" आता तू आमका वळाकतस..... आमचा खानदानी घराणा. आमी गावचे मानकरी म्हाजन. दोनशे माड नी अडिजशे पोफ़ळ हा आमची. वीस खंडी खंडाचा भात येता...... दुपिकी मळो...... हाल्लीच शंभर कलमांची बाग उटवली. पण चार बाजून येवडा उत्पान असोन आज मितीक पन्नास रुपाये म्हणशा तर गाटीक नाय आमच्या. येरे दिवसा नी भर रे पोटा अशी कुडवाळ तऱ्हा ..... आमच्या काय उतवाक् धूर लागना नाय. लय थळा सोदून झाली. पण एकाचो म्हणशा तर गुन नाय......"
आलेली किरकोळ गिऱ्हायकं मार्गी लागल्यावर जिक्रियाने बाबुला आत न्हेला. भिंतीवर हाजी मलंगाचा फोटो लावून त्यासमोर चटई टाकून डोक्याला गलप बांधून म्हमद पालथा पडला की , डोळे मिटून जोरजोराने "हां हांऽऽ हां हां " असे आवाज काढीत घुमायला लागे. प्रश्न कर्त्या बाबूकडे निर्देश करून , "लेकरू तुज्या पायाशी इलाहा..... तेची नड वळक " एवढं जिक्रिया बोलल्यावर म्हमद वदायला लागला. " हे घोडे पोईतले म्हाजन...... चार भाव . मोटो दादा. त्या बागचो भाऊ. ह्यो बाबु तीन नंबर नी धकटो आबा..... " त्याने घराण्यातल्या पूर्वीच्या चार पिढ्यांमधल्या पूर्वाचांची नावं सांगितली, ठिकाणाच्या चतु:सीमा सांगितल्या. गोठ्यातल्या चार गुरांची वर्णनं केली सगळ्या गोष्टी तंतोतंत पटणाऱ्या होत्या. बाबुने त्याची सत्यता पटल्याचे सांगितल्यावर तो पुढे बोलू लागला. "आमदनी मोटी पन वाद्या दुस्मानानी पान उल्टा फिरौन ठेवलंला हा..... घराखाली आगरात उत्तरेकडे आड्यात मोटी जांबळ हा तेच्या मुळात खैची घान हानून गाडून ठेवलली हा..... दोन दिसा पाटी दुबती गाय दूद द्येवची बंद झालीहा...... ह्येंचो राखणदार मदल्या पडणात हा...... तेची भागवनी होयत् नाय ....... चार वाटानी येता तां धा वाटानी निगोन जाता...... " त्याचे वर्णन ऐकून दणदणा सर्द झाला. म्हमद गलप सोडून उठून बसला.
बाबूचे सगळे प्रकरण मार्गी लावायचे तर पुढच्या तीन चार अमावास्यांना येवून एकेक नड भागवीत तोडगे करायला लागणार होते. म्हमदने गलप बांधून ज्या गोष्टी वदल्या त्या इतक्या तंतोतंत पटणाऱ्या होत्या की बाबुच्या मनात कसलाच किंतू उरला नव्हता. त्याने कचकचीत पाच रुपये काढून दिले. " ही उद धुपासाटना देणगी आसा माज्याकडसून . माजा काम मार्गी लावन् दी. मी तुका नाराज करनार नाय." म्हमदने दिलेली विभूत आणून लावल्यावर दूध न देता लाथांचा सटाका मारणारी गाय शांत होवून दूध द्यायला लागली. आता दर अमावास्येला बाबू मणच्यात हजेरी लावायला लागला. भात, कडधान्य, नारळ, ओले बेडे(सुपाऱ्या) , जळावू लाकडं शिवाय दर खेपेला दहा पाच रुपये बिदागी ठरलेली होती. म्हमदने समक्ष खेप करून काही तोडगे केले. त्या दरम्याने नारळाचे पाडप झाले नी दुसऱ्या दिवशी सागव्यातला कोणी नारळाचा व्यापारी बोलावल्या सारखा दारात हजर.....चार पैसे सरस दर देवून त्याने सगळेच्या सगळे चारशे नारळ उचलून रोख पैसे दिले. पुढच्या आठवड्यात एक गाय नी दोन म्हशी व्याल्या. एक म्हैस विकायची ठरली तिलाही चांगलं रोखीचं गिऱ्हाईक लागलं. दोन देणेकरांकडे बरीच वर्षं तुंबलेली उधारीही अशीच अकस्मातपणे वसूल झाली. म्हमंदने केलेल्या तोडग्याची प्रचिती यायला लागली.
आता बाबु दणदणा म्हंमदच्या कच्छपि लागला. मणच्याच्या खेपा वाढल्या. सतत काहीना काही तोडगे, उपाय करीत राहाण्यापेक्षा एकदाच कायमचा उपाय आपल्याकडे आहे मात्र त्याचा खर्च जादा आहे . त्यासाठी इचलकरंजीचा आपला गुरु हाजी उस्मान त्याची मदत घ्यायला लागेल. त्याची बिदागी जबर - सवाशे रुपये आहे. पण एकदा हा तोडगा हाती आल्यावर दोनाचे चार, चाराचे आठ अशी बरकत होत राहील. असे म्हंमदने सांगितले. आजवरचा अनुभव पाहता दणदण्याच्या मनात शंका काहीच नव्हती प्रश्न फक्त रक्कम उभी करण्याचा होता. घरी गेल्यावर त्याने हा विषय दादाच्या कानी घातला. सध्या चलती आहे ती पुरेशी आहे . उगाच अती लोभ धरून भलत्या अतिरेकी विषयांच्या नादी लागणे बरे नव्हे असे त्याने सुचविले. अर्थात बाबुने एकदा एखादी बाब मनावर घेतली तर तो कोणाचे ऐकणार नाही ही दादा जाणून होता, आणि तसेच झाले.
घरात वडिलोपार्जीत सोन्याची सलकडी,सल्ले जोड, पुतळ्याची माळ असा पंचवीसेक तोळ्यांचा सोन्याचा आणि चांदीचे ताम्हन. तांब्ये, पंचपात्र्या असा ऐवज होता तो वर्षभरासाठी गहाण ठेवून रक्कम उभी राहणारी होती. मोठ्या भावानी हो नाही करीत शेवटी परवानगी दिली. जैतापुरच्या शिरसाट पेढीवाल्याकडे ऐवज गहाण ठेवून दणदण्याने नकद सवाशे रुपये उभे केले. पंधरा दिवसानी अमावास्येला म्हंमदचा गुरु हाजी उस्मान आला. त्याने काळ्या कपड्यात शिवलेला तावीज बाबु दणदण्याच्या हवाली केला. तो तोडगा म्हणजे वायंगी भुताचा उतारा होता. वीत भर लांब माडाची ओली पाती दुमती करून त्यात तावीज गुठाळून काळ्या धाग्याने बांधून तोडगा करणाराने ती वस्तू कायम जवळ बाळगायची होती. चार सहा दिवसानी पाती पूर्ण सुकण्या आधी नवी ओली पाती बदलायची होती. चार दोन वर्षानी पुरेशी माया जमली की तावीज सुकलेल्या पाती सकट आगीत जाळून टाकून वायंग्याला मोकळे करायचे. तोडगा करणाराच्या सोबत माडाच्या पाटीत गुंडाळलेला तावीज असेतो जे काम हाती घेईल त्यात हुकमी यश मिळणार होते. आय दुप्पट चौपट वाढत जाणार होती. दिवसभरात दीड दोन घंटे कशी फेरी असेल त्याप्रमाणे चेडा नाबूत झालेला असेल त्यावेळात त्याचे साह्य नसणार. त्याच्या फेरीच्या वेळा तिथी प्रमाणे रोज बदलत्या असतील. तेवढा अवधी सोडला तर पाती ओली असेतो वायंगी भुताचा चेडा सतत आसपास राहणार होता. पात सुकत जाईल तसतसा त्याचा अंमल कमी कमी होत जाणार, म्हणून वरचेवर पातीचा तुकडा बदलीत रहायची अट होती. जर दुर्लक्षामुळे पात पुरी सुकून गेली तर चेडा तोडगा करणारावर उलटून पडला असता नी त्याने त्रास द्यायला सुरुवात केली असती.... सगळी शिस्तवार माहिती सांगून म्हंमद म्हणाला, ' शेवटी किती झाला तरी ती पिशागत हा..... तोडगो शाबूत असासर ती वश आसणार पन तेतू चुक झाली तर ती तुज्यारच उलटोन पडनार. आपला काम होयसर ती बाळग नी बरकत इली की तेका मोकळीक दी. वायंग्या म्हंजे पदरात बांदलेलो निखारो हा ह्या विसरां नुको. काम झाला की तेका सोडून द्येवचा नी आपून शाबूत ऱ्हवायचां...." (क्रमश:)