तोतया
प्रकरण ३
आज तिसरा दिवस..दुपारी मजहरने जेवण आणलं तेव्हा मी सह्या करत बसलो होतो. माझी सहीवर आता हुकुमत आली होती. येतांना त्याने माझा तिसरा हप्ता आणला होता.पाच हजाराचा ड्राफ्ट ! मला आता बाहेर नेण्यात येणार होतं.माझी तोतयेगिरी आता सुरु होणार होती. भालेकर आत आला त्याच्या हातात ब्रीफ केस होती.त्यातून एक लीगल पेपर बाहेर काढला. हिरवट रंगाचा. त्यावर काहीतरी मजकूर छापला होता.
“ यावर पेन्सिल ने सही कर.”
मी हातात पेन्सिल घेऊन अस्खलित पणे प्रखर प्रजापती ची सही ठोकली.भालेकर माझ्याकडे बघत होता.माझा आत्मविश्वास पाहून तो खुष झाला.
“ आता पेनाने कर.” तो म्हणाला. मी केली. ती नीट निरखून पहात तो म्हणाला,
“ पास झालास तू चक्रपाणी, तुला आता दुबईला नेण्यात येईल. दुबई मधे आपल्या कंपनीचं ऑफिस आहे. तुझी तोतयेगिरी आता खऱ्या अर्थाने चालू होईल.
“ पण माझ्याकडे फक्त पासपोर्ट आहे.व्हिसा नाही.मग दुबईला कसे जाणार?” मी शंका घेतली.
“मूर्ख आहेस तू, प्रजापती सरांच्याच पासपोर्ट आणि बिझनेस व्हिसा वर तू जाणार आहेस.” माझ्या हातात प्रजापतीचा पासपोर्ट आणि व्हिसा ठेवत तो म्हणाला. हे दोन्ही सांभाळून ठेव.दुबईला निघताना या दोन्ही गोष्टी लागतील. तुझा पासपोर्ट आमच्या लोकांनी तुझ्या रूम मधून आणलाय आणि तू अत्ता इथे राहतो आहेस त्या रूम मधे ठेवलाय. ”
बापरे! काय थराला जाऊन काम करतात हे लोक!
“ दुबईला तुझी प्रजापतीच्या बायकोशी भेट होईल.तिला हे सगळं माहित्ये त्यामुळे काळजी करू नकोस.तिथे तुला स्वतंत्र क्वार्टर्स मिळतील आणि तिथल्या कुठल्याही कर्मचाऱ्याशी तुझा संपर्क येणार नाही कारण खरा प्रजापती सुद्धा कुठल्या कर्मचाऱ्याशी फारसा संपर्कात नसायचा..त्यामुळे सगळ्यांना हे वेगळं काही घडतंय असं वाटणार नाही.मजहर तिथे असेलच.तुला हवं नको ते तो बघेल. तू अधून मधून प्रजापतीच्या रुपात तिथल्या परिसरात इतरांना दिसायचे आहेस.आठवड्यातून तीन वेळा तुला कंपनीच्या ऑफिसात नेलं जाईल. मजहर असेलच तुझ्या बरोबर. तुला तिथे कोणी स्वत:हून भेटायला येणार नाही तू फक्त तिथे वेगवेगळ्या कागदपत्रावर सह्या करायचं काम करायचं आहेस.ही सगळी मोहीम मीच हाताळत आहे.प्रजापतीच्या खाजगी सेक्रेटरीला मी रजेवर पाठवलंय.तिच्या जागी मी दुसऱ्या मुलीला नेमलंय, तिने कधीच खऱ्या प्रजापतीला बघितलं नाहीये.त्यामुळे तुला काळजीचं कारण नाहीये. तू फक्त मी सांगेन तेच आणि तेवढंच करायचं आणि मी समोर ठेवीन त्या कागदावर काहीही प्रश्न न विचारता सही करायची. समजलं नीट? ” भालेकर ने विचारलं.
मी हो म्हणालो. आणखी काय वेगळं बोलू शकत होतो मी?
“ तुला या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्ही बऱ्यापैकी पैसे देतोय तुला.”
मी मान डोलावली. तो म्हणतोय त्या प्रमाणे अत्ता पर्यंत मी जे केलं, त्या सोप्या गोष्टी होत्या.पैशांच्या तुलनेत. पण खरंच सगळ सोप होतं पुढचं?
भालेकर उठला. “ आजच संध्याकाळी सात वाजता निघू आपण. प्रजापती जेव्हा बाहेरगावी जातो तेव्हा मजहर असतोच त्याच्या सोबत त्यामुळे तो आत्ताही तुझ्या बरोबर राहील.तुला तो वेळोवेळी सूचना देईल तसं करत रहा म्हणजे काही धोका नाही तुला. ”
दुबईला जायचं आणि त्यापेक्षाही प्रजापतीच्या बायकोला भेटायचं या कल्पनेने माझ्या डोळ्यात चमक आली. कशी असेल ती दिसायला?
सहा वाजताच मजहर आला.त्याने चेहेऱ्याचा मास्क, बूट, आणि सूट घालायला आणला होता तो घालायला लावला.नंतर त्याने भुवया आणि मिशा चिकटवल्या.
“ माय गॉड! मी सुद्धा कबूल करणार नाही की तू खरा प्रजापती नाहीस म्हणून. थांब मी भालेकर ला बोलावतो.तू इथेच थांब.”
ती भालेकर ला बोलवायला गेला तेव्हा मी आरशात माझं प्रतिबिंब न्याहाळलं.प्रखर मार्तंड प्रजापती ! भारतातल्या उच्च श्रीमंतातला एक. माझ्या कडे काय नव्हतं या क्षणी जे खऱ्या प्रजापतीकडे होतं? पैसा, ताकद.नव्हतं पण शरीर? ते माझ्याकडे होतं.आणि आता तर त्याची सही मी करू शकत होतो. भालेकर आत येताच माझी तंद्री भंग पावली.
“ छान.” भालेकर त्रोटकपणे म्हणाला. पण मला माहित होतं, तो खुष होता माझ्या रूपावर. “ चला निघू.” तो म्हणाला आणि पुढे झाला.
“ मी तुला एक सुचवू का?” मी मजहर ला विचारलं.
“ बोल चंद्रहास.”
“ इथून पुढे मला चंद्रहास किंवा चक्रपाणी म्हणू नकोस. बॉस म्हण किंवा मिस्टर प्रजापती म्हण.
“ औकातीत रहा.तू आमचा नोकर आहेस.मी सांगेन तेच तू करायचं आहेस आणि बोलायचं आहेस.” मजहर म्हणाला.
“ विचार कर, तू सतत माझ्या बरोबर असणार आहेस.आसपास कोणी असताना तू मला चंद्रहास किंवा चक्रपाणी म्हणालास तर केवढा अनर्थ होईल विचार कर.” मी म्हणालो.
त्याने विचार केला.
“ मुद्दा बरोबर आहे तुझा. चला मिस्टर प्रजापती सर.” तो म्हणाला.आम्ही खोलीचा बाहेर पडलो आणि प्राशिला पुढे आली.
“ फॅंटास्टिक !” ती उद्गारली. “ तू खरंच माझा मुलगा आहेस.” तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी सिनेमात दाखवतात तसा तिचा हात माझ्या हातात घेऊन माझे ओठ तिच्या तळहातावर टेकवले.आणि आमचं त्रिकुट खाली आलं.कार मधे मजहर ड्रायव्हर शेजारी बसला. मागे भालेकर बसला आणि त्याच्या शेजारी मी.
“ आपण विमान तळावर पोचू तेव्हा पत्रकार तिथे आलेले असतील. ते तुझ्या पर्यंत पोचू शकणार नाहीत पण ते असतील याची तुला कल्पना देऊन ठेवतो.आपण आपल्या कंपनीच्या विमानाने जातोय.तू विमानाचा जिना चढून शेवटच्या पायरीवर गेलास की मागे वळायच आणि सर्वांना हात उंचावून अभिवादन करायचं.कळलं?”
मी हो म्हणालो.
“ विमानात आल्यावर एअर होस्टेस कडे बघून मान डोलवायची आणि गप्प बसून राहायचं.तुला कोणी काही विचारायला येणार नाही. आपण पोचलो की पुढचं तुला सांगीन.”
“ ठीक आहे. तुला एक सुचवू का?तू प्रजापतीला जे काही म्हणतोस त्याच नावाने इथून पुढे मला हाक मारशील का? कारण सवयीने चंद्रहास किंवा चक्रपाणी म्हणालास आणि कोणी ऐकलं तर आपल्या सगळ्या मोहिमेवर पाणी पडेल.” मी म्हणालो.
“ गुड ! हुशार आहेस.” भालेकर म्हणाला. “ तू सुद्धा मला भालेकर नाही भूप म्हण.प्रजापती म्हणतात तसं.” भालेकर म्हणाला, पण त्याला हे सर्व पटत असलं तरी आवडत नसावं असं मला वाटलं.
विमानतळावर पोहोचे पर्यंत कोणी काही बोललं नाही.
“ काहीही बोलू नको, करू नको.आपण आलोय विमानतळावर. मजहरवर सोपव सर्व. ”
“ ठीक आहे,भूप ” मी मुद्दामच त्याच नाव घेऊन म्हणालो. आम्ही खाली उतरलो.समोर आमचं विमान होतं.त्याच्याच जिन्यावर चढून मला सर्वांना अभिवादन करायचं होतं. आम्ही चालायला लागलो. एवढ्यात कॅमेरा घेतलेले प्रेस रिपोर्टर चा घोळका आला,
“ मिस्टर प्रजापती, इकडे बघा, जरा तुमच्या प्रतिक्रिया द्या आम्हाला. प्लीज एक मिनिट ” असे आवाज आले.
काय वातावरण होतं! मी माझ्या आयुष्यात अशाच श्रीमंतीचं स्वप्न बघितलं होतं. मी मोठा फिल्म स्टार झालोय, आणि प्रेस रिपोर्टरच्या गराड्यातून माझे बॉडी गार्ड मला वाट काढून देतायत.
मी विमानाची शिडी चढलो. ठरल्या प्रमाणे सर्वात वरच्या पायरीवर गेल्यावर मागे वळून सर्वांना हात हलवला. भालेकर ने वेळ न घालवता मला कोणाच्याही लक्षात येणार नाही असं आत ढकललं.
त्या खाजगी विमानात स्वर्ग होता.जगातली सर्व सुख तिथे होती.तोतया असलो म्हणून काय झालं मी अत्ता हे सर्व उपभोगू शकतोय ना !
पुढची वीस मिनिटं मी हे सुख पिऊन घेतलं. माझ्या मनात आलं, या क्षणी मी प्रजापती आहे. जगातला कोट्याधीश. माझ्याकडे इतरांनी त्याच नजरेने बघावं असं मला वाटलं आणि मी ओरडलो,
“ मजहर ! ”
मजहर आणि भालेकर, दोघांनी माझ्याकडे चमकून पाहिलं.आणि माझ्या दिशेने आला.
“ मला डबल स्कॉच आण, आणि काहीतरी खायला पण दे.”
त्याने एकदम भालेकरकडे बघितलं.भालेकरने माझ्याकडे चिडून पाहिलं.नंतर शांत झाला आणि मान डोलावली.
“ ओके मिस्टर प्रजापती.” मजहर म्हणाला आणि एअर होस्टेस ला निरोप द्यायला गेला. भालेकर माझ्याकडे चमकून बघत होता पण थोड्या वेळाने त्याने पुन्हा काहीतरी वाचायला सुरुवात केली.थोड्या वेळात जेवण आलं.शाही जेवण.दोन एअर होस्टेसनी अत्यंत आदर पूर्वक आणि आग्रहाने आम्हाला खाऊ घातलं.भालेकरने हुशारी दाखवून नेहमीच्या एअर होस्टेस न ठेवता नवीन ठेवल्या होत्या.त्यामुळे त्यांना खरा आणि खोटा प्रजापती कळायला मार्ग नव्हता.जेवण झाल्यावर त्यातल्या एकीने मला वर्तमान पत्र किंवा पुस्तक वाचायला हवंय का विचारलं.मी पेपर द्यायला सांगितला.फार वेगळ्या काही बातम्या नव्हत्या.मी पेपर खाली ठेवणार तेवढ्यात मला एका माणसाचा फोटो दिसला.तो ओळखीचा वाटला म्हणून मी पाहिलं तर माझा मेकअप मन गंधार चा होता.त्याची कुठली बातमी आल्ये म्हणून मी नीट वाचलं.त्या थंडगार ए.सी.मधे सुद्धा मला घाम फुटला.त्याने आत्महत्या केल्याची बातमी होती.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून दहाव्या मजल्यावरून त्याने उडी मारली होती.
या लोकांनी दुसरा बळी घेतला होता.आधी सिन्नरकर, म्हणजे माझ्या जागी आणलेला माणूस, ज्याने काम नाकारलं तो.आणि हा दुसरा! माझं काय? माझ्या चेहेऱ्यावर आलेला घाम माझ्या मास्क मुळे कुणाला दिसला नसावा.
“ ब्रँडी घेणार?” एका एअर होस्टेसने विचारलं.
मला गरजच होती.
तुम्हाला जरा विश्रांती घ्यायची असेल तर तुमच्या बेडरूम मधे जा.अजून आपल्याला पोचायला वेळ आहे.
मला झोप आवश्यक होतीच पण तो मास्क कधी काढेन असं झालं होतं मला.मी विमानातल्या त्या अलिशान बेडरूम मधे जायला लागलो आणि मजहर उठला.पण भालेकरने त्याला नजरेनेच खाली बसवलं.मी आत आलो आतून दार लावून घेतलं. आरशा समोर स्वत:ला पाहिलं.समोर प्रजापती उभा होता.ज्याचं कोणीच वाईट करू शकत नव्हतं. मास्क ओढून काढला. आता समोर चक्रपाणी होता. दुसर्याच्या तालावर नाचणारा. त्याला ते कधीही संपवू शकत होते.मला आठवलं की भालेकर म्हणाला होता की माझी ही मोहीम किमान तीस दिवस चालू राहणार होती, कदाचित वाढेलही. याचा अर्थ मी तीस दिवस तर नक्कीच जगणार होतो. त्यात सर सुखं उपभोगायची आणि मुदत संपायच्या आत या दु:स्वप्नातून बाहेर यायचा मार्ग काढायचाच असं मी ठरवलं. बाहेरून दाराचं हॅण्डल फिरवल गेलं.उघडण्यासाठी दार ढकललं गेलं पण मी आतून काडी घातल्याने दार उघडलं गेलं नाही.बाहेरून मजहरचा आवाज आला,
“ तुम्ही ठीक आहात ना मिस्टर प्रजापती?”
“ मला त्रास देऊ नको.जा तू.मला झोपायचंय.” मी आतून ओरडलो.
एवढं अलिशान खाजगी विमान, त्यातली माझी ही खाजगी बेडरूम, पण माझी अवस्था पिंजऱ्यातल्या उंदरासारखी झाली होती.
***
दारावर टकटक करून मला उठवण्यात आलं. तासाभरात आपण उतरणार आहोत तुम्ही तयार होऊन बाहेर या म्हणून सांगण्यात आलं. मी पुन्हा मास्क घातला.आरशात पाहिलं. प्रजापती बाहेर पडायला तयार होता. कोणी मला काही करू शकत नाही हा विश्वास त्या मास्क ने दिला.मी बाहेर आलो.मजहर आणि भालेकर बरोबर कॉफी घेतली.
“ आपण एअरपोर्ट वरून हेलिकॉप्टरने घरी जायचंय. ” भालेकर म्हणाला. विमानातून उतरल्यावर पुन्हा प्रेस चे लोक येतीलच पण तुझ्या पर्यंत ते नाही पोचणार.
विमान खाली उतरल्यावर आम्ही थोडावेळ आताच बसून राहिलो.खिडकीतून मी पाहिलं तर खाली उतरायच्या शिडीभोवती बॉडी गार्डस ने वेढा घातला होता. खाली उतरताना प्रेस च्या कॅमेरामन चे फ्लॅश लाईट आणि मला बोलायला सांगणारे पत्रकार यांच्या आवाजाने एक सुखद संवेदना अंगातून गेल्याचा भास झाला.काय लाईफ आहे सालं ! माझ्या मनात आलं.
हेलिकॉप्टर आमच्यासाठी वाटच बघत होतं मला मोह झाला की प्रेस रिपोर्टरकडे वळून त्यांना हात करावा पण मला अक्षरशः हेलिकॉप्टर मध्ये कोंबलं गेलं, आणि दार बंद करण्यात आलं. हेलिकॉप्टरच्या पायलटने हसून माझं स्वागत केलं.
“ नमस्कार मिस्टर प्रजापती” तो म्हणाला.
“वा ! बरं वाटलं तुला भेटून.” मी त्याला प्रत्युत्तर दिलं. अर्थात आमच्या दोघातले हे संवाद भालेकरला अजिबात आवडले नाहीत त्यानं मला गप्प बसायला सांगितलं माझ्या जागी खरा प्रजापती असता तर तो पायलटशी असं बोललाच नसता. साधारण वीस मिनिटांनी आमचं हेलिकॉप्टर दुबई शहराभोवती गिरट्या घालायला लागलं. माझ्या
स्वप्नातलं शहर होतं ते. चंद्राच्या रुपेरी प्रकाशात न्हावून गेलेलं.. मोठमोठ्या टुमदार बंगल्यांच्या परिसरात आमचं हेलिकॉप्टर स्थिरावलं आणि खाली उतरलं. आम्ही बंगल्याच्या पुढच्या बाजूला खाली उतरलो होतो. एका मोठ्या हॉलमध्ये आम्ही प्रवेश केला. तिथून एका रुंद अशा कॉरिडॉर मधून आम्ही लिफ्ट मधे बसलो.
“याला त्याच्या खोलीत घेऊन जा.” भालेकर मजहरला म्हणाला. “मिसेस प्रजापती याला उद्या सकाळी भेटेल ” आणि तो निघून गेला. लिफ्टने आम्ही वर आलो. एका लॉबीमध्ये उतरलो. आमच्यासमोर दोन दरवाजे होते. त्या दोघातला एक दरवाजा उघडून मजहर म्हणाला “इथे तू राहतोस”
आम्ही दोघं आत आलो. एक आलिशान अशी ती खोली होती एक अब्जाधीश ज्या ज्या प्रकारे खोली सजवू शकेल त्या सर्व सुख सोयी तिथे होत्या. त्या खोलीतून मला मजहर दुसऱ्या एका खोलीत घेऊन गेला.
“ही तुझी बेडरूम आहे.” माझा वरचा श्वास वर आणि खालचा खाली झाला. एवढी अलिशान आणि अद्ययावत बेडरूम मी चित्रपटात सुद्धा बघितली नव्हती.मजहरनं तिथलं एक कपाट उघडलं आणि तिथला एक सिल्क चा पायजमा आणि शर्ट बाहेर काढला आणि गुबगुबीत स्लीपर्स. “या घाल.” तो म्हणाला “उद्या आपण भेटू” आणि बाहेर पडला मला जाणवलं की पुन्हा मी बंदिवान झालो होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठवायला मजहर आला. त्याच्या हातात कॉफी आणि बिस्कीट ची ट्रॉली होती.
“आवर पटकन” मला तो म्हणाला. मी बाथरूम मध्ये जाऊन पटकन आवरून घेतलं मनसोक्त स्नान केलं उबदार पाण्यात बाथ टबा मध्ये डुंबलो.मजहर ने दारावर टकटक केली त्यामुळे नाईलाजाने तिथून बाहेर आलो. माझा मास्क घातला मजहरने माझ्यासाठी काढून ठेवलेला सूट अंगावर चढवला. मला आठवलं आज सकाळी मला प्रजापतीची बायको भेटणार होती
“कशी आहे प्रजापती ची बायको?” मी मजहरला विचारलं.
उत्तरा दाखल मजहर ने एक हळुवार शिट्टीच वाजवली.
तू चंद्रहास चक्रपाणी आहेस हे तिला माहिती आहे. जरा काळजीपूर्वक हाताळ तिला. पण वरचढ होवू देऊ नको.”
तेवढ्यात इंटरकॉम वाजला तो बहुतेक भालेकरचा होता. मी कपडे करून तयार असल्याचं मजहरने त्याला सांगितलं आणि फोन झाल्यावर माझ्याकडे वळून त्याने मला सूचित केलं की मिसेस प्रजापती म्हणजे मालविका इथे येते आहे.
न पाहिलेल्या एका स्त्रीच्या प्रतीक्षेत मी क्षणभर स्वतःला विसरून गेलो कशी असेल ती सुंदर अतिसुंदर की सर्वसामान्य?
मालविका दारात येऊन कधी उभी राहिली मला कळलच नाही. कुठल्याही माणसाचा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली राहील अशी ती होती तिचे नक्की वर्णन असं करताच आलं नसतं. उंच पुरी भरल्या अंगाची परंतु शिडशिडीत. पण तिचा चेहरा कमालीचा मोहक होता क्लिओपात्रा या इंग्रजी सिनेमातल्या नटी सारखा. ती फक्त सुंदरच होती असं नाही तर पुरुषांना आकर्षित करणारं असं काहीतरी तिच्यात होतं.
मी सोफ्यावर बसलो होतो तिला बघून उठायचं सुद्धा मला भान राहायलं नाही.
तिच्या मागोमाग भालेकर आत आला. त्याने भडकून मला उभं राहण्याची आज्ञा दिली मी एकदम उठून उभा राहिलो. “चालून दाखव मॅडमना.” दुसरी आज्ञा केली. मी त्याच्या म्हणल्याप्रमाणे केलं.
"आम्ही त्याच्या सगळ्या टेस्ट घेतली आहेत मॅडम, आमच्या म्हणण्याप्रमाणे तो आपल्याला योग्य असा आहे."भालेकर तिला म्हणाला.
“ त्याला काहीतरी बोलायला सांग.” आपल्या मधाळ आवाजात हळुवार पणे ती म्हणाली.जणू काही मी तिथे नाहीच आहे असं समजून तिने भालेकरला आज्ञा केली.
“ बोल काहीतरी. ऐकलं नाहीस का तू?” भालेकर माझ्यावर खेकसला.
मी काय बोलावं हे ठरवत असतांना माझं लक्ष समोरच्या आरशातल्या माझ्या प्रतिबिम्बाकडे गेलं.समोर प्रखर मार्तंड प्रजापती उभा होता.जगातला एक शक्तिशाली माणूस. तो अशा थिल्लर नोकरांकडून ऐकून घ्यायला जन्माला नव्हता आला.मी भालेकरला दाराकडे बोट दाखवत दटावून म्हणालो,
“ तू, आणि मजहर, दोघेही ताबडतोब निघून जा इथून. कळत नाही तुम्हाला? मला माझ्या बायको बरोबर बोलायचंय”
( प्रकरण ३ समाप्त.)