तीन झुंजार सुना
श्रेय
मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर
लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे
Adv. आनंद मुजुमदार.
पात्र रचना
श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
यमुनाबाई श्रीपतरावांची बायको
प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपतरावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा निशांतची बायको
विदिशा विशालची बायको.
वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील
विजयाबाई वर्षांची आई.
शिवाजीराव विदिशाचे वडील
वसुंधराबाई विदिशाची आई
आश्विन प्रताप आणि सरिताचा मुलगा
बालाजी आणि सदा शेत मजूर
बारीकराव शेत मजूर
कृष्णा आणि राघू शेत मजूर
दाजी, रखमा आणि सुरेश गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.
रावबाजी ठेकेदार. बटाईदार.
रघुवीर आणि त्यांची गॅंग परदेशी मजूर.
रामशरण रघुवीरच्या गॅंग मधला मजूर.
मंजुळा सदाची बायको.
कार्तिक निशांतचा मुलगा.
भाग ३९
भाग ३८ वरून पुढे वाचा .................
त्या दिवशी सर्वांनाच गोडाची मेजवानी होती. सर्वांनाच खूप आनंद झाला होता. सर्व मजूर एक मतांनी विदीशाला म्हणाले, “छोट्या वहिनी साहेब आता तुम्ही शेतात येऊ नका आम्ही सगळं सांभाळून घेऊ. तुम्ही बस आराम करा.” तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी विदिशा नेहमी प्रमाणे शेतावर जायला निघाली पण मजुरांच्या बायकांनी तिला अडवलं आणि घरी वापस जायला लावलं.
दिवसभर शेतात झोकून देवून काम करणाऱ्या विदीशाला हे जरा अवघडच होत होतं. ती सरिताला म्हणाली सुद्धा की “मी अर्धा दिवस जाते शेतात, वहिनी, तुझ्यावर कामाचा फार बोजा पडेल, मी नसतांना.”
“काही जरूर नाही, माझी काळजी तू करू नकोस, घर आणि विशालला सांभाळ तेवढं पुरे आहे.” सरिता म्हणाली.
“पण वहिनी, घरात बसून बसून कंटाळा येईल हो. आणि अश्या अवस्थेत कामं करावी असं म्हणतात न” – विदिशा
“ठीक आहे, घरातली कामं कर. जरा हलकाई राहील आणि वर्षाला मदत करू शकतेस तू. ते कर. झालं. मातीत हात घालायलाच पाहिजे असं काही नाही.” सरिताचं फायनल उत्तर.
दिवस आनंदात जात होते. विदीशाला त्रास होत होता, म्हणून ती दिवसभर झोपूनच असायची. संध्याकाळी तिला जरा बरं वाटायचं मग ती मिटिंगला येऊन बसायची. एक दिवस मीटिंग मधे सरिताने वेगळाच विषय घेतला.
“मी मागे एकदा बोलले होते. आज मला पुन्हा बोलावसं वाटतंय. आपण सहकारी शेतीचा प्रयोग करायला पाहिजे असं मला वाटतं.”
“वहिनी, कोणी तयार होतील का? कारण आपण जो प्रयोग करतो आहोत, हर्बल शेतीचा, तो सगळ्यांना मान्य होईल याची खात्री देता येत नाही, आणि साध्या शेतीकडे वळणं आपल्याला परवडणार नाही. मग?” निशांतनी शंका काढली.
“बरोबर आहे. पण याचीच चाचपणी करायची आहे. या साठी आपल्या शेतीला लागून ज्यांची शेती आहे त्यांच्याशी, निशांत तू बोलणं करावं अशी माझी इच्छा आहे.” – सरिता.
“ठीक आहे. आपल्या शेतीला लागून तिघा जणांची शेती आहे त्यांच्याशी मी बोलतो. पण काय बोलायचं ते सांग, म्हणजे तुझी नेमकी योजना काय आहे हे कळलं की, मग काय बोलायचं ते मी ठरवतो.” – निशांत.
“माझ्या मनात एक सहकारी संस्था काढायचा विचार आहे. म्हणजे संस्थेकडे सर्वांनी शेती जमा करायची आणि त्या बदल्यात प्रत्येकाला शेअर्स द्यायची. आता समजा १०० एकर शेती जमा झाली, तर उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. मशीनरी वाढवून आपण फायदेशीर शेतीचं मॉडेल सर्वांच्या पुढे उभं करू शकतो. मग दर एकरी किती खर्च येतो ते काढायचं आणि दर एकरी उत्पन्न किती येतेय ते काढायचं. हे झाल्यावर प्रत्येकाला त्याच्या शेती प्रमाणे मोबदला द्यायचा. म्हणजे समजा १० एकर शेती आहे. तर दहा एकरांवरचं उत्पन्न वजा त्यावरचा खर्च करून जि येईल ती रक्कम त्याला मिळेल. इतकं साध सरळ गणित आहे.” – सरिताने तिच्या मनात के आहे ते सांगितलं.
निशांतला काही ते पटलेलं दिसलं नाही. तो म्हणाला “वहिनी सरळ गणित हे आहे की उत्पन्न वजा खर्च आणि मग दर एकरा प्रमाणे मोबदला.”
“नाही निशांत, १० एकर वाल्यांनी ५० एकरांवरच्या खर्चाचा वाटा का उचलायचा? हे सांग.”
“पण वहिनी, या पद्धतीने आपल्यावरच खर्चाचा बोजा पडेल. मग ही उस्तवारी करण्यात फायदा काय?” निशांत कुरकुरला.
“नाही, आपल्यावर जास्त बोजा पडण्याचं काही कारणच नाहीये. दर एकरी हिशोब लावला तर आत्ता जो खर्च आपल्याला येतो आहे तेवढाच येईल किंवा थोडा कमीच येईल. कारण आपण एकदम बल्क मधे खत आणि फवारणीची औषधे घेऊ, दुसरं म्हणजे कामं एकांत एक होऊन जातील. आणि प्रत्येकाचा श्रमात वाटा असल्याने खर्चात कशी बचत करायची यांचा सगळेच विचार करतील. आलं का लक्षात?” वर्षा बोलली.
“ठीक आहे, पण मला जरा शंकाच आहे, पण तुम्हाला खात्री असेल तर तसं बोलून बघतो. नाही तर असं करतो सगळ्यांची एक मीटिंग बोलावू आपण म्हणजे सगळ्याच गोष्टी तिथल्या तिथेच स्पष्ट होतील. काय वहिनी तुमचं काय मत आहे?” – निशांत.
“चालेल. तसंही करता येईल. बोलाव त्या लोकांना” सरिताने संमती दिली.
“वहिनी, मला अजूनही समजत नाहीये की आपलं सगळं तर ठीकच चाललंय, मग हा अव्यापारेषु व्यापार कशा करता? पूर्वी आमचं साफ चुकलं होतं, पण आता तशी परिस्थिती नाहीये. निर्विवाद पणे तू आमची लीडर आहेस. आणि माझ्या मते कुठलीही गाडी जर ओवरलोडेड असेल तर तिची गती मंदावते, मग आपण कशाला ही जबाबदारी अंगावर घ्यायची? आपलीच गाडी थांबण्याचा धोका आहे यात.”
“हो वहिनी, मला पटतंय निशांतचं बोलणं. तू विचार कर अजून एकदा.” – विशाल.
“निशांत, विशाल, तुमच्याच म्हणण्या नुसार आता आपल्याला भरपूर मिळतंय. कसलीच ददात नाहीये. आपली गंगाजळी सुद्धा चांगली भरली आहे. बरोबर आहे न?” – सरिता.
सरिता पुढे म्हणाली “म्हणजे आता आपल्यासाठी जे काही आहे ते पुरेस आहे आणि अजून काही आटापिटा करायची जरूर नाही. असंच ना?”
“हो वहिनी असंच. आपले मजूर पण आता चांगलेच ट्रेंड झालेले आहेत. आपल्याला काही एक्स्ट्रा करायची आवश्यकताच नाहीये.” निशांत बोलला.
“असा विचार जर बायकांनी केला तर चालेल का?” – सरिता.
“ म्हणजे?” निशांत आणि विशाल एकदमच बोलले.
“म्हणजे असं की समजा सर्वांची जेवणं झाल्यावर जर कोणी पाहुणे आले, आणि बायकांनी म्हंटलं की आमची पोटं भरली आहेत, म्हणून आम्ही आता स्वयंपाक करणार नाही, तर चालेल का?” सरितानी आपला मुद्दा मांडला.
“अरे, असं कसं चालेल? ते तर तुमचं कामच आहे.” – निशांत.
“अरे तेच म्हणते मी.” सरिता आपला मुद्दा स्पष्ट करत पुढे म्हणाली. “आपला तर जम बसला आहे, मग आता आपल्या शेजारचे जे शेतकरी आहेत, त्यांचा विचार करून त्यांचाही उत्कर्ष होईल असं काम आपण करावं असं मला वाटतं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. असं म्हंटलच आहे कोणी तरी.”
“पण वहिनी, सगळे झडझडून काम करतील, असं कशावरून तू गृहीत धरते आहेस? असं जर झालं नाही तर सगळा भार आपल्यावर पडेल. आणि मग ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं’ अशी आपली अवस्था होऊ शकते.” निशांत हार मानायला तयार नव्हता. सगळे विचारात पडले. निशांत म्हणाला त्यात तथ्य होतं. थोडा वेळ तसाच गेला.
इतका वेळ विदिशा, नुसतं बसून सगळ्यांची मतं आणि विचार ऐकत होती, तिच्याही मनात विचार चालूच होते. आता तिनेच बोलायला सुरवात केली. “ वहिनी यात अजून एक धोका आहे, तो सर्वांनी ध्यानात घ्यायला पाहिजे, असं मला वाटतं.” एवढं बोलून ती प्रतिक्रियांचा अंदाज घेण्यासाठी थांबली.
“पूर्ण बोलून टाक. कसली भीती वाटते आहे तुला?” वर्षा म्हणाली.
“सहकार म्हंटला की बहुमतांनी जो विचार ठरेल, त्या विचारा नुसार चालावं लागणार. त्यात आपल्याला हवी असलेली दिशा जर बदलली, तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. ते आपल्याला चालणार आहे का?” विदिशानी तिच्या मनातला प्रश्न सांगीतला.
“हूं, वहिनी, विदिशा जे बोलते आहे त्यात दम आहे. यावर चर्चा व्हायला हवी.” – विशाल.
सगळेच, अगदी सरिता पण विचारात पडली. सगळ्यांना आपल्याच मार्गावर खेचून नेणं हे तसं अवघड काम होतं. थोड्या वेळाने निशांत म्हणाला “ वहिनी, सहकारी संस्था असेल, तर शेती च्या बदल्यात शेअर्स असं होऊ शकतं, पण सरकारची याला मान्यता नाहीये, त्यामुळे, सहकारी संस्था काढण्याचा विचार मनातून काढून टाक. पण कलेक्टिव फारमिंग करण्याला मान्यता आहे. तो प्रयोग आपण करू शकतो. त्या साठी प्रत्येकांनी त्यांच्या शेतीत काय पेरायचं हे चर्चा करून बहुमतानेच ठरेल. तुला समाजाचं उत्थान करायचं आहे की राजकारणात शिरायचं आहे? तुझी खात्री आहे का की त्या प्रकारच्या लीडरशीप क्वालिटीज तुझ्याजवळ आहेत म्हणून? नाही तर आपली शेती सुद्धा कोणी तरी बळकावून बसेल. बघ विचार कर.” आता मात्र प्रश्न गंभीर झाला होता. थोड्या वेळाने सरिता म्हणाली की
“मग आता काय करायचं? तूच सांग, निशांत.”
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.