Bhaktch jevha dev hoto... in Marathi Motivational Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | भक्तच जेंव्हा देव होतो...!

Featured Books
Categories
Share

भक्तच जेंव्हा देव होतो...!

              " भक्तच जेंव्हा देव होतो....!"

        स्वतःच अस्तित्व विसरून जेव्हा माणूस भगवंताच्या अनुसंधानात रममाण होतो, तेव्हा तो एक साधक न राहाता, ईश्वरापासून अलग राहून त्याच्या नामस्मरणात दंग होत नाही, तर तो त्याचाच होऊन जातो. भक्त ईश्वरामध्ये आपोआप विलीन होतो. त्याला वेगळे अस्तित्वच राहात नाही. संत तुकाराम महाराजही म्हणतात कीं " देव पाहवयाशी गेलो | तेथे देव होऊनिया ठेलो |"  साधक (भक्त) जगत असलेल्या देहाला समष्टीचे संदर्भ शिल्लक राहातच नाहीत. तो आपोआप सर्वांचा होऊन जातो. चंद्राची शीतल किरणं जशी सर्वत्र सारखी पडतात तसा तो सर्वांसाठीच शीतल होऊन जातो. सर्वांना हवाहवासा वाटू लागतो. अशा माणसाच्या अंतःकरणातून एक प्रेमाची सरस्वती वाहतच राहाते. त्याचा प्रत्येक शब्द मंत्रसामर्थ्य घेऊन येतो. त्याने जरी केवळ कृपामयी नजर फिरवली तरी दुःखीकष्टी लोकांचे दुःखसंदर्भ नाहीसे होतात. ईश्वराच्या चरणांशी स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे अर्पण करणारा हा भक्त परमेश्वराचा अत्यंत लाडका होऊन जातो. सर्वोत्तम परमेश्वराचा लाडका सुपुत्र झालेला हा ज्ञानी भक्त आणि त्याची कहाणी अलौकिक  असते. त्यात भक्ताला भगवंताची खूण पटलेली असते. त्याच्या अस्तित्वात तो न्हातअसतो. परमेश्वराने त्याचाच हात हातात घेतलेला असतो. नदी समुद्राला मिळाली की तिला जसे स्वतंत्र अस्तित्व राहात नाही, तसं या ज्ञानोत्तर भक्तीत डुंबून गेलेल्या भक्तांना देवाव्यतिरिक्त स्वतंत्र अस्तित्वच राहात नाही. अशी माणसं समाजात कशी दिसतात, कशी वागतात युगाचे कुतूहल समष्टीला असते. अशा माणसांचे वर्णन  समर्थहीं एका श्लोकातून करतात. समर्थ म्हणतात की," दीनदुबळ्यांना एका शक्तीचा सतत आधार असतो. त्यांच्या हाकेला परमेश्वराव्यतिरिक्त कुणीच ओ देत नसतो आणि त्या परमेश्वराच अस्तित्व त्या दीनदुबळ्यांना अलौकिक भक्ताच्या रूपातून घडते. कारण दीनदुबळ्यांविषयी अशा लोकोत्तर पुरुषांच्या मनात करुणेचा अपार सागर असतो." त्यांना त्या पीडित जनतेची सेवा करायला अधिक आवडते. कारण ती सेवा परमेश्वर त्यांच्या रूपाने करवून घेतो. अशी माणसं मनाने खूप चन्द्रशीतल असतात. मनाने मऊशार कापसासारखी असतात. त्यांची भाषा अतिशय गोड असते. त्या भाषेतून करुणा वाहात असते. तिथे माणसांविषयी प्रेम सारखे उमटत राहाते. ती अतिशय स्नेहशील असतात. त्यांच्या स्वभावात अनुकंपा असते. जे गरीब लोक असतात त्यांचा ते सांभाळ करतात. त्यांना क्रोध, संताप माहीत नसतो. त्यांचा क्रोधाशी इतकाही संबंध नसतो की क्रोध म्हणजे काय ? संताप म्हणजे काय....? केवळ करुणेची बरसात करणारी ही माणसं. अशा भक्तांचा परमेश्वर दास होऊन जातो.                प रमेश्वराशी अनुसंधान साधणारा भक्त हा विवेकी असतो. त्याची वाणी संपन्न असते. त्याच्या सत्यवचनाला चंदनाचा सुगंध असतो.त्याचं जगणं म्हणजे सर्वांसाठी सुखाचा झुळझुळणारा वारा असतो. भक्त आणि त्याची निष्काम भक्ती निष्कपट असते. भक्त हा ज्ञानी असतो. ज्ञानोत्तर भक्तीच्या वाटेवरून तो चालत राहातो. भक्ताच्या मनात कुठल्याही प्रकारची फसवणूक नसते. सर्वांसंबंधी त्याच्या मनात अफाट प्रेम असते. त्याची निर्व्याज प्रीती सर्वांनाच खूप हवीहवीशी वाटते. सर्व गोष्टी त्याच्याजवळअसतात.महत्त्वाचं म्हणजे विवेकाची कास धरून तो आपली मार्गक्रमणा करीत असतो. नम्रता हा त्याचा प्रधान गुण. आर्जवी गोड स्वभाव हे त्याचे न संपणारे धन, अशा भक्तांविषयी समर्थ सतत बोलत आहेत. अफाट अशा भक्तीच्या बाजारपेठेत वावरणारे हे संतपुरुष ही भक्तीची पेठ होती. त्यातलेच समर्थ हे एक होते आणि समर्थ हे बोलतांना आत्मानुभवी बोलत आहेत. भक्त हा सर्वांचा आवडता असतो; परंतु तो देवाचा अत्यंत लाडका असतो. अशा भक्तांच्या शोधात वास्तविक देवच असतो. ह्या भक्तीच्या विविध छटा समर्थांनी या मनाच्या श्लोकातून चितारल्या आहेत. समर्थ प्रस्तुत श्लोकातून आपल्या मनाला सांगत आहेत की, बा माझ्या मना ! जो सर्वांशी सरळ वागतो, सर्वांना प्रिय होऊन जगतो, सर्व लोकांना अगदी हवाहवासा वाटतो, तो भक्त निराळाच असतो. तो सतत गोड तर बोलतोच परंतु सत्य वचंनच तो बोलतो. तो सत्यविना आणखी काहीच  बोलत नाही. त्याच्या बोलण्यातला विवेक, त्याच्या चालण्यातला विवेक, त्याच्या जगण्यातला विवेक हा एक भक्तीक्षेत्रातला चमत्कार असतो. त्याला असत्य म्हणजे काय हे माहित नसते.किंबहुना सत्या – असत्याच्या पलीकडचे ईश्वरी सत्तेचे वैभव तो भोगत असतो. आपल्या भक्तीविषयीसुद्धा तो काही बोलत नाही. तो फक्त ईश्वरी अनुभवाविषयीच स्वतःशी बोलल्यासारखा बोलत राहातो. असा हा भक्त त्या सर्वोत्तम श्रीरामाचा अत्यंत आवडता आणि लाडका होऊन जातो. असा हा दासानुदास त्या जगातला धन्य पुरुष समजावा. असे हे भक्त स्वतः हा भवसागर तर तरून जातातच; परंतु अन्य अज्ञ जनांनासुद्धा तारून नेतात. त्यामुळे भोवतीचे सर्व लोक त्याच्या सहवासाला आसुसलेले राहातात. त्या भक्ताशी दोन शब्द बोलायला मिळावे ही त्यांची आस राहाते. कारण इतर जणांना जनांना अशा भक्तांशी बोलताना प्रत्यक्ष ईश्वराशी बोलल्याचा आनंद मिळत राहातो. ईश्वराचे अस्तित्व ते अशा परमभक्तांत शोधत राहातात आणि त्या इतर लोकांना ईश्वराचे दर्शन या भक्तांमध्येच होते.       

           🌹🌹🌹           🌹🌹🌹       🌹🌹🌹                                       मच्छिन्द्र माळी, छत्रपती संभाजीनगर.