प्रकरण 10
बाहेर साक्षात प्रखर मार्तंड प्रजापती उभा होता !
***
हा माणूस माझ्या कडे येईल अशी कधीच मी अपेक्षा केली नव्हती.
“ हाय, चंद्रहास, तू या वेळी जागा आहेस? तुला डिस्टर्ब नाही ना केलं?” त्याने विचारलं. मी त्यांच्याकडे निरखून पाहिलं.त्यांचे हात थरथरत होते.मला जरा ते आजारी वाटले, पण त्यांना तसं भासवू न देता मी म्हणालो,
“ छे, छे. मला आनंदच झाला उलट. पण तुम्ही का आलात इथे? मला निरोप पाठवला असता तर मीच आलो असतो.” मी म्हणालो.
“ बस.मला तुझ्याशी खाजगी बोलायचं होतं जरा.” प्रजापती म्हणाले.
मी अस्वस्थ झालो जरा.यांना काय बोलायचं असेल?
“ कसं चाललंय तुझं आयुष्य?” प्रजापतीने विचारलं.
जगातला दोन नंबरचा श्रीमंत माणूस माझ्या शेजारी बसून मला विचारतोय कसं चाललंय माझं म्हणून.काय बोलणार होतो मी?
“ तुमच्या कृपेने मला स्वप्नातील आयुष्य जगायला मिळतंय. काय बोलू मी? ” मी मनातलं बोललो.
“ तुझी मदत लागणार आहे मला. तुझं मेकअपचं सामान इथे आहे?”
“ तू तुझा प्रजापतीचा मास्क आणि इतर सर्व मेकअप तयार कर. आज रात्री तू प्रजापती बनून माझ्या बंगल्यात माझ्या रूम मधे राहाला जा. तुला तिथे कुणाचाच अडथळा येणार नाही.पहारेकरी तुला प्रजापतीच समजतील.मी दक्ष ला आधीच सांगीतलय की जेवण माझ्याच खोलीत आण म्हणून, मला कोणी डिस्टर्ब करू नका असं.मी तुला पुढील सूचना देई पर्यंत तू तिथेच राहायचं आहेस.जातांना मी आणलेली माझी कार घेऊन जा.”
“ ठीक आहे सर.” मी म्हणालो.
“ जा तर मग,लौकर प्रजापती म्हणून तयार होऊन ये. ”
प्रजापती म्हणाले. आणि त्याच क्षणी ‘ते’ घडलं.
‘ते’ जर घडलं नसत तर पुढच्या तासा-दोन तासात माझा मृत्यू अटळ होता......
भिंतीवरचा सुरवंट जसा घसरून खाली पडावा, तशी प्रखर मार्तंड प्रजापती ची उजवी भुवई अचानक डोळ्यावरून निसटून खाली पडली.
वातावरणात अचानक एक थंडगार लहर आली.समोर उभा असलेल्या प्रजापतीच्या तोंडातून एक अस्पष्ट, दबलेला कण्हण्याचा आवाज बाहेर निघाला.त्याने उभं राहून आपली खुर्ची लाथेने ढकलून दिली.सापळ्यात अडकलेल्या, पण घाबरलेल्या हिंस्र प्राण्यासारखं त्याने सुटकेसाठी माझ्याकडे आणि आजूबाजूला पाहिलं आणि अचानक उघड्या फ्रेंच विंडो कडे झेप घेतली.माझी प्रतिक्रिया सुद्धा माझ्या नकळत, स्वाभाविक घडली,मी माझा पाय त्याच्या पायात घालून त्याला खाली पाडलं.त्याच्या हातावर माझे पाय दाबून धरले आणि हाताने त्याची दुसरी भुवई आणि मिशी उपटली.
“ कोण आहेस तू?” मी ओरडून विचारलं.
“ जाऊदे मला.” तो घुसमटत म्हणाला.
त्याच्या मानेखाली मी हात घातला.मास्क ची कड माझ्या हाताला लागली, मी ती खेचून वर ओढली. पातळ रबरापासून बनवलेला मास्क माने पासून
बाहेर निघाला आणि माझ्या छातीचा ठोका चुकला. मास्कच्या आतील चेहेरा समीप सिन्नरकरचा होता !
“ तू ?” मी चमकून ओरडलो. “ तुला ठार मारल्याचं त्यांनी मला सांगितलं.”
“ मला जायचंय ! लगेच.” तो ओरडला.
“आधी काय झालं ते सांग सविस्तर.नाहीतर तुझे हातपाय तोडून टाकीन मी.” मी म्हणालो.
तो प्रचंड घाबरला होता.मी त्याला कडक रम पाजली. हळू हळू तो सावरला.
“ मला थोडा अवधी हवा होता. माफ कर मला, मी केवळ माझाच विचार केला.” तो म्हणाला.
“ म्हणजे?” मी न समजून विचारलं.
त्याने असहाय्यपणे माझ्याकडे बघितलं.
“ सगळ सविस्तर हवंय मला. सलग बोलत रहा.मला मधे मधे प्रश्न विचारायला लावू नको.” मी दम भरला.
त्याने बोलायला सुरुवात केली.
मला जो अनुभव आला होता आणि मी ज्या प्रसंगातून गेलो होतो अगदी तसंच त्याच्या बाबतीत झालं होतं.प्रीतम कपूर ने प्लाझा हॉटेल मधे प्राशिला आणि त्याची भेट घडवून आणली होती.त्याला गुंगीचं इंजेक्शन देऊन तिच्या बंगल्यात आणलं गेलं होतं.गंधार गोवंडे ने त्याच्या वर मेकअपच्या प्रक्रिया केल्या होत्या.नंतर मला आणलं गेलं तसं त्यालाही प्रजापतीच्या दुबईच्या बंगल्यात आणलं गेलं होतं.त्यालाही माझ्या सारखाच रोज पाच हजारचा ड्राफ्ट दिला जात होता.
“ तू सुद्धा मालविकाला भेटलास?” मी विचारलं.
त्याने आपल्या शुष्क ओठावरून जीभ फिरवली.
“ हो.तिच्या बरोबर सहाय्य सोबत करायचा मोह मी टाळू शकलो नाही. तुलाही तिनं सांगितलं का की आपलं लग्न झालं नाही प्रजापती बरोबर आणि खोट्या लग्न दाखल्यासाठी ती काय करणार आहे या बद्दल?” समीप ने विचारलं.
“ हो.तिचा खून झालाय, तुला कळलंय?” मी विचारलं.
“ त्या लोकांनी मला सांगितलं की तिला झोपेत चालायची सवय होती. ”
“ झोपेत चालताना कोणी वरून खाली पडलं तर किंचाळणार नाही.मी किंकाळी ऐकली, मी जवळच होतो हे घडलं तेव्हा. मजहरने तिची मन मोडली.” मी म्हणालो.
“ नाही, मजहर तसा नाही.तू म्हणतोस तसं तिला मारलं गेलं असेल तर तो मजहर नाही, भैरव असणार. ड्रायव्हर.तो भालेकरचा उजवा हात आहे.आणि क्रूर आहे.”
माझ्या दृष्टीने कोणी मारलं ते महत्वाचं नव्हतं.सगळे सारखेच.मी काही बोललो नाही तेव्हा समीप म्हणाला, “ मी प्रजापती च्या फ़्लॅट मधून पळून आलोय.त्यांना जेव्हा कळेल की मी तिथे नाही तेव्हा मला शोधायला ते आकाश पातळ एक करतील, त्या आधी मला इथून पळून जाऊदे प्लीज.” माझ्या पाया पडत समीप म्हणाला.
“ तू मला तिथे प्रजापती च्या फ़्लॅट मधे जायला सांगत होतास याचा अर्थ तू पळून गेलास हे कळू नये म्हणून? ” मी चिडून विचारलं.
“ हो.माफ कर मला.मी फक्त माझा स्वार्थ साधायचा प्रयत्न केला.” समीप म्हणाला.
“ म्हणजे तुला त्यांनी गरज संपल्यावर मारलच असतं त्या ऐवजी तू माझा बळी द्यायचा प्रयत्न केलास?”
समीप सिन्नरकर काही बोलू शकला नाही.
“ पण त्यांना दोन तोतया का हवे होते?” मी न समजून विचारलं.
“ लक्षात घे, खरा प्रजापती अंथरुणाला खिळून आहे.त्यांना अबुधाबी मधे एक मोठ डील करायला जायचं होतं. त्याच वेळी त्यांना इथे दुबई सरकार कडून एक मोठी ऑर्डर मिळाली होती दोन्ही ठिकाणी सह्या करण्यासाठी प्रजापती ची समक्ष हजेरी अत्यावश्यक होती आणि दोन्ही डील ची कराराची तारीख एकच होती.यातील एक जरी डील पुढे मागे करायचं या लोकांनी ठरवलं असतं तर प्रजापती कॉर्पोरेशन ची त्याहून मोठी स्पर्धक कंपनी, मिरचंदानी एम्पायर्स यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं असतं. हो दोन डील थेट अबुधाबी आणि दुबई च्या सरकार बरोबर ठरली होती.सध्याच्या घडीला मिरचंदानी एम्पायर्स हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहेत,पण ही दोन डील प्रजापती कॉर्पोरेशन ला मिळाल्यामुळे ते मिरचंदानी एम्पायर्स ना मागे टाकून भारतातील सर्वात मोठे आणि श्रीमंत उद्योजक होणार होते त्यामुळे त्यांच्यासाठी हे दोन्ही करार महत्वाचे होते. खरा प्रजापती अंथरुणाला खिळून असल्याने ते मला अबुधाबीमधे प्रजापतीचा तोतया म्हणून मधे घेऊन गेले, त्याच वेळी तुला दुबईत आणलं, प्रेस रिपोर्टर्सना तू अधून मधून दिसशील अशी व्यवस्था केली. इथल्या कागदपत्रावर तुझ्या सह्या घेतल्या, जशा तिकडे माझ्या घेतल्या. ” समीप म्हणाला.त्याला माझ्यापेक्षा सुद्धा बरीच माहिती होती असं दिसत होतं.
“मिरचंदानी एम्पायर्स हे फारच मोठं नाव आहे. कापड, कागद साखर , इलेक्ट्रिकल्स, वाहन उद्योग ! कशात नाहीत ते सांग.” मी उद्गारलो.
“ त्या ग्रुप च्या खाजगी बँका सुद्धा आहेत. ” समीप म्हणाला. “ परदेशात आणि भारतातही. इथे दुबई मधे पण त्यांच्या अपेक्स बँकेची शाखा आहे.”
“ अपेक्स तर खूपच मोठी प्रायव्हेट बँक आहे.” मी म्हणलो.
समीप एकदम बोलायचा थांबला.
“ प्रजापती अत्ता संध्याकाळी सहा वाजता वारला.” समीप म्हणाला. मला हा दुसरा मोठा धक्का होता.
“ मेला?” मी अविश्वासाने विचारलं.
“ हो.जोरदार हार्ट अॅटॅक आला.”
“ तुला कसं समजलं पण?”
“ अगदी नशिबाने. मी प्रजापती च्या बंगल्यातल्या खोलीत निवांत पडून होतो, मला अचानक कुजबुज ऐकू आली.म्हणजे आधी मोठ्या आवाजात आणि नंतर दबक्या आवाजात. मी लक्ष देऊन ऐकू लागलो, माझ्या रूम चे दार बाहेरून किल्ली लावून बंद केल्याचा आवाज मला आला.म्हणजे मला कोंडून ठेवण्यात आलं होतं तर. त्याच वेळी आतल्या इंटरकॉम ची रिंग एकदाच वाजली, म्हणजे चुकून कोणीतरी फोन करतं आणि लगेच कट करतं ना, तशी. याचा अर्थ मला बाहेरून कोंडून घेण्यात आलं तेव्हा त्या गडबडीत माझा फोन डिस कनेक्ट करायचं त्यांच्या हातून राहून गेलं असावं, मी पटकन फोन उचलला. मजहर आणि प्राशिला एकमेकांशी बोलत होते.ते क्रॉस कनेक्शन मला ऐकू येत होतं.मजहरने तिला प्रजापती गेल्याचं सांगितलं.काय बाई आहे ती! तिने ती बातमी एखाद्या हवामान खात्याचा अंदाज ऐकावा त्या तटस्थतेने ऐकली.तिने मजहरला सांगितलं की ती तिथे येई पर्यंत मजहरने काहीही करायचं नाही.भालेकर परदेशात गेला होता त्याला सांगायचं काम तीच करेल.नंतर ती म्हणाली की प्रजापती मेल्यामुळे आता चंद्रहास आणि समीप दोघांचं काम संपलं आहे.त्यांची गरज संपली आहे. भैरवला सांग त्यांची पुढची ‘व्यवस्था’ करायला.” समीप सिन्नरकर म्हणाला आणि मी गारठून गेलो. ‘व्यवस्था’ करायला म्हणजे काय ते आम्ही समजून चुकलो होतो.
“ प्राशिला ने मजहरला विचारलं की प्रजापती मेल्याच मला म्हणजे सिन्नरकरला कळलंय का, त्यावर मजहर म्हणाला की नाही, त्याने बाहेरून दार लावून त्याला कोंडून ठेवलंय. त्यावर ती बर म्हणाली आणि फोन बंद झाला.” समीप म्हणाला.
“ पण आपल्याला ते का मारतील, मला कळल नाही.” मी म्हणालो.
“ अरे मूर्खा, अबुधाबी आणि दुबई दोन्ही ठिकाणाची डील झाली आहेत.प्रजापती म्हणून आपल्या सह्या आपण केल्या आहेत. हे फक्त आपल्याच दोघांना माहित आहे, आपण जर ही बातमी बाहेर कोणाला सांगितली तर काय होईल त्यांच्या डीलचं? दोन्ही डील सरकारी डील होती.दोन्ही देशाचं सरकार प्रजापती कॉर्पोरेशनला संपवून टाकेल.”
“ तुला माहीत होतं त्यांनी लगेचच तुझ्या फ़्लॅट मधे शिरून तुला ठार केलं असतं. तू स्वत:ला वाचवण्यासाठी मला तिथे पाठवणार होतास ! आणि माझा बळी देणार होतास.” मी भडकून म्हणालो.
“ मान्य करतो मी.माझं डोकं ताळ्यावर नव्हतं. आपल्या दोघांना आता इथून निसटून जायला हवं. आपण बाहेर पडल्यावर ते आपल्याला शोधायला जंग जंग पछाडतील.कारण त्याचं रहस्य आपण बाहेर फोडू असं त्यांना वाटेल.आणि ते स्वाभाविकच आहे.पण आपण ते रहस्य उघड करायचं नाही.कारण आपल्याकडे पैसा आहे.आपण बाहेर पडूनही त्यांचे गुपित उघड केले नाही याची जाणीव त्यांना होईल आणि ते आपला शोध घेण्याचा वेग कमी करतील. हे माझं म्हणणं आहे आणि मी तरी तेच करणार आहे.मी आता जातो आहे तू माझ्या बरोबर येणार आहेस?”
“ नाही.तुला मी अडवणार नाही कारण एकत्र गेलो तर त्यांना शोधायला जास्त सोप जाईल.तू जा. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, आपल्या दोघांना ते केव्हाही सहज मारू शकत होते आणि मारू शकतातही तर मग मला त्यांनी त्यांच्या कंपनीत नोकरी, हा बंगला, गाडी, कशासाठी देऊ केलं?”
“ तू त्यांना जड जात होतास..त्यांना अडवत होतास. सह्या करायला नकार देत होतास. त्यांना तुझी गरज होती बळजबरी करून उपयोग होतं नाही म्हणून त्यांनी कशी खेळी खेळली बघ, मला प्रजापती च्या वेषात तुझ्याशी बोलायला लावून नोकरी, गाडी बंगला सर्व दिलं, तू मोहात पडलास,तुला त्यांनी ऑफर स्वीकारायला लावली आणि सहज सांगितल्या सारखं करून तुझ्या सह्या मिळवल्या सुद्धा. आठवतंय तुला प्रजापती च्या रुपात मी तुला म्हणालो होतो ‘मजहर तुला ऑफिसात नेईल. तिथे भालेकर असेल काही कागदपत्रावर सह्या करून माझ्या घरी जा आणि मी येई पर्यंत तिथेच रहा’ त्या प्रमाणे तुझ्या कडून भालेकरने सह्या करून घेतल्या. आता तुझं सह्या करायचं काम संपलय.तुझी गरजही संपल्ये.” समीप म्हणाला.
मला ते आठवलं.भालेकर त्यावेळी खुष नव्हता, माझी नेमणूक त्याला पटलेली दिसत नव्हती असं मला वाटलं होतं. पण ते नाटक होतं तर.
“ पण मी सह्या करायला नकार दिला तर ते तुझ्या सह्या घेऊ शकत होते. कारण त्यांनी तुला तोतया म्हणून तयार केलं होतं त्यात प्रजापतीचा आवाज, सह्या सगळ्याच बाबतीत तुला तयार केलं असणार.आणि तू म्हणतोच आहेस की अबुधाबी मधे तू प्रजापती बनून गेलास तेव्हा तिथे सह्या केल्याच असशील ना?मग तुझ्या सह्या घेण्या ऐवजी मला त्यांनी गाडी, बंगला,नोकरी च्या मोहात पडून माझ्या सह्या का मिळवल्या?” मी समीपला विचारलं.
“ अबुधाबी वरून आल्यावर मी खूप आजारी होतो, मला कंपवात झाला चंद्रहास. माझे हात थरथर करायला लागले, सह्या करायच्या लायकीचा मी राहिलो नाही. फक्त तुला फसवण्या पुरता मी प्रजापती झालो. त्यामुळे सह्या करण्यासाठी त्यांना फक्त तुझीच गरज होती. ”
मी आवाक झालो.
“ आता मला काही विचारू नको. निघालो मी.” उभा रहात तो म्हणाला आणि बाहेर पडला सुद्धा.
तो जे काही बोलला होता त्यात दम होता.वस्तुस्थिती होती.मी पण बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.पाकिटात बँकेतून काढलेले पैसे होतेच. पण आणखी लागणार होते, मी पटापट माझे कपडे , वस्तू, आणि लिखाणाचे साहित्य बॅगेत भरले. प्रजापतीचे दोन तीन सूट भरले. माझा स्वत:चा पासपोर्ट, प्रजापती चा पासपोर्ट, व्हिसा, मालविकाने मला दिलेला प्रखरच्या डॉक्टरांचा आजारपणाचा दाखला, पॉवर ऑफ अॅटॉर्नी ची प्रत सर्व माझ्या बॅग मधे भरलं.खोलीत काही राहिले नाही याची खात्री केली.समीप सिन्नरकर प्रजापती च्या वेषात बाहेर पडल्याने त्याला पहारेकऱ्यानी अडवले नव्हते.तो प्रजापतीचीच गाडी घेऊन गेला होता. मला माझ्या मूळ वेषातच बाहेर जावे लागणार होते, माझ्याच गाडीने.पण मला ते स्वातंत्र्य देण्यात आल्यामुळे पहारेकरी मला अडवणार नव्हते.तसंच घडलं. दुबईच्या विमान तळाच्या दिशेने मी गाडी पिटाळली........
*************************
........आता मी भारतात, माझ्या मातृभूमीत परतलोय. खूप महिन्यांनी. अगदी ऐशो आरामी जीवन मी जगतोय. मी जिवंत राहाणं ही माझी नाही तर प्रजापती कंपनीसाठी आवश्यक बाब झाली आहे. आणि तशी वेळ मीच त्यांच्यावर आणली आहे. आता मला काही काम नाही. पण पैशांची चिंताही नाहीये कारण काम न करण्याचेच मला रोज पैसे मिळताहेत. किती माहित्ये? रोज पाच लाख. अगदी बिनबोभाट माझ्या अपेक्स बँकेतल्या खात्यात जमा होतात. मग वेळ कसा घालवायचा याचाही विचार मी करून ठेवलाय.बरेच दिवस अर्धवट लिहून झालेली डायरी लिहिण्याचं काम मी करतोय. समीप सिन्नरकर माझ्या समोर प्रजापती म्हणून उभा राहिला आणि त्याची भुवई पडल्याने मी त्याचा खोटेपणा उघडा पाडला आणि त्या नंतर तो पळून गेला आणि मी सुद्धा माझे सामान काळजीपूर्वक बॅगमधे भरून माझी गाडी घेऊन दुबईच्या विमान तळाच्या दिशेने निघालो या घटने पर्यंत माझी डायरी लिहून झाली होती. त्यानंतर त्याच्या पुढील घटना डायरीत नोंदवायचे काम मी पूर्ण केलं. म्हणजे अगदी आजच्या माझ्या ऐशो-आरामीच्या दिवसा पर्यंतच्या नोंदी करून झाल्या. पुस्तक म्हणजे डायरी वाटू नये एक रहस्य प्रधान कादंबरी वाटायला हवी त्यामुळे आधी सगळ्या डायरीतल्या नोंदी गोष्ट वाटेल अशा पद्धतीने पुन्हा लिहून काढल्या. तसंच ते आत्मचरित्र वाटायला नको म्हणून माझ्या लिखाणातला ‘मी’ पणा सोडून त्या त्या जागी माझं नाव टाकलं. चंद्रहास चक्रपाणी असं.
एक प्रकाशक गाठला, पुस्तकाचा सर्व खर्च मीच करायच्या अटीवर त्याने हे पुस्तक छापलं देखील.वर बक्षीस म्हणून मला दहा प्रती भेट दिल्या. मला पैशाची काहीच कमी नव्हती आता. रोज पाच लाख खर्च कसे करायचे हा प्रश्न होता.
काय घडलं होतं मध्यंतरीच्या या काळात? की मी केवळ भारतात सुखरूप पोहोचलो होतो असं नाही तर मला रोज पाच लाख रुपये मिळायला लागले होते आणि कुठल्याही परिस्थितीत ते लोक मला मारू शकत नव्हते?
माझ्या पुस्तकातील शेवटची प्रकरण वाचल्याशिवाय हे समजणार नव्हतं
( प्रकरण 10 समाप्त )