प्रकरण १
मागचा पूर्ण आठवडा मी अत्यंत कंटाळलेल्या अवस्थेत आणि छताकडे बघत घालवला होता.खिशात पैसे नाहीत, नोकरी नाही,काम नाही अशा स्थितीत. माझ्या जवळचा फोन हा एकमेव सोबती आणि आधार होता. एवढ्यात फोन वाजला.
“ मी प्रीतम कपूर ची सेक्रेटरी रुधिरा बोलत्ये.”
रुधिरा माझी मैत्रीण. आत्ताची की भूत काळातली? मी मनाला विचारलं.
“ कशी आहेस रुधिरा?”
“ प्रीतम कपूर ना  तुम्हाला तातडीने भेटायचंय. येताय असं गृहीत धरू ना मी?” कोणतीही वैयाक्तीक ओळख असल्याचं न दाखवत तिने विचारलं.
“ तातडीने म्हणजे नक्की कधी? ”
“ जेवण झाल्यावर.साधारण ३ वाजता दुपारी.”
“ मी प्रीतम कपूर यांना काही रक्कम देणे लागतो.त्याच्या वसुलीसाठी नाही ना बोलावलंय?” मी विचारलं
“ जॉब बद्दल आहे.” रुधिरा म्हणाली.
मला आनंद झाला. मी लगेच हो म्हणून टाकल. काही वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्री मधे मी चांगला जम बसवला होता.छोटे मोठे रोल मिळत होते.ते कमी होतं गेले, मग टीव्ही सिरीयल मधे काम केलं.हळू हळू ते ही बंद पडलं.आता मी चाळीशी पार केली होती. चांगला उंच पुरा होतो. सावळा पण तरतरीत आणि दणकट.पण आता कामाची नितांत गरज होती.प्रीतम कपूर हा माझ्या सारख्या वय वाढत असलेल्या आणि काम नसणाऱ्या माणसाना काम देणारा शेवटचा उपाय असल्या सारखा होता.मी तीन वाजता त्याच्या ऑफिसात पोचलो.रुधिरा कडे चौकशी केली की तो आहे ना आत, तिने हो म्हणताच मी आत गेलो प्रीतम कपूर केबिन मधे पीत बसलेला होता. स्थूल,बुटकासा देह, तुळतुळीत दाढी आणि टक्कल.
“ या मिस्टर चंद्रहास चक्रपाणी ”  मुद्दामून माझा उल्लेख आदरार्थी बहुवचनात करून प्रीतम कपूर म्हणाला.
“ मला वाटतंय तुला योग्य असं काम मिळायची शक्यता आहे. ”
“ कुठे काम आहे? सिनेमा की टीव्हीवर?” मी विचारलं.
“ ते नक्की माहित नाही.आज सकाळी दहा च्या सुमाराला भूपती भालेकर, असं नाव सांगणारा एक माणूस आला, चाळीस-पंचेचाळीस वय असेल.  कपड्यावरून आणि एकंदरित त्याच्या वागण्यावरून मला तो  खानदानी श्रीमंत वाटला. त्याला कुठून तरी माझ्या बद्दल कळल होतं की मी फिल्म लाईन मधे माणसं पुरवतो.त्याला एखादा काम नसणारा अभिनेता हवा होता. मी म्हणालो की माझ्याकडे बरेच आहेत. त्याच्या मनात कसा माणूस आहे ते त्याने सांगावे म्हणजे मी त्यांचे फोटो दाखवेन. त्याला हवा असलेला माणूस हा सहा फूट उंच, शिडशिडीत, पस्तीस ते चाळीशीचा, कार चालवता येईल असा, घोडेस्वारी येणारा, पोहता येत असलेला असा होता. मी त्याला काही जणांचे फोटो दाखवले त्यात्न त्याने तझा फोटो निवडलाय चंद्रहास. आणि तो आता तुला समक्ष भेटू इच्छितोय. फायनल निवड करण्या पूर्वी.” प्रीतम कपूर म्हणाला.
“ कोण आहे तरी कोण हा? आणि कामाचं स्वरूप तरी काय आहे? ” मी विचारलं.
“ त्याचा थांगपत्ता त्याने मला लावू दिला नाही. आपल्याला काय फक्त पैश्याशी मतलब आहे. मला कमिशन मिळेल त्याच्या कडून आणि तुला काम मिळेल.त्यातून  मी तुझ्या कडून येणं असणारी रक्कम वसूल करीन.”  प्रीतम कपूर म्हणाला.
मी कसानुसा हसलो.मला काम मिळणार होतं हे महत्वाचं.
“ तर मग चंद्रहास, तू आज रात्री प्लाझा हॉटेलच्या लॉबी मधे प्रवेश करशील.तिथे एक दोन फेऱ्या मारशील आणि तिथल्या पुस्तकाच्या द्कानात जाऊन एक मासिक विकत घेशील.नंतर हॉटेलातल्या बार मधे जाऊन मार्टिनी मागवशील.बारमन बरोबर काहीतरी बोलशील आणि पुन्हा लॉबी मधे जाशील.हे सगळ करताना तुझ्यावर भूपती भालेकर चं लक्ष असणार आहे.तेव्हा हे सगळं आरामात आणि घाई न करता करायचं आहे. तू लॉबीत अर्धा तास बस. तू भालेकरला पसंत पडलास तर तो तुला तिथे भेटेल, नाही पसंत पडलास तर तो येणार नाही तिथे. तसं झालं तर तू घरी जायचं आणि झालं गेलं ते विसरून जायचं.”प्रीतम कपूर म्हणाला.
“ त्याला नेमकं काय हवंय तुला कल्पना नाही? किंवा पैशा बद्दल काही चर्चा नाही झाली?” मी विचारलं.
“ नाही.  ही एक प्रकारची ऑडीशन आहे तुझी असं समज.तू ठरव काय करायचं ते.”
मी जरा विचार केला त्या बद्दल, मला हे सर्व विचित्र वाटलं पण पैसा मिळणार होता तरी मी प्रीतम कपूर ला विचारलं,
“ पैसेवाला वाटतोय तो माणूस?”
“ दिसायला तरी चांगलाच मालदार वाटतो.”
मी विचार केला, नंगे से खुदा डरे, मला गमावण्या सारखं  काहीच नव्हतं.
“ मी जाईन तिथे.”
“ एकदम शांत डोकं ठेव. नीट सर्व कर.त्याने पैशाचा विषय काढला तर माझ्याशी बोलायला सांग त्याला.तुझा एजंट या नात्याने. ”
“ ठीक आहे. मला एकदा नीट सांग, प्रीतम कपूर, मी लॉबी मधे एक दोन चकरा मारायच्या, मग पुस्तकाच्या टपरीवर जाऊन  मासिक घ्यायचं, बार मधे जाऊन मार्टीनी प्यायची आणि पुन्हा लॉबीत जाऊन बसायचं. ”
“ बरोब्बर.”
“ पण हे सगळ मी कुठल्या पैशातून करायचं? माझ्याकडे दमडा नाही आता. माझी कार सुद्धा विकल्ये मी.”
“ मी तुला उधार दिलेल्या पैशातून कर ”
“ ते अजून शिल्लक आहेत असं वाटतंय तुला?”
प्रीतम कपूर ने डोळे मिटून विचार केला आणि आपल्या खिशातून पाचशेची नोट काढून मला दिली.
“ ही माझ्याकडून तुला दिलेली शेवटची उधारी.” प्रीतम कपूर ने मला जाणीव करून दिली आणि मला हे काम मिळालं तर त्यातून आत्ताचे पाचशे आणि या आधी दिलेल्या उधरीतील किती राहिले याचा व्याजासह हिशोब मला दिला.
मी तिथन बाहेर पडलो.माझ्या मैत्रिणी कडे पाहून छानसं हसलो ती  माझ्या नंतर प्रीतम कपूरला भेटायला जाणाऱ्या दोन कळकट मळकट अशा माणसांशी बोलत होती. तरीही तिने माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं असावं असा भास मला झाला.मी माझ्या रूम वर आलो. मला हवा असलेला ब्रेक हाच होता का?  की कुठेही न जाता प्रीतम कपूरने दिलेल्या पाचशे रुपयात ऐश करावी असाही विचार करून ठेवला.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
साडे दहा वाजता मी प्लाझा हॉटेलात आलो.मला हे हॉटेल चांगलंच माहित होतं कारण माझ्या उमेदीच्या काळात म्हणजे खिशात पैसे खुळखुळत असतांना मी बऱ्याच ‘कबुतरांना’ इथे घेऊन येत असे.त्यावेळी पन्नासची नोट दाखवली की दारवान मला सलाम ठोकत असे. आज तो होता पण माझ्याकडे नोट न दिसल्याने त्याने लक्ष दिलं नाही.मी आत गेलो.लॉबी मधे बऱ्यापैकी गर्दी होती, लोक एकमेकांना भेटत होते, हास्य विनोद करत होते, म्हणजे नेहेमीचं वातावरण होतं.मी इकडून तिकडे एक-दोन वेळा फिरलो आणि पुस्तकाच्या टपरीवर गेलो.तिथे नेहमीची मुलगी होती, तिने ओळखलं.
“ अरे! चक्रपाणी, काय पत्ता काय तुमचा? किती दिवसांनी भेटताय. बाहेर होता की काय?” तिने विचारलं.
“ दुबईला होतो.” मी फेकली. तू पूर्वी पेक्षाही छान दिसते आहेस असं म्हणून तिचं कौतुक केलं, एक मासिक घेतलं.नंतर सहज भटकत भटकत बार मधे शिरलो.माझ्यावर भालेकरची नजर आहे याची जाणीव सतत होत होती, पण मी आजू बाजूला तो कुठे दिसतोय का हे शोधायचा मोह टाळला कारण मला माहित होतं की तसं केलं असतं तर माझा हा अभिनय  सहज वाटला नसता. बार मधे गर्दी होती.कौंटर पर्यंत पोचायला वेल लागला, एक ढेरपोट्या माणूस आणि त्याची त्याच आकाराची बायको बरीच जागा अडवून उभे होते. बारमन जयराज, पूर्वीचाच होता.एवढ्या दिवसांनी मी आलो तरी त्याने ओळखलं.
“ काय म्हणतोस चक्रपाणी,  जरा ही गर्दी कमी झाली की देतो तुला काय हवंय ते. ” तो म्हणाला.
म्हणजे मला इथल्या दोन व्यक्तींनी ओळखलं होतं तर. एक ती स्टॉल वरची पोरगी आणि आता हा बारमन.
त्याने मला हवी असलेली मार्टीनी दिली माझी चौकशी केली आणि दुसऱ्या ग्राहकांकडे वळला. मला नाही म्हंटलं तरी मनातल्या मनात सुखद गुदगुदल्या झाल्या कारण मला दोन जणांनी ओळखलं होतं.हातात ग्लास आणि एका हातात मासिक धरून  घेऊन मी मार्टीनीचे घोट घेता घेता सहज पणे बार मधे इकडे –तिकडे नजर टाकली.मुद्दाम कुणाला शोधतो आहोत असं वाटणार नाही याची दक्षता घेऊन.पण गर्दी खप होती त्यामुळे माझ्याकडे कोणी पहात असेल तर कळायला मार्ग नव्हता आणि त्यातून मी भालेकर ला कुठे बघितलं होतं? मी जयराज ला खूण करून एक सिगारेटचं पाकीट द्यायला सांगितलं.दोन्हीचे पैसे दिले आणि जयराजला टिप देऊन खुष केलं. भेटू पुन्हा म्हणून निरोप घेतला.मार्टीनी संपली होती, सिगारेट हातात होती ती घेऊन बाहेर लॉबीत आलो.आता ठोके वाढायला लागले होते.लॉबीतल्या   खुर्चीत मासिक चाळत बसलो.भालेकर येईल? मी जे काय केलं ते त्याला आवडलं असेल? बराच वेळ कोणी आलं नाही. प्रीतम कपूर म्हणाला होता शांत ठेव डोकं.तब्बल वीस मिनिटं मी बसून होतो.आता गर्दी संपली होती.माझ्या जवळच्या बाकावर एक वयस्कर जोडपं बसलं होतं. एक शिडशिडीत जोडपं रिसेप्शन क्लार्क शी बोलत होतं.एक वृद्ध बाई  मांडीवर पॉमेरियान कुत्रा घेऊन एकटीच बाकावर बसून वाट बघत होती, दोन पंचवीस तीस वयाचे तरुण सिगारेट ओढत आपल्या हातातील पेपर मधे एकमेकांना काहीतरी दाखवत होते.थोडक्यात भालेकर नामक माणसा सारखं दिसणारं कोणीच नव्हतं. अर्धा तास व्हायला आला होता काहीच झालं नाही किंवा कोणी आलं नाही. थोडक्यात मी सपशेल हरलो होतो.चला आणखी काही मिनिटे थांबू आणि घरी जाऊन पडू असा विचार आला. लॉबीतले एक एक जण कमी व्हायला लागले होते. हातात प्रीतम कपूर ने दिलेल्या पाचशे रुपयातले एकशे अकरा रुपये शिल्लक होते.
मी अजून जरा थांबायचा निर्णय घेतला.नाहीतरी घरी जाऊन खास काही करायचं नव्हतंच मला.बाकावर एकटीच बसलेली वृद्ध स्त्री माझ्या दिशेने यायला निघाली.
“ चंद्रहास चक्रपाणीच ना तू? नक्कीच!  कैदी या सिनेमात तुझं काय सुंदर काम झालय ! ”
मी तिला धन्यवाद दिले आणि निघायची तयारी करायला लागलो. माझ्या सारख्या एका छोटा रोल करणाऱ्या अभिनेत्याला तिने ओळख दिली हेच खूप होतं.पण भालेकर न भेटल्याने मूड मधे नव्हतो.  पण ती चिवट होती तिने मला तिच्या बरोबर  जेवण घ्यावे अशी विनंती केली.इथे बाहेरच धनुष्य नावाचं सुंदर रेस्टॉरंट आहे.तिथे जावं म्हणून तिने सुचवलं. हे रेस्टॉरंट फक्त बाहेरून बघायची माझी लायकी होती, तिथे कधी जायला मिळेल हे माझं स्वप्न होतं.माझ्या परवानगीची वाट न पाहता  तिने मला तिच्या अलिशान गाडीत बसवलं. गाडी धनुष्य हॉटेल कडे न्यायला ड्रायव्हरला सांगितलं.
“ मॅडम, तुमचं नाव नाही सांगितलं मला.”  मी म्हणालो.
“ काय मूर्ख आहे मी ....” ती म्हणाली. तेवढ्यात तिच्या मांडीवरच्या पामेरियन कुत्र्याने माझ्या मांडीवर आक्रमण केलं.कुत्र्याचा मला भयंकर तिटकारा आहे.मी त्याला पटकन खाली ढकललं. मला माझ्या मांडीला अचानक एक तीव्र वेदना जाणवली.
“ अहो तुमचा कुत्रा मला चावला ! ” मी वेदनेने ओरडत म्हणालो.
“ नाही हो, माझा शेरू कधीच कुणाला चावलेला नाही.... तो अत्यंत..... सज्जन...” ती बरंच काही बोलत राहिली पण मला ते सर्व ऐकू येत नव्हतं, माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरत चालला होता.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मला जाग आली तेव्हा मी एका डबल बेड वर झोपलेल्या अवस्थेत होतो. ती एक खूप मोठी आणि अद्ययावत सुख सोईनी सजवलेली खोली होती.महागडे फर्निचर, आधुनिक पडदे आणि मी ज्या बेड वर होतो त्याच्या टोकाला एक मोठा आरसा. माझं प्रतिबिंब मला दिसलं.कुठे होतो मी? आणि कसा आलो इथे? पण ज्या कुठे होतो, ऐयाशित होतो.माझं लक्ष हातातल्या घड्याळाकडे गेलं.८.४५ झाले होते.पण दिवसाचे की रात्रीचे? काहीही समजत नव्हतं. आणि... आणि. माझा मोबाइल कुठे गेला? मी आठवायचा प्रयत्न केला.शेवटची जागेपणाची जाणीव रात्री ११ ४५ च्या सुमारास होती. ते आठवलं कारण तेव्हा गाडीत त्या म्हाताऱ्या बाईचा कुत्रा माझ्या मांडीवर आला आणि चावला तेव्हा मी घड्याळ पाहिलं होतं.नंतरचं मला काहीच आठवत नव्हत. कसं शक्य आहे हे? ती बाई कोण होती? ती म्हणाली माझा कुत्रा कधीच चावत नाही मग माझ्या मांडीला काय टोचलं?  ओह! मला काहीतरी इंजेक्शन टोचून बेशुद्ध करून इथे आणलंय ! पण मला असं मोकळं कसं ठेवलंय? बांधून वगैरे नाही ठेवलं. आणि एवढ्या महागड्या घरात? मी आजू बाजूला नजर टाकली. माझ्या खोलीला जोडून बाथरूम होती. मी ठरवलं अत्ता या क्षणी मी सुखात आहे ना, तर आनंद घ्यायचा. प्रथम सर्व आवरून फ्रेश होण्यासाठी बाथरूम मधे गेलो.ती एखाद्या फाय-स्टार हॉटेल सारखी होती.बाथ टब, भारीतली बेसिन, महागडे नळ, पांढरे धोप टर्किश टॉवेल. काय नाही असं नाही. पोट  रिकामं झाल्यावर मी खोलीत नजर टाकली.दार खिडक्या बंद होत्या.त्यातल्या कशालाही हँडल नव्हतं त्यामुळे ते आतून उघडायचा प्रयत्न करूनही यश आलं नाही. मला प्रथम चहाची तल्लफ आली आणि भुकेची जाणीव झाली. मला काल धनुष्य या महागड्या रेस्टॉरंटचं आमिष दाखवलं गेलं पण प्रत्यक्षात नेलं नाही.त्यामुळे रात्रीचं जेवण झालाच नव्हतं तेवढ्यात मला बेड च्या जवळच बेल चं बटण मला दिसलं. मी ते दाबलं, चांगल दोन-तीन वेळा दाबल.थोड्या वेळात दार उघडलं गेलं आणि एक माणूस एक ट्रॉली घेऊन आत आला. माणूस कसला, एखादा गोरिला असावा तसा.मी स्वत: सहा फुट एक इंच आहे पण तो माझ्या पेक्षा उंच होता.आणि धिप्पाड. सिनेमात मी अशा तगड्या व्हिलन बरोबर मारामारीचे सीन्स केलेत, पण ही मंडळी फट पडद्यावर व्हिलन असतात खऱ्या आयुष्यात चांगली असतात.पण हा गोरिला तसा वाटला नाही.त्याने माझ्या जवळ ट्रॉली आणली.त्यात काय नव्हतं? कॉफी, ज्यूस, सॅंडविच इडली, पराठे. मी ठरवलं की कशालाही न घाबरता पाहिलं खाऊन घ्यायचं. तो गोरिला निघून गेला आणि मी खाणे संपवल्यावर ट्रे मधे ठेवलेली सिगारेट पेटवली आणि  त्याचे झुरके मारत पुढे काय आणि कधी घडणार याची वाट बघत बसलो.एव्हाना माझी भीती चेपली होती.मला जिवंत ठेवलंय आणि एवढी खातिरदारी केली जाते आहे याचा अर्थ माझी त्यांना गरज आहे. अर्धा तास गेला आणि तो गोरिला पुन्हा आत आला पण यावेळी त्याच्या मागोमाग एक पंचेचाळीस च्या आसपास वय असलेला एक काळेलासा माणूस आत आला.त्याचा पोशाख एकदम श्रीमंती वाटत होता. तो बोलला काहीच नव्हता अजून पण देहबोली एकदम समोरच्यावर दादागरी करणारी वाटत होती. मी ओळखलं हाच भालेकर असणार.प्रीतम कपूरने केलेलं वर्णन असंच होतं. मी उठून उभं राहायला लागलो.
“ बसूनच रहा मिस्टर  चक्रपाणी.” तो म्हणाला.आणि माझ्या शेजारी बसला. माझी नजर त्या गोरिला कडे गेली.तो दारातच उभा होता पण गुरकत असावा असा भास मला झाला. भालेकर ने पहिली खेळी खेळावी असा विचार करून मी गप्प राहिलो.
“ चक्रपाणी, तुला आश्चर्य वाटत असेल हे सगळ काय आहे, पण ज्या पद्धतीने तुला इथे आणलय त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे आणणे शक्य नव्हतं आम्हाला.” भालेकर म्हणाला.
“ एखाद्याला पळवून आणणे हा कायद्याने गुन्हा आहे.” मी म्हणालो.
“ मान्य.पण कायदेशीर बाबी बोलायची ही वेळ नाहीये.कदाचित ती नंतर येईल.” भालेकर म्हणाला. “ तुझ्या बद्दल काही गोष्टी आम्हाला समजल्यात त्याची खात्री करून घेणं आवश्यक आहे आधी. तू एकेकाळी सिनेमात छोटी मोठी कामं करणारा अभिनेता होतास पण सद्य स्थितीत बेकार आहेस आणि तुला कामाची आणि पैश्यांची गरज आहे.बरोबर आहे ना? ”
मला कबूल करण्यावाचून पर्याय नव्हता.
“ तुझ्याकडे पैसा नाहीये एवढंच नाही तर तू कर्ज बाजरी पण झालायस, खरं की नाही? ” भालेकर ने विचारलं.
मी हो म्हणत गेलो.
“ मी तुला नोकरी देतो.तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मी देईन. रोज पाच हजार. किमान एक महिना तरी तुला हे काम असेल.कदाचित जास्त दिवस सुद्धा, जर तू आमच्या अटी पाळल्यास तर.”
मी अवाक झालो होतो.माझ्या कडून काहीच प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. रोज पाच हजार ! खूप मोठी रक्कम होती ही.पण त्यात काहीतरी मेख असणार.त्याचा अंदाज घ्यायलाच हवा होता पण हा प्रस्ताव नाकारण्य एवढा मी मूर्खही नव्हतो.
“ काय अटी आहेत तुमच्या?” मी विचारलं.
“ रोज पाच हजार रुपये दराने मी तुझ्या कडून १००% सहकार्य विकत घेणार आहे. म्हणजे कोणतेही प्रश्न , शंका न विचारता मी सांगेन तेच तुला करायचं आहे. एक तर तू हो म्हण किंवा नाही.हे आधीच सांग.”
“ पण मला काय करावं लागेल त्या बदल्यात?” मी जोर करून विचारलं.
“ अच्छा म्हणजे कामाचं स्वरूप समजल्या खेरीज तू तुझा निर्णय देणार नाहीस तर !” भालेकर ने अशा काही आवाजात विचारलं, की मला घामच फुटला.दारातल्या त्या गोरीलाने माझ्याकडे पहिल्याचा भास मला झाला.पण पैशाच्या लोभाने कुठल्या सापळ्यात अडकू नये असं माझं मन मला बजावत होतं त्यामुळे मी भालेकर ला तसं निक्षून सांगितलं होतं.
“ मला वाटलं होतं की पाच हजार रोज ही रक्कम तुला पुरेशी आहे, शंका न विचारता काहीही काम घ्यायला.”
“ तसं तुला वाटत असेल तर ते चूक आहे.” मी हे बोलून गेलो याचं मलाच नवल वाटलं.
भालेकर ने आपल्या हाताने भुवया खाजवल्या “ ठीक आहे साधारण तुला कल्पना देतो.” भालेकर म्हणाला आणि त्याने आपल्या खिशातल्या पाकिटातून सिगारेट बाहेर काढली.  ते पाहून दारात उभा असलेला गोरिला सारखा दिसणारा माणूस तातडीने त्याच्या जवळ आला आणि त्याने लायटरने त्याची सिगारेट पेटवून दिली.
“ तर ऐक, तुझ्यासारख्या दिसणाऱ्या एका माणसाचा तोतया म्हणून तुला आम्ही नेमू इच्छितो.”
“ तोतया! कुणाचा?” मी उत्सुकतेने विचारलं.
“ ते तुला माहित असायची गरज नाही.”
“ ठीक आहे त्याचं नाव नका सांगू पण तसं करायची गरज काय आहे?” माझी भीड आता चेपली होती.
“ ज्या माणसाचा तोतया म्हणून तुला वावरायचं आहे त्या माणसाला स्वातंत्र्य हवंय.सध्या त्याच्यावर एका प्रतिस्पर्धी  ग्रुप ची आणि पत्रकारांची  नजर आहे.त्यामुळे त्याच्या हालचाली वर नियंत्रण आलंय.आणि एका मोठ्या डील साठी त्याने मोकळेपणाने हालचाली करणे, काम करणे आवश्यक आहे जे त्याला करता येत नाहीये. तू त्याच्याच सारखा दिसतो आहेस त्यामुळे तुझ्याकडे लक्ष वेधायचे आणि खऱ्या माणसाने  निर्धास्त पणाने युरोप ला  किंवा जिथे जायचं तिथे जावून आपले डील पूर्ण करायचे  असा प्लान आहे. त्याचं हे काम झालं की तुझंही काम होईल, तुझ्या खात्यात दीड लाख जमा होतील.”
“ पण यासाठी किडनॅप का केलं मला. तुम्ही...”
एखादी माशी झटकून टाकावी तसं त्यानं माझं बोलणं तोडलं.त्याने सांगितलं की जास्तीत जास्त गुप्तता पाळण्यासाठी त्यांना असं करावं लागलं.मी जर नाही म्हणालो या कामाला तर ते मला पुन्हा बेशुद्ध करतील आणि माझ्या घरी सोडतील. मला खरोखरच काम झाल्यावर दीड लाख मिळतील याची खात्री मला हवी होती.मी माझी शंका त्याला बोलून दाखवली तेव्हा त्याने मला माझ्या नावाने काढलेला  पाच हजाराचा बँकेचा ड्राफ्ट दाखवला.
 “असे रोजच्या रोज तुला मिळतील. आम्ही तुझ्या खात्यात  परस्पर  जमा करू शकतो ही रक्कम पण तुला खात्री पटवण्यासाठी मुद्दाम ड्राफ्ट काढायची व्यवस्था केली आहे.तुझी इथेच राहण्याची व्यवस्था करण्यात येईल.पण तू आमच्या परवानगी शिवाय बाहेर संपर्क करू शकणार नाहीस. बाहेर जाऊ शकणार नाहीस.तुझं काम  महिना दीड महिन्यात झालं की  तुला मोकळ केलं जाईल, जातांना तुझा मोबाइल तुला परत केला जाईल.”
“ अच्छा म्हणजे मला माझा मोबाइल  कुठेतरी पडला असं वाटत होतं....”
“ तो आम्ही आमच्याकडे ठेवलाय.” भालेकर म्हणाला. “या अटीवर  तयार आहेस का सांग.”
मला त्याच्या हातातला पाच हजाराचा ड्राफ्ट खुणावत होता.
“ डन!” मी म्हणालो आणि हात पुढे केला.
 आणि  ५००० चा  ड्राफ्ट  माझ्या हातात पडला.
(प्रकरण १ समाप्त.)