कथा क्र. १२: नाम्याची मिसळ
गावात नाम्याचं नाव घेतलं की लोकांच्या तोंडात हसू फुटायचंच. "फजिती" हा शब्दच त्याच्या नावासोबत जोडला गेला होता. जसं कुणी गोडबोले म्हटलं की "गोड बोलतो", तसं कुणी "नाम्या" म्हटलं की लगेच डोळ्यांसमोर फजितीचा सिनेमा सुरू व्हायचा. कुठं गेला तरी त्याची काहीतरी गडबड व्हायचीच. पार हे असं होतं की सूर्य पश्चिमेला उगवला तरी चालेल, पण नाम्या कुठंही गेला आणि तिथं काही बिनसलं नाही. असं कधीच होणार नाही.
त्यादिवशी सकाळी नाम्याने उठून डोळे चोळले, अंग टाकलं, आणि अचानक विचार केला."आज काहीतरी भारी खायचंय... रोजचं रोज पोहे-उपमा खाऊन जिवाला कंटाळा आलाय. चला, आज मस्त झणझणीत मिसळ खायचीच!"
हे जणू त्याच्या मेंदूला वीजेचं झटकेचं कनेक्शन मिळालं. उठता उठता तो ओरडला,"आईऽऽऽ! आज नाश्त्याला काही बनवू नकोस. मी थेट तात्याच्या मिसळवाल्याकडे जाणार आहे!"
गावाच्या चौकात "तात्याची झणझणीत मिसळ" हे ठिकाण म्हणजे जणू भुकेल्यांसाठी तीर्थक्षेत्र होतं. सकाळपासून तिथं प्रचंड गर्दी असे. कुणी दूध-भाकरी खायला येई, कुणी फक्त रस्याची झणझणीत वाफ श्वासात घ्यायला येई, तर काहीजण हॉटेलसमोरचं बाकडं पकडून बसत आणि ताट्याच्या मिसळीचा वास घेऊन डोकं हलवत म्हणत – "वा रे वा, जीवन सफल झालं!"
नाम्या तिथं पोचला. समोर जे दृश्य दिसलं ते पाहून त्याच्या डोळ्यांची पापणी थक्क होऊन थांबली."अरे देवा! एवढी प्रचंड रांग?!"
संपूर्ण गल्लीभर माणसंच माणसं. कुणी कपाळावर रुमाल ठेवून उभं, कुणी खांद्यावर पिशवी टाकून, कुणी मोबाईलवर गेम खेळत, तर कुणी आपली भूक शमवण्यासाठी शेजाऱ्याच्या ताटात डोकावून पाहत होतं.
नाम्या थोडा वेळ ह्या गर्दीकडे बघत होता. त्याचं पोट मात्र “डमडम” आवाज करत भुकेचा मोर्चा काढत होतं.
तो म्हणाला,"वा! एवढी लोकं रांगेत उभी म्हणजे मिसळ भारी असणारच. पण... हंmm... लोकं इतके मूर्ख का असतात? एवढा वेळ रांगेत उभं राहायचं म्हणजे काय? आपला नाम्या आहे ना, स्मार्ट! मी थेट आत जातो आणि ऑर्डर देतो."
लोकं कष्ट करून रांगेत उभी, आणि आपला नाम्या छाती फुगवून, तोंडावर अर्धा हसू आणत, थेट काऊंटरवर पोचला.
तो म्हणाला,"तात्या! एक स्पेशल मस्त झणझणीत मिसळ टाक! वरून रस्सा पण डबल द्यायचा हं... आपल्याला कमी चालणार नाही."
तात्याने डोक्यापासून पायापर्यंत नाम्याला एक कटाक्ष टाकला. टेबलाखालून डोकं बाहेर काढून म्हणाला,"रे नाम्या... आधी टोकन घ्यायचं असतं. इकडे सरळ येऊन 'स्पेशल' मागायचं नसतं. जा, रांगेत उभा रहा."
इतकं ऐकून मागून उभ्या असलेल्या लोकांचे चेहरे बघण्यासारखे झाले.एक जण मोठ्याने म्हणाला,"हा नाम्या कुठंही गेला की आपल्याला VIP समजतो!"दुसरा जोडला ,"अरे, याला तर नुसता वास दिला तरी पोट भरलं म्हणून सांगेल!"
संपूर्ण रांगेत खसखस पिकली. काही तर उघडं उघडं पोट धरून हसायला लागले. नाम्याच्या कानात शिशिर वाजल्यासारखं झालं. चेहरा लाल झाला. तो थोडा लाजला, पण काय करणार? परत रांगेत शेवटी गेला.
शेवटी देव पावला. नाम्याचा नंबर आला. काउंटरवरून ताट सरकवलं गेलं आणि नाम्याच्या हातात आलं.
ताटात भरगच्च मिसळ, त्यावर सोन्यासारखा चमकणारा रस्सा, वरून कुरकुरीत फरसाण, बारीक चिरलेला कांदा, एक लिंबाचा फोड, आणि बाजूला दोन गरमागरम, धुरकट पाव.
ताट हातात घेताच नाम्याच्या डोळ्यांत पाणी आलं... पण ते भावुकतेमुळे नाही, तर रस्याच्या झणझणीत वाफेमुळे! नाक, डोळे, कान सगळीकडं मिरच्यांचा स्फोट झाल्यासारखं वाटलं.
तो स्वतःशीच पुटपुटला –"वा रे वा! काय सुगंध आहे! हिच खरी आयुष्याची मज्जा!"
त्याने पहिला घास घेतला... आणि बस्स!तो घास तोंडात जाताच त्याच्या आतड्यांनी जणू ताशा वाजवायला सुरुवात केली.
"आsssssssssssssss!" नाम्या पूर्ण हॉटेलभर ओरडला.
तो आवाज इतका मोठा होता की बाहेरच्या चौकात उभं असलेलं बैलजोळसुद्धा घाबरून उडालं. एका बाईच्या हातातलं पाणी उडालं. दोन छोटे मुलं ओरडली – "भूत आलं का काय?!"
नाम्या तोंडावर हात ठेवून फडफडत उभा राहिला. तोंड, घसा, नाक, कान... सगळीकडे आग लागल्यासारखं झालं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, आणि तो रडतोय की हसतोय, याचा काहीच पत्ता लागेना.
आजूबाजूची लोकं हसून लोळू लागली."काय झालं रे नाम्या?" कुणीतरी विचारलं.
नाम्या थोडं शहाणं वागल्यासारखा म्हणाला,"काय झालं नाही... मी मुद्दाम असंच ओरडलो. म्हणजे लोकांना वाटेल की मिसळ झणझणीत आहे. ब्रँडिंग करतोय, ब्रँडिंग!"
हे ऐकून लोकं आणखी हसायला लागली. काही तर ताटं बाजूला ठेवून पोट धरून लोळले.
नाम्या मात्र लालभडक झालेला. डोळे असे दिसत होते जणू दोन टोमॅटो चिकटवलेत.
तो घाईघाईने म्हणाला –"तात्या, पाणी दे! पटकन पाणी दे! नाहीतर आगीवर भाजलो रे!"
तात्या हसत म्हणाला –"नाम्या, इथे पाण्याचं ग्लास मिळत नाही. आमचं हॉटेल झणझणीत आहे, पाण्याने कधी थंड होणार नाही. ताक मिळतं. हवं तर माग."
नाम्याने दोन क्षण नाक मुरडली. पण पोटाच्या आगीने त्याला जास्त विचार करू दिला नाही. तो म्हणाला – "ठीक आहे, दे ताक."
तात्याने ताकाचा थंडगार ग्लास नाम्याच्या हाती दिला. नाम्याने तो एका घोटात तोंडात ओतला.
पण ताक एवढं गार होतं की तोंडातून थेट घशात न जाता... नाकातून फसफसत बाहेर आलं!
लोकांच्या हसण्याचा आवाज इतका जोरात झाला की हॉटेलच्या भिंती हलल्यासारख्या वाटल्या.
मागच्या टेबलावर बसलेला एकजण पोट धरून म्हणाला ,"अरे, नाम्याचं 'फाउंटन शो' सुरू झालंय!"
आता तर वातावरण फुटलं. कुणी टाळ्या वाजवू लागलं, कुणी पाय आपटून हसायला लागलं, तर कुणी व्हिडिओ काढायला मोबाईल काढला.
नाम्याचा चेहरा पूर्ण भिजला होता, नाकातून फेसाळ ताक खाली ओघळत होतं, आणि तो स्वतःच विचार करत होता – “देवा, माझं हे जन्मभर लक्षात ठेवतील.”
नाम्याने कसाबसा घाम गाळत मिसळ संपवली आणि काऊंटरकडे गेला.तात्या हिशोब करत म्हणाला ,"वीस रुपये झाले रे नाम्या."
नाम्या खिशात हात घालतो तर… अरे देवा! खिसा अगदी कोरडाच!तो गोंधळला, चेहरा लाल झाला. मग टेबलावर ठेवलेला टॉवेल उचलून म्हणाला –"तात्या, हे बघ… हा टॉवेल अगदी ब्रँडेड आहे. देतो तुला. याच्या बदल्यात मिसळ चालेल ना?"
तात्या थिजला. लोकं मोठमोठ्याने हसू लागले –"अरे! हा नाम्या तर मिसळ खाऊन बार्टर सिस्टीम सुरू करतोय!"तात्या रागाने – "अरे बावळटा! पैसे नाहीत तर आधी सांगायला हवे ना! आता चल, भांडी घासायला!"
नाम्या नाईलाजाने हॉटेलच्या मागे गेला. ढिगभर ताटं, वाट्या, पेल्या त्याच्या समोर रचलेल्या होत्या.तो पुटपुटला,"हे काम माझ्यासारख्या हुशार माणसाचं नाही हो… पण फजिती झाली की काय करणार!"
त्याने भांडी घासायला सुरुवात केली. पण त्याच्या स्टाईलमध्ये सुद्धा नाटक असणारच.साबण इतका ओतला की फेस हवेत फुलकळ्यांसारखा उडायला लागला.फेस त्याच्या डोक्यावर, मिशीवर, अगदी कानामागे जाऊन बसला.
गावातली मुलं किलबिलाट करत ओरडली –"बघा बघा, नाम्या फेसपाव झालाय!"कुणी तर म्हणालं – "हॉटेलमालकाने मिसळ विकायचं की साबण जाहिरात करायची?"
कसेबसे फेसाचा डोंगर साफ करून नाम्या बाहेर आला. कपडे ओले झालेले, चेहरा साबणात उजळलेला!तोच गड्या समोर आला आणि थक्क होऊन विचारतो –"अरे नाम्या, तू इतका फेसाळलेला का दिसतोस? आणि पोट धरून का चाललायस?"
नाम्या श्वास घेत म्हणाला –"गड्या, आयुष्यात एक गोष्ट पक्की लक्षात ठेव…तिखट मिसळ आणि आपली फजिती… दोन्ही टाळता येत नाहीत रे बाबा!"
हे ऐकून गड्यासकट सगळा गाव डबल हसत सुटला.
दुसऱ्या दिवशीही गावात लोकं नाम्याला बघून विचारत होती –"नाम्या रे, आज पुन्हा मिसळ खायला जाणार का?"
नाम्या डोकं हलवत, अजूनही पोटावर हात ठेवून उत्तर द्यायचा –"नको रे बाबा… आता फक्त साधा पोहे-उपमा पुरे! मिसळ म्हणजे सरळ फजिती-एक्सप्रेस आहे!"
आणि गावभर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडाले.
समाप्त
- अक्षय वरक