मध्यान् रात्री जोरात लघवीला लागली नी बाबुला जाग आली. उठून बसत त्याने अंदाज घेतला. अंधारात चेड्याची धूसर आकृती पोवळीबाहेर बसलेली दिसत होती. तो उठून आत गेला. गर्भागृहाच्या डाव्या उजव्या अंगानी बाहेर पोवळीत जायला दरवाजे होते. चेड्याला पत्ता लागू न देता एका दाराने बाहेर पडून मागिल बाजूच्या प्रवेश द्वाराबाहेर जावून पट्कन लघवी करून यायचा त्याचा बेत होता. चेडा त्याच्या जागेवरून चाळवलेला नव्हता. बाबु खाली बसून एका बाजूच्या दारातून बाहेर पडला. पोवळीच्या भिंतीचा आडोसा असल्याने चेड्याला त्याचा पत्ता लागणेच शक्य नव्हते. बसून पुढे सरकत सरकत तो मागच्या प्रवेश द्वारा बाहेर पडला नी चार पावले बाजुला जावून लघवी करायला बसला. लघवी करून तो मघारी वळला तेवढ्यात त्याचा हात धरून खेचीत चेडा किंचाळला, " आता गावलास माझ्या तावडीत आता तुला सोडणार नाय मी...... " नी बाबूला खेचीत चेडा धावायला लागला. अंधारात दगड धोंड्याना अडखळत ठेचाळत आंगठे नी बोटं फूटून रक्त बंबाळ झाली.
खरी जवळच्या आवळ्या जावळ्या सात्वणांपाशी आल्यावर चेडा थांबला. बाबू गयावया करीत बोलला, " अरे भडया माका तान लागली हा...... माका पाणयालागी न्ही......" तिथून हाकेच्या अंतरावर रेडेटाक्या जवळ चेडा त्याला घेवून गेला. साठवणीच्या पाण्याला शेवाळाचा उग्र दर्प येत होता. पण घाशाला कोरड पडली होती पाण्याची ओंजळ तोंडात साठवीत चुकारे दोन घोट गिळल्यावर घसा ओला झाला. तोंडात साठलेलं पाणी थुंकून बाबूने दुसरी ओंजळ भरून तोंडात घेतली. चेडा त्याला घेवून पुन्हा सात्वणा जवळ आला. एका सात्वणाला तीनेक पुरुष उंचीवर दोन डेळे फुटलेले होते. चेड्याने बाबुला उचलून त्या बेचक्यात ठेवले नी आपण सात्वणाच्या मुळाला पाठ तेकून बसला. आता भुकेने पोटात रसरसायला लागले होते. रागाने शिवी हासडीत बाबु चेड्याला बोलला, " रे मायझयां माका भुक लागलीहा ...... माका कायतरी खांवक् दी......" चेडा म्हणाला, " काय हव ते सांग...... तू मागशील ते देतो . पण ते खाल्ल्यावर उतारा कर नी मला बंधनातून मोकळा कर......." बाबुने चटणी भाकरी मागितली. लगेच गरम गरम भाकरी नी त्यावर चटणीचा गोळा बाबुच्या पुढ्यात आला.
चेड्याने दिलेली भाकरी चटणी हा फक्त आभास होता. तुकडे मोडून चावून गिळले तरी पोटाला काय आधार लागला नाही. चेडा दरवेळी त्याने मागितलेली हर चीज त्याच्यापुढे ठेवीत असे . पण तो फक्त भासच होता. सहा सात दिवसात अन्नाचा कणही पोटात न गेल्यामुळे बाबुच्या फासळ्या मोकळ्या झाल्या नी पोट खापाटीला गेलं. आवाजही क्षीण झाला नी पाउल टाकायचही त्राण अंगात राहिलं नाही. निर्दयी चेडा त्याला तसाच ओढीत ओढीत ठिकाणं बदलीत फिरत राही. मात्र त्याची फेरी असेल त्यावेळी कधी उंच झाडावर कधी गच्च झाळीत अवघड ठीकाणी बाबूला अडकवून ठेवीत असे. त्या दिवशी दुपारी फेरीला जाताना चेड्याने त्याला खाजणात उंच चिपीच्या झाडावर नेवून ठेवले. जवळच माड होते. बाबू चेड्याला म्हणाला, “ भडया माका माडालागी न्ही, मी याक शहाळा काडतंय.” शाहळे काढल्यावर तो चेड्याला म्हणाला, " मायझया, सोडणा काडून दी, नी मग्ये खय गू खावक् जावचांहा थय जा. " चेड्याने अणकुचिदार नखानी सोडणं पेचून काढली. त्या दरम्याने बाबूने चिव्याच्या शिरडीचा वीतभर लांब ढंबूस मोडून घेतला. त्याला चिपीच्या उंच डेळक्यात ठेवून चेडा फेरीवर गेला. बाबूने शाहाळ्याची शेण्डी पेचून नरम डोळ्यात ढंबूस खुपसून छिद्र पाडून पाणी प्याले. शहाळ्यातले पाणी प्याल्यावर ते फोडले. वरच्या अर्धुकात नरम खोबरे होते ते खावूनच त्याचे पोट भरले, डरडरा ढेकर आली. खालच्या भकलातले खोबरे काढून ते तुकडे पाटलोणीच्या खिशात ठेवले.
आता तो एक दोन दिवसानी शहाळे मागून घेई. आपणाला माडापर्यंत न्यायला सांगून ते स्वत: काढी. मात्र चेडा दिवसभर त्याला घेवून दडी मारी ती जागा, नी फिरण्याचे मार्ग चेडा स्वत: ठरवी. त्याने दिलेली वस्तू खावून पोट भरत नाही हे बाबूच्या लक्षात आले होते. म्हणून तो शहाळे स्वत: काढी. आठ दहा दिवस चेड्याने त्याला दुनियाभर घुमवला. अधून मधून पाती बदल, मला बंधनातून मोकळा कर म्हणून तो बाबुला सांगे. आपली पिशवी देवळात राहिलेली आहे, तिथे मला सोड मग मी तुला बंधनातून मोकळा करीन असे बाबू सांगे. पण या गोष्टीला मात्र चेडा कसाच काबूल होईना. पाच सहा दिवसानी दुपारी फेरीवर जाताना चेड्याने त्याला मोंडे वाडीच्या खरी जवळ वडाच्या उंच झाडावर डांबून ठेवले होते. उन्हाचा कडाका वाढला नी बाबूला शोष पडला. तहानेने व्याकूळ होवून त्याच्या घशाला कोरड पडली. जीव जातो की काय अशा अवस्था होवून त्याला झापड आली. मधल्या टायमात राखणे गुरं घेवून विश्रांतीसाठी वडाजवळ आले. वडाच्या थंडगार सावलीत आल्यावर गुरानी बसकण मारली आणि ती निवांतपणे रवंथ करायला लागली. तसे राखणेही दम घेत थांबले नी त्यानी बेणी जागा गाठून शिदोरी सोडली. त्यानी शिदोरीत सोडल्यावर लसणीच्या चटणीचा वास आला नी बाबु भानावर आला. त्याने वाकून बघितले. जीवाच्या आकांताने शिकस्त केल्यावर त्याच्या तोंडातून शब्द फुटले.' रे पोरग्यानो, माका खाली उतरा ...... मी हय अडकोन ऱ्ह्वलंय्.....उनाच्या कायलीन माजो जीव जावक् इलोहा कायतरी करून माका खाली उतरा.... " (क्रमश:)