विचार करते कधी कधी तेव्हा जाणवतं.... कसे भेटलो ना आपण...? कसे जुळलो एकमेकांशी.? मनात बसलो एकमेकांच्या.. स्वप्नात हरवलो.. भावनांत रंगलो... सगळं कधी आणि कसं घडत गेलं कळलंच नाही ना...? तुला ही नव्हतं ना कळलं रे..? नकळत आपण मनापासून एकमेकांचे झालो, समोरासमोर भेटलो नाही कधी तरीही.... एकदा ही एकमेकांना ना बघता तू माझा मी तुझी केव्हा झाले कळलंच नाही ना?
माझ्या कवितेवर तु कविता लिहायचा, माझ्या कवितेच कौतुक म्हणून... आणि तुझ्या कवितेवर मी... हळू हळू शब्दांना शब्द जुळत गेलेत... भावनांची गाठ घट्ट होत गेली... तू माझ्या मी तुझ्या प्रवाहात वाहत गेले... तूच शोधलंस मला पुन्हा जवळ घेण्यासाठी...हाती हात धरलास कधीही ना सोडण्यासाठी....
तू माझ्या मनातलं अचूक ओळखतोस...मला ते नीट जमत नाही पण तू समजुन घेतोस... तू आज ही किती छान छान लिहितोस... किती अर्थपूर्ण लिहितोस...पण हल्ली मला काहीच लिहायला सुचत नाही... शब्दच सापडत नाहीत.... फक्त तुझ्याशी गप्पा माराव्या वाटतात.... तुला समजावं, तुला समजून घ्यावं वाटतं... सतत तुझ्या जवळ असावं वाटतं... तुझा सहवास हवाहवासा वाटतो... तुझी चाहूल लागते रे..... डोळे वाटेकडे टक लावून असतात....कधी येशील अस विचारतात...पण एवढ्या सगळ्यात तू मला सांगितलं होतंस की आपण ज्यामुळे भेटलो ते लिहिणं कधी सोडू नकोस असं.... आणि तू आज ही तसच लिहीत असतोस, मला वाचायला देत असतोस.... मी तुझं ते वाचण्यात इतकी हरवून जाते, रमून जाते की लिहायचं हे विसरूनच जाते...
तुझ्या ही नाही ना आलं लक्षात की आता लिहिणं बंद केलंय.... कारण आता तुला वाचणं मला जास्त आवडायला लागलंय....