Kirkali - 5 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | किंकाळी प्रकरण 5

Featured Books
Categories
Share

किंकाळी प्रकरण 5




प्रकरण ५
मोजून पंधरा मिनिटांनी सौंम्याने प्रज्ञा पांडवच्या दाराची बेल वाजवली होती.दारात एक सुंदर स्त्री उभी होती.
“ यस? काय हवयं?” तिने विचारलं.
“ मी अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन.”
“ बरं मग?” तिने विचारलं.आणि त्याच्या मागच्या सौंम्याकडे पाहिलं.
“ ही माझी सेक्रेटरी सौंम्या सोहोनी.”
तिच्या तोंडावर पुसटसं हास्य उमटलं.
“ आम्ही आत येऊ का?”  पाणिनीने विचारलं.
“ सॉरी, माझा अजून स्वयंपाक व्हायचाय.आणि नंतर मला एकाला भेटायला जायचंय”
“ मला बोलायचंय”  पाणिनी म्हणाला.
“ खरंच वेळ नाही.”
“ डॉक्टर बंब यांच्या बद्दल.”  पाणिनी म्हणाला.
क्षणभरच तिच्या चेहेऱ्यावर जरासा संभ्रम दिसला पण पटकन ती म्हणाली, “ मला कोणी डॉक्टर बंब वगैरे माहित नाहीत.”
“ माहित्येत तुला.”  पाणिनी म्हणाला. आणि तिने मान हलवून नाही म्हंटलं.
“ आणि निनाद धुरी बद्दलही. ”  पाणिनी म्हणाला.
“ धुरी?...धुरी... धुरी...” तिने आठवायचा प्रयत्न करत म्हंटलं. “ पटवर्धन, तुम्ही दुसऱ्याच कोणत्या पांडव कडे आला नाहीत ना?”
“ प्रज्ञा पांडव तूच आहेस ना? ”
“ हो.”
“ मग तुझ्याच कडे आलोय. ”
“ पण मग मला हे दोघेही माहित नाहीत.बंब नाहीत आणि धुरी पण नाही.त्यातल्या त्यात धुरी हे नाव कानावरून गेलंय असं वाटतंय पण सांगता येत नाही.”-पांडव म्हणाली.
“ तू नुकतीच फोर्ड गाडी घेतल्येस?”  पाणिनीने विचारलं.
“ हो.पण त्याचा काय संबंध ? आणि आता फार झालं पटवर्धन, मला खरंच वेळ नाहीये.मला बाहेर जायचंय.” तिने दार बंद करण्याचा प्रयत्न केला पण पाणिनीने आपला पाय मधे घातला.
“ जोरात ओरडून माणसं गोळा करू का मी?” ती किंचाळत म्हणाली.पाणिनी पटवर्धन आणि सौंम्या आत आले.
“ दार लावून घे सौंम्या.”  पाणिनी म्हणाला.
“ हे फार म्हणजे फारच होतंय.पोलिसांना बोलावू का मी?” प्रज्ञा पांडव म्हणाली.
“ अगदी माझ्या मनातलं बोललीस. बंब यांच्या घरी घडलेल्या घटनेबंबत  चौकशी करायला आज न उद्या ते इथे येणारच  होते, त्यापेक्षा अत्ताच येऊन जाऊ देत. ”  पाणिनी म्हणाला. ही मात्रा बरोबर लागू पडली.तिला धक्का बसला.
“ तुम्ही कशा बद्दल बोलताय?”
“ तासापूर्वी डॉक्टर बंब गेले.”
“ मेले तर मेले.असे हजार  डॉ.बंब गेले तरी मला काय फरक पडतो? ”
“ आणि धुरी सापडत नाहीये.” तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता  पाणिनी म्हणाला.
“ बर मग?” प्रज्ञा ने विचारलं.
“ डॉक्टर गेल्यामुळे तुला जराही दु:ख वाटलं नाही?” अचानक तिच्या खांद्यावर थोपटत  सौंम्याने विचारलं,आणि तिचा बंध फुटला.ती खाली कोसळली. डोळे अश्रूंनी डबडबले.
“ तू आता खर काय घडलं ते सांगावस हे उत्तम.पण आधीच तुला सांगून ठेवतो की मी तुझा वकील होवू शकत नाही.दुसरा कोणीतरी माझा क्लायंट आहे त्यामुळे तू मला जे सांगशील ते मी गुप्त ठेवीनच असं नाही.” पाणिनी म्हणाला आणि सौंम्याकडे बघत त्याने खात्री केली की ती त्यांच्यातले सगळे संवाद आता तिच्या छोट्या डायरीत लिहून घेत होती.
“ पटवर्धन. सॉरी, खरं तर मी धुरी ना ओळखते.डॉ. बंब ना नाही.”
“ तू काल रात्री कुठे होतीस?” पाणिनीने विचारलं.
“ माझी नवीन गाडी घेऊन मी बाहेर फिरायला गेले होते.मला वाटलं त्यात बऱ्यापैकी पेट्रोल असेल पण माझा अंदाज चुकला आणि गाडी बंद पडली.मला पंपावर जायला लागलं चालत, पेट्रोल आणायला. कॅन मधे पेट्रोल भरून कार कडे जात असताना हा धुरी नावाचा माणूस मला भेटला.मी आधी कधीच त्याला पाहिलं नव्हतं. त्याने मला लिफ्ट दिली माझ्या गाडी पर्यंत.पण तिथे आलो तेव्हा गाडी जाग्यावर नव्हती.कुणीतरी ती चक्क चोरली होती !  ”
“ पेट्रोल नसलेली कार ? ”  पाणिनीने विचारलं.
“ कुणीतरी त्यात पेट्रोल टाकून नेली असावी किंवा टोव्ह करून पळवली असावी. मला धुरीने हॉटेलात नेऊन रहायची सोय केली आणि स्वत: घरी गेला.अत्यंत सज्जन माणूस निघाला तो.माझ्याशी काहीही लगट करायचा प्रयत्न केला नाही त्याने. सकाळी लवकर उठून मी बाहेर पडले त्या हॉटेलातून. जरा जास्तच चालले. लांब गेल्यावर मला टॅक्सी मिळाली आणि मी घरी आले. ”
“ गाडीचं काय ?”
“ रस्त्यालगतच्या एका प्लॉट मालकाकडून  मधून मला फोन आला.त्यांच्या जागे समोर माझी कार लावल्यामुळे त्यांच्याकडे येण्या जाणाऱ्याना  अडथळा निर्माण होतं होता अशी त्यांनी तक्रार करून मला कार हलवायला सांगितली.माझ्या कार नंबर वरून त्यांनी माझं नाव आणि फोन  शोधला असावा.”-प्रज्ञा पांडव म्हणाली.
“ रात्री तू कुठल्या हॉटेलात राहिलीस?”  पाणिनीने विचारलं.
“ नाव नाही लक्षात.”
“ कुठे होतं ते सांगता येईल?”
“ मी जर ते पाहिलं पुन्हा तर आठवेल.”
“ पुन्हा पुन्हा तुला विचारतोय, डॉ.बंब तुला माहित नाहीत?”
“ खात्री आहे माझी.त्यांच्या बद्दल मी ऐकलं पण नाही कधी. ”
“ तुला आधी तुझ्या कारला तात्पुरता नंबर मिळाला असेल ना?”  पाणिनीने विचारलं.
“ हो.”
“ कायमचा नंबर मिळाल्यावर नंबर प्लेट कोणी लावली कारला?”
“ काय फरक पडतो त्यांनी?”
“ बराच पडतो.”
“ एका ओळखीच्या माणसाने बसवली. अशी किरकोळ कामे करणाऱ्या माणसाने. काय महत्वाचं आहे का त्यात?” –प्रज्ञा.
“ ज्याने ती बसवली त्याच्या लक्षात राहिलाय गाडीचा नंबर. लक्षात घे, गेल्या शुक्रवारी तू डॉ.बंब च्या घरी गेली होतीस.तू पुढच्या दाराने न जाता मागच्या दाराने गेलीस.तिथे त्यांचा घरगडी होता त्याला मस्का मारून तू त्याच्याकडून नंबरप्लेट  बसवून घेतलीस.”  पाणिनी म्हणाला. सौंम्याने तिच्या चेहेऱ्याकडे पाहिलं.आपण पकडले गेल्याची जाणीव तिच्या चेहेऱ्यावर दिसली.
“ डॉ.बंब यांचा खून झालाय. तुला त्यांच्या घरातून  पळत बाहेर पडताना शेजाऱ्यांनी पाहिलंय.तुझ्याकडे फार वेळ नाहीये.पोलीस कधीही येतील इथे. काही मिनिटात, किंवा काही दिवसात.पण येणार हे नक्की. तू तुझी संपूर्ण हकीगत का नाही सांगत मला? अर्थात नाही सांगितलीस मला तरी चालेल कारण माझा क्लायंट वेगळा आहे.पण पोलिसांना सांगावीच लागेल ती तुला.”
“ तुम्ही धुरी ची वकिली घेतल्ये ,मला माहित्ये.मला धुरी म्हणालाच होता की काही भानगड झाली आणि ती तुमच्या लक्षात आली तर पेट्रोल आणि कार चोरी बंबत च्या त्याने सांगितलेल्या गोष्टीला मी पूरक असे समर्थन द्यावे.” –प्रज्ञा पांडव म्हणाली.
“ कधी म्हणाला हे तो तुला?”  पाणिनीने विचारलं.
“ अर्ध्या तासापूर्वी.”
“ इथे आला होता तो ”  पाणिनीने विचारलं.
“ नाही. फोन केला होता त्याने ”
“तू असं तुटक तुटक आणि मी विचारतोय तेवढेच सांगते आहेस. एकदाच सगळी काही हकीगत सांगून टाक ना .”  पाणिनी म्हणाला.
“ मी कियान ची सावत्र बहिण आहे.”
“ कियान कोण?निनाद धुरी शी काही नातं आहे?” 
“ मुलगा आहे तो त्याचा.”-प्रज्ञा म्हणाली.
“ बोल पुढे.” 
“ मी हे शोधून काढू शकले  कारण कियान शी माझा संबंध आला. मला त्याच्यात इंटरेस्ट होता. डॉक्टर बंब हे एक लहान मुलांचा कारखाना चालवायचे जणू.”
“ म्हणजे ?”- पाणिनीने विचारलं.
“ त्यांची दोन हॉस्पिटल्स होती. ज्याना मूल  झालंय पण ते नको असायचं  अशा स्त्रियांसाठी एक हॉस्पिटल होतं. दुसरं हॉस्पिटल हे मूल होऊ न शकणाऱ्या  पण हवं असणाऱ्या उच्चभ्रू श्रीमंत स्त्रियांसाठी होतं. अशा स्त्रिया तिथे अॅडमिट होत असत. पहिल्या हॉस्पिटल मधे मुलाला जन्म दिल्यावर   तेथील मूल डॉक्टर बंब श्रीमंत स्त्रियांना  विकत असत. हे सर्व इतकं गुप्तपणे आणि अस्खलितपणे चालत असे की कुणालाही कळत नसे.त्यांचा सगळा स्टाफ त्यांना सामील होता.ही दोन्ही हॉस्पिटलस वेगवेगळ्या दोन डॉक्टरांच्या मालकीची आहेत पण हे सर्व कागदावर. मागील दाराने डॉ.बंब हेच मालक आहेत.”
“ तुला माहिती आहेत या डॉक्टरांची नावं?”  पाणिनीने विचारलं.
“ नाही.”
“ठीक आहे. सांग पुढे” 
“ डिलिव्हरी आणि त्यातून जन्मलेलं मूल दुसऱ्या इच्छुक बाईला देणं अशा सगळ्या प्रकरणात डॉक्टर बंब दहा लाखापेक्षा कमी रक्कम घेत नसत.” 
“ डॉक्टर बंब यांचा खून झाल्याचे तुला माहिती होतं ?”
“ हो.”  प्रज्ञा म्हणाली.
“ मी सांगण्या पूर्वी?”
“हो.” 
“ कुणी सांगितलं होतं तुला?” 
“धुरीने”
“कधी नेमकं?”   पाणिनीने विचारलं.
“जेव्हा थोड्या वेळापूर्वी त्यांन फोन केला होता तेव्हा.” 
“ हे बघ नीट ऐक, या माणसाचा वकील मी असणार आहे. या माणसाची आणि माझी भेट होणं फार आवश्यक आहे आणि तीही अत्यंत तातडीने होणे आवश्यक आहे संपूर्ण दुपार उलटून गेली तरी तो त्याच्या ऑफिसमध्ये गेलेला नाही, फोनला तो उत्तर देत नाही. मला सांग मी कुठे भेटू येऊ शकतो त्याला?” 
“सॉरी मिस्टर पटवर्धन. मला नाही सांगता येणार त्याने स्वतःला दडवून ठेवलंय.”
“का पण ?”
“पोलिसांना तोंड द्यायला लागेपर्यंत परिस्थिती  निवळावी म्हणून.” ती म्हणाली. 
पाणिनी पटवर्धन अस्वस्थपणे फेऱ्या मारू लागला. मनात विचारांचे काहूर होतं. अचानक चालता चालता तो थांबला आणि प्रज्ञाला म्हणाला, 
“तुझ्या कियान बद्दल आणखीन काही सांग मला. काल रात्री काय घडलं? आणि निनाद धुरी आणि तुझी भेट कशी झाली त्याबद्दल पुन्हा एकदा सांग .”
“ मला आई नाहीये मिस्टर पटवर्धन. म्हणजे मला ती आठवतच नाहीये. पहिल्यापासून माझ्या वडिलांनीच माझा सांभाळ केला. तेच माझे आई वडील आणि त्याहून माझे मित्र बनले. अनेक बरे वाईट प्रसंग आम्ही एकमेकांबरोबर घालवले आहेत. पर्यटनाला गेलोय. आठ वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी परत लग्न केलं. हे लग्न झाल्यानंतर साधारण वर्षभराच्या काळात  माझ्या वडिलांना  त्यांच्या भागीदाराने आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे रसातळला नेलं. त्यांचं आयुष्य उध्वस्त केलं. वडिलांच्या ही गोष्ट लक्षातच आली नाही ते त्यांच्या तरुणपणच्या काळासारखेच सतत उल्हासित आणि साहसाची आवड असणारे होते. परंतु वय लपत नसतं. ते थकत चालले होते तरीसुद्धा या घटनेनंतर ते परदेशात एका मोठ्या बिजनेस डील साठी गेले ती मोहीम यशस्वी झाली असती तर त्याना खूप पैसा मिळणार होता. ते गेल्यानंतर काही आठवड्यानंतर आम्हाला बातमी आली की त्यांचा तिकडेच मृत्यू झाला. त्यांनी ज्या स्त्रीबरोबर लग्न केलं होतं ती गरोदर होती. मी त्यावेळेला सतरा वर्षाची होते. आमच्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते. मी शॉर्ट अँड टायपिंग शिकून घेतलं होतं मी कसाबसा उदरनिर्वाह चालू ठेवला.”
“मी माझ्या सावत्र आईला सांगितलं की मी तुला आधार देईन. तिने डॉक्टर बंब यांच्या तथाकथित हॉस्पिटल बद्दल ऐकलं होतं. तिथं दिल्या जाणाऱ्या त्या विशेष सेवेबद्दलही ऐकलं होतं. तर तिथे जाऊन तिनं मुलाला जन्म दिला आणि मला एक सावत्र भाऊ मिळाला. पण ज्याला मी कधीच पाहिलं नाही. माझी सावत्र आई त्यापुढे एक दोन महिनेच जगली आणि गेली . मला माहिती होतं की कियान ला जन्मानंतर कुठल्यातरी दुसऱ्या आईकडे सोपवलं गेलं आहे. पण माझ्याकडे कुठलाच रेकॉर्ड उपलब्ध नव्हतं आणि एका प्रसंगातून अचानक डॉक्टर बंब अशा प्रकारचे उद्योग करत असल्याचे माझ्या कानावर आलं. कियानचा जन्म कधी झाला आहे मला आठवत होतं. त्या दिवशी जन्मलेल्या सर्व मुलांचे जन्माचे दाखले मी मिळवले. माझ्या सुदैवाने त्यादिवशी फक्त एकच जन्म दाखला मला मिळाला म्हणजेच एकाच बाळाचा जन्म झाल्याचं रेकॉर्ड दाखवत होतं की ज्यावर डॉक्टर बंब यांची सही होती. निनाद आणि लीना च्या मुलाच्या जन्म दाखल्यावर.”
“एकदा माझ्या मनात विचार आला की धुरी नवरा बायकोची भेट घ्यावी. मी कोण आहे याचा परिचय न देता. म्हणजे मला त्यांच्या मुलाला म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांच्या मुलाला बघता येईल. माझ्याच वडिलांसारखा तो दिसतोय का, तसाच उत्साही आहे का ,आकर्षक आहे का? हे बघायची मला फार उत्सुकता होती. पण नंतर माझ्या मनात आलं असं न केलेलं बरं.” प्रज्ञा म्हणाली 
“पण नेमका निर्णय काय घेतलास? म्हणजे काय केलस तू?”   पाणिनीने विचारलं.
“ मी डॉक्टर बंब यांना भेटायला गेले. मी कोण आहे याचा परिचय त्यांना दिला. आणि मला काय हवं होतं हे त्यांना सांगितलं.” 
“काय हवं होतं तुला?”- पाणिनीने विचारलं. 
“मला एवढीच खात्री करून घ्यायची होती की कियान आनंदात आहे ना. आणि त्याला चांगलं घर मिळाले आहे ना .”
“ बर मग काय झालं पुढे?”  पाणिनीने विचारलं.
“मी हे सांगितल्यावर डॉक्टर एकदम हादरले पण मी त्यांना नीट समजावून सांगितलं की माझ्या भावना काय आहेत. हे सांगितल्यावर ते एकदम टेन्शन मुक्त झाले..”
पाणिनी पटवर्धन काही न बोलता शांत बसून प्रज्ञाकडे बघत राहिला.ती पुढे बोलू लागली.
“या डॉक्टरांचा जो सहाय्यक डॉक्टर होता तो ड्रग अॅडिक्ट होता. आणि त्याला पैसे हवे होते. डॉक्टर बंब ना कळलं की मी थोडी फार डिटेक्टिव गिरी करून कियान बद्दल शोधून काढलंय. ते माझ्याशी सहकार्य करायला तयार झाले. त्यांनी मला रिसेप्शन मधे बसायला सांगितलं. त्याचं रेकॉर्ड तपासलं.ते पाहून  त्यांनी मला हमी दिली की कियान एकदम आनंदात होता. त्याला चांगलं कुटुंब मिळालय आणि भविष्यात जर काही त्याला अडचण येते आहे असं त्यांना वाटलं तर ते नक्कीच माझ्याशी संपर्क करतील. त्यांनी एवढी खात्री दिल्यानंतर मलाही बरं वाटलं आणि मी ठरवलं की कियानला प्रत्यक्ष भेटण्याऐवजी आणि त्याच्याशी ओळख करून घेण्याऐवजी मी पडद्यामागेच राहीन आणि त्याच्या खुशालीची माहिती घेत राहीन.”-प्रज्ञा  
“बर मग ?”  पाणिनीने विचारलं.
“ मागच्या शुक्रवारी डॉक्टर बंब यांनी मला फोन केला. मला म्हणाले की फार काळजी करण्यासारखं कारण नाहीये पण कोणीतरी त्यांना ब्लॅकमेल करतय. धुरी च्या प्रकरणात काय घडलं आहे हे त्या माणसाला समजलं होतं, पण त्याच्याकडे ठोस असे पुरावे नव्हते.” 
“एक मिनिट- एक मिनिट.” पाणिनी मध्येच म्हणाला. “ डॉक्टरनी  नेमकं काय शब्द वापरले?  धुरीच्या केस मध्ये की सर्वच केसेस मध्ये? आणि तू धुरीच्या केस मध्ये रस घेत असल्यामुळे त्यांनी तुला फोन केला का?”  पाणिनीने विचारलं. 
“नाही. ते म्हणाले की ब्लॅकमेलरला फक्त धुरीच्या केस मध्येच रस होता.” 
“ठीक आहे तू काय केलंस ?”  पाणिनीने विचारलं.
“ मी त्यांना जाऊन भेटले. नंतर काल दुपारी मी निनाद धुरी यांना त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला. मी त्यांना सांगितलं की अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी मला भेटायचं आहे त्यांना. त्यांच्या मुलाच्या संदर्भात.”-प्रज्ञा. 
“ बर. पुढे काय झालं ?”
“त्यांना एकदम धक्काच बसला. ते मला म्हणाले. त्यांच्या सेल्स ऑफिसर ची एक मीटिंग त्यांनी बोलवली आहे त्यामुळे रात्री अकरा पर्यंत ते त्याच्यात अडकलेले आहेत त्या नंतर जर भेटता आलं तर बर होईल.”
“ कुठे भेटायचं ठरलं ?”
“ त्यांची मीटिंग ज्या ठिकाणी होती तिथे. राजहंस एकर्स.मी माझी गाडी घेऊन गेले तिथे.”
“ तिथे भेट झाली तुमची?”  पाणिनीने विचारलं.
“ हो. भेटल्यावर काय झालं होतं हे मी त्याना सांगितलं. आम्ही ठरवलं की डॉक्टर बंब यांना जाऊन भेटायचं. आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा घरात लाईट लागलेला होता. धुरीचं असं म्हणणं पडलं की आधी मी एकटीने पुढे जावं आणि आत सगळं काही अलबेल आहे ना पाहावं. त्याला भीती वाटत होती की तिथे अजून कोणीतरी असेल दुसरा. कोणीतरी असेल तर त्यांनी मला म्हणजे धुरीला बघू नये, अशी त्याची इच्छा होती.”
“ मग काय केलं तुम्ही?” 
“धुरीने त्यांची गाडी रस्त्यावर बाजूला लावली. मी खाली उतरले आणि डॉक्टरांच्या मागच्या दारात जाऊन बेल वाजवली. पण नंतर पुढच्या दाराने जायचं ठरवलं ते दार उघडच होतं मी दार उघडून आत गेले.”
“आणि?”  पाणिनीने विचारलं.
“ आणि आता मी तुम्हाला जे सांगणार आहे मिस्टर पटवर्धन, ते अगदी सत्य सांगणार आहे.” 
“तेच तर मला हवंय.”- पाणिनी म्हणाला. 
“पुढच्या दारने आत जाऊन मी थोडा वेळ रिसेप्शन मध्ये बसले. बसल्यानंतर मिनिटाभरातच मला आतल्या खोल्यांपैकी कुठल्यातरी खोलीतून झटापट किंवा मारामारी झाल्याचे आवाज ऐकू येऊ लागले. पायाचे जोरात आवाज. मध्येच एखादा फटका किंवा ठोसा मारण्याचा आवाज. आत नक्की काहीतरी घडत होतं आणि मला एकदम एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली.” 
“तुला स्त्रीची किंकाळी ऐकू आली?” आश्चर्याने पाणिनीने विचारलं. 
“हो मिस्टर पटवर्धन.” 
“म्हणजे तू स्वतः  किंचाळली नाहीस?” 
तिने नकारार्थी मान हलवली. 
“मी घाबरून दाराकडे पळाले.” 
“पुढच्या दाराकडे?”  पाणिनीने विचारलं.
“नाही. आतल्या दाराकडे म्हणजे जिथून आवाज येत होता त्या बाजूला.” 
“बरं. पुढे काय घडलं ?”  पाणिनीने विचारलं.
“ मी आतलं दार उघडलं आणि आत मध्ये एक शरीर.....  ते डॉक्टर बंबच होते. आणि एक पाठमोरी स्त्री त्यांच्याजवळ उभी होती ती खाली वाकली होती.” 
“तिचा चेहरा पाहिलास?” 
“थेट चेहरा नाही पण एका बाजूने दिसला .” –प्रज्ञा.
“ वर्णन करता येईल तुला? ”
“ साधारण तिशीच्या घरातील वाटत होती. चांगली तयारीची वाटत होती. किंचित वर झुकलेल नाक. गडद काळे केस आणि भुवया. फार जाड किंवा स्थूल नव्हती फार बारीकही नव्हती.” 
“ पुढे काय घडलं?” 
“ ती एकदम बाहेर पळून गेली.” 
“ नंतर ?”
“मिस्टर पटवर्धन त्यानंतर मी अशी काही गोष्ट केली की ती मी करायला नको होती पण मला ती करणं आवश्यकच होतं.” 
“कुठली गोष्ट ?”
“ डॉक्टर बंब यांचं रेकॉर्ड मी चोरलं ” 
“म्हणजे त्यांचा खाजगी रेकॉर्ड?”  पाणिनीने विचारलं.
“ हो.”
“ म्हणजे कुठलं  नक्की?” 
“म्हणजे ते जे एकमेव रेकॉर्ड ठेवत असत, त्यांनी अनाधिकृतपणे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जन्माला घातलेली मुले कोण आणि ती कुणाला देत त्याचं रेकॉर्ड .”
“ असं काही रेकॉर्ड त्यांनी ठेवलंय हे तुला कसं कळलं ? ”
“ मी जेव्हा प्रथम त्यांना भेटायला गेले होते आणि कियान चांगल्या घरात पडला आहे ना तो सुखात आहे ना याची खात्री करून घेण्यासाठी मी आले आहे असं त्यांना म्हणाले होते त्या वेळेला त्यांनी मला थोडा वेळ बाहेर बसायला सांगितलं होतं त्याला वाटलं होतं की मी रिसेप्शन मध्ये बसले असेन परंतु मी त्यांची नजर चुकवून त्यांच्याच घरातल्या एका खोलीत लपले होते. आणि दार थोडं किलकिलं केलं होतं. कियान ची माहिती काढण्यासाठी त्यांनी रेकॉर्ड कुठे ठेवलं होतं त्या दिशेने ते गेले तेव्हाच मी बघून ठेवलं होतं. त्यांचं सर्व रेकॉर्ड उत्कृष्टपणे बाईंडिंग केलेल्या रजिस्टर मध्ये ठेवलेलं असे. पण कियानची माहिती काढण्यासाठी त्यांनी एक अत्यंत साधं दिसणार फाटकं तुटक असं  कॉम्ब बाईंडिंग असलेलं रजिस्टर उघडलं. म्हणजे कोणी कल्पनाही करू शकणार नाही  की केवढं महत्त्वाचं रेकॉर्ड ते आशा रजिस्टर मध्ये ठेवत असतील. ते रजिस्टर उघडून त्यांनी ते रेकॉर्ड तपासलं होतं मी ते सर्व दाराच्या आडून बघत होते.” 
“ अच्छा म्हणजे तुला त्यांचं मास्टर रेकॉर्ड कुठे आहे ते समजलं होतं.” 
“हो.” 
“ मग तू काय केलंस? ” 
“ या बाईला मी त्यांच्या खोलीत पाहिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की ती बाई सुद्धा याच रेकॉर्डच्या मागे होती. कारण तिजोरीचं दार उघडं होतं. आणि आतली सर्व कागदपत्र,  दस्तऐवज फरशीवर पडलेले होते. मला खात्री होती की जेव्हा ती मागच्या दाराने पळाली तेव्हा तिने त्यातल्या काही वह्या, रजिस्टर,. तिच्याबरोबर घेतल्या होत्या तिला वाटत होतं की तिला जे रेकॉर्ड हवं होतं ते त्यातच असेल. तिथे काही वेळात पोलीस येतील याचा मला अंदाज होता आणि एकदा का ते रेकॉर्ड म्हणजे मुलांच्या नोंदी असलेलं, पोलिसांच्या ताब्यात गेलं म्हणजे काय झालं असतं विचार करा. म्हणजे फक्त कियानचाच विचार माझ्या मनात नव्हता तर त्याच्यासारख्या असंख्य मुलांचा विचार माझ्या मनात होता. काय मंथन चाललं असेल माझ्या मनात तुम्ही समजू शकता मिस्टर पटवर्धन. त्या मुलांना वाटत असतं आपण आपल्या खऱ्या पालकांच्या घरी सुरक्षित आहोत आणि नंतर अचानक त्यांना कळतं की आपण दत्तक पुत्र आहोत ! तर या सगळ्यात पोलीस काय करतील हा भाग वेगळाच.” 
“तर मग तू ते मास्टर रेकॉर्ड घेतलंस?”  पाणिनीने विचारलं.
“ मी घेतलं. ते माझ्या ड्रेसमध्ये ते मी लपवलं आणि जेवढं लवकर बाहेर पडता येईल तेवढे त्या घरातून मी बाहेर पडले मला माहिती होतं की आत मध्ये खूप मारामारीचे आवाज, काहीतरी पडल्याचे आवाज ऐकून शेजार-पाजारी जमा होतील आणि ते पोलिसांना बोलवतील. मला जाणीव झाली की डॉक्टर बंब यांच्यासाठी मी काही करू शकत नाही आणि तिथे थांबून स्वतःला अडकवून घेण्याचाही माझा विचार नव्हता. मी झपाट्याने धुरीच्या कार मध्ये बसले. काय घडलं ते त्याला सांगितलं.  मला तातडीने लपण्याची आवश्यकता होती. मग त्याने मला हायवे वरच्याच एका हॉटेलमध्ये नेलं. आम्ही नवरा बायको म्हणून तिथे नाव नोंदवलं आणि धुरी घरी गेले.दुसऱ्या दिवशी पहाटेच ते आले. मला हॉटेलातून घेऊन गेले.माझी गाडी जिथे लावली होती, राजहंस एकर्स या ठिकाणी तिथे मला सोडलं, मी माझ्या गाडीत बसून माझ्या घरी गेले.”
“आणि तुला जर कोणी काही प्रश्न विचारले, तर तू काय सांगायचं हे धुरीने तुला सांगितलं?”  पाणिनीने विचारलं.
“हो. म्हणजे गाडीतलं पेट्रोल संपलेलं असणं, मी पेट्रोलचा कॅन हातात धरून रस्त्याने चालणं, वगैरे सर्व.” प्रज्ञा म्हणाली. 
“तुला डॉक्टर बंब यांच्याकडे जे गोपनीय रेकॉर्ड मिळालं त्याबद्दल तू धुरीला सांगितलंस?”
“त्याबद्दल मी कुणालाही सांगितलेलं नाही.” 
“कुठे आहे ते रजिस्टर अत्ता?”
“माझ्याकडे आहे.” प्रज्ञा म्हणाली. 
पाणिनीने मान हलवली. “मी तुला शोधून काढलय, पोलीस सुद्धा तुला शोधून काढतील. ही काही फक्त हल्ल्याची केस नाही. ती खुनाची केस झाली आहे. तुझ्यावर खुनाचा आरोप येणार आहे.” 
“माझ्यावर?  प्रज्ञा ओरडली.” 
“नक्कीच. तुला काय वाटतं?” 
“मिस्टर पटवर्धन, जिने खून केला डॉक्टर बंब यांचा, तीच ती किंकाळी फोडलेली बाई होती. जी मला त्यांच्या क्लिनिकमध्ये दिसली.”
“हे बघ तुला तुझ्या कियान बद्दल काळजी होती, त्याची माहिती काढण्यासाठी तू डॉक्टर बंब यांच्या क्लिनिकमध्ये गेलीस, तूच सांगितलेल्या गोष्टीवरून तुला मी हे सांगतोय. ते काय विचार करतील लक्षात घे. निनाद धुरीनेच तुला हे रेकॉर्ड शोधून काढण्याच्या कामावर नेमलं होतं. तुझं म्हणणे आहे की किंकाळी फोडणारी दुसरीच एक स्त्री तिथे होती. तू नव्हतीस .
घडलंय असं की शेजाऱ्यांनी फक्त ‘एका’ बाईची  किंकाळी ऐकली आहे. ती कोण हे महत्वाचं नाहीये. पोलीस असं गृहीत धरतील की एका विशिष्ट हेतूने, म्हणजे ते रेकॉर्ड चोरण्याच्या हेतूने तू डॉक्टर बाबांच्या क्लिनिक मध्ये गेलीस. त्यांनी पुढचं दार उघडच ठेवलं होतं. तिथून तू रिसेप्शन रूम मध्ये गेलीस. आणि तिथून क्लिनिकच्या आतलं दार उघडलंस. डॉक्टर बंब हे कदाचित घरातल्या आतल्या भागात असावेत. तुला संधी मिळाली ते रेकॉर्ड चोरण्याची. तू ते रेकॉर्ड चोरायचा प्रयत्न केलास तेवढ्यात डॉक्टर बंब बाहेर आले. आणि तू रेकॉर्ड चोरत असताना त्यांनी तुला पकडलं. तुमच्यात झटापट झाली. तू त्यांच्या डोक्यात काहीतरी जड वस्तू मारलीस, फुलदाणी वगैरे. कदाचित  ठार मारण्याच्या हेतूने नाही पण त्यांनी तुला पकडू नये या हेतूने. पण तू ती इतकी जोरात मारलीस की ते खाली पडले. त्यानंतर तू घाबरून किंचाळलीस आणि तशीच मागच्या दाराने पळून बाहेर गेलीस.”  पाणिनी म्हणाला.
“पटवर्धन साहेब मी तुम्हाला खरंच सांगते तिथे दुसरी बाई होती.” 
“असेलही कदाचित पण तू माझ्याशी खोटं बोलत्येस.”  पाणिनी म्हणाला.
“म्हणजे ? काय म्हणायचंय काय तुम्हाला ?” ती किंचाळून म्हणाली.
“तू म्हणतेस की तू आणि धुरी डॉक्टर बंब यांना भेटायला गेलात. तू काही त्यांची आधी फोन वगैरे करून अपॉइंटमेंट घेतली नव्हतीस.” 
“नव्हती घेतली. त्यात काय?” प्रज्ञा म्हणाली. 
“जर तू अपॉइंटमेंट घेतली नव्हतीस तर मग डॉक्टर बंब यांच्या अपॉइंटमेंटच्या रजिस्टर मध्ये तुमची दोघांचीही नाव लिहिलेली आहेत हे कसं ? ”  पाणिनीने विचारलं.
तिने पाणिनीकडे एकदम डोळे विस्फारून पाहिलं.
“निनाद धुरीने त्याला फोन केला असेल का?”  पाणिनीने विचारलं.
 “त्याने केला असला पाहिजे.” 
“लक्षात घे आता. पोलिसांचे दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा संशयित माणूस म्हणून तूच आहेस. मी जसं तुला शोधून काढलं तसं तेही शोधून काढतील. आता ते चोरलेलं रजिस्टर माझ्याकडे दे आणि इथून निघून जा.” 
“कुठे जाऊ मी?” प्रज्ञाने विचारलं. 
“ते तू ठरव. पोलीस सहज तुला पकडू शकणार नाहीत अशा ठिकाणी जा.” 
पाणिनीने सौंम्याकडे पाहिलं.ती नोट्स घेत होती हे पाहून पाणिनी पुढे म्हणाला,
“वकील या नात्याने तुला एक सल्ला द्यायचा आहे. जर तू पळून गेलीस तर तो तुझ्याविरुद्धचा पुरावा ठरू शकतो पण मी तुला एक आशेचा किरण दाखवतो. डॉक्टर बंब यांच्या घरात आणखीन एक स्त्री होती हे मला आता कळलय. ती कोण होती हे मी जंग जंग पछाडून शोधून काढीन. आणि ते शोधायचा एकमेव मार्ग माझ्याकडे आहे तो म्हणजे हाताचे ठसे. जे पोलीस शोधून काढतील.”   पाणिनी म्हणाला.
“माझ्याकडे किती वेळ आहे?” 
“कदाचित दोन सेकंद, कदाचित दोन आठवडे. धुरीने जर तुला फोन केला तर त्याला सांग की कनक ओजस च्या ऑफिसमध्ये फोन कर त्याचं आणि माझं ऑफिस एकाच इमारतीत एकाच मजल्यावर