तोतया प्रकरण 5
प्रकरण ५
रात्री माझ्या बेडवर मालविका आल्याचं स्वप्न मला पडलं मी चमकून जागा झालो रात्रीचे सव्वातीन वाजले होते झोपेच्या अंमला मधून मी जागा झालो तेव्हा मला लक्षात आलं की ते स्वप्न नव्हतं.
“तू खूप छान आहेस. ‘सर्वच’ बाबतीत” ती म्हणाली.
“तू सुद्धा तशीच आहेस” मी म्हणालो
“भालेकर तुझ्यावर खूप खुश आहे. तो म्हणत होता की तुला फोनवरील संभाषण खूप छान प्रकारे करता आलं.” मालविका म्हणाली.
“मी मुळात अभिनेता आहे मालविका आणि हा अभिनय करण्यासाठीच मला इथे आणलं गेलंय. चक्क भाड्याने घेतलं गेलंय.” माझ्या बोलण्यात नकळत कटूता आली.
“प्रखर ची परिस्थिती आणखीनच खराब झाल्ये, आज त्यानं मला ओळखलं पण नाही”
मी किंचित सावध झालो. ही माझ्यावर काही डाव टाकण्याचा तर प्रयत्न करत नाही?
“त्याच्या आई बद्दल तुला कितपत माहिती आहे?” अचानक तिने विचारलं.
“तिनेच तर मला या कामासाठी निवडलं. तिनेच तिच्या मर्सिडीज मधून मला हॉटेल मधून किडनॅप करून घरी नेलं. मला काही कळू नये म्हणून वाटेत इंजेक्शन दिलं.”
“अत्यंत दुष्ट आहे ती बाई.” मालविका म्हणाली. “तिच्या डोक्यात फक्त पैसा आणि पैशाचाच विचार असतो. तिला तिच्या आजारी असलेल्या मुलांमध्ये सुद्धा रस नाही तिला त्याचा फक्त पैसा आणि संपत्ती हवी आहे. ती त्याला बघायला इथे कधीही आली नाही. रोज फक्त फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी करते आणि चौकशी करताना तो बरा होतो आहे का हे ती कधी विचारत नाही. तिला फक्त तो कधी मरेल याचा अंदाज हवा असतो. तो जेव्हा मरेल तेव्हा ती प्रजापती साम्राज्याची अध्यक्ष होईल आपला मुलगा कधी मरतोय याची ती वाटच बघते आहे.”
मी आणखीनच सावध होऊन म्हणालो,
"त्याची पत्नी तू आहेस त्याच्या आईला फक्त त्याच्या मृत्युपत्रात त्याने जे ठेवलं असेल तेवढेच मिळेल. त्याहून अधिक काही नाही. पत्नी या नात्याने तुझे अधिकार अबाधित आहेत, वारस या नात्याने"
“त्यात दोन मुख्य अडचणी आहेत.” मालविका म्हणाली.
“पहिली अडचण म्हणजे प्रखर ने मृत्युपत्रच केलेलं नाही.”
या तिच्या बोलण्यावर माझा विश्वासच बसला नाही. एवढा मोठा साम्राज्य असलेला माणूस स्वतःचं. मृत्युपत्र करणार नाही हे पटणारच नव्हतं.
“ते केलेलं नसलं तरी पत्नी या नात्याने तुझे अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही. थोड्याफार कायदेशीर अडचणी आणि कालावधी जाईल पण तुमचे वकील त्याच्यातून नक्कीच मार्ग काढतील. पण तू त्याला मृत्युपत्र करण्यासाठी पटवत का नाहीस?” मी विचारलं.
“आता ती वेळ निघून गेली आहे. तो शेवटच्या घटका मोजतो आहे. मला ओळखलं सुद्धा नाही त्याने. आज तो एखाद्या लाकडी ओंडक्या सारखा झोपून आकाशाकडे टक लावून बघत बसलाय.” मालविका म्हणाली
मी चक्रावून गेलो पण ती म्हणते ते खरं होतं. या घडीला मृत्युपत्र होऊ शकत नव्हतं.
“मी तुला थोडं खाजगी सांगितलं तर ते तू तुझ्या पुरतंच मर्यादित ठेवशील?” मालविकानं विचारलं.
“पण तू दोन समस्ये पैकी दुसरी समस्या सांगितलीच नाहीस अजून.” मी म्हणालो.
“तेच सांगते आहे तुला, मी..... मी..प्रखर ची पत्नी नाही.”
मला हा फार मोठा झटका होता.
“म्हणजे? तुमचं लग्न झालेलं नाही?” मी विचारलं. मला संशय यायला लागला होता की मला जसं या मोहिमेसाठी किडनॅप करून इथे आणलंय तसंच तिलाही आणलं गेलं असेल का? माझ्याच सारखं तीही या कटकारस्थानातील एक बळीचा बकरा असेल का?
“आम्ही दोन वर्षांपूर्वी भेटलो. तो एका मोठ्या डील करण्याच्या गडबडीत होता. मी त्यावेळेला मॉडेलिंग करत होते. मला मजहर भेटला, त्यानं माझी आणि प्रजापती ची भेट घालून दिली. तो खूप श्रीमंत होता त्यामुळे मी साहजिकच त्याच्याकडे आकर्षित झाले पण तो तुझ्यासारखा प्रणय क्रिडेत तरबेज नव्हता. तरी त्याच्या पैशाकडे, संपत्तीकडे पाहून मी त्याच्याशी लग्नाला तयार झाले, पण तो त्या महत्त्वाच्या डील मध्ये एवढा अडकला होता की त्याला माझ्यासाठी फुरसतच मिळत नव्हती. शेवटपर्यंत त्यांन माझ्याशी लग्न केलंच नाही. मला तो पंधरा दिवसाच्या पर्यटनावर घेऊन गेला. आम्ही आलो तेव्हा त्यांनी इतरांना सांगितलं की आमचं लग्न झालं आहे. त्याच्या आईला, भालेकरला ,मजहर ला अगदी सगळ्यांना त्यांनी तसंच सांगितलं. इतर सगळ्यांच्या दृष्टीने मी त्याची पत्नी होते.दोन वर्ष मी त्याच्याबरोबर राहत होते. शेवटी तो त्या भयानक आजाराने ग्रासला. त्याच्या आईला संशय आहे की आमचं लग्न झालं नाही ती अत्यंत नीच आणि लालसा असलेली स्त्री आहे ज्या वेळेला प्रखर जाईल त्या वेळेला ती सिद्ध करू शकेल की आमचं लग्न झालं नव्हतं म्हणून. त्यामुळे मी वारसा हक्काने मिळणारी संपत्ती उपभोगू शकणार नाही ही सगळी संपत्ती त्याची आई हडप करेल. मला मदत हवी तुझी चंद्रहास.”
“मी कशाप्रकारे मदत करू शकतो तुला? मला तर प्रजापती चा तोतया म्हणून इथे पळवून आणलंय. त्यासाठीच मला पैसे दिले जाताहेत.” मी विचारलं.
“मी प्रेम करत्ये तुझ्यावर. माझ्यासाठी एवढं नाही का करू शकत तू?” तिने कामुक चेहरा करून विचारलं
माझ्या डोळ्यासमोरून समीप सिन्नरकर, गंधार गोवंडे यांचे चेहरे झळकून गेले. माझी एक चूक माझ्या मृत्यूला कारणीभूत ठरणार होती मी सावध झालो. आत्ताच हिला हो किंवा नाही काहीच सांगण्यात अर्थ नव्हता मी थोडा टाईमपास करायचं ठरवलं.
“मदत करण्याजोगी स्थिती असेल तर मी मदत करीन.” मी मोघम पणे म्हणालो माझ्या तेवढ्या शब्दांनी सुद्धा तिचा चेहरा उजळला.
“मला माहित होतं की तू हो म्हणशील.” ती म्हणाली आणि अचानक तिने पुढे विचारलं “चंद्रहास, तुला दोन कोटी रुपये मिळाले तर कसं वाटेल?”
“कोणाला बरं वाटणार नाही ! ” मी माझी उत्सुकता दडवून म्हणालो
मी उत्तर द्यायच्या ऐवजी तिला प्रतिप्रश्न केला.
“माझा प्लॅन काय आहे तुला समजून सांगते मी, प्रखर चा तोतया म्हणून तू माझ्याशी लग्न करायचं आणि मी त्या बदल्यात तुला दोन कोटी देईन.”
“हा प्लॅन काय फारसा यशस्वी होणार नाही.” मी म्हणालो. “वेड्यासारखा विचार आहे हा. याचं कारण असं की ज्या तारखेला आपण लग्न करू त्या तारखेचा विवाहाचा दाखला आपल्याला मिळेल.तुझी दुष्ट सासू तू म्हणतेस त्याप्रमाणे तयारीची बाई आहे. ती लगेच ओळखेल की प्रखर ची स्थिती लग्न करण्याजोगी नाही मग तो कसं लग्न करू शकतो? आणि मी तोतया म्हणून वावरतो आहे हे तुला माहित नाही का?”
“तुला पैशाची ताकद माहित नाही.” ती म्हणाली “ज्या वेळेला भालेकर मला म्हणाला की तू प्रखर ची हुबेहूब सही करू शकतोस तेव्हाच माझ्या डोक्यात ही योजना आली. तुला माहिती आहे इथे दुबई मध्ये लग्नासाठी एक महिन्याची नोटीस वगैरे द्यावी लागत नाही. माझ्याकडच्या पैशाचा वापर करून मी इथल्या सरकारी कार्यालयात विवाहाची नोंदणी करणाऱ्या क्लार्कला लाच देऊन मागच्या तारखेचा विवाहाचा दाखला मिळवू शकते. त्यांच्याकडच्या रजिस्टर वर तू प्रखर ची सही कर. इतकं सोपं आहे.”
“अगं पण त्या रजिस्टर वर सही करताना साक्षीदार लागतात. त्यांच्या सह्या लागतात.”
“ती सुद्धा व्यवस्था मी करून ठेवली आहे. दोन गरीब घरातील रहिवासी मी बघून ठेवले आहेत, त्यांना मी पैसे चारून साक्षीदार म्हणून तयार करणार आहे. माझे त्यांच्याशी बोलणंही झालं आहे.” –मालविका
“थांब,थांब एवढी घाई करू नको. तुझ्या लक्षात येतय का, नोंदणी करणारा क्लार्क, दोन साक्षीदार यापैकी कोणीही तुला ब्लॅकमेल करू शकतं.” मी शंका घेतली.
“ब्लॅकमेल कोणाला करणार? देशातल्या दोन नंबरच्या सर्वात श्रीमंत माणसाला? प्रजापती कुटुंबातील एका स्त्रीला?”
पुन्हा माझ्या डोळ्यासमोर समीप सिन्नरकर आणि गंधार गोवंडे यांचे चेहरे आले या दोघांना ज्या पद्धतीने ठार मारण्यात आलं त्याच पद्धतीने विवाहाची नोंदणी करणारा क्लार्क आणि दोन साक्षीदार यांना ठार मारला जाऊ शकत होतं. मी काही बोललो नाही.
माझ्या योजनेचा हा पहिला भाग झाला, लग्न करण्याचा. आता दुसरा भाग, आपल्या दृष्टीने त्याहून महत्त्वाचा आहे तो भाग म्हणजे मृत्युपत्र. आपण लग्नाची तारीख दोन वर्षांपूर्वीची दाखवणार आहोत म्हणजे प्रजापती आणि माझं लग्न झाल्यानंतर प्रजापतीनं लगेचच मृत्युपत्र करून मला वारस म्हणून नेमल्याचं मी दाखवणार आहे आणि ते दाखवण्यासाठी प्रजापती च्या मृत्युपत्रावर त्याचा तोतया म्हणून मला तुझ्या सह्या हव्या आहेत. तुझी इथून सुटका व्हावी म्हणून आणि मला मदत करण्याचा मोबदला म्हणून मी तुला दोन कोटी रुपये देणार आहे. काही दिवसातच प्रखर मार्तंड प्रजापती मरेल. तो मेला की मी तयार केलेल्या मृत्युपत्राचे वाचन होईल आणि त्यात मला प्रखरची सगळी संपत्ती माझ्या नावाने झालेली असेल दोन कोटी मिळण्यासाठी आपण फक्त माझा नवरा प्रखर मरण्याची वाट बघूया तेवढं थांबायला हरकत नाही, दोन कोटी साठी.”
(प्रकरण पाच समाप्त)