तोतया प्रकरण 7
रात्री मला नीट झोप लागली नाही. माझ्या मनात विचार आला समजा प्राशिलाचा खून करण्यासाठी मालविकाने मजहरला पटवलं तर? मला प्राशिलाला सांगावं लागेल की मालविका ने प्रजापतीशी लग्न केलेलं नाही आणि खोटा लग्नाचा दाखला आणि मृत्युपत्र तयार करण्यासाठी ती मला पटवते आहे. समजा मी प्राशिलाला हे सगळं सांगितलं तर काय होईल? माझ्या हातात एक हुकमाचं पान घेईल. पुढच्या कुठल्याही कागदपत्रावर मी सही करणार नाही असा स्पष्ट नकार मी देऊ शकेन. नंतर माझ्या मनात भालेकर बद्दल विचार आला. तो फार क्रूर होता. तो मला बळजबरी करू शकेल का सह्या करण्यासाठी? त्याला गरज होती म्हणून तो मला ठार मारणार नाही पण तो छळ करू शकेल कागदपत्रावर सह्या करावी म्हणून. विचारांच्या कोलाहालात मला थोडीशी डुलकी लागली. सकाळी मजहर नाश्त्याची ट्रॉली घेऊन आला.
“तुम्हाला बाहेर जरा फिरून यायचं होतं ना?” आल्या आल्या त्याने विचारलं.
“नाही मला फिरायचं नाहीये प्राशिला मॅडमला म्हणावं मला तिच्याशी बोलायचंय.” मी म्हणालो.
“कशाबद्दल बोलायचंय तुम्हाला तिच्याशी?”
“तू तिला फक्त माझा निरोप द्यायची व्यवस्था कर.” मी म्हणालो आणि बाथरूम मध्ये गेलो. माझं आवरून मी बाहेर आलो तेव्हा मजहर गेलेला दिसला. मी त्यांने आणलेला नाश्ता केला. नाश्त्याची ट्रॉली नेण्यासाठी तो परत आला तेव्हा मी त्याला विचारलं की त्याचं आणि प्राशिलाचं बोलणं झालं का त्याने नाही म्हणून सांगितलं
“तुला तुझ्या बँकेशी बोलायचं होतं ना? बोल इथून.” फोन कडे बोट दाखवत तो मला म्हणाला.
“मी बँकेचा नंबर लावला. मजहर माझ्या शेजारी आला.
“फक्त कामापुरतं बोलायचं. बाकी काही नाही. समजलं?” त्याने मला दम भरला.
मी बँकेला फोन लावला आणि ब्रांच मॅनेजरला फोनवर मागवून घेतलं मी माझं नाव सांगितलं आणि माझ्या खात्याचा बॅलन्स विचारला.
“माफ करा मिस्टर चक्रपाणी पण आम्हाला ही खात्री नाही की तुम्ही चक्रपाणीच बोलत आहात. बँकेच्या खात्याविषयी आम्हाला गोपनीयता पाळावी लागते.” तो म्हणाला.
"आता माझ्यासमोर दुसरा काही पर्याय नाहीये. मला एक चेक इशू करायचा आहे आणि तो जेवढ्या रकमेचा आहे तेवढी शिल्लक माझ्या खात्यात आहे का एवढेच मला हवं आहे. तुम्ही मला खात्यावरची शिल्लक सांगू नका पण समजा मी ३५००० चा चेक एका व्यक्तीला दिला तर तो चेक पास होण्यापुरती शिल्लक माझ्या खात्यात आहे की नाही तेवढेच मला सांगा." मी म्हणालो
माझा हा पर्याय मॅनेजरला एकदम पसंत पडला. त्याने मला माझा खाते नंबर विचारून घेतला. ते खाते उघडताना नोंदवला गेलेला इतर तपशील त्याने मला विचारून घेतला की जो फक्त मला माहित होता. अशा पद्धतीने त्यांने खात्री करून घेतली की मीच स्वतः चक्रपाणी बोलतो आहे. आणि मग त्याने मला सांगितलं की तुमचा चेक आरामात पास होईल. कारण कालच तुमच्या खात्यात ३५००० हजार जमा झाले आहेत.
मजहरने आमचं एवढं बोलणं झाल्यावर फोन बंद केला. आणि तो ट्रॉली घेऊन निघाला.
“मी सांगितलेला निरोप प्राशिलाला दे ” मी म्हणालो.
“ती झोपून उठली की मी निरोप देतो. ती निवांत उशिरा उठते. पण तुझं आणि तिचं आज बोलणं होईल याची व्यवस्था मी करीन ” एवढं बोलून तो निघून गेला. तो जाता क्षणी मी पुन्हा त्या फोनवरून रिडायल करून पुन्हा ब्रांच मॅनेजरला फोन लावला आणि म्हणालो
“मला माझ्या मृत्युपत्राचे व्यवस्थापन करायचा असेल तर तुमच्याकडे तसा खास विभाग आहे का?”
“नक्कीच आहे सर. आम्हाला आवडेल तुमच्यासाठी हे काम करायला. आणि त्यासाठी आमची फी पण फार नाही.” मॅनेजर पलीकडून म्हणाला आणि मी समाधानाने फोन खाली ठेवला.
त्यानंतर साधारण तासाभराने आपल्या शेरूला हातात धरून प्राशिला आत आली मला गुड मॉर्निंग केलं
“तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं मजहर म्हणत होता.” ती म्हणाली आणि खाली बसली.
“मला वाटतं आता तू खुश आहेस, मजहर मला म्हणाला की तू बँकेला फोन केला होतास आणि तुझ्या खात्यात तुला अपेक्षित असलेली रक्कम जमा आहे.”
“मॅडम, मॅनेजर ने, माझ्या खात्यात अपेक्षित रक्कम जमा असल्याचे सांगितलं पण मला दररोज 5000 रुपये द्यायचे तुम्ही कबूल केलं होतं ते माझ्या खात्यात जमा होत नव्हते. मला तुम्ही जे ड्राफ्ट देत होतात ते खोटे होते. काल मी तुम्हाला सहकार्य करायचं नाही असं ठासून सांगितल्यावर नाईलाजाने तुम्ही सगळी पेंडिंग रक्कम माझ्या खात्याला जमा केली. मला जर तुम्ही देत असलेले ड्राफ्ट खोटे आहेत हे कळलं नसतं आणि मी तुम्हाला ते सांगितलं नसतं तर मला ह रक्कम मिळालीच नसती; त्यामुळे मला तुमच्याबद्दल आता खात्री वाटत नाहीशी झालेली आहे.”
“मिस्टर चक्रपाणी खरं म्हणजे तुमचं सगळं काम झाल्यानंतरच आम्ही तुला एक रकमी मोठी रक्कम देणार होतो. पण तुला रोजच्या रोज पैशांची गरज होती. तुझं समाधान व्हावं म्हणून तुला आम्ही ते ड्राफ्ट दाखवत होतो. ते ड्राफ्ट खोटे नव्हते, पण आम्ही तुझ्या खात्यात भरत नव्हतो. पण आता तर तू खात्री केली आहेस ना की तुझ्या खात्यात पूर्ण आठवड्याची रक्कम जमा झाली आहे, इथून पुढे सुद्धा तू दर आठवड्याला बँकेत फोन करून खात्री करून घेऊ शकतोस.”
“मजहर मला सांगत होता की तू पळून जायचा प्रयत्न केलास वेडा आहेस का तू? आम्ही तुझ्यावर अवलंबून आहोत तुला त्याचा योग्य मोबदलाही आम्ही देतोय मला वाटतं तू पुन्हा असं काही करणार नाहीस.” प्राशिला म्हणाली.
“तशी वेळ आली तर मी करीन. मी तुम्हाला काहीही हमी देत नाही.” मी धाडस करत म्हणालो. “पण मी तुम्हाला इथे आता बोलावलं आहे ते थोडं वेगळ्या कारणासाठी. तुमची सून मालविका तुमचा खून करण्याच्या प्रयत्नात आहे.”
प्राशिला घाबरलेली दिसली नाही पण तिने भुवया उंचावल्या. मी पुढे सांगायला लागलो,
“स्वतः मालविकाने मला सांगितलं की ती मजहरला तुमचा खून करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. तुम्ही झोपल्या असताना तुमच्या तोंडावर उशी दाबून तो तुम्हाला गुदमरून टाकून मारण्याची शक्यता आहे. आणि तुम्हाला मारल्यानंतर त्याचा आळ माझ्यावर कसा येईल याची ती व्यवस्था करणार आहे म्हणून मी इथून पळून जायचा प्रयत्न करत होतो.” मी स्पष्टपणे सांगून टाकलं
“किती काळजी करतो आहेस माझी!” आपल्या कुत्र्याला कुरवाळत ती म्हणाली. जणू काही मी कुत्रा म्हणून तिच्या मांडीवर बसलो होतो आणि ती कौतुकाने मला कुरवाळत होती.
मला आश्चर्यच वाटलं. मला वाटत होतं जेव्हा मी ही बातमी तिला देईन तेव्हा ती काहीतरी तिखट प्रतिक्रिया देईल किंवा घाबरेल पण ती अगदी आरामात निवांत बसलेली होती.
“चंद्रहास, काळजी करू नको. तुला वाटतं तसं काही होणार नाही.” प्राशिला म्हणाली
“तसं झालं नाही तर चांगलंच आहे. पण मी तुम्हाला सावध केल हे लक्षात ठेवा.” मी म्हणालो
“खरंच तू माझ्याशी खूप एकनिष्ठ आहेस त्याचा आनंद झाला. आणखीन काय म्हणाली मालविका? तिने तुला सांगितलं का की माझा मुलगा प्रखर हा मानसिक दृष्ट्या आजारी आहे?” प्राशिला न विचारलं
“हो. ते तिने सांगितलं आणि हेही सांगितलं की या बंगल्याच्या दुसऱ्या विंग मध्ये तो राहतो आहे आणि त्याची पूर्णवेळ देखभाल करण्यासाठी केअर टेकर ठेवला आहे.” मी म्हणालो.
“मग तिने हेही सांगितलं असेल ना तुला, की तिचं आणि प्रखर च लग्न झालेलं नाही?” प्राशिला न विचारलं आणि मी भीतीने आवंढा गिळला.
“तुम्हाला माहिती आहे हे?” मी अविश्वासाने विचारलं
“तिनं हे तुला सांगितलं का?”
“हो”
माझं उत्तर ऐकून प्राशिला खळखळून हसली.
“तर मग तिने तुला हेही सांगितलं असेल की तिने पैसे चारून रजिस्ट्रार ला इथे यायला सांगितलं आहे आणि तो तिला लग्नाचा खोटा दाखला देणार आहे.?”
“तुम्हाला हे सुद्धा माहित आहे?” मी हादरून विचारलं
“मला सर्व माहित आहे. मला असंही वाटतंय की तिच्या नावाने मृत्युपत्र केलं जावं म्हणून तिने तुला तिच्या नवऱ्याची सही करण्यासाठी पटवलं आहे.” प्राशिला म्हणाली
माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच शिल्लक राहिलं नव्हतं मी गप्प बसलो
“चंद्रहास, खरोखर तू माझ्याशी खूप एकनिष्ठ राहून काम करतो आहेस. माझा मुलगा जो आता एका महत्त्वाच्या डील साठी परदेशी गेला आहे त्याच्या वतीने इथल्या स्थानिक व्यवहारासाठी तो उपस्थित असल्याचे दाखवण्यासाठी, त्याच्या सह्या करण्यासाठी तू आम्हाला फार मोठी मदत करतो आहेस मी तुला आता एक खाजगी आणि गुप्त गोष्ट सांगणार आहे आणि ती माहीत करून घेण्याचा तुला नक्कीच अधिकार आहे. मला तुझ्याकडून वचन हवंय की हे तू कोणालाही सांगणार नाहीस.”
“तुला मालविकानं हे सगळं जे काही सांगितलं, तीच सर्व हकीगत तिने यापूर्वी समीप सिन्नरकर याला सांगितली होती. तो आठवतोय ना तुला? तुझ्यासाठी ज्याने मास्क बनवला आणि मेकअप केला तो. तुला वाटते तशीच काळजी त्यालाही वाटत होती मालविकाने त्याला तुझ्याप्रमाणेच दोन कोटी रक्कम देण्याचा प्रस्ताव दिला होता तू जसं मला सांगायला इथे बोलावलंस तसंच त्यानंही मला हे सगळं सांगितलं. मी त्याला खात्री दिली की असं काही होणार नाही. पण तो घाबरला होता आणि त्यानं आम्हाला सहकार्य करण्याचं नाकारलं. आम्ही त्याला त्याच्या कामाचा योग्य मोबदला देऊन ' मुक्त ' केलं. मुक्त या शब्दावर जोर देऊन प्राशिला म्हणाली.
“काळजी करू नको मालविका ही प्रखरची पत्नी आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालंय. तू माझ्यावर विश्वास ठेव किंवा ठेवू नको मी तुला त्याचा पुरावा देऊ शकते.” असं म्हणून ती उठली आपल्या शेरूला तिने खाली ठेवलं भिंतीतलं एक कपाट उघडलं एक मोठा अल्बम बाहेर काढून तिने ते माझ्यासमोर धरला
“बघ हे. त्यांच्या लग्नाचे फोटो आहेत. मोठा समारंभ करून हे लग्न झालं होतं.”
मी ते सगळे फोटो पाहिले. जगातला दोन नंबरचा श्रीमंत माणूस ज्या पद्धतीने विवाह करेल तसेच ते सगळे फोटो होते. मी ते फोटो बघून अल्बम प्राशिलाला परत दिला
“मग तिनं मला का सांगितलं की तिचं लग्न झालं नाही म्हणून?”
“तेच माझ्या मुलाच्या बाबतीतलं एक दुर्दैवी गुपित आहे आणि जे मी अनेक वर्ष दडवून ठेवलय.” प्राशिला म्हणाली. “तुला सांगते आता, मानसिक रुग्ण माझा मुलगा नाही तर स्वतः मालविका ही मानसिक रुग्ण झाली आहे. मजहरला ही माहिती आहे. त्यामुळे तुला वाटतं तसं तिच्या सांगण्यावरून तो माझा खून वगैरे काही करणार नाही. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे”
" ती म्हणाली की मजहर आणि तिचं प्रेम आहे " मी पुन्हा तिला पटवायचा प्रयत्न केला ती पुन्हा जोरात हसली.
“मालविका सतत सेक्स ची स्वप्न बघत असते. समीप वर सुद्धा तिने तसा मोह टाकण्याचा प्रयत्न केला. आणि मला माहितीये की तुला सुद्धा नादाला लावायचा प्रयत्न केला असेल. मजहरला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न केला असेल पण तिचं ते अस्त्र मजहरवर चालणार नाही.”
“का? इतका का विश्वास आहे तुमचा त्याच्यावर?” मी विचारलं
“कुठल्याही स्त्री बरोबर प्रणय करायची त्याची शारीरिक क्षमता नाही. यातच काय ते समजून घे. जास्त स्पष्ट बोलायला लावू नको.” ती फटकळपणे म्हणाली
“तुमच्या मुलाला लोखंडी गजाआड बंदिस्त का करून ठेवलंय?”
“ते लोखंडी गज माझ्या मुलासाठी नाही तर मालविकाच्या सुरक्षिततेसाठी बसवलेत.”
“साधारण दीड वर्षांपूर्वी तिचं मिस कॅरेज झालं, तेव्हापासून ती मानसिक दृष्ट्या दुर्बल झाली आहे. विशेषतः पौर्णिमेच्या आसपास तिच्या मनावर जास्त मोठा परिणाम होतो आणि ती जास्तच आक्रमक होते , त्याच वेळेला जर प्रखर ला कामा निमित्त बाहेर जावं लागलं तर तिला त्या खोलीत बंदिस्त करून ठेवावं लागत, नाहीतर ती हाताबाहेर जाते. म्हणूनच पौर्णिमेच्या आसपास प्रखर इथे नसेल तर तिच्यावर नियंत्रण ठेवायला म्हणून मी इथे येते. आता सुद्धा मी त्याच कारणासाठी इथे आल्ये.कारण आता येत्या दोन-चार दिवसात पौर्णिमा येईल. तुला हे सगळं अंधश्रद्धा सारखं वाटेल पण उत्कृष्ट डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तिच्यात काही फरक पडलेला नाही. त्यामुळे तिला बंदिस्त करून ठेवणे एवढे एकच आमच्या हातात उरलंय. आता आमच्या कुटुंबातलं सर्वात मोठं रहस्य आता तुला मी सांगितलं आहे. माझी विनंती आहे की तू आम्हाला सहकार्य कर. तुला फार दिवस इथे राहावं लागणार नाही. " ती म्हणाली.
माझा तिच्यावर फार विश्वास बसला नाही पण मला माझा समीप सिन्नरकर होऊन द्यायचा नव्हता, त्यामुळे मी तिला म्हणालो,
“हे तुम्ही मला एवढ्या विश्वासाने सांगितलं त्याचा खूप आनंद झाला. मला आता वस्तुस्थिती काय आहे ते कळलं. तुम्ही माझ्यावर पूर्ण अवलंबून राहू शकता काळजी करू नका.”
तिने आनंदाने मान डोलावली “ इथून पुढे ती काय बोलते याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका तिच्याशी चांगलंच वागा. तिला असं भासव कि ती जे काही सांगेल ते करायला तू तयार आहेस आता पौर्णिमा जवळ येत असल्यामुळे ती पुढील काही दिवसात अधिक अधिक आक्रमक होईल किंवा काहीतरी विचित्र कल्पना लढवत जाईल. तू मला सहकार्य करायची खात्री दिल्यामुळे मलाही बरं वाटलं तुला जेवणात काही खास हवं असेल तर मजहरला तसं सांग.” ती म्हणाली आणि निघून गेली. मधेच मला ती अरे तुरे करत होती, मधेच अहो जाहो करत होती. मालविका सारखीच ही पण सर्किट होती की काय !
***
मजहर आत आला आणि मला टेनिस खेळायला घेऊन गेला माझा खर तर मूड नव्हता पण त्याच्याशी बोलायला संधी मिळावी म्हणून मी हो म्हणालो.
“आपण आता एकमेकांना बऱ्यापैकी ओळखतो पण दोघांनाही एकमेकांच्या कुटुंबाबद्दल काहीच माहिती नाही. मी तर सडा फटिंगच आहे तुझं काय? तुझं लग्न झालंय? मुलं बाळ वगैरे काय?” मी त्याला विचारलं.
मजहर हसला. "तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर हो आहे पण पहिल्या प्रश्नाचे उत्तर नाही असं आहे"
याचा अर्थ प्राशिलाने मला जे मजहर बद्दल सांगितलं होतं की तो कुठल्याही तरुणी बरोबर प्रणय क्रीडा करू शकत नाही हे धादांत खोटं होतं. मजहर बद्दल तिने हे खोटं सांगितलं असेल तर मालविकाबद्दल सुद्धा तिने खोटं सांगितलं असेल का?
विचाराच्या तंद्रीत मी घरी आलो आणि ज्या कपाटातून प्राशिलाने अल्बम बाहेर काढला होता तो पुन्हा एकदा बघावा या हेतूने कपाट उघडलं. हे लोक काहीही करू शकत असतील तर दुसऱ्या कोणाच्या तरी विवाह समारंभातील फोटोमध्ये नवऱ्याच्या जागी प्रजापती आणि नवरीच्या जागी मालविकाचा चेहरा बदलणं या लोकांना काहीच अवघड नव्हतं. कपाटामध्ये अल्बम नव्हता.
मी खुर्चीत पटकन खाली बसलो. विश्वास तरी कोणावर ठेवायचा?
लोखंडी गज लावून बंदिस्त केलेला बंगला नक्की कोणासाठी होता? मालविकासाठी की प्रजापती साठी?
एकंदरीत गेल्या काही तासात घडलेल्या घडामोडी पाहता रात्री पळून जाण्याचा विचार करण्यात काही अर्थ नव्हता रात्री पहारेकरी जास्तच कडकपणे आपला पहारा देतात असं माझ्या लक्षात आलं होतं दिवसा त्यामानाने ते थोडे ढिले पडत असावेत. मला सगळ्यात पहिला अडथळा मजहरचा होता. तो दूर करायला हवा होता. मी त्याचा विचार करायला आणि मजहर जेवण घेऊन यायला एकच गाठ पडली.
“मजहर आपल्या दोघांची आता बऱ्यापैकी मैत्री झाली आहे मी तुला एक स्पष्ट विचारू का?” मी म्हणालो
“काल पण तू माझ्या मुलाबाळांची चौकशी केलीसच की. आता आणखीन काय हवंय?”
“तुझं आणि मालविकाचं काही लफडं चालू आहे का?”
“काहीही काय बोलतो आहेस?”
“मी सांगतो आहे ते नीट ऐक, मालविका, प्राशिला चा खून करण्याच्या प्रयत्नात आहे.”
तो एकदम स्तब्ध झाला त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झालेले मला दिसले. मी त्याला आणखीन घाबरवायचं ठरवलं.
“आणि त्याचा आळ तुझ्यावर येईल अशी ती व्यवस्था करणार आहे.”
माझ्या अपेक्षेनसार त्याला हा आणखीन एक मोठा धक्का होता. त्याच्या चेहऱ्यावरून मला जाणवत होतं पण पटकन स्वतःला सावरत तो म्हणाला,
“मूर्खासारखं बोलू नकोस काही. आणि माझ्यात किंवा या कुटुंबाच्या मधे पडू नको. तुला ज्याच्यासाठी पैसे मिळत आहेत तेवढेच काम कर.” तो म्हणाला आणि निघून गेला
प्रकरण 7 समाप्त