तुला माहित आहे मी खरे म्हणजे मी कधी हॉटेलमध्ये जात नाही पण तुझ्या वाढदिवसाला हॉटेलमध्ये नक्की येणार बर का....!!”तिच्याकडे बघून डोळे मिचकावत बोलणाऱ्या ऊमाकडे बघताच ..नयनाने खूष होऊन आईचा गालगुच्चा घेतला. “आणि नयन मोह्नमामाला पण फोन कर बर का आधीच ..तो तर येतोच दर वर्षी तुझ्या वाढदिवसाला ,त्याला आमंत्रण देऊन ठेव .”..आईचे बोलणे ऐकताच नयन हसली ..“आमचे फोन तर आधीच झालेत आई ..येणार आहे तो नेहेमीप्रमाणेच मला गिफ्ट काय हवे हे सुद्धा त्याने विचारून ठेवलेय मला ..”असे म्हणून खुष होऊन कपडे बदलायला आत गेली .गेली दहा वर्षे मोहन नियमित नयनाच्या वाढदिवसाला तिच्या आवडीचे गिफ्ट घेऊन येत असे .कित्येक वर्षाचे त्या दोघींच्या सोबत असलेले नाते अजूनही त्याने त्याच ताजेपणाने जपले होते आता ऊमाच्या मनात पुन्हा विचारचक्र चालू झाले .आज काही केल्या तिचा भूतकाळ तिची पाठ सोडत नव्हता .आणि तिला आठवला नयनाचा थाटात झालेला पहिला वाढदिवस !!किती हौस होती सतीशला नयनाचा वाढदिवस जोरात करायची ..मुळात नयनाचा जन्म झाला त्या वेळेस तो खुपच हरखला होता त्याला मुलगी हवी होती ती झाली होती .आणि ती सुद्धा हुबेहूब त्याच्यासारखीच दिसणारी ..!!सतीशसोबत लग्न झाल्यावर ऊमा खरोखर खुप खुप खुष होती .लग्नानंतर दोन तीन महिने सर्व ठीक चालले होते .आणि ऊमाला दिवस राहिले ,ते ऐकून सतीशच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता .आणि त्याच रात्री तो भरपूर पिऊन घरी आला .त्याला असे पिऊन आलेले ऊमाने पहिल्यांदाच पाहिले होते .कदाचित आनंदात मित्रांबरोबर प्यायला असेल असे तिला वाटले .पिऊन तर्र होऊन आलेला असा त्याचा अवतार, त्याचे बोलणे ,पाहून मात्र ती घाबरली होती .अशा गोष्टी यापूर्वी तिने कधीच पाहिल्या नव्हत्या जेवण तयार होते ते सोडुन त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली .तिला एक शब्दही न बोलू देता ..तिच्या होकार नकाराची कसलीही पर्वाही न करता त्याने तिचे कपडे अक्षरश: ओरबाडून काढले आणि तो तिच्यावर तुटून पडला . तो मात्र गाढ झोपून गेला नंतर ,पण घडलेल्या प्रसंगाने ऊमा हमसाहमशी रडत राहिली .एवढे दिवस आपल्याला अगदी एखाद्या नाजूक फुलासारखे जपणारा....काल बाळाच्या आगमनाची बातमी ऐकुन आनंदाने आपले कौतुक करणारा सतीश तो हाच का तो ?असे तिला वाटले .पण मग दुसऱ्या दिवशी मात्र त्याने ऊमाची रीतसर माफी मागितली .पुन्हा असे कधीही करणार नाही असेही वचन दिले .त्याच्या विनवणीनंतर ऊमाने पण हा विषय मनातून काढून टाकला .घडले असेल असे त्याच्या हातून जाऊ दे अशी स्वतःच्या मनाची समजूत घालत त्याला माफ केले . सतीशला जरी ऊमाने माफ केले तरीही अधून मधून हे असे काहीतरी विचित्र घडत राहिले .सतीशचे पुन्हा पुन्हा माफी मागणे ..चांगले वागायची वचने देणे हे नेहेमीचेच झाले .ऊमाच्या लक्षात आले सतीशचे हे दारूचे व्यसन सुटणारे नव्हते .ती हतबल झाली होती..सतीशच्या या वागण्याची ती कोणाकडे तक्रार करणार होती ...आणि कोणाला सांगणार होती ती हे ?आपल्याच मनात ही गोष्ट ठेवून ती शांत राहिली ..हळूहळू घरात पैशाची अडचण भासू लागली,कारण सतीश हल्ली घरखर्चाला काही पैसेच देत नव्हता .त्याचा दरमहा येणारा पगार तो काय करीत होता याबद्दल काहीच समजत नव्हते .त्याच्या पगाराचा विषयच तो काढू देत नव्हता कधी .इतके दिवस तिने स्वतःच्या पगाराला कधीच हात लावला नव्हता .पण आता मात्र नाईलाज झाला होता होता ..रोजचा संसाराचा खर्च तर करायलाच लागणार होता .गरजेच्या वस्तूही आणायलाच लागणार होत्या .गरोदर असल्याने लागणारी फळे ,औषधे तिला आणायलाच लागणार होती .यासाठी कधी सतीशला काही सांगावे तर.. एरवी ठीक असणारा सतीश पैसे मागितले की आरडा ओरडा करीत होता .खर्चाचे आणि घराचे नियोजन करताना तिचा जीव अक्षरश: मेटाकुटीला आला होता .आजकाल तो घरातल्या कोणत्याच गोष्टीत अजिबात लक्ष देत नव्हता .डोके ताळ्यावर असले की मग मात्र तिची काळजी,बाळाची काळजी फक्त बोलून दाखवत होता .बाळाच्या आयुष्याचे आणि दोघांच्या संसाराचे खूप मोठे मोठे प्लान करीत होता .ऊमाच्या बाळंतपणाची वेळ जवळ आल्यावर काका स्वतः घरी येऊन तिला घेऊन गेले .ऊमाच्या अशा अवघडल्या अवस्थेत तिला आरामाची गरज आहे .तिला स्वतःच्या घरी कामाच्या व्यापामुळे आणि नोकरीमुळे तिला आराम मिळणार नाही .अशा विचाराने काकूने स्वतः काकांना पाठवले होते ऊमाला घेऊन यायला त्यावेळेस मात्र सतीशने सज्जनपणाचा“बुरखा” घेतला होता .आणि अगदी नाईलाजाने तिला माहेरी जायला परवानगी देत आहे ..त्याला तिच्याशिवाय अजिबात करमत नाही असे दाखवले .काकांची खरेतर ऊमाच्या बाळंतपणाचा खर्च करायची ऐपत नव्हती पण ऊमाचे पहिले बाळंतपण आपल्याकडे करायची त्या दोघांना हौस मात्र होती. काकांच्या सोबत ऊमा आपले जुजबी सामान घेऊन काकांच्या घरी राहायला गेली .तिथूनच ती नोकरीला जायला लागली .सतीश दिवसाआड तिची खुशाली विचारायला येत असे .काका काकु पण त्याचे जावई म्हणून कौतुक करीत असत .आता एकटे कुठे जाऊन जेवता असे म्हणत अधेमध्ये अगदी आग्रहाने त्याला जेवायला थांबवून घेत असत .पोटातल्या बाळाच्या काळजीने ऊमा चूप असायची .आता बाळाची काळजी घेणे हेच तिचे पहिले काम होते. योग्य वेळेस एके दिवशी ऊमाने एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला . बाळंतपण फारच कठीण गेले ऊमाला ,पण आपल्या सुंदर लेकीला पहाताच तिचा सगळा शीण पळाला.मुलीच्या जन्माची बातमी ऐकताच क्षणी सतीश ताबडतोब दवाखान्यात आला होता .येताना नवजात मुलीसाठी खेळणी,कपडे तसेच आनंदाने सगळ्यांना वाटायला बर्फी घेऊन आला .खुप कौतुक केले सतीशने त्याच्या लेकीचे ...त्यात लेकीच्या गालावरच्या त्या तिळासकट ती अगदी त्याच्यासारखीच दिसायला होती त्यामुळे त्याला खूपच हर्ष झाला .तिचे नयना हे नाव सुद्धा लगेच ठरवून टाकले त्याने ऊमाचे हात हातात घेऊन इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल आभार मानले .आता पुढील आयुष्यात दोघींना सुखी ठेवायची वचने पण दिली .ऊमाला पण बरे वाटले ..लेकीच्या पायगुणाने आता सर्व ठीक होईल अशी आशा वाटली .ऊमाला बाळंतीण होऊन दोन महिने पूर्ण होताच त्याने त्या दोघींना घरी न्यायची गडबड सुरु केली .ऊमाला आणि बाळाला घरी घेऊन जातो असा त्याने काकांकडे आग्रह धरला मी आता यानंतर दारू अजिबात पिणार नाही असे ऊमाला सांगू लागला .अगदी त्या वेळेस ऊमाला त्याने तसे पक्के वचन सुद्धा दिले.ऊमाने विचार केला आपल्या तिकडे जाण्याने आणि मुलीच्या पायगुणाने याची दारू सुटणार असेल तर उत्तमच होईल .तिने पण मग काका काकूंकडे घरी जायची इच्छा व्यक्त केली .काकू मात्र म्हणाली ऊमाला , “अग इतक्या लहान बाळाला घेऊन इतक्या लवकर कशाला तुझ्या घरी परत जातेस?अजुन तुझी तब्येतही फारशी सुधारलेली नाही .आपल्या घरी गेले की काम पडेल तुला .त्यात बाळ पण अजून बाळसे धरते आहे .”खरेच या काही महिन्यात तिची तब्येत खुप खराब झाली होती .तिच्या मनातल्या चिंतांनी तिला ग्रासले होते .बाळंतपण तर अजिबात मानवले नव्हते .काकूला वाटत होते बाळंतपणाच्या त्रासामुळे तिची तब्येत सुधारत नसेल . पण खरी गोष्ट फक्त रमालाच ठाऊक होती .बाळ बाळंतीण दोघींची तब्येत तशी नाजूक असल्याने अजून बारसे झालेच नव्हते .ते जरा थाटात करावे असा काका काकुंचा विचार होता .पण मग जावयाच्या आग्रहामुळे काकांनी बाळाचे बारसे घरच्या घरीच थोडक्यात आटोपून घेतले.बाळाचे नाव सतीशने ठरवून ठेवल्याप्रमाणे नयना ठेवले.आणि नयनाला घेऊन ऊमा तिच्या स्वतःच्या घरी परतली .घरी जाताना मात्र काकूने तिला बजावले की इतक्यात नोकरीवर मात्र जायचे नाही