Totaya - 8 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | तोतया - प्रकरण 8

Featured Books
Categories
Share

तोतया - प्रकरण 8

तोतया प्रकरण 8
दिवसा पळून जायचं तर मला पहारेकर्‍यांना  चकवा देता आला पाहिजे. प्रजापतीचा मास्क घालून मी तो सहज देऊ शकत होतो फक्त त्यावेळी मजहर तिथे असता कामा नये एवढीच काळजी मला घ्यायची होती मी ठरवलं की काहीतरी निमित्त काढून बाजूला खाली घेऊन जायचं. बंगल्याच्या खालच्या गॅरेजमध्ये जग्वार, रोल्स राईस आणि मर्सिडीज अशा तीन गाड्या होत्या. कुठल्या गाडीने पळून जाणं जास्त सोयीस्कर आहे असा विचार माझ्या मनात आला..
मजहर आत आला. मी त्याला काल दिलेल्या बातमीचा त्याच्यावर काय परिणाम झाला असेल याचा अंदाज घ्यायचा मी प्रयत्न केला पण तो फारसे काही बोलला नाही. 
“अर्ध्या तासात आपण निघतो आहोत.” तो म्हणाला आणि आतल्या कपाटात जाऊन त्याने माझे कपडे मला घालण्यासाठी बाहेर काढले. 
मला आश्चर्य वाटलं त्याने बाहेर काढून ठेवलेले कपडे हे माझे स्वतःचे होते म्हणजे प्रजापती चा सूट नव्हता. आपण निघताना तू हे कपडे घालायचे आहेस आणि तुझा मास्क घालू नकोस मला त्याने सांगितलं. 
मी नखशिखांत हादरलो. याचा अर्थ एकच होता भालेकर बाहेरून परत आला असणार. माझ्या जिथे जिथे सह्या घ्यायच्या तिथे तो सह्या घेणार, त्यानंतर त्यांना माझी गरज भासणार नाही. भालेकर मजहरला सांगेल की आता याचे इथलं काम संपलं आहे. याला विमान तळापर्यंत सोडून ये. गाडीतून विमानतळावर जाईपर्यंत ते मला इंजेक्शन मधून बेशुद्धीचं औषध देतील आणि माझं आयुष्य संपून जाईल. 
नाही. मी हे होऊन देणार नव्हतो. मी जेव्हा ऑफिसमध्ये जाईन तेव्हा सह्या करायला स्पष्ट नकार देईन. काय करतील ते करून करून? मला जिवंत तर ठेवावंच लागेल त्यांना. मी माझे स्वतःचे कपडे आणि बूट अंगावर घातले. इतके दिवस प्रजापतीचा सूट अंगावर घालायची सवय होती, त्यामुळे मलाच माझे हे कपडे अगदी दरिद्री वाटले. एक तर मी मरणार होतो किंवा जगलो असतो तर पुन्हा पूर्वीचंच दरिद्री जीवन जगायला सुरुवात केली असती. म्हणजे रोज बॉलीवूडचे दरवाजे ठोठावणं, मला काम द्या म्हणून भीक मागणं. नको पुन्हा मला जुनं आयुष्य जगायचं नाहीये, आणि मला मरायचं ही नाहीये. मी स्वतःला बजावलं माझा मास्क आणि मेकअपचं इतर सामान मजहरने एका सुटकेसमध्ये भरलं. त्याला लॉक लावलं. 
"चल निघूया."
मजहर मला खाली घेऊन आला. अंधारातून एक व्यक्ती पुढे आली. त्यानं मजहरच्या हातून सुटकेस घेतली. 
“हा भैरव आहे इथून पुढं हा तुझ्याबरोबर असेल. तो तुला योग्य त्या ठिकाणी घेऊन जाईल.” 
बाहेर एक टॅक्सी उभी होती भैरव आणि मी टॅक्सीत बसलो.  
“तू नाही का येत आहेस माझ्याबरोबर?” मी मजहरला विचारलं तो फक्त दात विचकून हसला.
“मला बरीच काम करायची आहेत.” तो म्हणाला टॅक्सी सुरू झाली. मी भिरभिरत्या नजरेने बाहेर बघत होतो. 
"शांत रहा मिस्टर चक्रपाणी" भैरव म्हणाला. तू तुझं काम कर मला माझं करू दे 
हा भैरव कोण असेल? आणि कशाला आला असेल मला न्यायला? कुठे नेत असतील ते मला?समीप सिन्नरकर ला यांनच मारलं असेल का? आणि माझं काय करेल हा? टॅक्सी शहराच्या दिशेने चालायला लागली. चालत्या टॅक्सी मधून उडी मारून आपली सुटका करून घ्यावी का माझ्या मनात विचार आला. प्रजापती इलेक्ट्रिक अँड ऑइल कॉर्पोरेशन च्या ऑफिसच्या दिशेने टॅक्सी धावू लागली. एका उंच लोखंडी गेट जवळ टॅक्सी उभी राहिली. पण हे गेट माझ्या ओळखीचं नव्हतं म्हणजे ऑफिसच्या इमारतीचं हे गेट नव्हतं. 
“आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत का?” मी भैरव ला विचारलं. 
“आपण मागच्या बाजूने आलोय; पुढच्या बाजूला प्रेसचे लोक असतात म्हणून.”
आम्ही अंधारात तळघरातल्या कार पार्किंग मध्ये आलो. भैरवने मला गाडीतून खाली उतरण्याची सूचना केली. तो ही स्वतः उतरला. आम्ही आता एका आलिशान अशा वेटिंग रूम मध्ये आलो होतो. वेटिंग रूम म्हणण्यापेक्षा वेटिंग हॉल होता. जवळ जवळ वीस खुर्च्या आणि टेबलं तिथे ठेवलेली होती. अनेक मॅगझिन्स इथे वाचायला ठेवली होती. मी पळून जायच्या विचारात होतो ते दूरच राहिलं. मला मोठ्या शिताफिने पकडून इथे आणण्यात आलं होतं. दरवाजा उघडला आणि सानवी आत आली. मला आश्चर्याचा धक्काच बसला. मला तिच्याशी खूप बोलायचं होतं पण आत्ता ते शक्य नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर मैत्रीचे असे कुठलेच भाव नव्हते. 
“मिस्टर चक्रपाणी, तुम्ही प्लीज माझ्याबरोबर इकडे याल का?” तिने विचारलं आणि मी मागून येतो आहे की नाही हे न बघता ती मला एका कॉरिडॉरमध्ये घेऊन गेली.टोकाला एक मोठं लाकडी दार होतं आणि त्यावर लिहिलं होतं, प्रखर मार्तंड प्रजापती यांचं ऑफिस. 
सानवी ने दार उघडलं. मी विचार केला आत भालेकर माझी वाट बघत बसला असेल सह्या करण्यासाठी. 
“आत या सर.” ती म्हणाली 
आत एक खूप मोठं सागवानी लाकडाचं टेबल होतं. त्याच्या मागे एक अत्यंत आरामदायी आणि भलीमोठी अशी ऑफिसची खुर्ची होती. त्या खुर्चीत भालेकर बसला असेल या अंदाजाने मी नजर वर करून पाहिलं. तिथे भालेकर नव्हता. ज्या माणसाचा तोतया म्हणून काम करण्यासाठी मला इथे आणलं गेलं होतं तो साक्षात प्रखर मार्तंड प्रजापती खुर्चीत बसला होता ! 
***
मला पाहताच दिलखुलास हसत तो खुर्चीतून उठला. पुढे होऊन माझे दोन्ही हात त्याने हातात घेतले. माझ्या चेहऱ्यावरचे काळजीचे भाव बदलत-बदलत आश्चर्यात परावर्तित झाले. माझी ही अवस्था बघून त्याला आणखीनच हसू आलं. 
"एवढी काळजी करू नकोस मित्रा ! आपण बोलूच पण सगळ्यात आधी मला तुला धन्यवाद द्यायचे आहेत."
त्याच्या आवाजात एक आश्वासक भाव होता. 
"आधी आपण काहीतरी ड्रिंक घेऊ. शॅम्पेन?"
मी अजून स्वतःला सावरू शकलो नव्हतो. अचानकच हे सगळं घडलं होतं. बघता बघता त्याने शॅम्पेनची बाटली उघडून दोन ग्लासात भरली पण त्या ग्लासला हात लावायचं धाडस मला झालं नव्हतं. प्रखर मार्तंड प्रजापती समोर मी उभा होतो. माझ्या अंगावर काटा आला होता. 
"तू कल्पनाही करू शकत नाहीस एवढं मोठं काम केलं आहेस माझं" तो म्हणाला आणि स्वतःच्या हाताने शॅम्पेनचा ग्लास उचलून त्याने माझ्या हातात दिला. थरथरत्या हाताने मी तो हातात घेतला. 
"मी कल्पनाही करू शकत नव्हतो की तंतोतंत माझ्यासारखा दिसणारा माझ्या सारखा आवाज असणारा आणि तेवढाच हुशार असा माझा डुप्लिकेट कोणी असू शकतो. मी तुझे सगळे फोटो आणि व्हिडिओ बघितले आहेत. टेनिस खेळताना, पोहताना, टेबलवर काम करताना, आमच्या ऑफिसमध्ये प्रवेश करताना, सगळे सगळे."तो कौतुकाने म्हणाला. 
"अमोघ अंगारे शी फोनवर बोलतानाचा तुझा आवाज सुद्धा मी ऐकला आहे अरे मीच बोलत होतो जणू काही त्याच्याशी."
"थँक्यू सर मला ज्या कामासाठी इथे आणलं गेले होते त्या कामा बाबत तुम्ही समाधानी आहात याचा मला आनंद आहे." मी म्हणालो 
"समाधानी? अरे हा फारच साधा शब्द झाला तुझ्या कामाचं वर्णन करायला. अरे तू माझ्यासाठी किती उपयोगी पडला आहेस आणि माझे किती पैसे वाचवले आहेस तू कल्पनाही करू शकणार नाहीस चंद्रहास."
बोलता बोलता तो एकेरीवर येऊन माझा उल्लेख माझ्या नावाने करायला लागला याचा मला वेगळाच आनंद होत होता. 
"हे अविश्वसनीय आहे ज्या पद्धतीने तू प्रेस रिपोर्टर ना फसवलस, माझ्या जुन्या स्वयंपाक्याला फसवलस, ड्रायव्हरला फसवलस, अक्षरशः हे अशक्य आहे. तुझ्याशिवाय हे मोठं डील करायला मी अबुधाबीला जाऊच शकलो नसतो. अबुधाबीमध्ये माझ्या डीलचं स्वरूपच असं होतं की तिथे मी वैयक्तिक जाणं आवश्यक होतं पण त्याच वेळेला मी इथे या शहरातही असणं आवश्यक होतं कारण तेवढंच महत्त्वाचं आणि अर्जंट डील मला इथेही करायचं होतं, आणि ते ही आपल्या इथल्या सरकारशी. आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी होती. दोन्ही ठिकाणी डीलचं स्वरूप काय होतं हे मी तुला सांगू शकणार नाही मला माफ कर कारण तो आमच्या व्यवसायाच्या गोपनीयतेचा भाग आहे. पण एवढंच सांगतो की तुझ्या रूपाने मी एकाच वेळेला अबुधाबीमध्ये आणि इथे या शहरात उपस्थित राहू शकलो त्यामुळे माझा हजारो कोटी मध्ये फायदा झाला आहे. तुझ्याशी एकत्र दारू पिऊन आणि तुला खायला प्यायला घालून तू आमच्या कंपनीवर केलेल्या उपकाराची परतफेड होणार नाही याची मला जाणीव आहे.  आणि म्हणूनच मी तुला आमच्यातर्फे एक ऑफर देतो. तुला दोन पर्याय देतो. इथल्या आणखी काही कागदपत्रावर सह्या झाल्यानंतर, एक तर तुला आम्ही पूर्ण मोकळं करू, तू तुझ्या गावाला जाऊ शकशील आणि तिथे तू तुझा जुना व्यवसाय किंवा नोकरी करू शकशील, पण माझी इच्छा आहे ती वेगळीच आहे आणि तोच माझा प्रस्ताव आहे, मी तुला इथे आमच्या कंपनीत एका चांगल्या पगारावर नोकरीची ऑफर देतो. तुझ्या कामाचं स्वरूप जसं आत्ता आहे तसंच राहणार आहे, म्हणजे गरज भासेल तेव्हा तू माझा तोतया म्हणून इथे वावरणार आहेस पण ते काम सतत नसेल. जेव्हा गरज असेल तेव्हाच ते करावे लागेल इतर वेळेला मी तुला काहीतरी हलकंफुलकं ऑफिसचं काम देईन. तू माझा पर्सनल असिस्टंट या पोस्टवर राहशील. तुला एक स्वतंत्र केबिन देण्यात येईल तू तिथून कोणालाही फोन करायला किंवा बाहेर कुठेही जायला मोकळा असशील त्यासाठी तुला कारची सोय करून देण्यात येईल तुझ्या हाताखाली दोन सहाय्यक असतील.
तुला महिना पाच लाख पगार दिला जाईल. अर्थात त्यावर आवश्यक तो इन्कम टॅक्स कापून उर्वरित रक्कम तुला दिली जाईल. तुला एक छोटसं घरही आम्ही राहायला देऊ.”
मी मुग्ध झालो.
“तू मला तुझा होकार किंवा नकार लगेच कळवू नकोस. पण तू गमावण्याजोगा नाहीस. तू जिथे काम करणार आहेस ते ऑफिस कसं आहे, घर कसं आहे ते तुला आधी हे दाखवतो तुला आम्ही कुठली कार देणार आहोत ती तुला दाखवतो तू हो म्हणालास तर आपण लगेच तसं अपॉइंटमेंट लेटर तुला द्यायची व्यवस्था करू. सात वर्षांसाठी हा करार करू. त्याच्या आधी तुला करार मोडायचा असेल तर तू आम्हाला तीन महिने आधी नोटीस देणे गरजेचे राहील. आमच्या कडून हा करार रद्द करायचा अधिकार कोणालाही असणार नाही, अगदी मला सुद्धा. 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुला इथे काम नसेल आणि तुला बाहेर जायचं असेल तेव्हा तू तुझ्या मित्र, नातलग यांना भेटू शकशील त्यावेळेला ते तुझं नेमकं काय काम आहे हे विचारतील त्यावेळेला तू माझा पर्सनल असिस्टंट आहेस एवढेच त्यांना सांगायचं बाकी इथल्या कामाच्या तुझ्या स्वरूपाबद्दल बाहेर काहीही वाच्यता करायचे नाही एवढीच माझी अट आहे किंवा अपेक्षा आहे असं समज." प्रजापती म्हणाला.
बोलता बोलता त्याने इंटरकॉम वरून सानवी ला बोलावून घेतलं. 
“ही बया माझी सेक्रेटरी आहे. ती तुला तुझं केबिन दाखवेल, तुझी कार दाखवेल. तुझं राहायचं घर दाखवेल.तुझ्या इथल्या नेमक्या कामाच्या स्वरूपाबद्दल माझ्या व्यतिरिक्त, स्वतः,भालेकर आणि मजहर एवढ्याच लोकांना माहिती आहे. आणि अर्थातच माझी आई प्राशिला.तुझा होकार किंवा नकार काही असो आम्ही तुला जे काही देऊ केलं आहे ते एकदा बघून घे. आज संध्याकाळपर्यंत विचार कर. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तू तुझा निर्णय आम्हाला कळवू शकशील?" प्रजापती ने विचारलं. 
भीतीने पायात गोळा येतो हे मी अनुभवलं होतं पण अति आनंदाने पण असंच होतं याचा अनुभव मी घेतला. 
काय ऑफर होती साला!  खुनाची भीती नाही, पैशांची चिंता नाही.
"येस सर"एवढेच मी प्रजापतीना बोलू शकलो आणि सानवी बरोबर बाहेर पडलो. 
त्या नंतर सानवी ने मला मला देण्यात आलेली छोटीशी पण टुमदार बंगली, त्याच्या आवारात ठेवलेली माझी कार, माझी केबिन सर्व काही दाखवलं. 
‘तू गमावण्याजोगा नाहीस.’
माझ्या मनात प्रजापतीचं वाक्य पुन्हा पुन्हा घुमत होतं.तो म्हणत होता ते माझी स्तुती करण्यासाठी नव्हतं.अबुधाबी मधील करारासाठी समक्ष हजर राहणे आणि त्याच वेळी इथल्या सरकारशी एक करार करण्यासाठी इथेही हजर असणे याचं प्रजापतीच्या दृष्टीने खूप महत्व होतं.वेळेची किंमत मोजत होता तो.त्याच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी पुन्हा पुन्हा अशी वेळ येणार होती आणि अशा संधी हाडाचा बिझिनेसमन सोडणार नव्हता.त्यामुळेच माझ्याशी तो सात वर्षांसाठी करार करायला तयार झाला होता ! त्याच्या प्रचंड मोठ्या संपत्तीच्या तुलनेत त्याने मला देऊ केलेला पगार आणि इतर सुविधा म्हणजे खिजगणतीतही नव्हत्या.
मी हा प्रस्ताव न स्वीकारणे म्हणजे वेडेपणाच ठरला असता.
माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होत होती.
प्रकरण आठ समाप्त