संध्याकाळी सूर्यास्त पाहणे हा माझा आजकाल नवीनच छंद झाला आहे . पूर्वी मला पाऊस पहायला खूप आवडायचं . आता सूर्यास्त . कशी क्षितिज रेषा दिवसभर झुरत असते सकाळपासून , सूर्य तिच्यापासून दूरावल्यावर ते संध्याकाळी तीव्रतेनं जाणवतं . दोघेही एकमेकांकडे आकर्षित होतांना स्पष्ट दिसतात .
सोनेरी हे रूप तुझे रे
मज जवळी येता येता
आरक्त झाले गाल माझे
तुला पाहता पाहता .
भल्या पहाटे गेलास तू
अन एकाकी मी झाले ,
संध्याकाळी कातरवेळी
तुुज साठीच सजले .
तुझ्यात मी अन माझ्यात तू
मिसळुन जाता जाता
रात्रीचे चांदणे निथळले
प्रेमात तुझ्या नहाता .
असा हा सूर्यास्त आजकाल मला वेगळाच जाणवतो . त्यात नव्या प्रेमाची नवी नव्हाळी नसून पक्व प्रेमाची पूर्ण तृप्ती असते . कदाचित आता भावना स्थिर झाल्याचा हा परिणाम असेल . कदाचित त्या सोनेरी रंगाची गुलाबी जादू असेल . आणि लांब कुठेतरी टूरिस्ट म्हणून जाऊन सनसेट पॉईंट वर सूर्याशी शर्यत लागल्यासारखं घाईनं जाऊन ' वॉव ' करत बसण्याऐवजी आता आमच्या नवीन घराच्या सज्जातून, बाल्कनीतूनच हा विविधरंगी सूर्यास्त आरामखुर्चीत बसून आम्ही दोघे पाहतो तेंव्हा दिवसभराच्या श्रमांचं सार्थक होतं . सोनेरी क्षण रेंगाळत राहतात आणि एकाएकी भराभर प्रकाश संपून रात्रीच्या जांभळ्या मखमली मिठीत आम्ही हरवून जातो .
क्षितिजरेषेत हरवून गेलेल्या सोनेरी सूर्यासारखे .
किंवा ज्यात सूर्य समर्पित झालाय त्या अदृश्य क्षितिज रेषेसारखे !