दोन तीन वेळा हाका मारल्यावर राखण्यानी बाबुचे शब्द ऐकले. उंच डेळक्यात बसलेल्या शरपंजरी बाबुला त्यातल्या एकाने ओळखले. "अरे ह्यो दणदणो म्हाजन....... धा पंदरा रोजामागे खंय नायसो झालो म्हणाहुते ल्वॉक....." दोन रुखाडी पोर वर चढले नी त्यानी थावरीत थावरीत बाबुला खाली उतरला. त्याला तहान लागलेली होती . पोरानी त्याला पाणी पाजल्यावर बाबूला जरा हुषारी वाटली. पोरानी भाकरी खावून झाल्यावर त्याला बकोट धरून हळू हळू चालवीत मोंडे वाडीत नेवून सोडला. तिथे भगत मोंड्याच्या ओसरीवर तो टेकला. पाणी पिवून सावध झाल्यावरतो म्हणला, “ दोन देवस झाले...पोटात अन्नचो कण गेलेलो नाय...... माका गोळोभर भात वाडा.” मग घरणीने त्याला पत्रावळीवर बचकाभर भात नी त्यावर कुळदाची पिठी वाढून आणली. चार घास पोटात गेल्यावर बाबुला हुषारी वाटली. त्याने कसेबसे चार घास खाल्ले नी पत्रावळ गुंडाळून तो उठला. माडाच्या तळीत हात तोंड धुवून तो माघारी येवून ओसरीवर टेकला. "कोणतरी वांगड देवन माका घरी पोचवा....... " त्याने भगत मोंड्याला गळ घातली.
भगत मोंड्याचा पोरगा पक्या बाबुचा हात धरून त्याला पोचवायला निघाला. अंगात त्राणही नसलेला बाबू पोराचा हात धरून कष्टाने एकेक पाउल टाकीत चालत राहिला. ते घाटी उतरत असताना त्याच्या मागावर चेडा आला. पक्या मोंड्याने हात धरलेला असल्यामुळे चेडा त्याला स्पर्शही करू शकत नव्हता. गावदरीत पोचल्यावर रस्त्यालगत मराठी शाळेच्या व्हरांड्यात ते दम खायला टेकले. बाबु पक्याला म्हणाला, "आता तू ग्येलस तरी चलात माजो मी हळू हळू जायन्...." व्हरांड्यात एका कडणीला तो बसून राहिला. तो खाली उतरून शाळेच्या कमानी बाहेर जाई पर्यंत चेडा काहीही करू शकत नाही हे बाबुला पक्के माहिती होते. चेडा बाजुला जावून फणसाच्या झाडा आड दबा धरून राहिलेला होता.
रवळनाथाच्या देवळात कौल प्रसादाचे काम सुरु होते. दाजी घाडी लघवी करायला उठून बाहेर गेला. पाय धूवून ओवरीच्या पायऱ्या चढून सभागृहात येती येता सहजपणे त्याची नजर बळाणी लगतच्या खांबाकडे गेली नी माथ्यावर ठेवलेली बाबु दणदण्याची पिशवी त्याला दिसली. पुढे जावून पिशवी खाली काढून त्याने बळाणीवर ओतली. पानाची चंची नी माडाची पात दिसली. चंचीत सुकलेली पानं , केंडशी लागलेले ओले बेडे, चांदीच कानकोरणं, चवली-पावली अधेली नी आखबंद रुपये असा खुर्दा, आडकित्ता नी सुकलेली पाती असा ऐवज होता. बाबू माडाच्या पातीचा तोडगा सोबत वागवीत फिरत असे हे त्याला माहिती होते. "ही नुको ती व्हायका आदी धगवून टाकतंय्... " त्याने सुकलेली पाने, केंड्शी लागलेले ओले बेडे नी माडाची पात उचलली. पडवीत चूल पेटवून त्यावर चहाचे आधण ठेवलेले होते. त्याने सुकलेली पाने, बेडे नी माडाची पाती चुलीत टाकली. काही क्षणातच पातीत गुंडाळलेल्या तावीजा सकट सगळे जळून गेले, नी बाबुच्या मागावर शाळेसमोर फणसाच्या झाडाआड दबा धरून बसलेला चेडा बंधनातून मोकळा होवून मूळ जागी निघून गेला.
शाळा सुटली, पोरे निघून गेल्यावर वर्ग बंद करून गुरुजी निघून गेले. आता सामसूम झाल्यावर चेडा हाकारायला येईल असा बाबुचा कयास होता. पण खूप वेळ झाला तरी चेडा त्याला हाकारायला आला नाही. बराच वेळ वाट बघितल्यावर जरा धीर करून बाबु शाळेच्या प्रवेश द्वाराजवळच्या कमानी पर्यंत जावून आला. त्याने तीन चार वेळा अशा चकरा मारल्या पण त्याला चेड्याचा काय मागमूस लागला नाही. काळवं पडेपर्यंत वेळ वाट बघितल्यावर चेडा फेरीवरून आलेला नसेल असा विचार करून तो येण्याआधी सुरक्षितपणे घर गाठूया असा विचार करून बाबु घराकडे निघाला. महद् कष्टाने पाय ओढीत ओढीत दिवेलागणीच्या सुमाराला बाबु घरी पोचला. पायऱ्या चढून ओसरीवर गेल्यावर दादा पुढे आला. "इतके दिवास झाले, खय नाबूत झालं हुतस? आमी तुजी वाट बगून बगून हैराण झालाव.... तुका खय खय सोदून इली मानसां...... आटवडोभर धा गावात फिरॉन फिरॉन मानसा जुजो सोध घेयत् हुती. पन खयच तुजी मागाडी लागयना नाय. आमच्ये विलाज थकले म्हंताना रवळनाताक तुज्ये राकणीचो जाब घालून आमी तुजी वाट बघताव.... आत्ता अर्द्या घंट्यापूर्वी तुजी पानाची पिशवी धाडून दिलान दाजी घाड्यान..... रवळनाथाच्या देवळात बळाणीच्या खांबार तू इसरॉन ग्येलं हुतस......" आश्चर्याने थक्क होत काही न बोलता बाबू चपळाईने पुढे झाला. बाबुने पिशवी हातात घेवून आतला ऐवज बाहेर काढला. पानाच्या चंचीत तंबाखू, आडकित्ता, काताची वडी, दहाबारा काजऱ्याच्या बिया, चांदीचं कानकोरणं नी पाच सहा रुपयाची चिल्लर शाबूत होती. पण चेड्याचा उतारा असलेली माडाची पात नी तावीज मात्र मिळाला नाही. (मालिका समाप्त)