खेचराचियाही मना......
आपण सर्वांनीच लहानपणी ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलविले ही कथा ऐकली आहे. हे काहीतरी रूपक असावे असे वाटत होते पण त्याचा नेमका संदर्भ आज ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात ११५९ ओवीत मिळाला.
मूळ ओवी.
खेचराचियाही मना
आणि सात्विकाचा पान्हा
श्रवणासवे सुमना
समाधी जोडे
अर्थ:
( ज्ञानेश्वरीतील अमृत बोल किती प्रभावी आहेत तर- ते ऐकून ) अज्ञान्यांच्या ही मनास सात्विकतेचा पान्हा फुटेल, आणि जो अधिकारी आहे, त्याला तर ऐकण्या बरोबर समाधी लागेल.
इथे 'खेचर' या शब्दाचा वापर ज्ञानेश्वर अज्ञानी अशा अर्थाने वापरतात. हे लक्षात आले की रेडा ऊर्फ खेचराचे रुपक स्पष्ट होते.
अंत्यज, अज्ञानी, वेदपठणाचा अधिकारी नसलेलाही त्याला समजेल अशा प्राकृतात ज्ञान सांगितले म्हणून ज्ञानग्रहण करू शकला, त्याच्या रोजच्या आचार विचारात वेदोक्त ज्ञान कुठल्याही अवडंबराशिवाय सहज समाविष्ट झाले.
सदानंद चावरे
१-३-२०१९