Kirkali - 12 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | किंकाळी प्रकरण 12

Featured Books
Categories
Share

किंकाळी प्रकरण 12



प्रकरण १२
“ कशी चालल्ये केस?” सौंम्याने पाणिनीला तो ऑफिसला आल्या आल्याच विचारलं.
“ सो सो. फार काही ठोस असं नाही अजून. धुरीच्या गाडीतून प्रज्ञा पांडव उतरली आणि डॉ.बंब च्या घराकडे गेली, तिथून झपाट्याने परत आली धुरीच्या गाडीत बसली आणि गाडी वेगात निघून गेली  हे बघणारा साक्षीदार त्यांना मिळालाय ”  पाणिनी म्हणाला.
“ अरेरे!” सौंम्या निराशेने म्हणाली.
“ याचा अर्थ असा नाही होत सौंम्या, की  तिने आत जाऊन डॉ.बंब न मारलं हे त्यांनी सिद्ध केलंय. त्यांच्या गाड्याला वाटतंय की डॉ.बंब त्याला बोलवायला मागच्या दारात गेले,आणि त्यांनी मागचं दार उघडलं असाव, त्याला हाक मारण्यासाठी.पण मला माहित्ये की लीना धुरी बाहेर पडल्यानंतर लगेचच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने  मागचं दार बंद केल्याचं नोकर पुरी ने पाहिलंय.” ”  पाणिनी म्हणाला.
“ आता काय करणार तुम्ही पुढची खेळी?”-सौंम्या.
“ मी अनुमान  डहाणूकर ला साक्षीसाठी बोलावणार आणि सिद्ध करणार की त्याने मागच्या दाराने कुठल्यातरी स्त्रीला बाहेर पडताना पाहिलं. म्हणजे काय होईल प्रज्ञा पांडव ऐवजी आणखी एक  वेगळीच स्त्री  तिथे होती आणि ती मागच्या दाराने बाहेर पडली याला दुजोरा मिळेल आणि पोलिसांना पुन्हा नव्याने तपास करायला कोर्ट आदेश देईल.पण यामुळे लीना धुरीवर संशयाचं जाळं पसरेल. ”
“ पोलीस तिच्या पर्यंत पोचतील?”—सौंम्या
“ मलाच सांगता येणार नाही अत्ता तरी पण मला हा जुगार अत्ता खेळावाच लागेल.”  पाणिनी म्हणाला.
सौंम्या जरा विचारात पडली.
“ कर्णिक कडून काय खबरबात?”  पाणिनीनं विचारलं.
“ काहीच नाही. ”
“ अजून तरी तो पोलिसांकडे किंवा खांडेकरांकडे गेलेला दिसत नाहीये.” पाणिनी म्हणाला.
“ कशावरून?”-सौंम्या
“ खांडेकरांच्या एकंदर बोलण्यावरून जाणवलं.अन्यथा त्यांनी प्रचंड आरडा ओरडा केला असता.”
“ पण सर, प्रज्ञा पांडव ला माहित नाहीये की लीना धुरी डॉक्टरांच्या घरात होती ते.”-सौंम्या.
“ नावाने माहित नाही पण ती तिचं वर्णन करू शकेल व्यवस्थित. अजून तरी या खटल्याबद्दल पेपरात काही छापून आलेलं नाही, फोटो आलेले नाहीत. बेकायदा दत्तक विधानाचा हा घोटाळा पेपरात  एकदा का छापून आला की निनाद आणि लीना धुरी दोघांचेही फोटो येतील, प्रज्ञाला लीना चे फोटो दिसतील, मग ती म्हणेल  कर्णिकला की याचं बाईला मी बंब यांच्या घरातल्या क्लिनिक मधे बघितलं होतं.मग कर्णिक अपॉइंटमेंट रजिस्टर मधलं धुरी हे नाव वाचेल, आणि त्याला सर्व चित्र स्पष्ट होईल.आणि मग तो त्याच्या मागण्या जोराने रेटेल.”  पाणिनी म्हणाला.
“ तसं झालं तर काय होईल?”-सौंम्या.
“ मलाच सांगता येणार नाही अत्ता. बर ते जाऊ दे, पांडव कुटुंबांबद्दल कनक ओजस कडून काय खबरबात?”  पाणिनीनं विचारलं.
“ त्याने मिळवल्ये माहिती. प्रज्ञाचा जन्म दाखला मिळवलाय त्याने.त्यावरून वडिलांची माहिती काढली.ते बऱ्याच वर्षापूर्वी कुटुंबाला सोडून निघून गेलेत.त्यांचा पत्ता नाही पण समीहन पांडव हा तिचा काका आहे. ”
“ कोण हा समीहन?”  पाणिनीनं विचारलं.
“ सेकंड हँड कार विक्री करणारा खूप मोठा डीलर आहे.त्याच्या जाहिराती कायम टीव्ही वर दाखवतात बघा.”
“ अरे हो ! तरीच नाव ऐकल्यासारखं वाटत होतं.”
“ या समीहन च्या बिझिनेसचं वैशिष्ट्य असं की तो फक्त एजंट म्हणून काम करत नाही तर जुन्या गाड्या स्वत:च्या नावाने खरेदी करतो. त्या एकदम चकाचक करतो.आणि ती गाडी उत्तम स्थितीत म्हणजे अगदी नव्याच्या तोडीची करून  नव्या ग्राहकाला विकतो. एखादी जुनी गाडी त्याने एखाद्या ग्राहकाला विकली की एक वर्षानंतर तो पुन्हा ती बाय बॅक पद्धतीने परत घेतो आणि दुसरी गाडी त्या ग्राहकाला विकतो.किमतीतला फरक फक्त ग्राहकाला भरावा लागतो.अशा प्रकारे ग्राहकाला दार वर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या वापरायला मिळतात आणि जुन्या झालेल्या गाडीचं काय करायचं याची चिंता करत बसावं लागत नाही. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे या समीहन ने डॉ.बंब यांना दोन-तीन वेळा जुन्या गाड्या विकल्या आहेत. त्यामुळे बंब आणि समीहन पांडव यांची चांगलीच ओळख आहे.” सौंम्याम्हणाली.
“ ओह ! पण हे कनकने कसं शोधून काढलं?”  पाणिनीनं विचारलं.
“ डॉ.बंब यांच्या गाडीच्या नंबर वरून.त्या गाडीचा आधीचा मालक कोण होता हे त्याने शोधलं त्यातून समीहनचं नाव पुढे आलं.”
“ म्हणजे एक शक्यता आहे की डॉ.बंब यांच्या अपॉइंटमेंट बुक मधील पांडव हे नाव म्हणजे समीहनचं असू शकतं.”  पाणिनी म्हणाला.
“ खरंच की ! ” –सौंम्या
“ प्रज्ञा आणि तिच्या या काकांचे संबंध कसे आहेत?” पाणिनीनं विचारलं.
“ तिच्याकडे सध्या असलेली गाडी तिने समीहन कडूनच घेतल्ये.” सौंम्याने माहिती पुरवली एवढ्यात कनक आत आला.
“ तू शोधून काढलेली माहिती मला अत्ता सौंम्या सांगत होती.”  पाणिनी म्हणाला.
“ माझ्याकडे अजून एक बातमी आहे.” कनक ओजस म्हणाला.
“ काय?”
“  समीहन पांडव  सोमवारी दुपारी डॉक्टरांच्या घरी आला होता ”
“ काय !! ” पाणिनी ओरडला. “ कशासाठी असेल? ”
“ तुला माहित्ये ना  डॉक्टर बंब यांनी त्यांच्या बंगल्यात मासे पाळलेत आणि त्यासाठी सुंदर तळं तयार केलंय. ”
“ हो मी अनुमान डहाणूकर च्या बायको कडून ऐकलंय.त्यात एक सोनेरी मासा आहे आणि एक मांजर तो मासा खायचा सतत प्रयत्न करत असतं वगैरे बडबड मी ऐकली होती. विषयाला सोडून फार बोलते ती.”  पाणिनी म्हणाला.
“ आता हा विषय कसा महत्वाचा आहे ऐक.या तळ्या सारखंच एक तळं समीहनला आपल्या शो रूम मधे बांधायचं आहे.ग्राहकांना आकर्षित करायला आणि त्यात त्याला सोनेरी मासे पाळायाचेत. तर त्याची मापे घ्यायला, सोनेरी माशांना पाणी कसे बदलायला लागते, खाद्य काय द्यायचं इत्यादी गोष्टीवर माहिती घ्यायला तो गेला होता.”
“ ठीक, आणखी काय?” पाणिनीनं विचारलं.
“ तू ज्या डहाणूकर कुटुंबाला भेटलास त्यांचेकडे त्यांची पुतणी राहायला आली आहे तुला त्यांनी सांगितलं होतं बघ! ” कनक म्हणाला.
“ हो आठवलं. सहेली असं नाव आहे तिचं. सतत हार्मोनियम वाजवते म्हणे ती.”  पाणिनी म्हणाला.
“ बरोबर. ती कुणाशीच मिसळत नाही. घरातून बाहेर जात नाही. ती सतत डॉक्टर बंब यांच्या घरी जात असते.त्या तळ्यातल्या सोनेरी माशाचं तिला फार आकर्षण आहे. मी शेजारच्या बंगल्यातल्या काही जणांकडे चौकशी केली तेव्हा कळलं की की पुतणी प्रेग्नंट आहे. ”
“ काय ! ” पाणिनी ओरडलाच.
“ अरे पण ती फक्त एकोणीस वर्षाची आहे असं डहाणूकर म्हणाला होता मला.”  पाणिनी म्हणाला.
“ ती त्यांच्याकडे राहायला आली तेव्हा तेवढी होती ” मिस्कील पणे कनक म्हणाला.
“. दोन तीन गोष्टी एकत्र  विचारत घेतल्या तर काय अर्थ निघतो बघ, कनक, डॉक्टर बंब आणि डहाणूकर यांची ओळख ती दोन कुटुंब शेजारी राहायला येण्या पूर्वी पासून असणे, सहेली प्रेग्नंट असणे, डॉक्टर बंब यांचा अशाच अनधिकृत मुलांना जन्म देणाऱ्या मातांची मुलं, मुले न होणाऱ्या जोडप्यांना विकायचा धंदा असणे. ”
“ सगळंच  डोकं फिरवणारं.” सौंम्या म्हणाली. तेवढ्यात इंटरकॉम वाजला आणि बाहेर अॅडव्होकेट कर्णिक आल्याचं रिसेप्शनिस्ट गती ने कळवलं.पाणिनीने त्याला आत पाठवायची सूचना केली आणि तो आत आला.
“ मी थेट विषयालाच हात घालतो पटवर्धन.” आत आल्या आल्याचं तो म्हणाला.
“ मी निघतो पाणिनी ” कनक म्हणाला आणि बाहेर पडला.
“ प्रज्ञा पांडव मला सांगत्ये की  डॉ.बंब यांचा खून शंभर टक्के त्याच स्त्रीने केलाय जी, प्रज्ञा तिथे असताना बंब यांच्या आतल्या ऑफिसात बसली होती आणि जी नंतर मागच्या दाराने पळून गेली.” कर्णिक म्हणाला. पाणिनीकाय प्रतिक्रिया देतो याचा त्याने अंदाज घेतला पण पाणिनी मख्खा सारखा बसला होता.
“ मागच्या दाराला आपोआप  दार बंद करणारा डोअर क्लोजर बसवला आहे.डॉक्टरांच्या नोकराने दार बंद झालेलं पाहिलं. त्याला वाटतंय की डॉ.बंब त्याला हक मारायला मागच्या दारापाशी आले असावेत आणि नंतर त्यांनीच दार आतून बंद केलं असावं. आतून  कोणी बाहेर गेलं असावं आणि दार बंद झालं असावं असं त्याला वाटत नाही पण तशी शक्यता असल्याचं सुद्धा तो मान्य करतो. ”
पाणिनीने एक जांभई दिली.
“ तुम्हाला आता फक्त प्रज्ञाला पिंजऱ्यात उभं करून सांगायला लावायचं हे सगळं. की तुमच्या अशीला विरुद्धची  केस  आपोआप संपून जाईल.” कर्णिक म्हणाला.
“ न्यायाधीश तिच्यावर विश्वास ठेवतील असं गृहित धरलं तर.”  पाणिनी म्हणाला.
“ मी तिला व्यवस्थित पढवलंय.ती बरोबर साक्ष देईल आपल्याला हवी तशी.डोळ्यात अश्रू आणील , हमसून हमसून रडेल, सर्व काही करेल.” –कर्णिक म्हणाला.
“ आणि मग?”
“ मग काय? हा खटला निकालीच निघेल.तुमचा क्लायंट मुक्त होईल. तर मग आता तुम्ही मला ती गोपनीय माहिती असलेली डायरी द्या.त्यातली माहिती, म्हणजे नावं आपण वाटून घेऊ, जे जे उत्पन मिळेल ते वाटून घेऊ.” कर्णिक म्हणाला.
“ तुम्ही खूपच करताय माझ्यासाठी.”  पाणिनी म्हणाला.
“ तसं पाहायला गेलं तर ही डायरी माझ्या ताब्यात आल्यावर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात तुम्हाला भागीदारी दिली नाही तरी चालणार आहे, कारण ही डायरी माझ्या क्लायंटची आहे, म्हणजे त्यावर माझाच हक्क आहे.”
“ आणि तुमच्या क्लायंटला कुठून मिळाली ही डायरी?”  पाणिनी म्हणाला.
“ स्पष्ट सांगायचं तर तिने ती चोरल्ये डॉ.बंब यांच्या घरातून.पण मी असं दाखवीन की प्रज्ञाला ती रस्त्यात पडलेली सापडली.तिच्या आधी कोणीतरी बंब यांच्या घरातून ती चोरली असावी आणि पळून जातांना ती रस्त्यात पडली असावी.तीच प्रज्ञालामिळाली. ” कर्णिक म्हणाला.
“  मला तुझं काहीच पटत नाहीये आणि मान्य नाहीये.”  पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही कुठल्या परिस्थितीत अडकलाय पटवर्धन, लक्षात घ्या.तुम्ही फक्त पुरावा लपवताय असं नाही तर चोरलेली वस्तू स्वत:कडे दडवून ठेवताय.माझ्या माहितीत अशी काही माणसं आहेत की या गोष्टीचं काय करायचं ते त्यांना बरोब्बर माहिती आहे.” कर्णिक ने दम दिला.
“ खरंच की काय?”  पाणिनीनं विचारलं.  “ तुमच्या क्लायंटला रस्त्यात ती डायरी सापडली असेल तर  ती  चोर ठरू शकत नाही त्यामुळे त्यात मी सुद्धा दोषी ठरू शकत नाही.”
“ माझीच कल्पना माझ्यावर उलटवून स्वत:ला निर्दोष सिद्ध नाही करू शकत तुम्ही.प्रज्ञा माझी अशील आहे आणि मी सांगेन तेच ती बोलेल.रस्त्यात डायरी सापडल्याच ती कबूल करणार नाही मी सांगे पर्यंत. आणि तिने कबूल केलं नाही ते, तर तुम्ही चोरीची वस्तू दडवल्याचा आरोप तुमच्यावर येऊ शकतो. ” कर्णिक म्हणाला.
“  हा माझ्यावर येऊ घातलेला आरोप कसा काढायचा याचा माझ्याकडे प्लान आहे पण त्याची मला तुमच्याशी चर्चा करायची नाही.मी ते कोर्टाला समजावेन. आणि मिस्टर कर्णिक, मला आता सौंम्या बरोबर जेवायला जायचंय. आणि आम्हाला दोघांनाच जायचंय. मी पण येतो असं निर्लज्जपणे म्हणू नका.तेव्हा तुम्ही आता निघा. ”  पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही मला नेहेमीच कमी लेखता.पण आपण पुन्हा भेटू आणि तुम्हालाच गरज लागेल मला भेटायची.” कर्णिक म्हणाला आणि बाहेर पडला.
“ मला भीती वाटायला लागल्ये.” सौंम्या म्हणाली. “ जर कर्णिक म्हणाला तसं प्रज्ञा ने चोरी कबूल केली आणि ती डायरी तुमच्याकडे दिली म्हणून सांगितलं तर?”
“ ती माझ्याकडे ‘मिळाली’ तर मी अडचणीत येईन ” पाणिनी  द्वैअर्थी बोलला.
( प्रकरण १२ समाप्त.)