Teen Jhunzaar Suna - 32 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 32

Featured Books
Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 32

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुनाबाई                       श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीकराव                       शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

रामशरण                        रघुवीरच्या गॅंग मधला मजूर.

मंजुळा                         सदाची बायको.           

भाग ३२            

भाग ३१  वरून पुढे वाचा .................

निशांत म्हणाला “तू माझ्यावर सरळ सरळ, मी फ्रॉड केला, असा आरोप करते आहेस. तुझ्या जवळ याचं काही प्रमाण आहे का? उगाच आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नकोस.”

“तू “आम्हाला” असं म्हणालास, याचा अर्थ काय? याच्यात विशाल पण सामील आहे का?” – विदिशा.

“हे तू काय बोलते आहेस विदिशा? तुझ तुला तरी कळतंय का? निशांत, बायकांच विरोधात उभ्या राहिल्या आहेत याला काय म्हणायचं?” – विशाल.

“आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आहोत. आम्ही कुटुंबा  बरोबर आहोत. आणि कुटुंबात तुम्ही पण येता. किंबहुना तुमच्या मुळेच हे कुटुंब आहे. आमची ओळखच तुमच्यामुळे आहे. तुम्ही दोघं आधार स्तंभ आहात या कुटुंबाचे. कुटुंब प्रमुखांचा दर्जा आहे तुम्हाला. पण कुटुंब प्रमुखच असं वेगळं वागायला लागला, तर त्याचं काय स्पष्टीकरण देवू शकतो आपण?” विदिशा म्हणाली तिचा स्वर जरा कातर झाला होता. परिस्थितीतलं गांभीर्य तिच्या स्वरात डोकावत होतं.

तिच्या बोलण्याने विशाल विरघळला. तो विचार करत होता की खरंच या बायका किती झटतात, या घरा साठी आणि आपण काय करून बसलो आहोत. आपण आपली चूक दुरूस्त करणं आवश्यक आहे. तो निशांतला म्हणाला

“निशांत, मला पण आता realise होतं आहे की आपण फार मोठी चूक केली आहे. आपण आपल्याच सख्या लोकांना विश्वासात न घेता माया जमवली. आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे. आपण आपली चूक सुधारायला पाहिजे, आपल्याच बायकांचा आणि आई, बाबांचा विश्वास आपण गमावला आहे. तो पूर्ववत व्हायला हवा असेल तर वर्षा जे म्हणते आहे ते स्वीकारायला पाहिजे.”

निशांत जवळ आता कुठलाच मार्ग नव्हता. वरतून हे सगळं प्रकरण वर्षांनीच म्हणजे त्याच्याच बायकोनी उकरून काढलं होतं. शेवटी त्यांनी पण हार स्वीकारली. तरी तो म्हणालाच. “ पैसे आमच्या अकाऊंट मधे असले काय किंवा बाबांच्या अकाऊंट मधे, काय फरक पडतो?”

“फरक पडतो निशांत,” वर्षा म्हणाली “अकाऊंट बाबांचं आहे. ऑपरेट सरिता वहिनी करतात. आणि हॅंडल मी करते, पूर्ण पारदर्शक व्यवहार आहे हा. वहिनी काम आणि खर्चाचं एस्टिमेट देतात आणि आम्ही तिघी आणि बाबा चर्चा करून झाल्यावर मी ओके करते आणि मगच सरिता वहिनी चेक देतात किंवा पैसे काढतात. उद्या आपण आपली private limited company काढणार आहोत. तेंव्हा हे बाबांचं अकाऊंट, कंपनी चं अकाऊंट बनणार आहे. त्या दृष्टीनेच सगळी कार्य पद्धती ठरवण्यात आली आहे.”

वर्षा असं बोलल्यावर निशांत कडे काहीच मुद्दा उरला नव्हता. शेवटी दोघेही नरमले. दोघांकडून २० -२० लाखांचे चेक आले. आता काळजी नव्हती.

“या तुमच्या चर्चेत आम्हाला स्थान असणार आहे की नाही?” – निशांत.

“आत्ता सुद्धा तुम्ही आहातच की. संध्याकाळच्या आढावा बैठकीतच सगळे निर्णय होत असतात, फक्त तुम्ही हजर असायला हवं, इतकंच.” सरिता म्हणाली. इतका वेळ ती गप्पच होती. मग तो विषय संपला.

दुसऱ्या दिवशी निशांत आणि विशाल दिवसभर व्यस्त होते. शेणखत आणि कंपोस्ट खताची व्यवस्था करतांना त्यांचा जीव मेटाकुटीला आला होता. विशाल आपल्या मनाशीच कसला तरी  विचार करत होता आणि मग त्यानी ठरवलं की संध्याकाळच्या मीटिंग मधे हा विषय काढायचा म्हणून. संध्याकाळच्या मीटिंग मधे सर्व गोष्टींचा आढावा घेणं झाल्यावर, विशाल म्हणाला

“२० एकरांसाठी लागणारं  शेणखत गोळा करणं हे हिमालयन टास्क दिसतंय. खूप फिरावं लागतंय. एवढं खत एका ठिकाणी मिळत नाही, खूप फिरावं लागत.”

“हो, खरंय विशाल, पण तुम्ही दोघंही जे अथक  प्रयत्न करता आहात ते कौतुकास्पद आहे. हे पुरुषांचच काम आहे, बायकांना एवढी फिरती फार अवघड  गेली असती. अगदी वेळेवर तुम्ही दोघ आमच्या मदतीला धावून आलात.” सरिता म्हणाली.

“वहिनी,” विशाल म्हणाला “या वेळेस तर फिरावंच लागेल, पण पुढच्या वर्षीची सोय करायला आत्तापासूनच सुरवात करावी असं मी म्हणतो आहे.”

“अरे वा, छानच विचार आहे. काही आयडिया आहे का तुझ्या मनात?” – सरिता.

“हो, बघा तुम्हाला पटते का?” – विशाल.

“सांगितल्या शिवाय कसं कळणार? नीट सविस्तर आम्हाला कळेल असं सांग.” – वर्षा.

“आपण  एक गोरक्षण संस्था काढू. सरकार दरबारी जरूर असलेल्या कागद पत्रांची पूर्तता करू. आणि जिल्ह्यात एक जाहिरात देवू. की ‘ज्यांना सद्य परिस्थितीत आपली गुरं सांभाळणं कठीण होत असेल त्यांनी ती गुरं आम्हाला द्यावीत. आम्ही त्यांचा सांभाळ करू. गुरं तूमचीच राहतील. तुम्हाला हवी तेंव्हा तुम्ही ती परत नेवू शकता.’ कशी वाटते ही कल्पना, गुरांसाठी पैसे वेचण्याची गरज नाही, आणि मुबलक शेणखत पुढच्या सर्व वर्षांसाठी available.

हे ऐकल्यावर, विदिशा उठली. विशालच्या जवळ जावून बसली. विशालचा हात आपल्या हातात घेतला. आता तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वहात होत्या. ती हसत होती पण डोळे भरून आले होते. विशालच्या बोलण्यावर सगळे प्रतिक्रिया देणार होते, पण आता विदिशा कडेच आश्चर्याने बघत होते. विशाल पण आश्चर्याने तिच्याच कडे बघत होता. आपलं काय चुकलं याचाच तो विचार करत होता. सरितानी विचारलं “ विदिशा, अग काय झालं रडायला? विशाल काही चुकीचा बोललेला नाहीये. उलट एक brilliant idea दिली  आहे. तुला रडायला काय झालंय?”

“वहिनी,” गदगदलेल्या स्वरात विदिशा म्हणाली “आज माझा नवरा मला परत मिळाला. म्हणून डोळ्यात अश्रु आले.” तिच्या भावना अशा काही उचंबळून आल्या की तिला पुढे बोलवेना. ती गप्प झाली.

“विशाल एक काम कर, अशी संस्था उभी करायला charity commissioner ची परवानगी लागते का वगैरे चौकशी करून लवकरात लवकर ही संस्था उभी कर.” बाबा म्हणाले.

निशांत आणि विशाल आता खरोखरच बदलले होते. जीव तोडून काम करत होते. दोघांनी शेणखताची जुळवा जुळव करता करता २०-२५ गुरं पण जमवली. त्यांच्या साठी खास एक तबेला पण तातडीने बांधून घेतला. त्यांना आपल्या कुटुंबामध्ये गेलेली पत  सावरायची होती. त्यासाठीच त्यांचे अथक प्रयत्न चालले होते. शेवटी बाबांचा आपल्या सुनांवरचा विश्वास सार्थ ठरला.

एक दिवस बाबांनी विशालला विचारल की “चॅरिटी कमिश्नर कडे रजिस्ट्रेशन करावं लागतं का याची तू चौकशी केलीस का?”

“हो बाबा,” विशाल म्हणाला “आपण यामध्ये पैशाचा काही व्यवहार करत नाहीये आणि आपल्याच जमिनीवर आणि आपल्याच खर्चानी सगळं करतो आहोत, आणि ते लोक केंव्हाही त्यांची गुरं परत नेऊ शकतात याच बोलीवर आणली आहेत, या कंडिशन मधे  कुठलंही रजिस्ट्रेशन लागणार नाहीये.”

“हे चांगलं झालं. पण या गुरांची नीट काळजी घे, आपल्या गाई, म्हशींपेक्षा जास्त, उद्या कोणी असं नको म्हणायला की आपण हेळसांड केली म्हणून.”

“तुम्ही निश्चिंत रहा. आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ.” – निशांत.

एक दिवस संध्याकाळी शेजारी ज्यांचं शेत होतं ते, विलासराव सहज बाबांना भेटायला आले होते. असंच बोलता बोलता ते म्हणाले की “मी आता मुलाकडे बंगलोर ला जायचं ठरवतो आहे. शेताकडे पाहणं आता जरा कठीण वाटतं आहे. तर तुम्हाला विचारायचं होतं की रावबाजीनी तुमचं शेत कसायला घेतलं होतं, तर हा कसा माणूस आहे? आम्ही त्याला शेत कसायला द्यायचा विचार करतो आहे.” विदिशा त्याच वेळी चहा घेऊन आली होती. तिने जावून सरिताला सांगितलं. म्हणाली “रावबाजी आपल्या शेजारी आला तर आपल्याला त्रासच होणार.” सरितानी थोडा विचार केला आणि म्हणाली की “आपणच कसायला घेतलं तर? तुझं काय मत आहे?” विदिशा काही बोलली नाही, thumbs up ची खूण केली आणि सरळ सरिताचा हात पकडला, आणि दोघी समोर आल्या.

“काका,” सरिता म्हणाली “ बटाईची काय बोलणी झाली आहेत?”

पांच वर्षांची बोली आहे. दरवर्षी ४ लाख देवू म्हणतो आहे.” – विलासराव.

एकरी ४ लाख? सरितानी आश्चर्यानी विचारलं.

“नाही ग पूर्ण १० एकरांचे ४ लाख., पण तू हे का विचारते आहेस?”

“आम्हाला द्या. आम्ही ५ लाख देवू. पण काका आम्हाला तुम्ही १० वर्षांसाठी द्याल तर अजून बरं होईल. आणि दर वर्षी २५ हजार वाढवून पण देवू. रावबाजीला देऊ नका तो लबाड आहे. आमचे पैसे बुडवले त्यांनी.” सरिता म्हणाली.

“हो सांगितलं आत्ताच मला श्रीपतीने. हरकत नाही तुम्ही किती निगुतीने शेती करता आहात हे दिसतच आहे. मग मला पण चालेल. उद्याच कागद करून घेऊ. आपले इतक्या वर्षांचे संबंध आहेत. त्यामुळे माझ्याही डोक्याला टेंशन राहणार नाही.” विलासराव समाधानाने म्हणाले.

दुसऱ्या दिवशी व्यवहार झाला. संध्याकाळी मिटिंगमधे, सगळे उत्सुक होते सरिताचा विचार ऐकायला, की अचानक अजून १० एकर शेती, कसायला  घेतली ती कशाला? मग सरिता बोलायला उभी राहिली.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.