प्रकरण 9
सर्वात प्रथम मी बँकेत फोन लावला आणि त्यांना सांगितले की मला पैसे काढायचे आहेत तर माझ्या खात्यात जमा असणाऱ्या पस्तीस हजार पैकी पंधरा हजार इथल्या दुबई शाखेत त्यांनी वर्ग करावेत. पंधरा वीस मिनिटात ते जमा झाले आणि मी बँकेत जाऊन रक्कम काढली.या सर्वातून हे लक्षात आले की प्रजापती ने त्याचा शब्द पाळला होता, मला कुठेही फोन करता येईल, बाहेर जाता येईल असं तो म्हणाला होता, तसं खरंच झालं होतं.माझ्या होकाराची वाट न बघता त्याने ही व्यवस्था केली होती.मला उद्या नवीन कपडे आणि इतर गोष्टी खरेदीसाठी ही रक्कम लागणार होती.बरोबर पावणेसहा वाजता मी प्रजापतीला भेटायला गेलो. बाजूला भालेकर होता. माझा चेहेरा त्याला बघून बदलला.प्रजापती ने ते हेरले.
“ चेहेरा असा का दिसतोय तुझा चंद्रहास?” त्याने मला विचारलं पण त्याचा स्वत:चा चेहेरा पण तणावपूर्ण वाटला.
“ नाही, मी ठीक आहे.” मी उत्तरलो.
“ काय निर्णय ठरला तुझा?” प्रजापतीने विचारलं.
“ मी तयार आहे तुमच्या बरोबर काम करायला.”
क्षणात प्रजापती तणावमुक्त झाला.
“ क्या बात आहे.मला खात्री होतीच. मी आधीच भालेकरला सांगितलं होतं सात वर्षांसाठी तुला माझा पर्सनल असिस्टंट म्हणून नियुक्त केल्या बाबतचा करार तयार करून आण म्हणून.” प्रजापती म्हणाला आणि त्याने भालेकर ला खूण केली. भालेकरने आपल्या ब्रीफ केस मधून एक हिरवट रंगाचा लेजर पेपर काढला, आणि मला वाचायला दिला.त्यावर माझ्या नियुक्तीबाबत तपशील लिहिला होता. जे,जे प्रजापतीने सांगितले होते ते सर्व लिखित स्वरुपात होते.माझ्या सहीसाठी भालेकरने pen दिलं. मी सही केली.मला एक प्रत दिली.त्यावर भालेकर,ने अध्यक्ष, प्रजापती इलेक्ट्रिक, ऑइल अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन म्हणून सही केली होती.
“ अभिनंदन चंद्रहास. आता तू आमचा एक स्टाफ झालास. प्रेस ला आणि इतरांना सांगायला तू माझा पर्सनल असिस्टंट आहेस.तुझ्या करारात तसच उल्लेख आहे.पण इथल्या कामाच्या स्वरूपाबाबत शंभर टक्के गुप्तता पाळायची हे लक्षात ठेव.”
“ नक्कीच सर.” मी म्हणालो.
“ तुझी हरकत नसेल तर तुला लगेचच तुझ्या कामाला सुरुवात करावी लागणार आहे चंद्रहास. कारण मला आता लगेचच एका कामासाठी बाहेर जायला लागणार आहे. प्रेस रिपोर्टर्स न टाळून. आत बाथरूम मधे जा, तुझं मेकअप चं सामान ठेवलं आहे तिथं. पुन्हा प्रजापती म्हणून तयार हो आणि मजहर बरोबर ऑफिसच्या पुढच्या दाराने बाहेर पड. आणि सरळ माझ्या घरी जा. मी येई पर्यंत तिथेच रहा.मी एक दोन दिवसात येईन.मी आलो की मात्र पुढचे दहा –पंधरा दिवस तू पूर्ण पणे मोकळा असशील.कुठेही जायला आणि काहीही करायला.” प्रजापती म्हणाला. मी बाथरूम मधे जाऊन पुन्हा प्रजापती चं रूप घेऊन आलो. भालेकर गेला होता.प्रजापती आपल्या खुर्चीवरून उठून खिडकी जवळ येऊन बाहेरच्या टेनिस कोर्टाकडे बघत उभा होता. मी बाहेर येताच त्याचे तोंड उघडलं आणि त्याची बोटे आश्चर्याने आपल्या ओठावर आली.
“ माय गॉड. आरशातली प्रतिमा मी बघत नाहीये ना?” तो उद्गारला.माझे दोन्ही हात त्याने हातात घेतले.
“ अविश्वसनीय !” तो म्हणाला.
“ अविश्वसनीय !” मी त्याच्या आवाजात म्हणालो. तो गडगडाट करत हसला. “ मला आता निघावं लागेल. मजहर तुला ऑफिसात नेईल. तिथे भालेकर असेल काही कागदपत्रावर सह्या करून मी मगाशी म्हणो त्याप्रमाणे माझ्या घरी जा आणि मी येई पर्यंत तिथेच रहा.” तो म्हणाला आणि त्याने इंटरकॉम वरून मजहरला बोलावून घेतलं.मजहर आल्यावर तो बाहेर पडला.
“ हा तुला पुढचं सर्व सांगेल.” तो म्हणाला आणि बाहेर पडला.
मजहर बरोबर मी ऑफिसात आलो तेव्हा भालेकर ने सहीसाठी काही कागदपत्रं ठेवली. आता मला कसलं टेन्शन नव्हतं.मी सह्या केल्या.पण भालेकर चा चेहेरा मला चिडलेला वाटला. प्रजापतीने मला नोकरी देणं त्याला आवडलेलं दिसलं नाही.सह्या घेतल्यावर तो काही न बोलता निघून गेला.मजहर मला घेऊन प्रजापतीच्या बंगल्यात आला. वाटेत आम्हाला प्रेस रिपोर्टर्सनी गाठलंच,पण आता मला त्याची सवय झाली होती.सुरक्षा रक्षकांनी त्यांना योग्य अंतरावर अडवून धरलं. घरी आल्यावर मी माझा मास्क काढून ठेवला.
“ मी आता निघतो. तू आता मोकळाच आहेस.या परिसरात कुठेही फिरलास तरी चालेल.कुणालाही फोन केलास तरी चालेल.” मजहर म्हणाला.
“ म्हणजे, माझ्यावर आता काही बंधन नाही?”
“ नाही.मी म्हणालो नव्हतो तुला, तू वाचशील म्हणून ! तू आता आपल्या कंपनीचा सदस्य झाला आहेस. फक्त खाली गेलास तर गेट जवळ जाऊ नकोस कारण कोणीतरी तुला तिथे बघू शकतं.” जाता जाता मजहर म्हणाला.
संध्याकाळी जेवणाची ऑर्डर घ्यायला दक्ष आला.मी त्याला काय हवंय ते सांगितल्यावर त्याने विचारलं,
“ तुम्ही खाली डायनिंग हॉल मधे जेवायला येणार की इथेच तुमच्या सूट मधे?”
“ प्राशिला मॅडम खाली येणारेत?” मी विचारलं.
“ नाही त्या त्यांच्याच खोलीत घेणार आहेत.” दक्ष म्हणाला.
“ आणि मालविका?”
“ त्या सुद्धा त्यांच्याच खोलीत.”
“ बरं, मी पण इथेच घेईन.” मी म्हणालो.
जेवण येई पर्यंत वेळ होता.माझं आयुष्य कुठून कुठे गेलंय. एखादं पुस्तक लिहिलं पाहिजे या विषयावर. किंवा डायरी.अगदी मला प्रथम रुधिराचा फोन आला की प्रीतम कपूरने मला बोलावून घेतलंय, इथ पासून आजच्या या क्षणापर्यंत.आणि पुढे काय घडत जाईल ते ते वाढवलं पाहिजे त्यात.माझ्या मनात विचार आला.पण सुरवात करायला मूड आला नाही.
रात्री साडे आठ वाजता दक्ष जेवणाची ट्रोली घेऊन आला. मी शांतपणे जेवण केलं आणि टेरेस वर सिगारेट ओढत बसलो. चंद्र उगवला होता.मोठा होता. प्राशिला म्हणाली होतीच की येत्या दोन तीन दिवसात पौर्णिमा असणार होती. पौर्णिमा म्हणजे मालविकाची मानसिकता ढासळणार का? प्राशिला म्हणाली ते खरं आहे का हे कळेलच.रात्र चढायला लागली पण मला झोप येत नव्हती.पण अंथरुणावर वाचत पडून राहिलो. ग्लानी कधी आली ते कळलं नाही मधेच जाग आली, कशामुळे आली याचा विचार करत असतांनाच समोर मालविका उभी दिसली.
“ मला बोलायचंय तुझ्याशी.” ती जवळ येत म्हणाली. “ भालेकर आलाय, तुला भेटला असेल ना? काय हवं होतं त्याला? ”
“ फक्त पेपर्सवर सह्या करायच्या होत्या ” मी कंटाळून म्हणालो.
“ माझ्या बद्दल काही बोलला तो?”
“ तुझा विषयच नाही झाला काही.” मी म्हणालो.
“ प्रखरची तब्येत अजूनच बिघडली आहे म्हणे. मला सुद्धा भेटायला देत नाहीयेत.माझ्या खोलीच्या बरोब्बर वरची खोली त्याची आहे. रात्रभर तो फिरत असतो खोलीत असं वाटतं कारण सारखेच पावलांचे आवाज येतात. मी मागच्या आठवड्यात त्याला शेवटच पाहिलं तेव्हा तो एखाद्या पुतळ्यासारखा निश्चल पडून होता.मला ओळखलं पण नाही त्याने.त्या नंतर मी त्याला भेटू शकले नाही.बाहेरचा पहारेकरी मला, मी बायको असूनही सोडत नाही आत. ”
मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
“ मारणार आहे का तो? आणि तो गेला तर ती थेरडी सगळा पैसा हडप करेल. तू बोलत का नाहीस? दोन कोटी देत्ये मी तुला. मला मदत कर.” ती किंचाळली.मला प्राशिलाचे शब्द आठवले.पौर्णिमा जवळ येते तसतशी ती जास्तच निराश, आक्रमक आणि वेडसर होते.
ही ब्याद कधी जात्ये असं मला झालं होतं. मी तिला हाताला धरून दाराजवळ नेलं. आपल्याला इथे कोणी पाहिलं तर धोकादायक ठरू शकत असं सांगितलं.
“ मी पुन्हा उद्या रात्री येईन चंद्रहास. फक्त मीच खरं बोलत्ये तुझ्याशी. प्राशिला तुला माझ्या बद्दल चुकीचं सांगत्ये. ते मला मारू शकतात, तुला सुद्धा मारू शकतात.” जाता जाता ओरडून ती बाहेर पडली.कुणावर विश्वास ठेऊ आणि कुणावर नको असं मला झालं होतं.माझ्या डोळ्या समोर समीप सिन्नरकर आणि गंधार गोवंडे दोघांचे चेहेरे येऊन गेले. दोघीजणी मला सांगू पहात होत्या की माझा जीव धोक्यात आहे.
लोखंडी गज बसवलेली खोली नक्की कुणासाठी होती? मालविका,की प्रजापती? प्रजापतीशी तर मी अत्ताच बोललो होतो.मग मालविकाला ऐकू येत असलेले पायांचे आवाज कुणाचे होते? तिथे आणखी कोणी कैदी होता की मालविकाला भ्रम होत होता? मला शोधून काढायचं होतं. एव्हाना रात्रीचे दोन वाजले होते. मी बेडरूम मधून हॉलमध्ये आलो. दाराची मूठ उघडते का पाहिलं. दार उघडं होतं याचा अर्थ प्रजापतीने सांगितल्याप्रमाणे मी आता बाहेर कुठेही जाऊ शकत होतो. खाली डोकावून पाहिलं कुठलाही पहारेकरी मला दिसला नाही. याचा अर्थ खरंच त्यांनी माझ्यावरील पहारे काढले होते.मजहर म्हणालाच होता, की ‘तू आता आमच्याच पैकीच एक झाला आहेस’ त्याही परिस्थितीत मला बरं वाटलं. प्रजापती चे रूम च्या दिशेने मी जायला लागलो. गज लावलेल्या तीन खिडक्या होत्या. मी पहिल्या दारावरून पुढे सरकलो. दुसऱ्या दाराच्या कडेला आलो. पहिल्या खोलीतल्या खिडक्या लोखंडी गजाने बंद केलेल्या होत्या. मी दाराची मूठ फिरवायचा प्रयत्न केला पण दार उघडू शकलं नाही. मी दाराला कान लावला आणि आतला कानोसा घेऊ लागलो.मला आतून कुठलाही आवाज आला नाही. मी तिसऱ्या दाराच्या दिशेने पुढे सरकलो. तोही दरवाजा बंद होता. त्याच्याही दाराला कान लावून मी कानोसा घेतला. आता मात्र माझ्या अंगावर काटा आला. मालविका म्हणत होती त्याप्रमाणे आत कोणीतरी चालत असल्याप्रमाणे थप-थप-थप असा आवाज येत होता. मध्येच खाकरून आपला घसा साफ केल्यासारखा आतून आवाज आला. मी दाराला कान लावून तसाच उभा राहिलो होतो. पुन्हा चालण्याचे थप-थप असे आवाज यायला लागले. याचा अर्थ मालविका खोटं बोलत नव्हती किंवा तिचा तो भ्रम नव्हता. आत कुठलातरी माणूस नक्कीच होता. पिंजऱ्यात जसा एखादा प्राणी सतत चालत असतो तसा चालत असलेला. एक नक्की आतला माणूस प्रजापती नव्हता कारण काही तासापूर्वीच तो मला भेटला होता. मग आत कोण असेल? तेवढ्यात माझ्या पायाला कशाचा तरी स्पर्श झाला. मी पटकन उडी मारून बाजूला झालो. काय आहे ते खाली पाहिलं. तो प्राशिलाचा कुत्रा शेरु होता.
***
पुढील कुठलाही धोकादायक प्रसंग टाळण्यासाठी पुन्हा मी माझ्या बेडरूम मध्ये येऊन झोपलो. झोप येणं शक्यच नव्हतं. आत मध्ये कोण माणूस असेल याचा विचार माझं मन करत होतं. बाहेर मोठा चंद्र प्रकाश पडला होता आणि खिडकीतून चंद्र दिसत होता. उद्या किंवा परवा पौर्णिमा असणार. कारण चंद्राचा आकार बऱ्यापैकी मोठा दिसत होता. म्हणजे प्राशिला जे सांगते ते खरं असेल तर मालविका वेडसर होणार. म्हणजे हे लोक तिला आता त्या खोलीत बंदिस्त करून ठेवतील, की आधीच ठेवल आहे तिला? आत मधला माणूस, याच्या पायाचा आवाज मी ऐकला होता, ती व्यक्ती म्हणजे स्वतः मालविका तर नसेल? तीच आत फिरत असेल आणि आपल्याला सांगत असेल की प्रजापती आत मध्ये आहे. तसा भास तर तिला होत नसेल? मी अंथरुणातून उठलो. झोप येत नव्हती. टेबलावरचा दिवा लावला. बाहेर आता पूर्णपणे शांतता होती. रात्रीचे पावणेतीन वाजले होते. मी विचार केला, या घरात काय घडतं आहे याच्याशी मला आता काहीच देणंघेणं नाही. आता मी प्रजापती कॉर्पोरेशनचा एक स्टाफ होतो. मला ते भरपूर पगार देत होते, राहायला घर होतं, गाडी होती. मी त्यांच्या घरगुती राजकारणात पडायचा नाही असा विचार केला. दोन दिवसांनी प्रजापती येईपर्यंतच मला त्याचा तोतया म्हणून रोल करायचा होता. त्यानंतर पुन्हा पंधरा दिवस मी मोकळा राहणार होतो. सानवी ला बाहेर फिरायला नेणार होतो. इतरही बरीच ऐश करणार होतो. मी पुन्हा बेडरूम मध्ये जाऊन झोपायचा विचार केला तेवढ्यात मला अगदी हळू आवाजात हॉलच्या दाराच्या बाहेर ‘क्लिट’ असा एखादा धातूचा आवाज येतो तसा आवाज आला. मी दाराकडे वळलो. माझ्या लक्षात आलं होतं, कसला आवाज असणार. दाराची मूठ मी फिरवली आणि दार ढकलून पाहिलं. दार बाहेरून बंद करण्यात आलं होतं., बाहेरून किल्ली लावून दार बंद करण्यात आलं होतं त्याचाच तो आवाज आला होता. याचाच अर्थ त्यांनी मला पुन्हा कोंडून ठेवलं होतं. थोड्याच वेळापूर्वी मी ठरवलं होतं की या कुटुंबाच्या घरगुती राजकारणात आपण पडायचं नाही पण आता मला कोंडून ठेवण्यात आल्यामुळे मी अपसुकच त्याच्यात ओढला गेलो होतो.
पुन्हा बाहेर शांतता पसरली. काय करावं याचा विचार करत असतानाच अचानक एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली. पुन्हा काही वेळ शांततेत गेला. नंतर थोड्या वेळाने पुन्हा फुसफुस आवाज आले, नंतर काहीतरी आपटल्यासारखा आवाज आला. म्हणजे एखादी जड वस्तू वरून खाली टाकल्यावर आवाज येईल तसा आवाज आला. नंतर काही पुरुषांचे दबक्या स्वरातील आवाज ऐकू आले. मी दाराजवळ जाऊन दाराला कान लावला.
"दूर रहा तिला स्पर्श करू नका" मजहर चा आवाज कानावर आला.
त्यानंतर आणखीन काही पुरुषी आवाज कानावर आले पण शब्द कळले नाहीत.
"डॉक्टर वाकनीस ना घेऊन या" हा मजहर चा आवाज. आणि मी अंदाज बांधला कुठलीतरी स्त्री मेली आहे. कोण असेल प्राशिला की मालविका? तो आपटल्याचा आवाज, ती किंकाळी , हा नक्कीच खून होता. दोन तासापूर्वीच ती मला म्हणाली होती की ते मला मारू शकतात तुलाही मारू शकतात.आणि अत्ता तीच गेली होती.मी गर्भगळीत झालो आणि खुर्चीतच बसलो.पायात त्राण राहिलं नव्हतं.थोड्या वेळाने दाराला बाहेरून किल्ली लावल्याचा आवाज आला आणि प्राशिला आत आली.तिच्या हातात कुत्रा होताच.
“ चंद्रहास, अरे तू जागाच आहेस का? बरं झालं, तुला उठवावं लागलं नाही मला. एक वाईट बातमी आहे. मालविका गेली.अत्ताच. तिला झोपेत चालायची सवय होती.विशेषतः जेव्हा ती मानसिक दृष्ट्या विचलित असते तेव्हा ती हमखास झोपेत चालते.आज तसच झालं.ती जिन्यावरून खाली पडली, डोक्याला मोठा फटका बसला आणि त्यात ती गेली. मला प्रजापतीचं फार टेन्शन आहे.त्याला कधी सांगायचं आणि कसं सांगायचं. ही बातमी आम्ही बाहेर कुठेच जाऊ देऊ शकत नाही कारण आमचे प्रतिस्पर्धी टपलेलेच आहेत. त्यांच्या दृष्टीने प्रजापती इथेच आहे आपल्या या घरी. प्रत्यक्षात तो बाहेर आहे, बायकोचं समजल्यावर तो लगेच इथे यायला निघाला आणि प्रेस रिपोर्टर्स कडून आमचे प्रतिस्पध्यांना तो बाहेरून येत असल्याचं कळलं तर अनर्थ होईल. पण ते आम्ही बघू.या क्षणी आम्हाला तुझी मदत लागणार आहे, डॉक्टर वाकनीस आता इथे येतील. ती गेल्याचं घोषित करतील पण पोलिसांना रिपोर्ट करावंच लागेल त्यांना. ”
“ मी काय करू?” मी विचारलं.
“ तू प्रजापतीचा मेक अप करून तयार रहा. तुला खूप मोठा धक्का बसल्याचा आणि बोलायच्या स्थितीत नसल्याचा अभिनय डॉक्टर वाकनीस समोर कर.आणि पोलिसांसमोरही. त्यांना सांग की तिला वरच्यावर झोपेत चालायची सवय होती.पोलीस तुला फार काही विचारणार नाहीत याची व्यवस्था आम्ही करू.”
निमूटपणे मी बाथरूम मधे गेलो आणि प्रजापतीचा मेकअप केला. मास्क घातला, भुवया चिकटवल्या. त्याचे कपडे घातले.
कदाचित मला इथून पळून जायची हीच संधी असेल का? मी पोलिसांसमोर मास्क काढून टाकला आणि त्यांना सगळं-सगळं खरं सांगून त्यांच्याच गाडीतून गेलो तर? मी कायमचा या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडू शकणार होतो. पण प्रजापतीचं काय?
‘ तू गमावण्याजोगा नाहीयेस.’ प्रजापती चे शब्द मला आठवले. मी निघून जाणं म्हणजे त्याची फसवणूक केल्या सारखं होईल.शिवाय घर,गाडी, मोठा पगार ! मास्क च्या आतील माझ्या चेहेऱ्यावर आता आत्मविश्वास आला.
थोड्या वेळातच डॉक्टर वाकनीस आले.त्यांना प्राशिलाने फार व्यवस्थित हाताळलं. अगदी नावालाच मी त्यांना सामोरा गेलो.दु:खी चेहेऱ्याने, कोसळल्याचा अभिनय मी छान वठवला. नंतर पोलीस आले. त्यांना डॉक्टरांनीच बरीचशी माहिती दिली.त्यांना जी काही चौकशी करायची होती ती त्यांनी प्राशिला आणि डॉक्टरांकडे केली.हा प्रसंग घडला तेव्हा प्रजापती तिथे नव्हता, तो खोलीत झोपला होता असं प्राशिला ने पोलिसांना सांगितलं. मी फक्त त्यांना तिच्या झोपेत चालायच्या सवयी बद्दल सांगितलं.मला मोठा हादरा बसल्याचं मी भासवलं.थोड्या वेळाने ते निघून गेले. त्या नंतर तिथल्या स्मशान भूमित तिचं दहन करण्यात आलं.तेवढ्या पुरता मी तिथे हजर राहिलो.बोलता बोलता आठ दिवस फारसं काही न घडता निघून गेले.
***
बाल्कनीतून मी खाली बघत होतो तेव्हा प्राशिला खाली आलेली दिसली.शोफरने रोल्स गाडी आणून तयार ठेवली होती.त्याने तिची बॅग गाडीत ठेवली. ती मागच्या सीट वर बसल्यावर गाडी सुरु झाली.
‘गेली बया.’ मी मनात म्हणालो.
मजहर आत आला.
मला मास्क घालायला लावून प्रजापतीच्या ऑफिसात घेऊन गेला.तिथे गेल्यावर मला दिसलं की भालेकर त्याच्या मोठ्या खुर्चीत बसला होता.
“ दहन क्रियेच्या वेळी तू चांगला अभिनय केलास.”
मला यावर काही बोलण्याजोगे नव्हतंच.
“ प्रजापती सर दौऱ्यावरून आलेत. त्यांनीच तुला जाण्यापूर्वी सांगितल्यानुसार आता पुढचे पंधरा दिवस तू पूर्णपणे मोकळा आहेस.कुठेही जायला, काहीही करायला.कपाटात तुझे कपडे आणि वस्तू ठेवलेल्या आहेत.तू फक्त या शहराच्या बाहेर जायचे नाहीस.प्रेसशी बोलायचं नाहीस.तुझ्या इथल्या कामाच्या स्वरूपा बद्दल कुणालाही सांगायचं नाहीस.”
“ येस सर” मी म्हणालो.
भालेकरने आपल्या सूट केस मधून चेक बाहेर काढला.मला दिला.
“ सरांनी तुला तुझा पगार अॅडव्हान्स द्यायला सांगितलाय.” भालेकर म्हणाला.त्याला हे सांगताना आणि माझ्या हातात चेक देतांना आवडलेलं दिसत नव्हतं.तो फक्त तुझ्या बॉस ची आज्ञा पाळत होता. तो निघून गेला.मी तिथून बाहेर पडलो.आता कुठेही जायला मी मुखत्यार होतो.लगेच बँकेत चेक जमा केला.आधीच्या शिल्लक रकमेतून खर्चासाठी काही पैसे काढले. एका
मॉल मधून उत्तम कपडे विकत घेतले, इतर काही खरेदी केली आणि माझ्या घरात आलो.
‘ माझं घर! म्हणायला किती छान वाटत होतं ! ’ मी सानवीला फोन लावला आणि तिला आज रात्री जेवायला छान हॉटेलात जायचं का विचारलं.तिने होकार दिला.हॉटेलचे नाव तूच सुचव म्हणून तिला सांगितलं.तिने ‘शॉक’ नावाचे हॉटेल सुचवलं.
“ चालेल.” मी म्हणालो. “ मी इथे नवीन आहे.तुला माहिती आहे ना कुठे आहे ते? मी तुला घरी घ्यायला येतो.”
“ नको.माझं घर सहज सापडण्याजोगे नाही.मी डायरेक्ट हॉटेलला येईन.” ती म्हणाली आणि फोन ठेवला.
ही मला कितपत प्रतिसाद देते आहे? समजायला मार्ग नव्हता. कदाचित ती चांगल्या एरियात रहात नसेल, मी तिथे आलो तर तिला अवघडल्यासारखे होत असेल.जाऊदे, ती यायला तयार झाली हेच खूप मोठे आहे.मी विचार केला. मला देण्यात आलेल्या छोट्या बंगलीमधे थोडावेळ मी टाइम पास केला.स्मिमिंग पुलावर पोहलो, टब बाथ घेतला, पण या सर्वात एक एकाकीपणा जाणवला.मला सतत लोकात रहायची सवय होती.मी कंटाळून अंथरुणावर अडवा झालो, तेवढ्यात इंटरकॉम वाजला.
“ मिस्टर चक्रपाणी?” पलीकडून विचारणा झाली.
“ यस, कोण?”
“ मी पीटर परमार. आपल्या कंपनीचा एच.आर.हेड.” आवाजात एक जरब होती.दुसऱ्याला आदेश देण्याची सवय असलेला हा माणूस वाटला.
“ बोला काय काम आहे?” मी सुद्धा बेफिकीरपणे विचारलं.
“ आपल्या कंपनीत तुम्ही नवीन आहात.आपल्या सर्व स्टाफ ला आपण नियमावली देतो.ती तुमच्या टेबलावर उद्या मिळेल तुम्हाला.”
“ ठीक आहे.तेवढ्यासाठीच फोन होता हा? ”
“ आपल्या कंपनीचा एक कडक नियम आहे , चक्रपाणी, कोणताही कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्याशी वैयक्तिक संबंध ठेवू शकत नाही. मला असं समजलंय की सानवी सेनला तुम्ही जेवायला नेताय.” पीटर परमार म्हणाला.
“ तुझा काय संबंध त्याच्याशी? ” मी डाफरून म्हणालो. “ मी प्रजापती सरांचा खाजगी सहाय्यक आहे. कंपनीचे नियम मला लागू होतं नाहीत.”
“ भालेकर सरांनी मला हे सांगितलं नाहीये की कंपनीचे नियम तुम्हाला लागू नाहीत म्हणून.तरी चला क्षणभर तसं समजू.तरी पण मिस सानवीला ते नियम लागू होतात ना ! ती पण नवीन आहे, मी तिला पण असाच फोन करून कळवलंय नियम काय आहेत ते. तिला ऐकावं लागेल मी काय सांगेन ते.” तो म्हणाला आणि फोन बंद केला गेला.
मी जाम भडकलो होतो. काय समजतो हा स्वत:ला ! मी हे प्रजापतीशी बोलायचंच असं ठरवलं. त्या आधी मला सानवीशी बोलायचं होतं.तिला सांगायचं होतं की तू त्या पीटर ला घाबरू नको.आपण ठरल्या प्रमाणे जेवायला जायचं आहे. मी
फोन लावला.
“ हॅलो, सानवी?”
पलीकडून फोन कट केला गेला.
***
मी चिडून लागोपाठ दोन सिगारेट्स ओढून संपवल्या.मन बेचैन झालं होतं.
‘तिला ऐकावं लागेल मी काय सांगेन ते’ पीटरचा आवाज माझ्या कानात घुमत होता.मी कार बाहेर काढली आणि फिरायला गेलो.माझ्या मनात कल्पना आली, प्रजापती कंपनीच्या ऑफिस बाहेर जाऊन मी थांबलो. थोड्या वेळाने ऑफिस सुटणार होतं आणि स्टाफ घरी जाण्यासाठी बाहेर पडणार होता. तिथेच सानवीला गाठायचं मी ठरवलं.गाडीतच वाट बघत बसून राहिलो. ऑफिस सुटलं होतं.ग्रुप-ग्रुप ने गप्पा मारत गेट मधून लोक बाहेर पडत होते. काहीजण एक-एकटे होते. जातांना उद्या भेटू म्हणून परस्परांचा निरोप घेत होते. आपापली वाहने बाहेर काढण्याची लगबग चालू होती. थोड्या वेळाने सानवी बाहेर येतांना दिसली. मी गाडी जरा लांब अंतरावर लावली होती.ती दिसताच मी खाली उतरलो. तिला एकदम धक्का द्यायचा माझा विचार होता. मी चालत चालत पुढे गेलो.आणि एकदम तिच्या पुढे जाऊन उभा राहिलो.
तिला धक्का बसला.पण तो आनंदाचा किंवा आश्चर्याचा नव्हता.तिच्या डोळ्यात भीती होती. जी सानवी मी मनात ठेऊन होतो ती ही नव्हती.
“ सानवी, काय झाल?...” मी तिच्या जवळ जाऊन बोलायचा प्रयत्न करत म्हणालो पण माझं बोलण पूर्ण होऊन न देता ती म्हणाली,
“ मला एकटीला राहूदे.जवळ येऊ नका.मला तुमच्याशी काहीही संबंध ठेवायचे नाहीयेत.”
“ हे बघ ऐकून घे, तू त्या पीटरला घाबरू नको. मी प्रजापती सरांचा खास माणूस आहे.हे फालतू नियम मला लागू होतं नाहीत.” मी म्हणालो.
“ काळात कसं नाही तुम्हाला? तुम्ही असलं मोठे, पण मला हे नियम लागू होतात ना! तुम्हाला कल्पना नाहीये की मला किती गरज आहे या नोकरीची आणि किती मेहेनतीने मी मिळवल्ये ही नोकरी. मला पीटर सरांनी स्पष्ट सांगितलंय की तुमच्याशी किंवा कुठल्याही स्टाफ शी मी संबंध ठेवले, वैयक्तिक पातळीवर तर मला हाकलून दिलं जाईल.आता कृपा करून तुम्ही जा इथून आणि मलाही जाऊ दे.” एवढ बोलून ती झपाझप पावलं टाकत दूर निघून गेली.मी तिच्याकडे बघताच बसलो.
“ अवघड आहे!” माझ्या मागून आवाज आला आणि दचकलो. माकड तोंड्या मजहर होता.
“ तू गुलछबू आहेस. पण तिचा विचार कर. तिला गरज आहे नोकरीची. चल जरा ड्रिंक घेऊ.” तो म्हणाला.
“ तूच जाऊन बस एकटा आणि पी काय हवं ते.” मी त्याला झटकून टाकलं आणि गाडीत बसलो.
संपूर्ण संध्याकाळ आणि रात्र माझ्या हातात होती.काय करणार होतो मी ?शहरात माझ्या ओळखीचं कोणी नव्हतं.माझ्या बंगल्यात जाऊन काय करणार होतो मी? देव भावाचा भुकेला असतो तसा मी माणसांचा भुकेला होतो. मी कार चालू केली.जसा इंजिनला झटका बसतो कार पुढे जातांना तसा मलाही बसला, म्हणजे माझ्या कल्पनेला बसला. वेळ घालवायला मी डायरी लिहायला सुरुवात केली होती तेच पुढे का करू नये? हा विचार माझ्या मनात आधी आला होता पण सुरुवात झाली नव्हती. ती करायचा निर्णय मी घेतला. अगदी मला प्रथम रुधिराचा फोन आला की प्रीतम कपूरने मला बोलावून घेतलं इथून सुरु करावी. आधी डायरी लिहू, नंतर एखाद्या प्रकाशकाला ते पाठवू आणि त्याचं पुस्तक छापू. घटना खऱ्या लिहू पण त्यातली नावे तीच ठेवावी की बदलावी? तीच नावे ठेवली तर माझ्यावर अब्रु नुकसानीचा खटला लावतील का हे लोक? मी एका स्टेशनरी च्या दुकानातून काही कोरे कागद खरेदी केले. , पेन घेतले. प्रकाशकाकडे माझे लिखाण पाठवण्यासाठी काही एन्व्हलप, पोस्टाचे स्टँप घेतले आणि बंगल्यात आलो. पुस्तकात काय काय समाविष्ट करावं याचे सर्वात आधी मुद्दे लिहून काढले.
रुधिरा ने मला फोन करून बोलावणे.
प्रीतम कपूरने मला काम असल्याचे सांगणे.
हॉटेलच्या लॉबीत आणि बार मधे मी अभिनय करणे.
माझी निवड झाल्याचे सांगून प्राशिलाने गुंगीचे इंजेक्शन देऊन मला पळवणे.
भालेकर आणि मजहर यांची माझ्यावर असणारी नजर.
मला प्रजापती चा तोतया म्हणून काम करायला लागणार असल्याची माहिती देणे
मला भारतातून दुबईला आणले जाणे.
माझा मास्क गंधार गोवंडे ने करणे.
माझ्याकडून सह्यांचा सराव करून घेतला जाणे
माझ्या कडून अनेक कागदपत्रावर प्रजापती च्या सह्या घेणे.
समीप सिन्नरकर, गंधार गोवंडे यांचे खून.
अगदी अलीकडचा मालविकाचा खून.
स्वत: प्रजापती सरांनी मला त्यांच्या या मोठ्या कंपनीत नोकरीला ठेवणे.
एखाद्या चित्रपटासाठी सुद्धा हा घटनाक्रम सनसनाटी ठरू शकेल. माझ्या मनात विचार आला.
ही यादी झाल्यावर मी या प्रत्येक पात्रासाठी काल्पनिक नावं कुठली ठेवायची याची यादी तयार केली. ज्या ज्या ठिकाणी मी वावरलो होतो त्या जागेला सुद्धा काल्पनिक नाव द्यायचं मी ठरवलं. ज्या ज्या माणसांच्या सानिध्यात मी आलो होतो त्यांचे वर्णन करताना सुद्धा मी त्यांच्या मूळ वर्णनानुसार न करता काल्पनिक वर्णन करायचे ठरवलं. आणि त्याचा तपशीलही लिहून काढला. रुधिरा आणि प्रीतम कपूर यांच्यासाठी मात्र मी काल्पनिक नाव न देता मूळ नावच द्यावं असं ठरवलं. घटना मनात ताज्या आहेत तोवर लिहून काढू