Mandodari - 2 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | मंदोदरी - भाग 2

Featured Books
Categories
Share

मंदोदरी - भाग 2

*******२******************

          मंदोदरी सात्विक होती व ते सात्विकतेचं बाळकडू तिला तिच्या आईनंच पाजलं होतं लहानपणी. तसं पाहिल्यास तिची आईही तिच्याजवळ जास्त दिवस राहिली नाही. 
           मंदोदरीच्या आईवडिलांचं नाव मय व हेमा. ज्या मयचा जन्म कश्यप ऋषी व दितीच्या गर्भातून झाला होता व हेमा ही एक स्वर्गातील अप्सरा होती. मंदोदरीला दोन भाऊ व एक बहीण होती. एक मायावी व दुसरा दुदूंभी. त्यांनीही तिच्यावर फारसे असे संस्कार केले नाही. परंतु भावानं तिला प्रेम दिलं व तिला कोणताच असा फारसा त्रास होवू दिला नाही. 
           मंदोदरीची आई हेमा ही स्वर्गातील अप्सराच होती. ती पाताळलोकातील आपलं कार्य पुर्ण करुन स्वर्गलोकात लवकरच निघून गेली होती. त्यामुळंच तिला नाईलाजानं तिच्या वडिलांनी म्हणजेच मायासूरानं पोषलं. लहानाचं मोठं केलं. वाढवलं व जे कोणते तिच्यात संस्कार टाकायचे, ते टाकले. त्यातच ती तरुण होताच रावणाची जेव्हा तिच्यावर वक्रदृष्टी पडली व तिच्या सौंदर्यानं रावण मोहीत होताच व त्यानं तिला मागणी घालताच तिच्या वडिलांचीही इच्छा नसतांना त्यांनी तिचा रावणाशी विवाह करुन दिला. तसं पाहिल्यास ती एवढी रुपवान होती की रावणाला ती फार आवडली व त्यानं तिला चक्कं पट्टराणीच बनवून टाकलं होतं. त्यातच तो तिच्यावर प्रेमही करु लागला होता.
         रावणानं जेव्हा पहिल्यांदा तिला पाहिलं व तो तिच्या प्रेमात पडला. तेव्हापासूनच तो तिच्यावर प्रेम करु लागला होता. त्यानं त्या प्रेमात कधीच खंड पडू दिला नाही वा कधी तिला अंतर दिलं नाही. त्याच रावणाचं तिच्यावर असलेलं प्रेम जेव्हा मंदोदरीला जाणवलं. तेव्हापासून तिही त्याचेवर प्रेम करु लागली होती. अन् ते प्रेम ती शेवटपर्यंत करीत राहिली. जेव्हा रावण मरण पावला होता. तेव्हा तिला एवढं अतीव दुःख झालं होतं की तिनं बरेच दिवस स्वतःला राजमहालाच्या एका कमऱ्यात बंदिस्त करुन ठेवलं होतं. तिनं जीवनभर म्हणजेच आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत रावणाला विसरण्याचा प्रयत्न केला असला तरी रावण तिच्या मनातून गेला नाही. त्याची आठवण तिला शेवटपर्यंत येतच राहिली.
            मंदोदरी....... मंदोदरी रावणाची पत्नी होती. रावण मरण पावताच तिला फार दुःख झालं होतं. कारण ती सर्वात जास्त आपला पती रावणाशी प्रेम करीत होती. तसं तिनं बरेचवेळेस त्याला समजावलंही होतं की त्यानं सीतेला सोडून द्यावं व आपलं राज्य सांभाळावं. नाहीतर दुर्गती होईल. परंतु रावण तिचं बोलणं वा सल्ला काही ऐकत नव्हता. कारण त्याचेजवळ एवढं सखोल व दिव्य ज्ञान होतं की त्या ज्ञानाचा त्याला गर्वही होता. वाटत होतं की अशी कधीच वेळ येणार नाही. आपल्या ज्ञानापुढं कोणाचाच टिकाव लागू शकणार नाही. तसेच आपण कधीच मरु शकणार नाही. त्यामुळंच मंदोदरीनं त्याला तशा स्वरुपाचे सल्ले देताच त्याकडे दुर्लक्ष करीत असे. ते सल्ले वा तिचं बोलणं अगदी धुडकावून लावत असे.
          रावण........ रावण महापराक्रमी व विद्वान योद्धा होता. तो प्रकांड पंडीत होता. ज्योतीशीही होता. शिवाय दुरदर्शी स्वभावाचाही होता. माणसांचा स्वभाव त्याला वेळीच ओळखता येत असे. त्यानं रामाचाही स्वभाव ओळखला होता. परंतु त्यानं ते कोणालाच दाखवला नाही. कारण त्याला वाटत होतं की तसं जर आपण दाखवलं तर आपलीच बदनामी होईल व लोकं म्हणतील की हा त्रैलोक्यस्वामी कसला? याच्यापेक्षाही राम अत्युच्च आहे. तसं पाहिल्यास रावण हा त्रिलोकस्वामी होता व त्यानं आपल्या हयातीत तिन्ही लोकांना जिंकून घेतलं होतं. 
          ते कैकेई राज्य व त्या राज्यातील सत्यकेतू नावाचा राजा. राजाचा कारभार सुंदर व सुरळीत होता. त्याला दोन मुलं होती. राजा भानूप्रताप व अरिमर्दन. दोनही राजपुत्र बलशालीच होते. त्यांचा एक मंत्री होता. धर्मरुची नाव होतं त्याचं. तोही शुरवीर होता. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर मोठा भाऊ भानूप्रतापनं राज्याची बागडौर सांभाळली व अरिमर्दन अरण्यात निघून गेला.
           रावण या जन्मात रावण म्हणून जन्मास आला असला तरी त्याचं पुनर्जन्मात नाव जय होतं. तसंच त्याच्या भावाचं नाव विजय. जय हा भानूप्रतापचा अवतार होता व विजय अरिमर्दनचा. ते विष्णूचे द्वारपाल बनले होते. ते शापामुळं झालं होतं. त्यांनी एकदा विष्णूला भेटायला येणाऱ्या मुनी सनत्कुमारचा अपमान केला होता. ज्यात तशा स्वरुपाचं विष्णूला माहीत होताच त्यांनी त्याला शाप दिल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथात मिळतो. मात्र वाल्मिकी रामायणात रावणाचं नाव वेगळंच सांगीतलेलं असून रावणाचं नाव त्याच्या पुर्वजन्मात भानूप्रताप सांगीतलेलं आहे.
          भानूप्रताप हा एक न्यायी राजा होता. परंतु त्याला राज्यविस्ताराची महत्त्वाकांक्षा होती. जी महत्वाकांक्षा कोणत्याही राजाला असतेच. त्यातच अशा राज्यानं आपल्या महत्वाकांक्षेनुसार राज्य विस्ताराचं धोरण अवलंबलं. ज्यातून कितीतली राजे हे भानूप्रतापला शरण आले. जे शरण आले नाही. त्याच्यावर भानुप्रतापनं विजय मिळवत त्यांचं राज्य हस्तगत केलं. अशाच काही राजांपैकी एक असाही राजा होता की ज्याला भानूप्रतापनं युद्धात हरवलं होतं. ज्यातून आपला जीव वाचविण्याच्या उद्देशानं तो राजा जंगलात पळाला होता. जो मुनी बनून वावरत होता. परंतु त्याच्या मनात बदल्याची भावना होतीच. ज्यातून तो षडयंत्र रचत होता.
          मुनी बनलेलं ते व्यक्तीमत्व. त्या व्यक्तीमत्वाला बदला काढायचाच होता भानूप्रतापशी. तो तशी संधीच पाहात होता. अशातच त्याला माहीत झालं कालकेतूबाबत. जो कालकेतू एक राक्षस होता व त्या राक्षसाचे शंभर मुलं आणि दहा भाऊ भानूप्रतापनं मारलेले होते. जो बदल्याचीच वाट पाहात होता.
           कालकेतूला तो मुनी शोधत असतांना अचानक त्याची भेट कालकेतूशी झाली. मग षडयंत्राला वळण मिळालं. तसा कालकेतू हा मायावी होता. त्यातच मुनीनं त्याला म्हटलं की भानूप्रतापचा जर बदला काढायचा असेल तर त्यांना त्याच्याविरुद्ध कटच रचावा लागेल व योजना बनवावी लागेल. 
           विचारांचा अवकाश. लागलीच त्या मुनीनं एक योजना बनवली. योजना होती, कालकेतूनं वराहाचं रुप घेवून आपल्या मागं भानूप्रतापला लावायचं. त्याला जंगलात आणायचं की जेथून तो रस्ता भटकेल. त्यानंतर तो त्याचे समक्ष जाणार व त्याला भ्रमीत होणारा व फसवणारा मार्ग सांगणार. यात काही गोष्टी मायावी शक्तीनं कालकेतूलाही कराव्या लागतील. 
           कालकेतूनं योजनेला होकार दर्शवला. लागलीच ती योजना कार्यान्वित करणे सुरु झाले. मग काय, एक दिवस भानूप्रताप शिकारीला निघताच त्याला कालकेतू वराहाच्या रुपात दिसला. त्यानं त्याला ओळखलं नाही. मग सुरु झाली छलाची व कपटाची योजना. वराह रुपातील कालकेतू पळू लागला व राजा त्याच्या पाठीमागे पळू लागला. शेवटी कालकेतू एका अंधाऱ्या गृहेत पळाला व राजा भानूप्रताप परत फिरला.
          राजा भानूप्रताप परत फिरला खरा. परंतु तो जंगलातील रस्ता भटकला. तशी रात्र झालीच होती व रात्रीच्या वेळेस रस्ता सापडत नसल्यानं तो काहीतरी आसरा म्हणून एखादी गृहा शोधू लागला. तशी त्याला भूकही फार लागली होतीच. तोच त्याला एक गृहा सापडली. ज्या गृहेत आधीच एक मुनी निवास करीत होता. शेवटी लक्षात येवू न देता तेथेच विश्राम करीत असलेल्या भानूप्रतापचा विश्वास त्या मुनीनं जिंकला. तसं भानूप्रतापनही त्याला म्हटलेलं की त्याला विश्वविजयी व्हायचं आहे. त्यावर मुनीनं उपाय सुचवावा. ज्यात उपाय म्हणून त्या मुनीनं सांगीतलं की त्यानं एक सहस्र ब्राम्हणांना भोजनदान करावं. ज्याचा स्वयंपाक तो स्वतः बनविणार आहे व भोजनदान भानूप्रतापनं करावं.
          ठरल्याप्रमाणे भानूप्रताप आपल्या राज्यात येताच त्यानं मुनीला जेवन बनविण्याचं निमंत्रण दिलं. ज्यात त्यानं अन्नामध्ये जनावरांचं रक्त व मांसाचे काही तुकडे मिसळवले. जे एक पापच होतं. ज्यातून त्या कपटी मुनीनं कालकेतूला पुरोहिताचं रुप घेवून जेवन बनवायला लावलं. तो काय करणार याची कल्पनाही भानूप्रतापला नव्हती. त्यातच कालकेतूनं बनवलेलं ते जेवन राजा भानूप्रताप एक सहस्र ब्राम्हणांना वाटू लागला. परंतु लागलीच एक गौप्यस्फोट झाला. जेवणात जनावरांचं रक्त व मांस मिसळल्याचा संदेश प्रसारीत झाला. शेवटी अशा संदेशातून जे पाप घडलं. त्या पापातून राजा भानूप्रतापचा दोष नसतांनाही त्याला एक सहस्र ब्राम्हणांनी शाप दिला. म्हटलं की त्याच्या अख्ख्या परीवाराचा जन्म हा पुढील काळात राक्षसकुळात होईल व तसा शाप देत ते निघून गेले. 
         भानूप्रतापला त्या घटनेत बराच पश्चाताप झाला. शेवटी तो हताश व निराश राहायला लागला. पुढं भानूप्रताप चिंतेत राहात असल्यानं त्यानं राज्याकडे व राज्यविस्ताराकडे लक्ष दिलं नाही. ज्यातून भानुप्रतापचं राज्य लयास गेलं व शेवटी दुःखी कष्टी होवून तो मरण पावला. त्यानंतर त्याला नवीन जन्म मिळाला. ज्यात तो त्याची रावण व त्याचा भाऊ अरीमर्दन कुंभकर्ण म्हणून ओळख निर्माण झाली होती तर त्याचा मंत्री धर्मरुची हा विभीषण बनला.