तीन झुंजार सुना
श्रेय
मुखपृष्ठ चित्र सौ. शिल्पा पाचपोर
लेखनास सहाय्य डॉ. अनंत बिजवे
Adv. आनंद मुजुमदार.
पात्र रचना
श्रीपति पाटील कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी
यमुनाबाई. श्रीपतरावांची बायको
प्रताप श्रीपतरावांचा मोठा मुलगा
निशांत श्रीपतरावांचा मधला मुलगा
विशाल श्रीपतरावांचा धाकटा मुलगा
मेघना श्रीपतरावांची मुलगी
सरिता प्रतापची बायको.
वर्षा निशांतची बायको
विदिशा विशालची बायको.
वासुदेवराव सुळे वर्षाचे वडील
विजयाबाई वर्षांची आई.
शिवाजीराव विदिशाचे वडील
वसुंधराबाई विदिशाची आई
आश्विन प्रताप आणि सरिताचा मुलगा
बालाजी आणि सदा शेत मजूर
बारीकराव शेत मजूर
कृष्णा आणि राघू शेत मजूर
दाजी, रखमा आणि सुरेश गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.
रावबाजी ठेकेदार. बटाईदार.
रघुवीर आणि त्यांची गॅंग परदेशी मजूर.
रामशरण रघुवीरच्या गॅंग मधला मजूर.
मंजुळा सदाची बायको.
भाग २९
भाग २८ वरून पुढे वाचा .................
“बरं तुमची तयारी पूर्ण झाली आहे ना, का नुसताच हर हर महादेव चा नारा.” – बाबा.
“मला माहीत नाही, विदिशा टयूशन घेणार आहे माझी. आणि तिला पूर्ण कॉन्फिडंस आहे. आता रिजल्ट आल्यावरच कळेल, की टयूशनचा काय परिणाम झाला आहे ते.” – वर्षा.
“काय ग विदिशा, काय म्हणतेय वर्षा, मग सर्व प्लॅनिंग तयार आहे ना तुझं? नाही तर ऐन वेळी घोटाळे करशील.” – बाबा
“बाबा, तांत्रिक बाजू वर्षांनीच सांभाळायची आहे. त्यातलं मला काही कळत नाही. मी फक्त emotional blackmail कसं करायचं ते सांगणार आहे.” विदिशा म्हणाली.
सरिता हसली. म्हणाली “ चालू द्या, चालू द्या यश घेऊन या म्हणजे झालं.”
दुसऱ्या दिवशी सकाळी जेंव्हा हे चौघेही आले तेंव्हा वर्षा आणि विदिशाचे चेहरे चमकत होते. वर्षानी सरिताला चेक दाखवले. २० -२० लाखांचे ते दोन चेक पाहिल्यावर, सरिताचा चेहरा उजळला. तिने वर्षांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. शाबासकी मिळाल्यामुळे वर्षाला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तिचा फुललेला चेहरा पाहून निशांत पण खूप खुश झाला. म्हणाला “वहिनी आता चिंता करू नका. आता फक्त घोड दौड, बस.” निशांतचं बोलणं ऐकून बाबांना पण खूप बरं वाटलं. ते म्हणाले “ वा निशांत आता मला चिंता नाही. तुमची टीम उत्तम काम करेल असा मला विश्वास वाटतो. Keep it up. All the best.” बाबांनी असे उद्गार काढल्यामुळे निशांत आणि विशाल पण उत्साहित झाले.
आदल्या दिवशी, घरी गेल्यावर, वर्षा आणि विदीशानी मन लावून दोघांच्या आवडीचे पदार्थ जेवणात केले. दोघही खुश झाले होते आणि मन भरे पर्यन्त जेवले. मग वर्षानी, निशांत आणि विशालला आदल्या वर्षांचा ताळेबंद त्यांना नीट समजावून सांगितला. पण त्या आधी विदिशाच्या सुचने प्रमाणे दोघी अश्या काही नटल्या की निशांत आणि विशाल पहातच राहिले. नंतर तर सगळा नजरेचा खेळच चालू होता. रात्र होत आली होती आणि आवडीच्या जेवणामुळे डोळ्यांवर गुंगी येत होती, अश्या वातावरणात वर्षा दोघांना ताळेबंद समजावून सांगत होती, आणि विदिशा विशालच्या बाजूला बसून वर्षाला सपोर्ट करत होती. त्यांनी लावलेल्या पर्फ्यूम चा मंद सुगंध असा परिणाम साधून गेला की दोघांचीही मती गुंग झाली होती. वर्षा सांगत असलेला ताळेबंद, विशालला तर नाहीच पण निशांतला सुद्धा किती कळला हे समजायला मार्ग नव्हता पण वर्षानी आपलं सगळं स्किल पणाला लावलं होतं. दोघांना एवढं नक्कीच कळलं की यात गुंतवणूक करणं फायदेशीर आहे. त्यांनी वर्षाला विचारलं की “आता पांच एकरा ऐवजी ३० एकर आहे म्हणजे आपलं उत्पन्न किती होईल?”
“हे बघ निशांत, मी हे projections आणले आहेत. म्हणजे अनुमानीत ताळेबंद. हे बघ. याच्या प्रमाणे जर काम झालं तर तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही, एवढं उत्पन्न होणार आहे. आणि या projections वरूनच आपल्याला, तुला माहितीच आहे न, की तीन कंपन्यांनी अडवांस दिला आहे. आता त्या माणसांनी आपल्यावर विश्वास ठेवला आहे, म्हणजे नक्कीच आपल्या माला बद्दल, आणि आपल्या कार्य पद्धती बद्दल, त्यांना खात्री वाटली म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचललं असेल ना.” वर्षानी सविस्तर सांगितलं. विदिशानी विशालकडे एक मादक कटाक्ष टाकला आणि विशालनी लगेच होकारार्थी मान डोलावली.
निशांतला अंदाज आला होता पण तरी सुद्धा त्याने विचारलच. “तू एवढं सांगते आहेस, ते कशा करता?”
“निशांत तुला अजूनही कळलं नाही का? अरे आत्ता पैसे फक्त सरिता वहिनींचे लागले आहेत. त्यामुळे नफ्यावर अधिकार त्यांचाच आहे. आपल्याला हिस्सा हवा असेल तर आपला पण पैसा लागला पाहिजे. इक्विटि निशांत, इक्विटि. आपण गुंतवणूक करायलाच पाहिजे, आपली इक्विटि नसेल तर प्रॉफिट शेअरिंग कसं होईल, आपल्याला हिस्सा कसा मिळेल? आपण नुसतीच घोड मेहनत करत राहू, म्हणून गुंतवणूक केल्याशिवाय, काही खरं नाही. आणि दूसरा फायदा म्हणजे, इक्विटि असेल तर आपण आपला मुद्दा पण पुढे रेटू शकतो. आलं का लक्षात?
विदिशा विशालच्या अजून जवळ सरकली आणि खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं की “ विशाल तुला काय वाटतं, तयार आहेस का?”
विशाल आता टोटल विरघळला होता. त्याला विदिशा शिवाय काही दिसतच नव्हतं. केंव्हा एकदा मीटिंग संपते, असं त्याला झालं होत. तो म्हणाला. “मला पटलं आहे वर्षांचं म्हणण, किती गुंतवावे लागतील?”
“प्रत्येकी २० लाख” वर्षा म्हणाली.
काम झालं होतं. वर्षांच्या हातात चेक आले.
निशांत आणि विशालनी अजून दोन ठेकेदारांकडून एस्टिमेट घेतलं, आणि एकाला फायनल केलं. १५ दिवसांत पूर्ण कंपौंड उभं झालं. आता त्यांना धावपळीची सवय होत होती. आता त्यांनी पण निर्धार केला होता की बायकांच्या बरोबरीने कामात सहभाग उचलायचा. सगळी कामं आता वेळच्या वेळी होत होती. निशांत आणि विशाल आता झडझडून कामाला लागले होते. कुठल्याही गोष्टी साठी शेतीचं काम अडणार नाही याची काळजी निशांत आणि विशालची जोडी घेत होती. कामं इतकी होती की संपता संपत नव्हती. एक दिवस वर्षा जेवतांना निशांतला म्हणाली की “निशांत कंटाळा आलाय, आज आपण जरा गावात फिरून येऊ. जमेल का? जरा पाणीपुरी, भेलपुरी खाऊ.” त्या दिवशी संध्याकाळी निशांत आणि वर्षा गावात गेले होते.
गावात जाण्याचं खरं कारण वेगळंच होतं. जातांना वर्षा निशांतला म्हणाली की डॉक्टर कडे जायचं आहे. निशांत हाबकला. म्हणाला “ का? काय होतंय तुला?”
“काही नाही रे, असंच. तू चल तर खरं.” - वर्षा.
आल्यावर वर्षांनी गुड न्यूज दिली. मग काय ! सगळा आनंदी आनंदच. त्या दिवशी सरितानी गोडाचा स्वयंपाक करायला सांगितला. सर्व दूर बातमी पसरली. सर्वांनी वर्षा आणि निशांतचं अभिनंदन केलं.
सरितानी वर्षाला हळूच विचारलं की “काय वर्षा? त्या दिवशीच्या नटण्याचे after effects दिसताहेत” वर्षा लाजून चूर झाली.
मग सरितानी सूचना केली “निशांत, विशाल, आता तुम्ही दोघेही इथेच येऊन रहा. आता वर्षांची काळजी घ्यायला हवी. निशांत, इथे तू सर्व सोईनी युक्त अश्या दोन खोल्या बांधून घे ताबडतोब. आणि तुम्ही लगेच उद्याच शिफ्ट व्हा. आता उशीर नको. आणि वर्षा, तू आता जरा बैठं काम कमी कर, आणि हिंडण्या फिरण्यावर जास्त भर दे.
दुसऱ्या दिवशी सरितानी सदाच्या बायकोला, मंजुळाला बोलावून घेतलं. तिला विचारलं की “काय ग तू बारावी शिकली आहेस ना? केंव्हा झालीस बारावी?”
“हो वहिनी साहेब. दोन वर्षांपूर्वी.” – मंजुळा.
“पुढे नाही शिकलीस?” – सरिता.
“नाही, लग्न झाल्यावर जमलंच नाही.” – मंजुळा.
“कम्प्युटर येतो का?” – सरिता.
“हो. MSCIT चा कोर्स केला आहे.” – मंजुळा.
“ठीक आहे. उद्या पासून वर्षा वहीनीं बरोबर काम करायला सांगितलं तर करशील?”
“हो. आवडीने करीन” मंजुळा
“ठीक आहे उद्या पासून तुझं ट्रेनिंग सुरू.” सरिता.
मंजुळा नाचत नाचतच घरी गेली. तिला खूप आनंद झाला होता. सरिताला पण समाधान होतं की आता वर्षाला मदतनीस मिळाला आहे, आणि तिच्या वरचा कामाचा बोजा थोडा कमी होईल म्हणून. तिने ही गोष्ट वर्षाला सांगितली.
वर्षाही खुश झाली म्हणाली “ वहिनी, किती विचार करता हो तुम्ही सगळ्यांचा! थोडं शिकवावं लागेल तिला, पण नक्कीच आधार होईल. थॅंक यू ”
दुसऱ्या दिवशी दोन्ही जोडपी शेतांवरच्या घरी शिफ्ट झाली. थोडी अडचण होत होती पण वर्षा कडे लक्ष देणं हे आता महत्वाचं होतं. निशांतनी खोल्या बांधण्याचं काम हातात घेतलं. लगेच ठेकेदारांशी संपर्क साधायला सुरवात केली पण होती. सरिताच्या बरोबर आता तिचं पूर्ण कुटुंब होतं. आता ती थांबायला तयार नव्हती. आता संध्याकाळची आढावा बैठक जेवणं झाल्यावर घेण्याचा नवीन शिरस्ता पडला होता.
एक दिवस संध्याकाळच्या बैठकीत सरिताने नवीनच विषय चर्चेला घेतला.
“मला असं वाटतं की आपली दाल मिल आता जवळ जवळ २० वर्ष जुनी झाली आहे. मशीनरी बिघडण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. जुन्या यंत्रावर क्वालिटी चं काम होत नाहीये. कस्टमर पण खूप कमी झाले आहेत, या परिस्थितीत मिल चालू ठेवण्या पेक्षा बंद केली तर ते जास्त फायदेशीर होईल.”
थोडा वेळ कोणीच बोललं नाही. सगळे आपापल्या परीने विचार करत होते. मिल विशालच्या अखत्यारीत येत होती. तो म्हणाला
“काय म्हणतेस वहिनी तू? दाल मिल हे बाबांचं स्वप्न होतं, आणि तू म्हणते आहेस की बंद करू म्हणून. मनात नेमकं काय आहे तुझ्या?”
क्रमश:..
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.