

“ बिलकुल नाही.” ऋता म्हणाली.

“ तर मग तू पुढच्या बाजूने न येता मागच्या बाजूने बाहेर का पडलीस?”

तिने आवंढा गिळला. “ तुम्ही कुठे होतात?”

“ मागच्याच बाजूला होतो.”

“ मी.. मी... म्हणजे काय झालं, तो फोन वर बोलत होता.मला ऐकायचं होतं,त्याचं बोलणं.म्हणून मी गुपचूप पणे किचन मधे सटकले.माझा अंदाज होता की फोनवरचं बोलणं बराच वेल चालेल पण त्याने अचानक फोन बंद केला आणि माझ्याशी बोलायला म्हणून तो पुन्हा हॉल मधे आला. त्याला मी दिसले नाही म्हणून तो चमकला.मी सापळ्यात अडकले जणू.म्हणून मी मागच्या दाराने सटकले.ते दार इमारतीच्या मागच्या बाजूला आहे.” ऋताने खुलासा केला. पाणिनीने नकारार्थी मान हलवली.

“ त्याने तुला पुन्हा फोन केला किंवा समक्ष भेटला आणि तुला विचारलं की तू अचानक कुठे गेलीस तर तुझ्याकडे काय खुलासा आहे? त्याला नक्कीच संशय येईल.”

“ मी सांगेन की तो फोन वर बराच वेळ बोलत होता म्हणून कंटाळून मी गेले.पुढच्याच दाराने.”

“ तो कुणाशी बोलत होता?” पाणिनीने विचारलं.

“ तो फार वेळ तो बोलत राहिला नाही त्या व्यक्तीशी, जेणे करून मला अंदाज बांधता येईल.”

“ पण त्याला फोन आल्यावर त्याचं बोलणं चोरून ऐकावं असं का वाटलं तुला?”

“ सुरुवातीला त्याने कामत चं नाव उच्चारलं.मला वाटलं की कार्तिक कामत यांचाच फोन असावा.”

“ त्यांचाच होता?” पाणिनीने विचारलं.

“ नाही.सकृत दर्शनी कुठल्यातरी स्त्रीचा वाटत होता.”

“ कोण असावी ती या बद्दल काही अंदाज?” पाणिनीने विचारलं.

“ नक्की नाही सांगता येणार.पण कार्तिक कामत च्या कुमारची पत्नी असावी.त्याने नुकतंच लग्न केलंय ना!”

“ त्याच्या बोलायच्या पद्धतीवरून, तो व्यवसाया संबंधी बोलत असावा की काही प्रेमाचं प्रकरण असाव?” पाणिनीने विचारलं.

“ नाही सांगता येणार.”

“ तू बऱ्यापैकी संभाषण ऐकलंस?”

“ ऐकलं पण आपल्याला हवंय ते कळण्याच्या दृष्टीने ते उपयोगी नाही.”-ऋता म्हणाली.

“ त्याच्या आवाजाचा जो स्वर किंवा ध्वनी होता, त्यावरून संभाषण कशाबद्ल चालू असावं हे सांगता येईल?”

“ नाही.” ती ठामपणे म्हणाली. “ थांबा इथेच माझी गाडी ठेवल्ये मी. मी त्रिकाल अपार्टमेंट मधे राहत्ये.कामत आणि तुमची भेट झाल्यावर मला फोन करून कळवा.” ती म्हणाली आणि पटकन पाणिनीच्या गाडीतून उतरली आणि आपल्या गाडीत बसली.किल्ली लावून तिने इंजिन सुरु केलं, गाडीच्या काचा खाली केल्या आणि म्हणाली, “ कदाचित माझ्या स्वरातून किंवा ध्वनीतून मी भावना व्यक्त करू शकत नसेन पण सांगते, खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर. ”

भन्नाट वेगाने तिने आपली गाडी रस्त्यावर घेतली. पाणिनी तिथून आपल्या ऑफिसमध्ये आला. आल्या आल्या सौम्याने त्याला विचारलं चांडकशी भेट झाली? पाणिनीने मान डोलावली 

“कसा आहे तो? एकदम भयंकर आहे? धोकादायक?” सौंम्या म्हणाली. 

“तुम्ही त्याच्याकडे पाठ करून उभा राहिलात तर नक्कीच धोकादायक आहे.” 

“कार्तिक कामत चा फोन आला होता अर्ध्या तासापूर्वी. तो म्हणाला की नुकताच तो देवनार वरून परत आलाय”- सौंम्या 

“कधी केला होता त्यांने फोन सौम्या?” पाणिनीने विचारलं.

“पाच मिनिटांपूर्वीच”

“तो येईल तेव्हा त्याला सून आल्याबद्दल अभिनंदन करायची आठवण कर मला.” पाणिनी म्हणाला. 

सौम्या हसली. “त्याच्या आवाजात काहीतरी अर्जंट होतं असं मला वाटलं सर. कदाचित त्याच्या मनात दुसरे काही विचार चालू असावेत म्हणून तो भराभर बोलत असावा.” 

त्यानंतर जवळजवळ अर्धा पाऊण तास सौंम्या आणि पाणिनी दोघांनी मिळून ऑफिसमधल इतर काम उरकलं. अर्ध्या तासाने कामत त्याला भेटायला आला आणि त्याच्या माहितीप्रमाणे कामतचं वय ५०-५१ होतं. प्रत्यक्षात बऱ्याच वर्षांनी पाणिनीला भेटला पण तो दिसायला चाळीशीचाच वाटत होता. आत आल्या आल्या त्यांने पाणिनीलाशेक हँड केला.

“आपल्याला जरा भराभर काही गोष्टी कराव्या लागतील म्हणून मी थेट मुद्द्यालाच हात घालतो पाणिनी. चांडक आणि तुझी भेट झाली?” 

“हो.झाली.” 

“त्यांने कितीचा प्रस्ताव दिलाय ?”

“तीस लाखाचा. तुझ्या पंधरा टक्के हिश्यासाठी.” पाणिनी म्हणाला. 

“आणि ऋता साठी कितीची ऑफर दिली?” कामतने विचारलं.

“तेवढीच.” पाणिनी म्हणाला.

“ म्हणजे तिच्या ४०% हिश्यासाठी सुद्धा ३० लाख ?हे चुकीचं आहे ना पाणिनी. १५% ला सुद्धा तेवढीच रक्कम आणि ४०% ला सुद्धा तेवढीच रक्कम.” कामत म्हणाला.

पाणिनी काही बोलला नाही. 

“मला वाटतं मीच ऋताला भेटलं पाहिजे. तिला काही गोष्टी सांगायच्या आहेत मला.चांडक बद्दल तुमचं मत काय आहे पाणीनी?” 

“तो एक थंड डोक्याचा, कुटील आणि कारस्थानी माणूस आहे, पण समोरासमोर मारामृण्मयीची वेळ आली तर तो नक्कीच नमेल.” पाणिनी म्हणाला.

“मला जी माहिती मिळालेली आहे, किंवा मी जी मिळवली आहे असं म्हण हवं तर, मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की ऋताच्या वडिलांचा मारेकरी चांडक हाच आहे.”-कामत म्हणाला. 

“पोलिसाला तुम्ही तसा पुरावा देऊ शकता?” 

“मला तसं वाटतंय पाणिनी याचं कारण असं आहे की कोदंड रिसवडकर याने त्याच्या मृत्यूपूर्वी काही तास त्याच्या मित्राला असं सांगितलं होतं की धंद्याबद्दल एक चर्चा करण्यासाठी तो आणि चांडक एकमेकांना भेटणार आहेत. कोदंड रिसवडकरच्या मृत्यूच्या थोडा वेळच आधी जी गाडी चांडक चालवत होता, त्या गाडीचा मागोवा मी घेतलाय पाणिनी. त्याच्या मृत्यूनंतर तीन दिवसातच चांडकने ती गाडी विकून नवी गाडी घेतली. तुला माहिती असेल की कोदंड रिसवडकर चा खून जेव्हा झाला त्यावेळी तो कोणाबरोबर तरी गाडीतून प्रवास करत होता. ती गाडी हायवे वरून खूप वेगाने जात होती. डाव्या बाजूचं दार उघडलं गेलं आणि एका माणसाची बॉडी बाहेर ढकलण्यात आली. ती बॉडी अर्धवट गाडीच्या आत आणि गाडीच्या बाहेर अशी लटकत जवळजवळ एक चौक पुढे गेली. नंतर फूटपाथ वर धाडकन आपटली. आणि तिथून गडगडत गेली. गाडी पुढे वेगात निघून गेली. रस्त्यावरून जाणारे पादचारी घाबरून त्या खाली पडलेल्या माणसा जवळ गेले. पाहिले तर तो मेलेला होता त्याच्या डोक्यात एक गोळी घालण्यात आली होती शरीरात दोन. त्यातली एक गोळी शरीरात अजूनही होती. त्यावेळेला चांडक जी गाडी चालवत होता ती त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छ केली गेली. परंतु मी भिंग लावून बघितलं असता उघड्या दाराच्या आणि पुढच्या सीटच्या मध्ये खूप डाग मला दिसले दाराच्या फ्रेमला सुद्धा पोचा आलेला मला दिसला. बहुदा तो बंदुकीच्या गोळी मुळे आलेला असावा. माझ्या वतीने काही तपासण्या करण्यासाठी मी एक गुप्तहेर नेमला. तो अशा क्षेत्रातला एकदम तज़्ज्ञ माणूस होता. त्यानं काही केमिकल्स वापरून शोधून काढलं की ते डाग म्हणजे रक्ताचेच होते. पुढच्या सीटच्या कुशन वर आणि मी मगाशी म्हंटल्याप्रमाणे दार आणि सीटच्या मधल्या भागात.” कामत म्हणाला .

“हे खूपच रहस्यमय आहे. हा एक मोठा क्लू आहे असं आपल्याला म्हणता येईल. की जेणेकरून हा सगळा प्रसंग संशयास्पद आहे असं आपण म्हणू शकतो. पण हा पुरावा म्हणता येणार नाही.” पाणिनी म्हणाला. 

मला कल्पना आहे याची पाणिनी. म्हणून मी चांडक ला जेव्हा समोर घेऊन त्याची झाडाझडती घेईन तेव्हा तो या गोष्टीचा खुलासा करायला लागेल आणि त्यातूनच आपल्याला पुरावा मिळेल.” कामत म्हणाला. 

“हे काम तू करायच्या आधी पोलिसांना करू दे.” पाणिनी म्हणाला.  

“ मला मुळीच भीती वाटत नाही त्याची.आपल्यावर काही शेकायचा प्रयत्न केला त्याने तर कुत्र्यासारखं गोळी घालून मारीन त्याला.”

“ तुझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे का?” पाणिनीने विचारलं.

“ एका पेक्षा जास्त परवाने आहेत आणि बंदुका पण आहेत. एक सतत माझ्याकडे असते, एक माझ्या कुमारला दिली आहे, एक माझ्या तिजोरीत असते.” कार्तिक म्हणाला.

“ एवढ्या कशाला लागतात तुला ?” पाणिनीने विचारलं.

“ हौस. पाणिनी, तुझ्या लक्षात नाही का मी निवृत्त मिलिटरी- मन आहे.आयुष्य बंदुका हाताळण्यात आणि शत्रूला मारण्यात गेलंय माझं.बंदुकी शिवाय जगू शकत नाही मी. ”

सौंम्या ने पाणिनी ला कामत च्या नकळत खूण केली.

“ अरे हो, कार्तिक, सासरा झाला बद्दल अभिनंदन.” पाणिनी म्हणाला.

“ थँक्स, पण मला त्या कुमारची जरा काळजीच वाटते. म्हणजे आता त्याने लग्न केलंय म्हणून ठीक आहे पण वर्षापूर्वी आद्रिका अभिषेकी त्याचं सर्वस्व होती.तिच्याशी त्याला लग्न करायचं होतं,पण ते घडलं नाही.मला तिचं वाईट वाटलं म्हणून तिला नोकरी दिली माझ्या ऑफिसात मृण्मयी ने सोडली तेव्हा.दरम्यानचे काळात तो ऋता रिसवडकर च्या प्रेमात पडला. खर तर तिच्यामुळेच माझा रिसवडकर कुटुंबाशी आणि त्यांच्या कंपनीशी संबंध आला.मला वाटलं होतं ऋता ही लवकरच आमच्या कुटुंबाचा सदस्य होणार आहे. ती शांत स्वभावाची आणि तरीही निश्चयी आहे.कुमारच्या चंचल स्वभावाला मुरड घालायला ती योग्य आहे. बर, ते जाऊदे, या परिस्थितीत आपण चांडक बाबत काय करणार आहोत?” कामत म्हणाला.

“ आपण जाऊया आणि ऋताशी बोलूया ” पाणिनी म्हणाला.

“ अत्ता एवढ्या उशिरा?”

“ बघूया आपण काय स्थिती आहे ते.सौंम्या, ऋता ला फोन लाव आणि सांग तिला भेटायला येतोय म्हणून.कामत आहे आपल्या सोबत हे मुद्दाम सांगू नकोस.”

“ मी येऊ बरोबर?” सौंम्या ने विचारलं. पाणिनीने मान डोलावली. “ ये, कदाचित शेअर खरेदी बाबत करार करावा लागेल आपल्याला.तू असलेली बरी.” सौंम्या म्हणाली आणि लगेच तिने आपल्या बरोबर नेण्यासाठी पोर्टेबल टाइप रायटर, छोटी वही,पेन्सिल अशी तयारी केली आणि फोन करायला गेली.कामत हे सर्व कौतुकाने पहात होता.

 “ अशी सक्षम सेक्रेटरी मिळायला भाग्य लागत पाणिनी. या बाबतीत मला मृण्मयी ची खूप आठवण येते. मला वाईट वाटत पाणिनी, की लग्नानंतर एकदाही ती मला भेटायला आली नाही. ” कामत म्हणाला.

“ तुझ्या माहितीसाठी सांगतो कार्तिक, एकदा नाही तर दोन वेळा ती तुला भेटायला आली होती.पण तुझ्या नव्या सेक्रेटरीने तिला अशी काही टांग लावली की तिला असं वाटलं की आता आपली गरज कामतला राहिली नाही. ”

“ तुझं असं म्हणणं आहे पाणिनी, की आद्रिका अभिषेकी ने आमची भेट होऊ दिली नाही?” कामत ने आश्चर्याने विचारलं.

“ हो.तसच. केवळ भेटू दिलं नाही असं नाही तर तुला इंटरकॉम वर सुद्धा कळवायची तसदी नाही घेतली.” पाणिनी म्हणाला.

“ आहा! आता मला आनंद झाला.” कार्तिक कामत म्हणाला.

“ आनंद?” पाणिनीने विचारलं.

“ हो आनंद. म्हणजे मी रात्रीच आद्रिका ला खडसावलं.तुला मी कुठे आहे ते न सांगितल्याबद्दल. आणि आता ते मृण्मयी बरोबर जे वागल्ये ते पाहता मी तिला फायर केलं याचा आनंदच झालाय मला. ती तारतम्याने वागत नाही.मला ती म्हणाली की तुम्हीच सांगितलं होतं ना मला की माझा ठाव ठिकाणा कुणालाही सांगायचा नाही म्हणून ! त्यामुळे मी पटवर्धनना पण नाही सांगितला.” कामत म्हणाला.

तेवढ्यात सौंम्या आत येत म्हणाली, “ ऋता रिसवडकर म्हणाली की या लगेच.”

“ चला निघूया लगेच ” पाणिनी म्हणाला.

( प्रकरण ३ समाप्त.)