प्रकरण ११
न्यायाधीश कोलवणकर यांच्या कोर्टात निनाद धुरी वि.सरकार पक्ष ही प्राथमिक सुनावणी सुरु झाली.अॅडव्होकेट खांडेकर उठून उभे राहिले
“ न्यायाधीश महाराज, मी मोकळेपणाने कबूल करतो की या खटल्यात उपलब्ध पुरावा नेमके काय दर्शवतो या बद्दल मला सांगता येणार नाही. ”
न्यायाधीशांनी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं.
“ म्हणजे? तुम्ही पोलिसांशी किंवा साक्षीदारांशी बोलला नाहीत? केस चा अभ्यास केला नाहीत?”
“ काहींशी बोललो पण सगळ्याच साक्षीदारांजवळ बोलता आलं नाही मला म्हणून माझी विनंती आहे की जर पुढची तारीख मिळाली तर आम्हाला ठोस पुरावे आणता येतील.बचाव पक्षालाही तयारी करायला वेळ मिळेल.” खांडेकर म्हणाले.
“ बचाव पक्षाचं काय मत आहे? ” कोलवणकर म्हणाले.
“ आमचं म्हणणं आहे की खटला चालू करावा आजच, नाहीतर आरोपी विरुद्धची केस मागे घेऊन त्याला मुक्त करावं. कारण त्याच्या विरोधात पुरेसे पुरावे नसताना त्याला कस्टडीत ठेवण्यात आलं होतं. ” पाणिनी म्हणाला.
“ मी असं समजू का मिस्टर खांडेकर की आरोपी विरोधात पुरेसे पुरावे नसल्यामुळे त्याला सोडायला तुमची हरकत नाही म्हणून?” न्यायाधीशांनी विचारलं.
“ नाही नाही, तसं नाही.मला म्हणायचं होतं की ही प्राथमिक सुनावणी असल्यामुळे आरोपीला गुन्हा करायचं कारण होतं का, संधी होती का, आणि गुन्ह्याच्या वेळी तो तिथे हजर होता का हे दाखवण्या एवढे पुरावे प्राथमिक तपासणीत पुरेसे असतात तेवढे आमच्याकडे आहेत पण वरच्या कोर्टात सुद्धा हे पुरावे टिकावेत म्हणून जे पूरक पुरावे लागतात ते सध्यातरी आमच्याकडे नाहीत.”
“ खटला चालू करा.” कोलवणकर तुटकपणे म्हणाले.
खांडेकरांनी प्रथम साक्षीदार म्हणून डॉ.बंब यांच्या घरी जे दोन पोलीस आले होते त्यातील एकाला, बोलावलं.त्यांनी डॉक्टर कोणत्या अवस्थेत पडले होते त्याचे वर्णन करून प्रथम त्यांना हॉस्पिटल मधे नेण्यात आल्याचं सांगितलं. त्यांनी साक्षीत पुढे सांगितलं की डॉक्टरांचा घर गडी, दीना हा पोलीस आल्याचे पाहून घरात आला, त्याने नुकतीच अंघोळ केलेली दिसत होती आणि तसच ओल्या अंगाने फक्त टोवेल गुंडाळून तो आला होता.त्याची पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याला त्याच्या घरी पाठवण्यात आले.तो पर्यंत ठसे तज्ञांना बोलावण्यात आले.पोलिसाने पुढे सांगितले की शेजारच्या मिसेस डहाणूकर तिथे आल्या आणि त्यांनी दार वाजवून आत यायला परवानगी मागितली त्यांनी दिलेल्या मागणी नुसार आम्ही पुन्हा पोलीस मुख्यालयात फोन लावला आणि मदतीसाठी आणखी काही गाड्या मागवून घेतल्या.
एवढी माहिती दिल्यावर खांडेकरांनी पाणिनीला उलट तपासणी घ्यायची असेल तर घ्या म्हणून सांगितलं.
“ तुम्ही तुमची नेहेमीची पोलिसांची कार्यपद्धती अवलंबली?” पाणिनीनं विचारलं.
“ हो.”
“ घराची पुढची आणि मागची दोन्ही बाजू तुम्ही तपासल्या?”
“ हो.”
“ अँम्ब्युलन्स बोलावल्यावर आणि ठसे तज्ज्ञांना बोलावल्यावर पुन्हा जादा गाड्या का मागवून घेतल्यात?” पाणिनीनं विचारलं.
“ कारण मिसेस डहाणूकर यांनी सांगितल्यानुसार त्यांनी नुकतीच एक तरुणी तिथून पळून गेली होती.त्यांनी तिला पाहिलं होतं.तिला शोधायला गाडी आवश्यक होती.” पोलीस अधिकारी म्हणाला.
“मिसेस डहाणूकर ने वर्णन केलं तिचं? ” पाणिनीनं विचारलं.
“ हो.”
“ तुम्ही काय केलंत नेमकं?” पाणिनीनं विचारलं.
“ माझ्या सहकारी पोलिसाला मी तिथे थांबायला सांगितलं आणि मी गाडीने त्या तरुणीच्या मागावर गेलो.”
“ एकाच शेजाऱ्याशी बोललात की दुसऱ्याही शेजाऱ्याशी बोललात?”
“ फक्त मिसेस डहाणूकर शी बोललो आणि लगेच त्या तरुणीच्या मागावर गेलो.पण ते प्रयत्न व्यर्थ गेले.त्या नंतर मी दुसऱ्या शेजाऱ्याची चौकशी केली.” पोलीस म्हणाला.
“ घरात असलेला पुरावा हलवला जाऊ नये यासाठी काय केलंत ?” पाणिनीनं विचारलं.
“ आम्ही ताबडतोब घर सील केलं.अजूनही ते सील आहे.”
“ बंब चा नोकर जो तुमच्या बरोबर होता त्याने कशाला हात लावला असायची शक्यता नाही ना?” पाणिनीनं विचारलं.
“ आम्ही त्याला आत येऊच दिल नाही.मागच्या दारात तो आला होता टॉवेल गुंडाळून, त्याची प्राथमिक चौकशी केली आणि त्याला त्याच्या क्वार्टर्स मधे जाऊन बसायला सांगितलं आणि कपडे करून तयार रहा म्हणून सांगितलं.घरातून बाहेर जाऊ नको गरज वाटली तर बोलावू असं सांगितलं. ”
“ त्या बाईचा शोध किती वेळ घेतला तुम्ही?” पाणिनीनं विचारलं.
“ ती बाई पळत पळत बाहेर गेली होती त्यानुसार जास्तीत जास्त किती अंतर ती गेली असेल याचा अंदाज घेऊन आम्ही साधारण १५-२० मिनिट शोधायचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला.आम्हाला तिने गुंगारा दिला होता.”
“ नंतर काय झालं?” पाणिनीनं विचारलं.
“ आम्ही घटनाक्रमाचा अभ्यास करायला सुरुवात केली.बंब यांच्या घरगड्याने सांगितलं होतं की डॉक्टर त्याला बोलवायला मागच्या दाराशी आले होते.त्यांनी मागचं दार उघडलं होतं.आणि त्याच वेळी त्यांना हल्लेखोराने धक्का दिला.” पोलीस म्हणाला.
“ बर पुढे? ” पाणिनीनं विचारलं.
“ आम्ही असं गृहीत धरलं की पोलिसांना जेव्हा बोलावण्यात आलं त्या पूर्वी अगदी काही मिनिटच आधी डहाणूकर बाईंनी किंकाळी ऐकली होती.आम्ही बंब यांच्या नोकराचा म्हणजे दीनानाथ पुरी च्या हालचालींचा माग काढला. म्हणजे अंघोळ करता करता तो बाहेर आला, त्याच्या खोलीच्या खिडकीत उभा राहिला,नंतर पटकन टॉवेल गुंडाळला, पायऱ्या उतरून खाली आला आणि बंब यांच्या घराच्या मागील दाराजवळ पोचला.या प्रत्येक हालचालीचा आढावा घेतला तर असं लक्षात आलं की बाथरूम मधून बाहेर पडल्या पासून मागच्या दारात येई पर्यंत साधारण १० ते १२ सेकंदाचा अवधी गेला असावा. बाथरूम मधून बाहेर आल्यावर तो प्रथम ज्या खिडकीत उभा राहिला, म्हणजे त्याच्या खोलीच्या खिडकीत, त्या ठिकाणी त्याच्या अंगावरून पाणी सांडून तिथे थारोळे साचले होते.हे थारोळे किती आकाराचे आहे यावरून तो किती वेळ तिथे उभा असावा याचा अंदाज घेतला.तिथून पुढे सुद्धा त्याच्या पायाचे ओले ठसे तो जिथे जिथे गेला तिथे उमटलेले होते त्याची नोंद घेतली.”
“ या सर्वात एक गोष्ट आढळली की तुम्ही फोन आल्यावर लगेचच आलात अगदी एखाद्या मिनिटात? हे कसं काय?” पाणिनीनं विचारलं.
“ आमची गाडी गस्त घालताना त्या बंगल्याच्या बाहेरच होती. डहाणूकर बाईचा फोन चौकीत गेला तेव्हा आम्हाला वायरलेस
वरून लगेचच कळवलं गेलं.कर्म धर्म संयोगाने आम्ही तिथेच बाहेर होतो त्यामुळे लगेच आलो.” पोलीस म्हणाला.
“ म्हणजे तुम्ही बंब यांच्या घरात आलात त्या नंतर काही मिनिटातच त्यांचा गडी ओलेत्याने बंब यांच्या घरात यायचा प्रयत्न करत होता, कोण किंचाळल आणि काय झालं ते पाहायला तेव्हा तुम्हाला दिसला?” पाणिनीनं विचारलं.
“ बरोबर.”
“ बंब यांच्या घरात आणखी कोणीतरी असावं आणि ते मागच्या दाराने बाहेर गेलं असावं ही शक्यता तुम्ही गृहीत धरली का? ”
“ हो.”
“ असं गृहीत धरण्यासाठी काही पुरावा तुमच्याकडे होता का? म्हणजे दाराच्या मुठीवर काही ठसे वगैरे ?” पाणिनीनं विचारलं.
“ ठसे घेतले गेले तेव्हा मी तिथे नव्हतो.” पोलीस म्हणाला.
“ तू म्हणालास की तुझा सहकारी घराच्या मागच्या बाजूला गेला होता आणि तिथून तुला त्याने सांगितलं की मागचे दार उघड?”
“ हो.”
“ आणि तू ते उघडलंस त्यावेळी तू आतली मूठ फिरवलीस ? ”
“ हो.”
“ त्यावेळी तुझ्या हाताचे जे ठसे मुठीवर उमटले असतील, त्यामुळे आधी असलेले ठसे पुसले गेले असतील ना?” पाणिनी म्हणाला.
“ हा साक्षीदाराचा अंदाज आहे. ” खांडेकर त्याच्या मदतीला येत म्हणाले.
“ हा पोलीस आहे, तज्ज्ञ म्हणूनच साक्ष देतोय.” पाणिनी म्हणाला.
“ सस्टेंड. ही गोष्ट पटवर्धन यांनी सिद्ध केल्ये असं माझं मत आहे, की पोलिसाने दाराची मूठ उघडताना आधी जर त्या ठिकाणी कुणाचे ठसे असतील ते पुसले गेले. ” न्यायाधीश म्हणाले.
“ दॅट्स ऑल.” पाणिनी म्हणाला.
खांडेकरांनी त्यानंतर ठसे तज्ज्ञाला, उन्मन निजसुरे ला, साक्षीला बोलावलं.त्याच्या कडून काढून घेतलं की डॉ.बंब यांच्या घरात अनेक जणांचे ठसे सापडले त्यात डॉक्टरांचे होते, त्यांच्या नोकराचे होते, इतरही खूप होते.त्या नंतर खांडेकरांनी दोन विशिष्ठ ठसे दाखवून त्याला विचारलं की हे ठसे डॉक्टरांच्या घर, क्लिनिक, व्यतिरिक्त इतर कुठे सापडले आहेत का.त्यावर साक्षीदाराने उत्तरं दिलं की आरोपीच्या गाडीत आणि ब्युटी रेस्ट हॉटेलात हेच ठसे सापडले आहेत.
“ बंब यांचं घर आणि हे हॉटेल यात किती अंतर आहे?”- खांडेकर.
“ बाराशे फुट फक्त.”
“ ठसे घेण्याचं काम चालू असताना बंब यांच्या घरात अपॉइंटमेंट चं रजिस्टर सापडलं?”
“ हो सर.”
“ कुठे ”
“ त्यांच्या क्लिनिक रूम मधे.”
“ कुठे?”
“ टेबलवर.”
“ हे रजिस्टर मी पुरावा म्हणून दाखल करून घ्यायची विनंती करतो.”
न्या.कोलवणकर यांनी पाणिनीकडे पाहिलं.
“ माझी हरकत नाही.” पाणिनी म्हणाला. “ यातल्या रात्रीच्या अपॉइंटमेंट वाचून दाखवाव्या.”
“ धुरी आणि पांडव. ” खांडेकर म्हणाले. “ सर्व अपॉइंटमेंट लिहिताना फक्त आडनावे लिहिली आहेत.नावे किंवा अद्याक्षरे लिहिलेली नाहीत.”
“ ठीक आहे पुरावा म्हणून जमा करा.” कोलवणकरांनी आदेश दिले.
“ तर मग मिस्टर उन्मन, मला सांगा, डॉ.बंब यांच्या मृत्यू पूर्वी तुम्ही त्यांना फोन केला होता?”
“ हो केला होता. तीन वेळा.प्रथम केला कारण मला त्यांचे ठसे घ्यायचे होते म्हणून.म्हणजे त्यांच्या घरी सापडलेल्या ठशांशी ते जुळतात का ते तपासण्यासाठी.दुसऱ्यांदा केला तो मला काही गोष्टी त्यांना विचारायच्या होत्या म्हणून. पण त्यांनी उत्तरं दिली नाहीत. आणि तिसऱ्यांदा केला तेव्हा तो अगदी मरणासन्न अवस्थेत असताना, मृत्युपूर्वी काही मिनिटे आधी.” उन्मन म्हणाला.
“ काय अवस्था होती त्यांची तेव्हा? शारीरिक दृष्ट्या ते सक्षम होते?” खांडेकरांनी विचारलं.
“ ऑब्जेक्शन !” पाणिनी म्हणाला. “ हा माणूस ठसे तज्ज्ञ आहे .डॉक्टर नाही किंवा वैद्यकीय क्षेत्रातला तज्ज्ञ नाही.”
“ ठीक आहे मी प्रश्न बदलून विचारतो.” खांडेकर म्हणाले. “तुम्ही तिसऱ्यांदा बोललात तेव्हा डॉक्टर शुद्धीत होते?”
“ होते.बोलू शकत होते पण एखादा शब्द.वाक्य नाही. हो किंवा नाही या स्वरुपात. ”
“ त्यांनी तुम्हाला काही सांगितलं?”-खांडेकर.
“ त्यांनी एक नाव घेतलं.”-उन्मन म्हणाला.
“ काय? कोर्टाला सांगा.”
“ निनाद धुरी.”
“ काय संदर्भात नाव घेतलं हे?”
“ त्यांना मी विचारलं होतं की तुमच्यावर कोणी हल्ला केला , डोक्यात मारलं ? ”
“ घ्या क्रॉस.” खांडेकर पाणिनीला म्हणाले.
“ निनाद धुरी नाव घेण्यापूर्वी त्यांनी आणखी कोणाची नावे उच्चारली?” पाणिनीनं विचारलं.
“ कोणाचीच नाही.”
“ कसं काय”
“ त्यांना बोलायला खूप कष्ट पडत होते.मीच त्यांना हो किंवा नाही स्वरुपात उत्तरं देऊ शकतील असे प्रश्न विचारत होतो.”
“ तुम्ही विचारत असलेल्या प्रश्नांचा अर्थ त्यांना कळत होता का हे तुम्हाला कळायला मार्ग होता?” पाणिनीनं विचारलं.
“ त्यांच्या उत्तरावरून कळत होतं की प्रश्न समजलाय की नाही.” उन्मन म्हणाला.
“ कदाचित तुम्ही विचारत असलेला प्रश्न त्यांना कळला नाही म्हणून सुद्धा ते ‘नाही’ म्हणत असतील.किंवा त्यांना बोलायचं नाही म्हणून सुद्धा ते नाही म्हणत असतील? ” पाणिनीनं विचारलं.
“ तसं नाही वाटत मला.त्यांच्या पर्यंत प्रश्न पोचे पर्यंत वेळ लागत होता पण मी पुन्हा पुन्हा विचारत होतो. ”
“ निनाद धुरी नाव घेण्यापूर्वी त्यांनी दुसऱ्या कोणाचेही घेतले नाही नाव?”
“ नाही.”
“ तुम्हाला खूप वेळा प्रश्न विचारावा लागला, निनाद धुरी चे नाव त्यांच्या तोंडून येण्यापूर्वी?” पाणिनी म्हणाला.
“ हो सर.७-८ वेळा विचारला.”
“ जास्त वेळा सुद्धा विचारला असू शकतो?”
“ मोजल नाही मी पण असू शकतो.” उन्मन म्हणाला.
“ आणि प्रत्येक प्रश्नानंतर वाट पहावी लागली उत्तर येण्यासाठी?” पाणिनीनं विचारलं.
“ हो.”
“ आणि मधला वेळ शांततेत जायचा?”
“ हो.”
“ शेवटी १३-१४ वेळा तोच प्रश्न विचारल्यावर तुम्हाला अपेक्षित उत्तरं आलं?” पाणिनीनं विचारलं.
“ १३-१४ वेळा नाही. ७-८ वेळा विचारलं.”
“ आणि शेवटी त्यांनी निनाद धुरीचे नाव उच्चारलं?” पाणिनीनं विचारलं.
“ बरोबर.”
“ उच्चारात जडत्व होतं? म्हणजे अस्पष्टता होती?”
“ हो.जडत्व होतं पण नाव ओळखता येणार नाही एवढं नव्हतं..” उन्मन म्हणाला.
“ त्यावेळी तुम्हाला आरोपी माहित होता का?”
“ नाही सर, त्याच्या गाडीचा त्याने हॉटेलात नोंदवलेला नंबर अर्धवट होता. म्हणून वर्णनावरून गाडी ओळखायला वेळ गेला.पण आम्ही शेवटी गाडी ओळखली, ती आरोपी निनाद धुरी ची होती.”
“ नंतर काय केलं?” पाणिनीनं विचारलं.
“ आम्ही त्या गाडीतून ठसे मिळवले, ते हॉटेल ब्युटी रेस्ट आणि डॉक्टर बंब यांचे क्लिनिक दोन्ही ठिकाणी मिळालेल्या ठशांशी जुळले.” उन्मन म्हणाला.
“ दॅटस् ऑल ” पाणिनी म्हणाला.
खांडेकरांनी त्या नंतर बंब यांच्या शेजारच्या बंगल्यात राहणाऱ्या रहिवाश्याला साक्ष द्यायला बोलावलं.त्याने सांगितलं की रात्री साडे अकराच्या सुमाराला त्याने त्याच्या घराजवळ एक गाडी पार्क केली जातांना पहिले.त्या गाडीत आरोपी निनाद धुरी होता याची त्याने खात्री दिली आणि गाडीचा नंबरही सांगितला.त्या गाडीतून एक तरुणी धुरीच्या शेजारच्या सीट वरून खाली उतरून बंब यांच्या घरात गेल्याचं त्याने सांगितलं.साधारण दहा मिनिटात ती पळत पुन्हा त्या गाडीत बसली शेजारी बसलेल्या आरोपीला तिने काहीतरी सांगितलं, गाडी ने यू टर्न मारला आणि जोरात निघून गेली.ही गाडी आरोपी धुरीच चालवत असल्याचा निर्वाळा साक्षीदाराने दिला.
“ या नंतर तुम्ही आरोपीला कधी पाहिलंत? आणि कुठे?” खांडेकरांनी विचारलं.
“ बुधवारी.तुरुंगात.ओळख परेड मधे.”
“ तुम्ही इतर अनोळखी माणसामधून सुद्धा ओळ्खल त्याला?”
“ हो.”
“ विचारा तुमचे प्रश्न.” खांडेकर पाणिनीला म्हणाले.
“ तुम्ही मगाशी जे वर्णन केलं, आरोपी गाडी घेऊन आल्याचं, त्यातून एक बाई उतरल्याचं वगैरे हे सर्व तुम्ही कुठून बघत होतात?” पाणिनीनं विचारलं.
“ माझ्या बेडरूमच्या खिडकीतून.”
“ बंब यांच्या घरातून जी तरुणी पळत आली आणि पुन्हा गाडीत बसली तेव्हा शेजारी बसलेल्या माणसाला ती काय म्हणाली?”
“ शब्द ऐकू येत नव्हते.”
“ गाडीचं दार उघड होतं की बंद?” पाणिनीनं विचारलं.
“ बंद.”
“ मग ती शेजारच्या माणसाशी बोलली की नाही हे कसं कळलं?”
“ त्या शिवाय का त्या माणसाने एकदम गाडी वळवून पोबारा केला?”
“ त्या तरुणीने शेजारच्या माणसाकडे तोंड वळवून काहीतरी बोलल्याचं तुम्ही पाहिलं का?” पाणिनीनं विचारलं.
“ नाही. गाडीत अंधार होता.पण ती बाई गाडीत बसताच त्याने गाडीचे दिवे चालू केले, यू टर्न मारला आणि अक्षरशः गाडी उसळी मारून पुढे नेली. ” साक्षीदार म्हणाला.
“ तुम्ही आरोपीला पाहिलंत ते एकदाच, गाडीत बसलेला, ड्रायविंग सीट वर.त्या नंतर तुम्ही त्या तरुणीकडे लक्ष दिलंत.बरोबर?”
“ हो.”
“ ओळख परेड मधे तुम्ही त्याला ओळखलं ते, तो उभा असताना. गाडीत बसतात तसं बसलेल्या अवस्थेत नाही.बरोबर ना?” पाणिनीनं विचारलं.
“ हं ”
“ तुमच्या घराजवळ असलेला रस्ता तुमच्या बेडरूम च्या खिडकी समोर आडवा जातो की बाजूने सरळ जातो?”
“ सरळ.”
“ म्हणजे तुम्ही खिडकीत असताना गाडी तुम्हाला आडवी दिसत नव्हती तर उभी दिसत होती?” पाणिनीनं विचारलं.
“ उभी.”
“ जेव्हा गाडी तुमच्या घराजवळ आली त्या रात्री तेव्हा तुम्हाला गाडीची मागची नंबरप्लेट दिसली की पुढची?”
“ मागची.”
“ म्हणजे जेव्हा ती गाडी तुमच्या खिडकी जवळ आली तेव्हा तुम्हाला ड्रायविंग सीट वर बसलेल्या माणसाचे तोंड दिसत नव्हतं.बरोबर ना?”
“ बरोबर.”
“ किंवा तो बाजूने सुद्धा दिसत नव्हता.त्याचं फक्त डोकं आणि पाठ दिसत होती.”
“ हं.”
“ तुम्ही गाडीची नंबर प्लेट अगदी नीट पहिलीत?”
“ एकदम व्यवस्थित.”
“ गाडी येऊन तिथे उभी राहिल्यापासून तुमचं नंबर प्लेट कडेच लक्ष होतं?” पाणिनीनं विचारलं.
“ हो.”
“ म्हणजे गाडी चालवणाऱ्याकडे नव्हतं?”
“ तसं नाही, मी त्यालाही पाहिलं नंतर.”
“ पण ते गाडीचे दिवे बंद झाल्यावर?”
“ हो.” साक्षीदार म्हणाला.
“ म्हणजे नंतर तुम्ही त्याला थेट ओळख परेड मधे ओळखताना तुमच्या मनात त्याला आधी पहिल्याची जी आठवण होती त्या आधारे तुम्ही ओळखलंत?” पाणिनीनं विचारलं.
“ बरोबर.”
“ आणि आधी तुम्ही फक्त त्याला पाठमोरं, ते सुद्धा गाडीत बसलेल्या स्थितीत, गाडीत दिवा चालू नसताना पाहिलं होतं, म्हणजे तुम्हाला तो नीट असा दिसलाच नव्हता? ” पाणिनीनं विचारलं.
“ ऑब्जेक्शन! ” खांडेकर ओरडले. “ याचं उत्तरं म्हणजे वाद निर्माण करणारे ठरू शकते.”
“ ओव्हररूल्ड” न्यायाधीशांनी आदेश दिला.
“ उत्तरं द्या ” पाणिनी कडाडला.
साक्षीदाराने अस्वस्थपणे चुळबुळ केली.
“ तुम्हाला गाडी बसलेला माणूस नीट दिसलाच नव्हता , बरोबर आहे की नाही? ” पाणिनी पुन्हा जोरात म्हणाला.
“ बहुतेक.” साक्षीदार म्हणाला.
“ दॅटस् ऑल ” पाणिनी म्हणाला.
“ दॅटस् ऑल ” खांडेकरांनी पण जाहीर केलं.
सरकार पक्षाचा पुढचा साक्षीदार दीना पुरी, म्हणजे डॉ.बंब यांचा घरगडी होता.त्याने साक्षीत सांगितलं की तो अंघोळ करत होता.त्याला एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली.तो तसाच नळ बंद करून खिडकीपाशी आला.तिथून त्याला डॉ.बंब यांच्या घराची मागची बाजू दिसत होती. बंब यांच्या घराचा मागचा दरवाजा बंद होतांना त्याला दिसला.त्याने पटकन कपाटातून टॉवेल काढला, आपल्या भोवती गुंडाळला, आणि पायऱ्या उतरून खाली आला.तिथून झपाझप चालत बंब यांच्या मागच्या दारापर्यंत पोचला तेव्हा स्प्रिंग लॉक मुळे दार बंद झालं होतं.त्याने जोरजोरात दार वाजवल, आतून काहीच प्रतिसाद आला नाही.थोडा वेळ वाट पाहून तो बाजूच्या खिडकीपाशी आला.खिडकीचं दार वाजवून पाहिलं, पण आतून कुठलाच आवाज आला नाही.तेवढ्यात एक पोलीस घराला वळसा घालून मागच्या बाजूने आला आणि त्याने त्याला पकडलं. त्यावेळी त्या पोलिसाला साक्षीदाराने काय घडलं ते सर्व सांगितलं.तो पर्यंत दुसऱ्या पोलिसाने घराच्या आतून येऊन मागचं दार उघडलं होतं. दोन्ही पोलिसांनी त्याची सविस्तर चौकशी केली आणि त्याला घरी पाठवून दिलं. कपडे घालून घरीच बसून रहा, आमच्या परवानगी शिवाय बाहेर जायचं नाही असं बजावलं.
“ क्रॉस.” खांडेकर पाणिनीला म्हणाले.
“ तू जेव्हा किंकाळी ऐकून तुझ्या खिडकीपाशी आलास तेव्हा तुला मागच्या दाराने कोणी पळून जातांना दिसलं?” पाणिनीनं विचारलं.
“ नाही सर.”
“ तू खिडकीत येई पर्यंत जर कोणी मागच्या दाराने पळून गेलं असतं, तर तुला ती व्यक्ती दिसली असती? ” पाणिनीनं विचारलं.
“ त्याचाच विचार करतोय मी.मागचं दार बंद होण्यापूर्वी कोणी तिथून माझ्याही नकळत बाहेर पडू शकलं असावं असं मला नाही वाटत. माझी कल्पना अशी आहे की डॉक्टर बंब मला बोलवायचा प्रयत्न करत असावेत आणि...”
“ तुझ्या कल्पना नको आहेत आम्हाला.तुला माहिती काय आहे तेवढीच दे.” खांडेकर त्याला बोलायची संधी न देता म्हणाले.
“ माझे प्रश्न संपले.” पाणिनीने जाहीर केलं.
“ कोर्टाचं कामकाज संपायला काही अवधी आहे पण त्यात नवी साक्ष पूर्ण होईल असं वाटत नाही.उद्या सकाळी पुन्हा ११ वाजता केस चालू करू. ” न्या.कोलवणकर म्हणाले.
( प्रकरण ११ समाप्त.)