संत मुक्ताबाईचे गूढ अभंग.
आज श्रीसंत मुक्ताबाई यांची पुण्यतिथी ! श्रीसंत मुक्ताबाई यांचे चरणी शिरसाष्टांग दंडवत ! मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सुर्यासी || थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला || विंचु पाताळासी जाय शेष माथा वंदी पाय || माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हासली वरील अभंग हा मुक्ताई यांना साधना काळात आलेला अनुभव आहे. त्यांनी प्रत्यक्ष घेतलेला अनुभव आपल्या अभंगातून सांगितलेला आहे. या अभंगाचा शब्दार्थ न घेता गूढार्थ विचारात घेतला तर यातून वेगळंच प्रबोधन होत आहे. अध्यात्मिक साधकांसाठी मार्गदर्शक असा हा अतिशय उच्च प्रतीचा अभंग आहे. सदगुरु कृपेने जर साधकाला योग्य मार्ग मिळाला तर त्याला साधना करताना असे अनेक अनुभव येतात, त्यावेळेस त्या साधकाला आनंदाने नक्की हसायला येत . वरील अभंगात अध्यात्मातील क्रिया आणि त्यातून येणारा अनुभव वर्णन केला आहे तेही गूढ शब्द वापरून या शब्दांचा कोणताही ओढून ताणून अर्थ न काढता तत्वज्ञानी सद्गुरूंच्या शिकवणी प्रमाणे व त्यातुन घेतलेला स्वानुभव म्हणून काही क्रिया येथे संतांची माफी मागून उघड करणार आहे. पण कुणीही या क्रिया स्वतः अनुभव नसताना करू नये, कुणीतरी जाणकार ( सदगुरु ) शोधावा त्यांच्या मार्गदर्शना खाली करावयाच्या आहेत कुणीही घाई करू नये.* *जिज्ञासूंनी मार्गदर्शन मागितलं तर जरूर माझे सदगुरु करतील. तर आपण मूळ अभंगाकडे वळून गूढार्थ समजण्याचे प्रयत्न करूया. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सुर्यासी || मुंगी हा एक छोटासा जीव आहे तिने कितीही प्रयत्न केले तरी सूर्याला गिळणे किंवा त्याच्या जवळपास जाणे ही शक्य नाही तरीही मुक्ताई अस का म्हणाल्या? याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे . मुक्ताई कारण नसताना वाटेल ते लिहिणाऱ्या संत नव्हत्या . त्या गोरक्षनाथ यांच्या शिष्या होत्या महान योगी होत्या . संत नामदेवांना गोरोबाकाका यांच्या मार्फत कच्च मडकं ठरवू शकत होत्या तसेच चौदाशे वर्ष जगणाऱ्या चांगदेवांना उपदेश करून त्यांच्या गुरू झाल्या अशा महान संत उगाच काहीतरी कसे लिहितील? म्हणून यातील मेख आपल्याला समजून घ्यावी लागेल तरच अभंगाचा अर्थ समजू शकतो. तर या ओळीत त्यांनी एक क्रिया सांगितली आहे ती आपण करून पाहीली तर नक्की त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजेल. मुक्ताईने या ओळीत त्राटक तंत्र सांगितले आहे , आकाश निरभ्र असेल व स्वच्छ सूर्य प्रकाश असेल अशावेळेस आकाशात त्राटक करावं तेथे आपणास एक मुंगी इतका छोटासा काळसर रंगाचा ठिपका दिसेल त्याच्यावर नजर स्थिर करावी काही वेळा नंतर आपल्या डोळ्यातुन कोटी सूर्या इतका प्रकाश निर्माण होईल या वेळेस भर दुपारी आपण सूर्या कडे बघितलं तर आपल्यातील प्रकाशामुळे सूर्य दिसेनासा होतो , झाडं, डोंगर, घरं इमारतीच नाही तर संपूर्ण सृष्टी यापैकी काहीच दिसत नाही तर सर्वत्र प्रकाश आणि प्रकाशच दिसतो म्हणून मुक्ताईने असे उद्गार काढले आहेत की, मुंगी उडाली आकाशी ! तिने गिळिले सुर्यासी ! !* पण हे एका दिवसात अनुभवाला येणे शक्य नाही तर त्यासाठी त्राटक क्रिया करण्याचं सातत्य कित्येक दिवस, महिने किंबहुना वर्ष सुद्धा असलं पाहिजे. थोर नवलाव झाला ! वांझे पुत्र प्रसवला || या ओळीत त्या म्हणतात की असे नवल घडले की वांझ व्यक्तीला म्हणा अगर स्त्रीला म्हणा पुत्र झाला हे शक्य आहेका तर अजिबातच नाही मग त्या असे का म्हणाल्या असतील असा अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर त्या म्हणतात ते अगदी खरं आहे. येथे वांझोटी कोण याचा विचार बारकाईने केला तर असं लक्षात येतकी आपली नजर ज्यावेळेस वांझ होते तेव्हाच आत्मप्रकाश प्रकटतो. नजर वांझ कशी करावी तर आपली बाह्य नजर घालवून तिला आतल्या बाजूस वळवली तर ती वांझ झाली असे म्हणावे आणि ती जेव्हा वांझ होते तेव्हाच तीला प्रकाशरूपी पुत्र होतो ( आपली दृष्टी घालवून तिला आत वळवणे ही किमया फक्त सद्गुरूंच करू शकतात म्हणून त्यांना विनंती करून ही क्रिया साध्य करावी ) Abroad थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला || असं अभांगात लिहितात. विंचु पाताळासी जाय ! शेष माथा वंदी पाय || विंचू म्हणजे आपला अहंकार हा पाताळात गेला म्हणजे त्यावर आपण विजय मिळवला तर आपलं मन आणि चित्त शुद्ध होत त्यानंतरच शेष शायी भगवंत जो आपल्या डोक्याच्या भागातील ब्रह्मरंध्रा जवळ रहातो त्याचे दर्शन होते तेथेच शेष त्या आत्मरूपी भगवंताला वंदन करत आहे. म्हणून मुक्ताई म्हणतात अहंकार रुपी विंचवावर ताबा मिळवावा लागतो मगच प्रत्यक्ष भगवंत आपल्याच देहात भेटेल. माशी व्याली घार झाली ! देखोनी मुक्ताई हासली || या ओळीत सुद्धा मुक्ताईने क्रिया सांगितली आहे ती आपण थोडक्यात पाहू. येथेही आकाशात त्राटक करायला सांगितलं आहे. आपण जेव्हा त्राटक करायला सुरुवात करतो तेव्हा निरभ्र आकाशात आपणास एक काळ्या रंगाचा छोटासा बिंदू दिसतो जस जसं त्राटकात प्रगती होत जाईल तसं तसं त्या छोट्या बिंदूला पंखा सारखे आकार असलेले दिसतील ते इतके मोठे होत जातात की पूर्ण आकाश नाहीतर सृष्टी व्यापून जाते .( याचा जिज्ञासूंनी गुरूंच्या मार्गदर्शना खाली स्वानुभव घ्यावा म्हणजे मुक्ताईच म्हणणं आपोआप पटेल ) म्हणून मुक्ताईना अशी नवलाची गोष्ट पाहून आनंदाने हसू येत आहे. एकच सूचना द्यावीशी वाटत आहे की असे कुटाचे (गूढार्थाचे )अभंग आहेत त्यांचा फक्त शब्दार्थ घेऊन उपयोग नाही तर त्यातील गूढार्थ समजून घेण्याचे प्रयत्न करावेत. 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 संकलन : मच्छिन्द्र माळी, छ.संभाजीनगर.-----------------------------------------------------------