अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ५१ )
इकडे वैष्णवीचा दादा पण घरी येताना पेढे घेऊनच आलेला होता. घरात वैष्णवी आणि आई त्याचीच वाट पहात असतात.
दादा तो पेढ्याचा बॉक्स खोलून त्यातील एक पेढा घेऊन वैष्णवीला भरवत बोलतो.
दादा : अभिनंदन बहिणाबाई तुमच्या लग्नाची बोलणी करून आलोय मी, आता तरी खुश. 😊
वैष्णवीला तो पेढा खात खात रडायला येतं, ती रडत रडत तशीच दादाला मिठी मारते.
दादा : अरे...! आता रडायला काय झालं...! तुझ्या पसंतीनेच झालं आहे ना...! आता पुढे नीट रहा म्हणजे झालं...!
ती मागे वळून आईला मिठी मारते. तिला खुप आनंद पण झाला होता, आणि रडायला पण येत होतं.
तिची आई तिचे डोळे पुसत तिला बोलते.
आई : रडु नको बाय...! चांगलं झालं ना आता.
असे बोलुन आई पण वैष्णवीला बोलताना स्वतःही रडायला लागली होती. त्यांना असं पाहुन दादा बोलतो....
दादा : अरे...! फक्त बोलणी करून आलोय, आत्ताच चालली का सासरला....!😊
तिला बाजुला करून तिची आई दादाला पण पेढा भरवते. दादा तिथून बाहेर निघुन जातो.
वैष्णवी देवासमोर हात जोडते. मनोमन त्याचे आभार मानते. पुढेही सर्व काही नीट होऊ दे असं मनातल्या मनात बोलत ती आईसोबत जेवणाच्या तयारीला लागते.
रात्री जेवण वगैरे झाल्यावर सर्व आवरून ती याच विचारात अंथरुणावर पडलेली असते. काही वेळाने तिला प्रेमचा मॅसेज येतो. "अभिनंदन बायको"
ती त्याला रिप्लाय देत बोलते...
"तुमचे पण अभिनंदन"
आज दोघांसाठीही खुप आनंदाचा दिवस होता. त्या रात्री काही वेळ ते दोघे मॅसेज वर गप्पा मारतात.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आवरून दोघेही कामावर निघतात. घरातुन आता लग्नासाठी परवानगी मिळाली होती त्यामुळे त्या दोघांचे मोठे टेन्शन निघुन गेले होते. त्या दिवशी संध्याकाळी कामावरून सुटल्यावर ते दोघे भेटून पुढील प्लॅनिंग बद्दल बोलतात.
काही दिवस असेच निघुन जातात. त्या दिवसात प्रेम रमेशच्या ओळखीने एक छोटीशी भाड्याची रूम घेतो. काही दिवसातच त्याची आई आणि लहान भाऊ पण गावावरून इकडे येतात. आई इकडे आल्यावर प्रेम आणि ताई तिला वैष्णवी बद्दल बोलतात. आई पण हि गोष्ट ऐकुन खुश होते.
प्रेमची रूम जरी छोटी असली तरी रुमला वरती एक पोटमाळा होता. काही दिवसातच प्रेमचा मनमिळाऊ स्वभाव हळूहळू त्या चाळींमधील लोकांची मन जिंकुन घेतो. त्याची आई आणि भाऊ पण आता तिथे रुळायला लागतात.
ठरल्याप्रमाणे एक दिवस प्लॅन करून प्रेम आई आणि ताईला घेऊन वैष्णवीच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी जातात.
तिच्या घरी हा छोटासा कार्यक्रम छान पार पडतो. प्रेमच्या आईला पण वैष्णवी खुप आवडते. तिची ओटी भरून झाल्यावर लग्नाची तारीख ठरवली जाते. लग्नाच्या एक दिवस आधी साखरपुडा करायचा असे ठरले होते. नेमका त्याच दिवशी आरवचा वाढदिवस होता.
अवघ्या काही दिवसातच त्यांचे लग्न होणार होते. दोन्हीकडून तयारी चालु होती.
ग्रुप मधील हे पहिलेच लग्न होते. त्यामुळे उत्साह तर सर्वांनाच होता. आपापल्या परीने सर्वजण त्याला हवी तशी मदत करत होते. दिवस खुप कमी उरले होते. दोन्हीकडे पत्रिका वैगेरे वाटुन झाल्या होत्या. प्रेम पण गावी जाऊन सर्व पाहुण्यांना पत्रिका देऊन आलेला होता.
लग्नाच्या काही दिवसांपूर्वी त्याने त्याचा जॉब चेंज केला होता. ते लोकेशन थोड्या दुर अंतरावर असल्यामुळे प्रेमला येण्याजाण्यासाठी त्या कंपनीने बाईक दिली होती. त्यामुळे त्याच्याकडे आता त्याची हक्काची बाईक झाली होती. लग्नाच्या धावपळीत त्याला त्या बाईकची खुप मदत होत होती.
लग्न अगदी चार दिवसावर येऊन ठेपले होते. प्रेमला मात्र एक हुरहूर लागली होती... अंजली.... आज ना उद्या तिला हे कळणारच.... मग तिला आधीच सांगितले तर...? पण चार दिवसावर लग्न आहे, तिला भेटलो आणि पुन्हा काही प्रॉब्लेम झाला तर...? काही सुचत नव्हते...! पण तो ठरवतो... काही झालं तरी चालेल पण तिला हे आधीच सांगायला हवं. असा विचार करून तो लग्नाची पत्रिका घेऊन तिच्या घरी पोचतो. हिंमत करून तो दारावरची बेल वाजवतो....
आतुन अंजलीची मॉम दरवाजा उघडतात... एवढ्या दिवसांनी प्रेमला असं समोर पाहून त्यांना सुद्धा धक्काच बसतो. काय करावं हे त्यांनाही कळत नव्हतं. अखेरीस त्या प्रेमला आत यायला सांगतात. प्रेम आत येतो, त्याची नजर अंजलीला शोधत होती पण त्यावेळी ती घरी नव्हती. समोरच कोचवर तिचे डॅड बसलेले होते. तेही त्याला असं अचानक घरी आलेलं पाहून थोडे टेन्शन मधे येतात.
त्याच्याकडे पहात ते त्याला बोलतात...
डॅड : अरे... तु...! कसा काय इथे... ये बस... ठिक आहे ना सर्व... असं अचानक आलास म्हणुन विचारलं
प्रेम : हो...! ठिक आहे सर्व...! तुम्ही कसे आहात...?
मॉम : आम्ही ठिक आहोत...! तुझं कसं चाललंय...?
प्रेम : हो छान चाललं आहे...!
मॉम : बरं... बस मी कॉफी घेऊन येते.
प्रेम : नाही... नको...! मी लगेच निघणार आहे.
असे बोलतच तो हातातून आणलेल्या पिशवीमधून एक पत्रिका काढतो. आणि उभा राहुन ती पत्रिका तिच्या डॅड ना देतो आणि त्यांच्या व बाजूला उभ्या असलेल्या तिच्या मॉमच्या पाया पडत बोलतो.
प्रेम : काही दिवसातच माझं लग्न आहे. जमलं तर नक्की या...🙏🏻
हे ऐकुन तिचे डॅड थोडे खुश होतात, मात्र मॉमच्या चेहऱ्यावर या गोष्टीची गंभीरता जाणवत होती. पण त्या तिथे काही बोलू शकत नव्हत्या... तेवढ्यात डॅड बोलतात..
डॅड : अरे... व्वा...! अभिनंदन...! खुप चांगली बातमी आहे...!
असे बोलुन ते त्याला हात मिळवतात.
प्रेम : थॅन्क्स...!
मॉम त्या दोघांकडे फक्त पहात असतात. नक्की काय चाललं आहे हे त्यांच्या लक्षात येत नव्हते.
डॅड : अगं...! काहीतरी स्वीट घेऊन ये, आणि कॉफी पण ठेव, मलाही हवीय, एवढी छान न्यूज आहे. तोंड गोड कर त्याचे.😊
मॉम किचन मधे जाऊन एका डिश मधुन काहीतरी गोड बर्फीसारखे घेऊन येतात आणि ती डिश प्रेमला देतात.
प्रेम त्यातील छोटासा तुकडा घेऊन तोंडात टाकतो. त्या डिश घेऊन पुन्हा किचन मधे जाऊन कॉफी बनवायला घेतात.
बाहेर प्रेम थोडा घाबरूनच डॅडना बोलतो...
प्रेम : सर...! तुम्ही रागावणार नसाल तर एक गोष्ट विचारू...?
डॅड : मला माहित आहे... तु काय विचारणार आहेस ते...! अंजली ठिक आहे आत्ता ती क्लास ला गेलीय. अजुन काही...?
प्रेम : सर...! मला काही वेळासाठी तिला भेटायची परवानगी हवी आहे....!🙏🏻
मॉम किचन मधुन कॉफीचे मग घेऊन येतच होत्या... प्रेम जे बोलला होता ते सर्व त्यांनी ऐकले होते. आता तिचे डॅड प्रेमला काय बोलतील याचे टेन्शन त्यांना जास्त आले होते. ते प्रेमकडे पहात बोलतात...
डॅड : आता कशाला भेटायचं आहे तुला तिला...?
प्रेम : मला थोडंसं बोलायचं आहे तिच्याशी. फक्त काही वेळ...आणि कदाचित शेवटचं ! तेही तुम्ही हो बोललात तर...! पण प्लीज नाही बोलू नका. मला फक्त एकदा तिला भेटुन सॉरी बोलायचं आहे. बाकी काही नाही. प्लीज....🙏🏻
* तिचे डॅड थोडा वेळ शांतच होते... प्रेम त्यांच्या बोलण्याची वाट पहात होता...
डॅड : हे बघ...! झालं गेलं ते विसरून तु आता नवीन आयुष्याची सुरुवात करायला निघाला आहेस, मग आता कशाला उगाच यात पडतोय. ती पण थोडीफार विसरली आहे. उगाच काही प्रॉब्लेम नको व्हायला.
प्रेम : सर...! विश्वास ठेवा माझ्यावर, तुम्ही जसा विचार करताय तसे काहीच होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. पण मी जर आत्ता तिच्याशी नाही बोललो तर ही गोष्ट आयुष्यभर मला त्रास देईल. त्यामुळे प्लीज मला फक्त एकदा तिला भेटु द्या...!🙏🏻
मॉम : अहो...! एवढा बोलतोय तो तर, भेटू द्या ना त्यांना एकदा, हवं तर तुम्ही पण थांबा तिथे जवळपास.
डॅड : पुढे काही झाले तर त्याला कोण जिम्मेदार असेल...? आत्ता कुठे सावरली आहे ती...!
मॉम : मला नाही वाटत असं काही होईल, अंजू समजुन घेईल. ती आता आधीसारखं वागणार नाही याची मला खात्री आहे.
डॅड : बरं ठिक आहे तर...! मग थोडा वेळ थांब येईलच ती थोड्या वेळात... आत्ताच भेटुन जा...!
प्रेम : इथेच...!
डॅड : हो...! काही प्रॉब्लेम आहे का तुला, हवं तर तुम्ही तिच्या रूम मधे जाऊन बोलू शकता.
प्रेम : काही हरकत नाही, मी थांबतो ती येईपर्यंत...!
* यावर तिघेही शांत होतात. प्रेमचे संपुर्ण लक्ष त्यांच्या डोअर वर होते. काही वेळातच डोअर बेल वाजते तशी प्रेमची धडधड वाढते. " कशी दिसत असेल ती..." एवढ्या दिवसांनी तिला पाहणार होता तो.
मॉम दरवाजा उघडतात, अंजली आत येते. योगायोग असा होता की, प्रेम ने तिला गिफ्ट दिलेला ड्रेस आज तिने घातला होता.
आत येताच समोर डॅड च्या बाजूला प्रेमला पाहून ती पण शॉक झाली होती. ते दोघे फक्त एकमेकांना पहात होते. मधेच मॉम तिला आवाज देत बोलतात.
मॉम : प्रेम आला आहे मघाशी, तुझीच वाट पहात होता तो...!
* डॅड समोर त्याला काय बोलायचं हे तिला सुचत नव्हतं. स्वतःला सावरत ती थोडी पुढे येऊन थोडी अवघडच त्याला बोलते.
अंजली : हाय...! कसा आहेस...?
प्रेम : मी ठिक आहे...! तु...?
अंजली : मी पण ठिक आहे. कसा काय आलास आज...?
मॉम : अगं...! असच सहज आला होता भेटायला.
डॅड : आता तिला सांगायला काय हरकत आहे, लग्न करतोय तो, निमंत्रण द्यायला आला आहे तो...!
* डॅड चे हे शब्द ऐकुन तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखे तिला झाले. आणि हे सांगण्यासाठी तो घरी आलाय. हे तिला पटत नव्हते. ती काहीच न रिॲक्ट झाल्यासारखं स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि प्रेमच्या समोर हात करते. प्रेम पण तिचा हात हातात घेतो. खुप दिवसांनी हा स्पर्श तो अनुभवत होता. ती बोलते आणि लगेच त्याच्या हातातुन आपला हात काढून घेते.
अंजली : अभिनंदन...! कधी आहे लग्न..?
प्रेम : चार दिवसांनी...!
* ती फक्त "अच्छा" बोलते. पुढे काहीच बोलत नाही आणि तशीच तिच्या रूम मधे जायला निघते. तोवर तिचे डॅड तिला बोलतात.
डॅड : थांब...! याला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी...!
अंजली : मला काही बोलायचे नाही...!
मॉम : अरे...! एवढा वेळ झाला तो थांबलाय तुझी वाट बघत, काय बोलायचं आहे त्याला ते निदान ऐकुन तरी घे.
अंजली : अजुन काय ऐकायचं बाकी आहे आता...!
* तिला खुप राग आला होता, हे तिच्या चेहऱ्यावर जाणवत होतं... तिला असं पाहून प्रेम बोलतो...
प्रेम : मला फक्त पाच मिनिट तुझ्याशी बोलायचं आहे. प्लीज....!
अंजली खुप दिवस त्याचा आवाज त्याचा सहवास मिस करत होती. निदान ही पाच मिनिटे तरी तो जे बोलेल ते फक्त ऐकून घेऊ. असा विचार करत ती बोलते...
अंजली : ठिक आहे...! मी फ्रेश होऊन येते.
* असं बोलुन ती वॉशरूम मधे जाते. बेसिन चा नळ चालु करते. एवढा वेळ आतमध्ये थांबवून ठेवलेला रडण्याचा हुंदका अखेरीस बाहेर पडतो. ती ढसाढसा रडायला लागते. एवढे दिवस ज्या क्षणाची ती वाट पहात होती की, कधीतरी तो येईल आणि मला घेऊन जाईल.
तो आला...! पण मला असं अर्धवट सोडून कुणा दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय हे सांगायला....! आणि आता काय बोलायचं आहे त्याला माझ्याशी....? का ऐकुन घेऊ मी त्याचं...?
डॅड... ! ते कसे तयार झाले यासाठी...? कदाचित त्यांचा तर काही हात नाही यामधे...?
मला हे जाणून घ्यायलाच हवे, एवढे दिवस कुठे होता तो...? का नाही भेटला मग एवढ्या दिवसात...? नक्की काय झालं असेल...?
* खुप प्रश्नांची डोक्यात गर्दी व्हायला लागली होती. त्यामुळे डोकं जड झाले होते. डोळे रडून सुजले होते....
खुप वेळ झाला होता. ती स्वतःला सावरत पटकन चेहऱ्यावर पाणी मारते आणि टॉवेल ने चेहरा पुसत बाहेर येऊन आपल्या रूम मधे जाते. बेडवर बसुन ती विचार करत असते. तेवढ्यात प्रेम आणि मॉम तिच्या रूम मधे येतात. तिला पाहून मॉम बोलतात.
मॉम : अंजू...! जे काही झालं आहे ते बाजूला ठेवून आत्ता फक्त त्याला काय बोलायचं आहे ते शांतपणे ऐकून घे, आणि प्लीज ओवर थिंक करू नका. जे काही बोलणं होईल ते नंतर माझ्याशी शेअर करा. आत्ता फक्त एवढच सांगते. त्यालाही जायचं आहे. मनमोकळे करून घ्या. कदाचित पुन्हा हि वेळ येणार नाही.
* एवढं बोलुन मॉम बाहेर निघुन जातात. जाताना दरवाजा थोडा ओढून घेतात.
अंजली बेडवर तशीच मान खाली घालून बसलेली होती. प्रेमकडे वेळ कमी होता. तो तिच्या जवळ जाऊन बसतो आणि बोलायला सुरुवात करतो.
प्रेम : अंजू....! मला माहितीय माझ्याबद्दल तुझ्या मनात खुप राग असेल. आणि तो मला मान्य आहे. गेल्या काही दिवसात माझ्यामुळे तुला खुप त्रास झालाय. त्याबद्दल मनापासून सॉरी...!
* प्रेम बोलत होता...! खुप दिवसांनी त्याचा आवाज तिच्या कानात अगदी जवळून पडत होता. तिला तेवढी गोष्टही आनंद देत होती. ती मान खाली घालून फक्त ऐकत होती. ती त्याच्याकडे पहात सुद्धा नव्हती. कारण तिला हे माहित होते की, तो बाजूला असताना तिने जर त्याच्याकडे वळून पाहिले तर ती स्वतःला कंट्रोल करू शकणार नव्हती. त्या भावनेवर कंट्रोल करत ती फक्त त्याचे बोलणे ऐकत होती.
ती त्याच्याकडे पहात नाही याचे प्रेमला सुद्धा खुप वाईट वाटत होते. अखेरीस तो तिच्या समोर जाऊन तिच्या पायाजवळ बसतो. आणि तिचे दोन्ही हात पकडून तिला पुन्हा बोलतो.
प्रेम : अंजु...! मला माहित आहे मी तुझं मन दुखवलं आहे. त्यासाठी मी तुझी माफी मागतोय. माफ नाही करणार का मला....?
* ती काहीच बोलत नव्हती. ती इकडे तिकडे पहात त्याच्या हातातुन आपले हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. हे जाणवल्यावर प्रेमने तिचे हात सोडले. आणि सरळ खाली वाकून तिचे पाय पकडून तिच्या पायावर डोके ठेवले. तिने पटकन पाय मागे घेतले. ऊठुन उभी राहिली आणि त्याला बोलली....!
अंजली : काय करतोय बावळट...!
* फायनली तिने काहीतरी प्रतिसाद दिला होता. हे पाहून तो उभा राहिला आणि तिच्या दोन्ही खांद्यावर ठेवत तिला खाली बसवले. त्या काही सेकंदाच्या वेळेत ते एकटक एकमेकांना पहात होते. साहजिकच दोघांनाही त्यावेळी एकमेकांना घट्ट मिठीत घ्यावं असच वाटत होतं. पण दोघेही स्वतःला कंट्रोल करतात. काही वेळाची शांतता खुप काही बोलुन गेली होती.
प्रेमकडे वेळ कमी होता... तो तिच्या बाजूला बसतो आणि आपल्या हाताने तिचा चेहरा आपल्याकडे करत तिला बोलतो.
प्रेम : अंजु....! माझ्याकडे वेळ खुप कमी आहे. आणि मला तुझ्याशी खुप काही बोलायचं आहे. आणि जर खरच तुझी इच्छा नसेल माझं बोलणं ऐकुन घेण्याची तर मला तसं सांग मी आत्ताच इथून निघुन जातो.
* असं बोलुन तो ऊठुन उभा राहतो. ते पाहून अंजली त्याचा हात पकडून त्याला खाली बसवते आणि बोलते.
अंजली : बोल...! मी ऐकतेय....!
* प्रेम तिचा हात हातात पकडून बोलायला लागतो...
प्रेम : अंजु....! सर्वात आधी सॉरी...! मागे जे काही झाले त्यानंतर मी तुमच्या कोणाशीही कॉन्टॅक्ट ठेवले नाही. कारण मी मजबूर होतो. तसे करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला गेला होता. पण त्या काळात मी हेही समजलो की, आपलं आयुष्य हे फक्त आपलं नसतं. खुप लोकं आपल्याशी जोडले गेलेले असतात. आणि आपल्या प्रत्येक गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर पण पडत असतो. फरक एवढाच असतो की, आपण त्यांच्या नजरेतून ते कधीच पाहू शकत नसतो. कारण त्यावेळी आपण फक्त आपल्या विश्वात धुंद असतो. त्यावेळी आपल्याला बाकी काही दिसत नाही. या गोष्टीला जे कोणी विरोध करतात ते सर्वच आपले दुश्मन वाटू लागतात, मग ते आपले जन्मदाते आईवडील का असेना.
कधी कधी भावनेच्या भरात आपण कधी न पुर्ण होणारी स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यामुळे आपल्याच जवळच्या लोकांचं आपण नुकसान करत असतो. आणि या गोष्टीची जाणीव आपल्याला तेव्हा आजिबात होत नाही.
* प्रेम जे बोलत होता ते अंजलीला नीट असं समजत नव्हतं, ती मधेच त्याला थांबवुन बोलते.
अंजली : प्रेम...! नक्की काय बोलायचं आहे तुला...! म्हणजे तुला असं बोलायचं आहे का... की, मी तुझ्यावर प्रेम केलं ही माझी चुक होती...?
प्रेम : अंजु...! अगं मी असं नाही बोलत आहे...!
अंजली : मग काय...! तुझ्या बोलण्यावरून असच वाटतय की माझीच चुक आहे.
प्रेम : अरे यार...! प्लीज समजुन घे ना मला काय बोलायचं आहे ते...!
अंजली : मला नाही समजत...! तु समजव आता मग...!
प्रेम : अंजु...! एक गोष्ट सांगु तुला...! कदाचित तुला या गोष्टीचा अंदाज नसेल...! पण मी त्या गोष्टीचा अनुभव घेतलाय, तोही अगदी जवळून.
अंजली : नक्की काय बोलायचं आहे तुला...?
प्रेम : अंजु...! तुला माहितीये तुझे डॅड तुझ्यावर किती प्रेम करतात...?
अंजली : हो...! माहितीय...!
प्रेम : माहित असेल तुला...! पण तेवढं नाही, जेवढं मी अनुभवलं आहे.
अंजली : म्हणजे....?
प्रेम : बरं एक गोष्ट सांग...! तु तुझ्या डॅड ना कधी रडताना पाहिलं आहेस...?
अंजली : नाही...!
प्रेम : मी पाहिलंय त्यांना रडताना, तेही तुझ्यासाठी...! ते तुझ्यावर किती प्रेम करतात याचा तुला अंदाज नसेल, पण कदाचित जगात सर्वात जास्त तुझ्यावर कोणी प्रेम करत असेल तर ते तुझे डॅड आहेत.
अंजली : असं का बोलतोय तु... ! काय झालं आहे नक्की, प्लीज मला सांगशील का...? मी कुठे चुकलीय का...?
क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️