*******५******************* 'मी असा कोणता अपराध केला की राक्षसाच्या घरी येवून पडले.' सुलोचनाचा तो विचार. तसा तिच्या मनात बराच विचार होता. ती विचार करीत होती, 'म्हणतात की स्वर्ग हा वेगळा आहे. तो पृथ्वीचा भाग नाही. पृथ्वीवर फक्त माणसंच जन्म घेतात. देव नाही. देव देवलोकात अर्थात स्वर्गभुमीत जन्म घेतात. जिथं ब्रम्हांड असतं. जिथं सात्विक लोकं राहतात. ते जर वाईट कर्म करीत असतील तर त्यांच्या त्यांच्या पापकर्मानुसार ते ते पापकर्म भोगण्यासाठी त्यांना थेट पृथ्वीवर पाठवलं जातं. जिथं नरकयातनाच जास्त असतात. स्वर्गात पाप करणारी मंडळी ही स्वर्गातून दंडीत झाल्यावर पृथ्वीवर आली की ती चांगले वर्तन ठेवत नाहीत. ते आपलं वर्तन हे राक्षसी प्रवृत्तीचे ठेवतात. ज्यांना संपविण्यासाठी देवांना जन्म घ्यावा लागतो. तसं पाहिल्यास देवही पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी तरसतातच. काही लोकं म्हणतात की देव आहे व तसे राक्षसही आहेत आणि त्याची अनुभूती मीच केलीय. मीच स्वर्ग अनुभवला आणि मीच पाताळभुमीही अनुभवत आहे. मी नागलोकांतील कन्या. बालपणात मी अति सुंदर होती म्हणतात. मला माझा जन्म कसा झाला हे माहीत नाही. परंतु जेव्हा समज आली. तेव्हा कळलं की माझा जन्म माझ्या वडिलांच्या नेत्रातून झाला. ते नेत्र, जे अश्रूभरले होते. माझे वडील वासूकी यांनी सेवाच केली अति निगरगट्ट राहून. कोणी म्हणतात की विष्णूच्या दंडावर रोजच माझ्या वडिलांच्या शरीरदेहाची दोरी बनवून माझ्या वडिलांच्या शरीरदेहाचा उपयोग करीत असत तर कोणी म्हणतात की पार्वती शिवाच्या दंडाला माझ्या वडिलांच्या शरीरदेहाची दोरी बनवून बांधत असे. तसं पाहिल्यास आमची जाती ही सेवा करणारी. माझे आजोबा शेषनाग. त्यांनी जीवनभर भगवान विष्णूची सेवा केली. अन् माझ्या वडिलांनी जीवनभर भगवान शिवाची सेवा केली. दास बनवून ठेवलं होतं आमच्या परिवाराला. अन् आम्हालाही ते कार्य करतांना वाईट वाटायचं नाही. मीही विष्णूची परमभक्तच होते. मी अभागी नव्हती की मला स्वर्ग मिळाला. परंतु या राक्षस जातीत मी आल्यानं मला वाईट वाटत आहे. परंतु आता मी काय करु. आता तर त्यावर कोणताच उपाय देखील दिसत नाही. सापडतही नाही. अन् तो करणं कठीण आहे. जर मी माझ्या पतीला सोडून निघून गेली तर तो अपराध ठरेल. लोकं पिढ्या न् पिढ्या माझा उद्धारच करीत राहतील. म्हणतील की त्रेतायुगात एक सुलोचना नावाची अशीही स्री होवून गेली की जिनं आपल्या पतीला धोका दिलाय. मी स्वर्गातील अप्सरा. हवं तर मी ते नृत्याचं काम स्विकारायला नको होतं. परंतु काय करु. आवड माझी आणि ती माझ्यातील सेवेची वृत्ती. त्याच सेवेच्या वृत्तीनं मला माझी आवडनिवड जोपासतांना थांबवलं नाही. मी चटकन होकार दिला. जेव्हा नारदमुनी आलेत, तो विचार घेवून.' सुलोचना विचार करीत होती व त्या गोष्टीवर पश्चाताप करीत होती. जी गोष्ट तिला नकोशी वाटत होती. तसं तिला आठवलं, ते नारदमुनी आले होते तिच्या घरी. त्यांनी तिच्या वडिलांना म्हटलं होतं की स्वर्गात एक जागा आहे अप्सरेची. तशी तुमची मुलगी सुंदर आहे व या नागलोकात तिच्या सुंदरतेला वाव मिळणार नाही. स्वर्गात तिच्या सुंदरतेला योग्य सन्मान मिळेल. तुम्ही होकार द्या. मी लगेच तिला तिथं नेण्याचं प्रयोजन करतो. नारदमुनींचं ते बोलणं. नारदमुनी हे भ्रमण करणारेच होते. नारदमुनींचं ते बोलणं ऐकताच वासुकीनं स्पष्ट नकार दिला होता. हे सुलोचनेला आठवत होतं. आठवत होतं की तिच्या वडिलांच्या डोळ्यातून तीच आसवं बाहेर पडली होती, तिला स्वर्गात पाठवतांना. तसं पाहिल्यास सुनयना व सुलोचना दोन बहिणी होत्या व दोघींवरही वासुकीचं प्रेम होतं. सुलोचनेला आठवत होती ती सुनयना. 'दोघीही आम्ही हुशार. आम्ही पाहायलाही सुंदर. आमचे डोळेही अतिशय सुंदर. त्यामुळंच आमचं नाव आमच्या डोळ्यावरुन ठेवण्यात आलं. मी सुलोचना व ती सुनयना. आमचा सांभाळ आमच्या वडिलांनी लहानपणापासून अतिशय योग्य प्रकारे केला. आम्हाला थोडातरी त्रास होवू दिला नाही. परंतु माझे वडील तरी काय करणार. केव्हापर्यंत ठेवणार आम्हाला. तसं पाहिल्यास आम्ही मुलीच होतो ना. एक स्री जात. आम्हाला आजही आमचे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. मग आम्ही निर्णय कसा घेणार? ज्या वडिलांनी आम्हाला लाडानं वाढवलं, त्या पित्याची आज्ञा कशी मोडणार. शिवाय आमच्या वडिलांनी आम्हाला सेवा शिकवली होती. त्यांनी जीवनभर जी विष्णूलोक व शिवलोकांची सेवा केली ती. आमच्या वडिलांनी शिकवलं की कितीही त्रास झाला तरी चालेल. परंतु सेवेत अंतर देवू नये. सेवा ही सेवाच असते. म्हणूनच जेव्हा समुंद्रमंथन झालं. तेव्हाही माझ्याच वडिलांच्या देहाची दोरी बनवली समुद्राला दह्यासारखं घुसळण्यासाठी. ज्यातून समुद्र घुसळला जावून त्याचं मंथन झालं व त्यातून चांगल्या चांगल्या गोष्टी बाहेर पडल्या. अनमोल रत्न, जडजवाहीर बाहेर पडले. एवढंच नाही तर विषारी वस्तूही बाहेर पडल्या. जे विष शिवानं एका क्षणात गिळून टाकलं. अन् त्या राक्षसांना सुरा मिळाली. जी सुरा राक्षस जातींना मिळाली. अन् ते अमृत फक्त देवांना. होय, देवांनाच मिळालं. त्यात देव आणि राक्षसाची रांग व त्या रांगेतील देवाच्या रांगेत त्या अमृताचं वाटप करण्यात आलं. अन् राक्षसांच्या रांगेत नंतर वाटप करण्याचं ठरलं. परंतु आपल्याला त्याचं काय करायचंय. आपण आपलं पाहावं. आपल्या तर जीवनाचीच राखरांगोळी झाली.' सुलोचना विचार करीत होती. तसा पश्चातापही होत होता तिला. ती स्वर्गातून आपल्या स्वखुशीनं पाताळभुमीत आल्याचं दुःख होतं तिला. परंतु तिनं ठरवलं होतं. आपण विवाह केला ना पाताळभुमीत. मग तो विवाह निभवायचाच. आपल्या विवाहाला न्याय द्यायचाच. सुलोचना विचार करु लागली. 'मला आठवतं ते नारदमुनींचं येणं. कशाला तरी आले असावे ते. निव्वळ मला स्वर्गभुमीत नेण्यासाठी. माझी आवडनिवड न जोपासता त्या स्वर्गलोकांतील लोकांचं मनोरंजन करण्यासाठी नेलं मला. किती पाय दुखायचे माझे, नृत्य करतांना. घरी येताच अतिशय थकलेली असायची मी. म्हणतात की अप्सरा. अप्सरा नावानं सन्मान होतो. कसला सन्मान? परंतु काय करणार. आमचा स्रियांचा जन्मच त्यासाठी. पुरुष कितीही वाईट वागत असला तरी ते आपलं कार्यच. त्यावर रुसवा दाखवू नये असा. माझ्था बहिणीचंही तेच झालं. माझ्या बहिणीलाही विवाह करायचाच नव्हता तेवढ्या लवकर. परंतु काय करणार. राजा जनकाच्या इच्छेसमोर तिचं काहीच चाललं नाही. अन् त्या खेळत्याच वयात झाला तिचा विवाह. माझ्या वडिलांची इच्छा नसतांना. लोकं म्हणत होते की चांगला राजमहाल आहे. राजा आहे. परंतु तो राजपाट केवळ विवाह करण्यापुरताच. विवाहानंतर मुलं न झाल्यानं राजपद गेलं माझ्या बहिणीच्या घरवाल्याचं. त्याचा लहान भाऊ कृशध्वज राजा बनला. राजा सिद्धध्वज नाही. शेवटी नाईलाजास्तव सीतेचा सांभाळ करावा लागला. जी शेतात मिळाली होती अन् ती उर्मिला. तिही त्यांनी दत्तक घेतलेली मुलगीच. परंतु माझी बहिण सुखी आहे. ती तर मानवगणात आहे. जनक मनुष्ययवनीतील आहे. अन् मी. मी एक स्वर्गातील अप्सरा राहून मला राक्षकुलात यावं लागलं. तसं चांगलंही झालंच. कारण मला स्वर्गभुमी अजिबात आवडत नव्हती. तिथं माझा जीव घुटमळत होता तिथं. श्वास दाबला जात होता. बोलण्याची उजागिरी नव्हती. अन् बोलायला गेल्यास हिंमत होत नव्हती. तसं इथं नाही. इथं बोलता येते. चालता येते. स्रियांनाही बोलण्याची उजागिरी आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात सन्मान नाही.' मान सन्मानाची गोष्ट सुलोचनेला चांगली कळत होती. त्यातच आता तिला स्वर्ग व पाताळही चांगलं कळू लागलं होतं. 'स्वर्ग आणि पाताळ. असे मुख्य घटक. म्हणतात की स्वर्गात चांगले लोकं राहतात. परंतु खरंच स्वर्गात चांगले लोकं राहतात का? तो चंद्र की जो डागाळला आहे. अन् तो इंद्र. त्यानंही लांछनास्पदच कृत्य केलेलं आहे. म्हणतात की राक्षस जाती ही बदमाश आहे. परंतु देवभुमी बदमाश नाही का? देव जातीतील लोकांची ही कृत्य दिसत नाहीत. समजा एखाद्यावेळेस एखाद्यानं देवलोकांत वाईट कृती केलीच की बस. त्याला लगेच शाप. अन् ती शापवाणीही सत्य होतेय. आता माझंच पाहा. मी असा कोणता अपराध केला की माझा प्राणप्रिय पती हिरावला या लोकांनी. माझ्या पतीनं केलेला पराक्रम या लोकांना भावला नाही. माझा तर विवाह इंद्राचा मुलगा जयंताशी ठरवला होता. परंतु मला तो आवडत नव्हताच. तो इंद्राचा मुलगा होता. जो शूर नव्हताच माझ्या पतीसारखा. मी नकार दिला व इंद्रजीतशी विवाह केला. तशी इंद्रजीतशी विवाह करण्याची माझी इच्छा होती. जी मी पुर्ण केली. परंतु लगेच मला शाप मिळाला. म्हटलं, तुझ्या पतीचा मृत्यू शेषाच्याच हातानं करु. अन् देवलोकांची इच्छा पुर्ण करण्यासाठी नागलोकांतून शेषनाग लक्ष्मण रुपानं आले जन्माला. ज्यांच्यात सेवावृत्तीच कुटकूट भरलेली आहे. जे विचारच करीत नाहीत की काय खरं व काय खोटं. जे विचारच करीत नाहीत की कोणाचं चुकतं. ते फक्त आदेश पाळतात. त्यांना फक्त देवलोकांचीच सेवा करणं आवडते. राक्षसवर्गाला ते शिव्या हासडतात. म्हणतात की राक्षस वर्ग हा चांगला नाही. तो वाईट आहे. माहीत नाही त्यांनी कोणतं वाईट केलं नागलोकांचं. हं, ते देवलोकांवर हमले नक्कीच करतात. कारण ते सुखात राहतात. पक्षपात करतात राक्षसांसोबत. राक्षसांना चांगली वागणूक देत नाहीत ना. प्रसंगी देवलोकांच्या सेवेसाठी आमचं नागलोक आपल्या मुलांनाही मारायला मागेपुढे पाहात नाहीत. आता माझंक पाहा. माझामं सिंदूर उजाडलंय यांनी. विचार केला नाही की सुलोचना आपलीच मुलगी आहे. तिचं कुंकू कसं मिटवावं. माझ्या पतीचा वध केला. ज्यात माझ्या पतीनं तपश्चर्या करुन मृत्यूवर विजयही प्राप्त केला होता. मागणं मागितलं होतं की जो बारा वर्ष झोपणार नाही. जो बारा वर्ष जेवणार नाही. जो बारा वर्ष ब्रम्हचर्याचं पालन करेल. तोच मला मारेल. जे सहज शक्य नव्हतं. परंतु जसा लक्ष्मण कर्दनकाळच ठरला माझ्या पतीचा. लक्ष्मण शेषनागच. आमच्याच बिरादरीतील. खासकरुन ती शापवाणीच सत्य करुन दाखवली त्यानं. तू जयंताशी विवाह केला नाही ना. तू इंद्रजीतशी विवाह केला ना. मग पाहातच राहा. तुझ्या पतीला हा शेषनागच यमसदनी पोहोचवेल. अन् ते खरंच घडलं. लक्ष्मण झोपलाच नाही बारा वर्ष. निद्रादेवी जेव्हा त्याचेजवळ गेली. तेव्हा त्यानं सांगीतलं. मी सेवेत आहे. मला निद्रा जर आली तर रामाची सेवा कोण करणार? त्याला व माई सीतेला कोणीही क्षति पोहोचविणार. मग निद्रादेवीनं विचारलं की तुझ्या वाट्याची झोप कोण घेणार? त्यावर लक्ष्मण म्हणाले की तू जा त्या उर्मिलेकडे. तिला एवढंच सांग की लक्ष्मणानं पाठवलं. ती तुझं त्यावर स्वागत करेल. तू बारा वर्षपर्यंत तिथंच राहा. मग गेली निद्रादेवी. तिनं उर्मिलेला तसंच म्हटलं आणि उर्मिला त्याची वाट्याची झोप घ्यायला तयार झाली. अन राहिला ब्रम्हचर्येचा प्रश्न. तोही सोडवला लक्ष्मणानं. त्यानं आपली भार्याच सोबत आणली नाही. अन् कोणत्याच परस्रीकडे लक्षही टाकलं नाही. सुरपंखेचा तर त्यानं नाक कापून काढला. जी त्याचेकडे जीव ओवाळून टाकायला गेली होती. तसाच तिसरा भाग, उपाशी राहाणं तर जे काही कंदमुळं जंगलात मिळायचे. ते तुटपुंजे असायचे. ते राम व सीतेला पुरेल की नाही. असा प्रश्न पडायचा लक्ष्मणाला. कारण अन्नाची सोय तोच करायचा. त्यातच तो जरी अन्नाची सोय करीत असला तरी ते मिळालेलं जंगलातील अन्न आपल्या भावासाठी व आपल्या भावजयसाठी ठेवायचा. खायचा नाही. इथंही नागलोकांची सेवा दिसली. शेषनाग माझ्याच बिरादरीतील. ज्यानं रामाची सेवा केली. अन् त्या देवलोकांनी दिलेला शाप सत्य करण्यासाठी प्रयत्न केला. माझे पती मरण पावले अन् त्या देवलोकांतील लोकांनी नागलोकांच्या मदतीनं मारलं माझ्या पतीला. विचारच नाही की सुलोचना आपली मुलगी. आपल्या बिरादरीतील.' सुलोचनेला आपल्याच बिरादरीतील लोकांबद्दल विचार येत होता. तशी भयंकर चीडही येत होती. वाटत होतं की यांचं काय करावं व काय नको. परंतु ती मौन बाळगून होती. तसा एक विचार आला. आपण आता जगूच नये. आपल्याच पतीशरणावर सती जावं. मरण पत्करावं असं कुढत जगण्यापेक्षा. तेच बरं राहिल. आयुष्याला दुःखातून बंधनमुक्त करण्यासाठी. जे दुःख माझ्याच बिरादरीतील लोकांनी मला दिलंय.