या नवीन आयुष्यात ऊमाला मोहनचा फार आधार होता .मोहन वर्षातून तीन चार वेळा त्या दोघींना भेटून जात असे .नयनाच्या प्रत्येक वाढदिवसाला मोहन न चुकता येतच असे .त्या त्या वेळी हटकून ऊमा आणि मोहनला सतीशची आठवण सतावत असे . होता होता अशीच दहा वर्षे पार पडली .ऊमा आता तिच्या या आयुष्यात चांगलीच स्थिरावली होती .या वाड्यात आल्यानंतर तिचे खूपच भले झाले होते .वाड्यातील सगळेच लोक खूपच चांगले होते .त्यांनी कधीही ऊमाला तिच्या भूतकाळाविषयी विचारले नव्हते ना कधी तिला तिच्या भूतकाळाची आठवण होऊ दिली .नयना आता हायस्कूलमध्ये शिकत होती.ती अत्यंत हुशार असल्याने प्रत्येक वर्षी पहिला नंबर काढत होती .शाळेतली एक गुणी विद्यार्थिनी म्हणून तिचे नाव गाजत होते .देखणी ,हुशार ,नम्र अशी नयना सर्वांचीच आवडती होती .ऊमाला कित्येक वेळा तिच्या या गुणी लेकीचे कौतुक वाटायचे .खरेतर पहिले एक दीड वर्षे सोडता नयनाला ना कधी बापाचे प्रेम मिळाले न त्याचा आधार मिळाला पण तरीही तिने कधीच कोणत्या गोष्टीची तक्रार केली नव्हती . आता तिची दहावी सुद्धा पार पडली . दहावीत ती बोर्डाच्या मेरीट लिस्ट मध्ये चमकली .शाळेत तर ती पहिली होतीच . शाळेने तिचा जंगी सत्कार केला .ऊमाने लेकीच्या कौतुकापोटी सगळीकडे भरभरून पेढे वाटले .वाड्यातल्या सर्वांचीच नयनाला वाढवताना खूपच मदत झाली होती .ऊमाने वाड्यात नयनाच्या या यशानिमित्त एक छान पार्टी ठेवली होती .काही ओळखीचे लोक ,नयनाच्या मैत्रिणी पण बोलावल्या होत्या .वाड्यातील शेजारी पाजारी ,ओळखी पाळखीची माणसेअगदी सर्वांनीच तिचे कौतुक केले .ऊमाच्या दुकान मालकांना नयना पेढे द्यायला घरी गेली होती .त्यांनी पण तिचे खुप कौतुक केले आणि तिला दोन हजार रुपये बक्षीस दिले .मोहन सुद्धा तिचा रिझल्ट समजताच स्वतः तिचे यश पहायला ताबडतोब आला होता .नयना होतीच पहिल्यापासून मोहनची लाडकी त्यात या तिच्या यशामुळे मोहनचा उर पण आनंदाने भरून आला होताया वेळी ऊमाला ,नयनाला आणि मोहनला सुद्धा काका काकुची खूप आठवण आली .नयनाच्या तिच्या यशाबद्दल अनेक प्रकारच्या तिला हव्या असलेल्या गोष्टी मोहनने तिला घेउन दिल्या .नयना अतिशय खुश होती ..आता ती कॉलेजकुमारी होणार असल्याने वेगवेगळ्या प्रकारचे तिचे आवडते कपडे मोहनने तिला घेतले होते .ऊमाने सुद्धा तिच्यासाठी आता दरमहा पाचशे रुपये पोकेट मनी सुरु केला .आता तर ज्युनियर कॉलेज मध्ये सुद्धा ती आदर्श विद्यार्थिनी ठरली होती .बारावी बोर्डात सुद्धा ती चांगली चमकणार याची कॉलेजला खात्री होती .आणखीन एक बदल ऊमाच्या आयुष्यात घडला होता.तो म्हणजे वर्षभरापूर्वी ऊमाने नोकरी सोडुन स्वतःचे काढलेल्या फूड शोपी .चा आता चांगला जम बसला होता. त्या भागात तिच्या दुकानाचे चांगले नाव झाले होते .असा हा भूतकाळाचा इतका मोठा प्रवास ऊमा तिच्या विचारात कधी करून आली हे तिचे तिला समजलेच नाही ..अकरावीत सुद्धा उत्तम मार्क मिळवून नयना बारावीत गेली होती . नयनाचा सतरावा वाढदिवस आता एक दिवसावर आला .नयनाची वाढदिवसाची तयारी जोरात चालू होती .खरेदी तर झाली होती .मैत्रीणीना आमंत्रणे गेली होती .हॉटेल आणि मेन्यू पण बुक झाला होता .आणि अखेर तो दिवस उजाडला ..मोहन सकाळीच हजर झाला होता .मामाला पाहुन नयना एकदम खुष झाली होती .दुपारी जेवण झाल्यावर मामाकडे मागितलेले स्पेशल गिफ्ट तिने हस्तगत केले होते . मोहनने तिच्यासाठी एक खूप महागाचा एकदम लेटेस्ट मॉडेलचा फोर जी मोबाईल आणला होता .मैत्रिणींना द्यायची पार्टी हॉटेलमध्ये संध्याकाळी होती .नयनाची नुसती गडबड चालली होती.दुपारी ती मैत्रिणीला घेऊन हॉटेलवर पार्टीची व्यवस्था पाहायला गेली .ती बाहेर गेली हे बघून मोहन तिला म्हणाला “वहिनी एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला ..म्हणजे माझा पण खरेतर अजून विश्वास बसत नाही त्या गोष्टीवर पण तुमच्या कानावर घालतो “ऊमाने प्रश्नार्थक नजरेने मोहनकडे पाहिले ..“आपल्या गावात काही लोकांनी सतीशला पाहिले असे म्हणतात . आता इतक्या वर्षानंतर मात्र ..तो सतीशच आहे का याबद्दल थोडी शंका वाटते आहे त्यांना .शिवाय गावात तो असा उजळ माथ्याने फिरू नाही शकणार पण तरीही तीनचार दिवसापूर्वी असे माझ्या ऐकण्यात आले .मी तर त्याला अजुन नाही पाहिले पण पाहिले तर नक्की ओळखीन आणि त्याला जाब पण विचारेन चांगला ..”हे ऐकुन ऊमा कोड्यात पडली ..खरेच असेल का तो सतीश ?तो गायब झाल्यावर मृत झाल्याची अशी बातमी कधीच आली नव्हती .पण त्याचा शोध सुद्धा लागला नव्हता ..काय करीत असेल तो इतकी वर्षे .. ?कुठे असेल?ऊमाचा जीव अगदी कावराबावरा झाला ..सतीशने ऊमाला आयुष्यात खुप वाईट दिवस दाखवले होते . पण त्याचा मृत्यू झाला असावा अशी शंका तिला कधीच आली नव्हती .म्हणून तर इतकी वर्षे विधवेसारखे आयुष्य काढत असुन सुद्धा तिने आपल्या अंगावरचे कुंकू मंगळसूत्र कधीच उतरवले नव्हते .खरेच तो सतीश असेल तर बर होईल !!!!पण परत त्याच्या रुपात आपल्यापुढे कोणते संकट येईल कोण जाणे ...अशा विचाराने ती थोडी धास्तावली .तिला विचारात पडलेली बघुन मोहन म्हणाला “काळजी करू नका वहिनी ..मी बघतो नक्की काय प्रकार आहे ते आणि कळवतो तुम्हाला ..काढतो माहिती त्याची पण त्यापूर्वी नयनालामात्र कसलीच कल्पना देऊ नका .नाहीतर एकदम तिला धक्का बसायचा .”“नाही हो मोहन मी कसे सांगेन तिला ?आणि का सांगेन ?जर आपल्यालाच नीट माहिती नाही तर... मला तर नवल वाटते आहे की नयनाने इतक्या वर्षात कधीच आपल्या बाबाचे नाव नाही घेतले किंवा कधीही मला तिने त्याच्याविषयी कोणतेच प्रश्नही कसे विचारले नाहीत “ऊमाच्या या बोलण्यावर मोहन म्हणाला .“कधी कधी लहानपणापासुन पाहिलेल्या चित्रविचित्र घटना बघुन मुलांच्या मनावर परिणाम झालेला असु शकतो .आणि मग त्याविषयी काहीही बोलणे त्यांना नकोसे वाटते .”हे मात्र ऊमाला पटले .. खरेच ..बाबाला ओळखू लागल्यापासून नयनाने त्याला कायम दारू पिऊन आलेले आणि आरडा ओरडा करतानाच पाहिले होते .नयनावर सतीश तसे प्रेम पण खुप करायचा.पण जास्त वेळ तेव्हा तिला तो देऊच शकला नव्हता . आणि बालपणी पाहिलेल्या वाईट गोष्टीच मनावर जास्त परिणाम करीत असतात..तिच्या सहाव्या वाढदिवसाला तो येईल अशी आशा वाटत होती .पण तेव्हाही त्याने गुंगारा दिला होता बाहेर गेलेली नयना परत आली आणि दोघांचा हा विषय थांबला . त्या दिवशी संध्याकाळी हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी एकदम जोरदार झाली .जेवणाचा चवदार मेन्यू ,मोठा केक ,भरपूर मैत्रिणी ..कधी हॉटेलात न जाणारी आई पण नयनाच्या सोबत आज आली होती ,शिवाय लाडक्या मोहनमामाची उपस्थिती होतीच ..!!नयनाचा चेहेरा आनंदाने चमकत होता .नव्या लेटेस्ट कपड्यातील आनंदी आणि देखण्या नयनाला बघुन ऊमाच्या डोळ्याचे पारणे फिटत होते .राहून राहून सतीशची आठवण होत होती ..रूप तर नयनाचे हुबेहूब सतीश सारखे होतेच !!क्रमशः