Vayangibhoot - 4 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | वायंगीभूत - भाग 4

Featured Books
Categories
Share

वायंगीभूत - भाग 4


पहाटे रोजच्याप्रमाणे  जाग आल्यावर तो शिपणं करायला  गेला. नेहेमी प्रमाणे ठराविक लाटा मारल्यावर आगरातल्या सहाही रांगा भरलेल्या असणार  या अंदाजाने तो लाट थांबवून बघायला गेला. पण आज जेमेतेम पहिली सरी भरलेली होती. त्याच्या काळजात चर्रर्र  झालं...... त्याच्या लक्षात आलं की आज कनवटीला तोडगा नव्हता त्यामुळे  वांगीभुताचा चेडा मदतीला आलेला नाही. माडाच्या पातीत बांधलेला तावीज कायम जवळ ठेवायचा ही अट म्हंमदने बजावून बजावून सांगितलेली होती. पात सुकण्यापुर्वी  पिशवी शोधून काढणे गरजेचे होते. अगर म्हंमदची भेट घेवून पिशवी हरवल्याची गोष्ट त्याला सांगून त्यावर काहीतरी तोडगा शोधायला हवा होता. उजाडण्याची वाट न बघता बाबु तडक मणच्याला म्हंमदची भेट घ्यायला निघाला. तो म्हंमदच्या घरी गेला तेव्हा नुकतीच माणसं उठून बहिर्दिशेला गेलेली होती. बाबु  म्हंमदची वाट बघीत कट्ट्यावर टेकला. खूप उशिराने एकदाचा म्हंमद आला.झाली गोष्ट ऐकल्यावर तो धास्तावत म्हणाला, " फुडचो इषय माज्या सोडाच पण माज्या गुरुका पण सोडवता येवचो नाय....... कायतरी करून पिशवी सोदून काडूकच व्हयी नी  पात सुकॉन जाव पुर्वी बदली करूक व्हयी...... नायतर  वायंग्याचो चेडो  तुका सुकवून सुकवून मारीत....... खरां तर चांगली बर्कत इल्यावर तू चेडो मोकळो सोडूक व्हयो होतो....... पण तुका आशा सुटाना...... "   

            बाबू अजीजी करीत रडवेला होवून हाती पायी पडायला लागल्यावर जिक्रिया म्हणाला, " तू गलप बांदॉन बाबु म्हाजनाची पिशवी तरी खय आसा ह्येचो सोद घी ....... " मग गलप बांधून म्हंमद आडवा झाला. जिक्रियाने बाबुची पिशवी कुठे दिसते विचारल्यावर, " बाबू  देवळाहारी चल्लो हा नी पिशवी तेच्या कमरेक आसा....... भुतू   पातीत गुठाळलेलो चेडो  दिसताहा माका....."  एवढेच म्हंमदने सांगितले. पुन्हा पुन्हा खोदून विचारल्यावर , " माकां फुडचा काय दिसना नाय .... मर्यादे पैलाडी मी जावक् शकत नाय..." एवढेच कर्ण पिशाच्च सांगे. मंदिराच्या विशिष्ट मर्यादे पलिकडे कर्ण पिशाच्चाला  दिसू शकत नव्हते. म्हंमद गलप सोडून उठला. तू  असोच देवळाहारी जा..... नीट आटवून आटवून पिशवी खय ठेवलंस ती नीट सोदून काड नी पात सुकॉच्ये आदी ती बदल नी  तावीज जाळून चेड्याक मोकळो कर.......नायतर फुडचे परिणाम तुका भोगूक व्हये....... ह्येतू मी तुका काय्येक मदत करूक शकनय नाय....... तू नी तुजा कर्म....... 

            बाबू  परत निघाला तो  दुपारी  मध्यान्हीच्या दरम्याने रवळनाथाच्या मंदिरात पोचला. देवाला कौल लावून  दाजी घाडी जाबसाल घालीत होता.  जमलेल्या मध्ये काल असलेल्यापैकी कोणीच नव्हते. दाजीची जाबसाल घालून झाल्यावर पुढे जावून बाबु म्हणाला, " कल राती तू  घरा ग्येलस तवा  मी बळाणीवर निजलेलो बगतलं हुतस ना तू? " त्यावर मुंडी हालवीत दाजी म्हणाला, "व्हय व्हय मी उटॉन घरा निगालय तवा तुका निसूर नीज लागलेली व्हती. मी हटकलय तुका . पन तू चाळावलंस दुकू नाय म्हंताना  मी  चालीर  निग़ॉन ग्येलय. " रंजीस येत बाबू म्हणाला, " त्या टायमाक माझ्या आजूबाजूक माजी पानाची पिशयी दिसली काय तुका?" त्यावर " च्यक च्यक" करीत दाजी म्हणाला नायबा....... मी काय तेवडो लक्ष करूक नाय ....... मी सकाळी न्हेरी करून इलय देवळात तवा भगो सुतार नी  तानु बाणो बसलले हुते तेंका हटक ...... " ते दोघेही  समोरच होते. नकारार्थी  मान हालवीत ते म्हणाले, आमी दोगुवले एकामच इलाव ना द्येवळात...... आमच्या आदी कोण्ण्येक इलेला नाय. पण आमका काय तुजी पिशवी दिसली नाय......"  

            बाबूने पुन्हा एकदा धांडोळा घेतला . मग़ आदल्या दिवशी त्याच्या सोबत  बळाणीवर बसलेल्या पैकी बळी नी  गुणू गावडे, परशा निकम. सख्या माश्ये, भिवा गोठणकर या सगळ्यांच्या घरी जावून बाबूने पिशवीची विचरणा केली. पिशवी देणाराला दहा रुपये बक्षिस द्यायची लालूचही दाखवली पण कोणालाच काही सांगता आले नाही. पिशवी गुठाळून ती छिनेलाच्या खांबावर सुरक्षित म्हणून ठेवणारा बळी गावडा...... त्याने ती कृती गांजाच्या तारेत केलेली असल्यामुळे त्यालाही विसर पडलेला होता. पूर्ण हताश होवून बाबू घरी आला. दिवसभर फिर फिर फिरून पायाचे तुकडे पडायची पाळी आली होती तरी पाती सुकल्यावर  रागाने पेटलेला चेडा काय करील या भीतीने गर्भगळित्त झालेल्या बाबूने चार  घास कसे बसे ढकलून  उरलेले अन्न तसेच बाहेर जावून माडाच्या मुळात ओतले. काल पासून  काजऱ्याची बी ही खाल्लेली नसल्यामुळे आता त्याच्या नजरेपुढे भोवडायला लागले. कोणीतरी आपल्याला उंच उचलून गरगरा फिरवून जमिनीवर भिरकावून देत आहे असा भास होवून  तो बसल्या जागी ताटकन्  उठून बसे नी  थोड्या  वेळाने पुन्हा टकली टेकी. पहिला कोंबडा झाला नी डोके ठणाणा दुखायला लागून जाग आली.  बाहेर जावून चूळ भरून तो आत आला नी ओटीवर साण्यात ठेवलेल्या काजऱ्याच्या मूठभर बिया खिशात टाकून झोपाळ्यावर जावून बसला. पाव बी कुरतडून खाल्ल्यावर जरा डोक ताळ्यावर आलं. दुपारला माडाची पात सुकायला लागली की चवताळलेला चेडा समोर येणार हे तो ओळखून होता. त्याच्या पासून बचाव करण्यासाठी पावणाईच्या देवळात  बसून रहायचे असा निश्चय करून तो वाटेला लागला.     

       दोणीवर जावून थंड पाण्याची आंघोळ करून त्याने तडक पावणाईचे देवूळ गाठले. अर्ध्या विरडीने हरी  नळेकर देवीची पुजा करून गेला नी थोड्या वेळाने मंदिराबाहेरून चेड्याने बाबूला हाक मारली...... " बाबू  पात सुकली ती आदी बदल..... " बाबुच्या अंगावर सर्रकन काटा फुलला. जरा वेळ गेला नी चेडा किंचाळ्ल्या सारखा ओरडत  पाती बदलायची आठवण करायला लागला. बाबू दाद देईना तशी  गुरगुराट करीत चेडा बाबुला बाहेर यायची  ताकीद द्यायला लागला. वीतभर उंच चेड्याची अंधूक काळी आकृती ओवरी बाहेर मंदिरा भोवती फेऱ्या घालीत बाबुला दमदाटी करून बाहेर बोलावीत होती. तू बाहेर ये....... मी तुला सोडणार नाय...... तुला झरवून झरवून मारीन ....... मला मोकळा कर नायतर  तोडगा तरी कर...... मार्यादेच्या बाहेर येशील तेव्हा मी तुला मुर्गाळल्याशिवाय सोडणार नाय....... किती वेळ पासून दडून ऱ्हातोस ते बघतो मी......" चेडा बेभान होवून ओवरीबाहेर कातळावर थडाथडा कपाळ आपटीत राहिला. पण बाबू  त्याच्या कचाट्यात गावला नाही. अगदी फुटक्या तिन्ही सांजेला चेड्याची फेरी करायची वेळ झाली नी  चेडा  फेरीला गेला. बाहेर सामसूम झाल्यावर अंदाज घेवून बाबु  ओवरी बाहेर जावून लघवी करून  पायावर पाणी घेवून  देवळात  बळाणीवर बसला त्यावेळी नळेकराची बायको नी पोरगी देवळात येवून समई लावून गेली. बाबूने  तांब्याभर पाणी प्याले नी  तो बळाणीवर आडवा झाला. त्याचा डोळा लागला. (क्रमश: )