Kirkali - 6 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | किंकाळी प्रकरण 6

Featured Books
  • રેડહેટ-સ્ટોરી એક હેકરની - 24

            રેડ હેટ:સ્ટોરી એક હેકરની        પ્રકરણ: 24      એક આ...

  • એકાંત - 25

    છ મહિના રેખાબેન અને નિસર્ગ સિવિલમાં રહીને બહાર નીકળ્યાં ત્યા...

  • મેઘાર્યન - 9

    મેઘાની વાત પૂરી થઈ ત્યાં જ અમારી આસપાસનું દ્રશ્ય બદલાઈ ગયું....

  • The Glory of Life - 4

    પ્રકરણ 4 :મનુષ્ય નું જીવન પૃથ્વી પરના  દરેક જીવો પૈકી નું એક...

  • નિલક્રિષ્ના - ભાગ 26

    અવનિલ : "તારી આવી બધી વાતોથી એક વાત યાદ આવી રહી છે. જો તું ખ...

Categories
Share

किंकाळी प्रकरण 6



प्रकरण ६
दुसऱ्या दिवशी पाणिनी खरोखर सकाळी पावणे आठ वाजता कनक ओजस च्या ऑफिसात हजर झाला.कनक थोडा उशिराच आला.
“  उशीर झाला तुला म्हणजे माझ्या कामात काही प्रगती केलीस असं म्हणू शकतो का मी? ” पाणिनीने विचारलं.
“ डॉ.बंब यांच्या घराच्या पुढच्या दारातून बाहेर पळालेल्या मुलीचं पोलिसांना सविस्तर वर्णन मिळालंय पाणिनी.”
पाणिनीने काहीही न बोलता एक सिगारेट शिलगावली. कनक पुढे सांगायला लागला,
“ पोलिसांनी अक्षरशः काही मिनिटातच तिचा पाठलाग सुरु केला तरी सुद्धा ती त्यांची नजर चुकवून गायब कशी काय झाली याचं पोलिसांना कोडं पडलंय.”
“ गाडीत बसून अल्पावधीत खूप लांब जाता येतं, कनक.”  पाणिनी म्हणाला.
“ तिच्याकडे गाडी होती आणि ती जवळच लावली होती असं गृहीत धरतोयस तू.  पोलीस गृहित धरताहेत,की ती पळतच गेली आणि लपली.”-कनक
“ ठीक”
“  आता पटकन लपण्यासारखं ठिकाण म्हणजे सर्वात जवळ असलेलं आणि रस्त्याला लागून असलेलं एखादं हॉटेल. या निकषात बसणारं एकच हॉटेल होतं ते म्हणजे ब्युटी रेस्ट हे हॉटेल.”-कनक म्हणाला.
“ काही आढळलं त्यांना? ” कोणताही भाव चेहेऱ्यावर न आणता  पाणिनी म्हणाला.
“ एका विशिष्ट वर्णनाची, सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास हॉटेलात  एकटीच आलेली कोणी स्त्री आली होती का याची चौकशी ब्युटी रेस्ट च्या मॅनेजर कडे केली. त्याने सांगितलं की एकटी स्त्री आली नव्हती पण त्या वेळेत एक जोडपं आलं होतं.नवरा बायको आहोत असं सांगून त्यांनी बुकिंग केलं पण ती स्त्री खोलीत गेल्या गेल्या नवरा लगेचच हॉटेल सोडून गेला  त्यामुळे हा प्रसंग लक्षात राहिला. ”
“ ओके.”
“ ज्या खोलीत डॉ.बंब यांच्यावर हल्ला झाला, तिथले ठसे त्यांनी मिळवायचा प्रयत्न केला. ज्या काचेच्या वस्तूने , फ्लॉवरपॉट सदृष्य वस्तूने त्यांच्यावर आघात केला गेला त्यावर डॉक्टर किंवा त्यांचा गाडी, पुरी या दोघांखेरीज आणखी एकाचे ठसे मिळाले. ब्युटी रेस्ट मधल्या त्या रूम मधून पोलिसांनी मिळवलेले ठसे आणि फ्लॉवरपॉट वर मिळालेले ठसे जुळलेत.  ”-कनक
“ आश्चर्यकारकच आहे हे सर्व नाही का?”  पाणिनी म्हणाला.
“ खूपच.पोलिसांनी डॉक्टरचं अपॉइंटमेंट रजिस्टर पाहिलं. दुपार नंतर एकूण चारच अपॉइंटमेंट दिल्या गेल्या होत्या.त्यातही उशिराच्या दोन होत्या. धुरी आणि पांडव एवढंच लिहिलं होतं. ”-कनक
“ म्हणजे फक्त आडनाव? नाव किंवा इनिशियल्स नाहीत?”
“ नाही.”
“ धुरी चा काही ठाव ठिकाणा?”
“ त्याच्या घरावर माझी माणसं नजर ठेऊन आहेत.घरी कोणीच नाहीये.पोलिसांनी त्याला शोधला आणि त्याच्या गाडीत जर त्यांना त्या तरुणीचे ठसे सापडले तर तो चांगलंच अडचणीत येईल.ती बाई कोण ? त्याच्या गाडीत ती का आली, कशी आली अशा अनेक प्रश्नांना उत्तरं देताना त्याला घाम फुटेल. ” कनक
“ तुझं म्हणणं आहे की पोलीस जोरात कामाला लागलेत तर.”  पाणिनी म्हणाला.
“ चांगलेच....” कनक म्हणाला तेवढ्यात फोन वाजला. फोन वर कनक जरा वेळ बोलत होता मग म्हणाला,
“ थांब जरा, तुला सांगतो काय ते, चालू ठेव फोन.” नंतर पाणिनीकडे वळून म्हणाला, “ दहा मिनिटा पूर्वी धुरी घरी आलाय.माझा माणूस विचारतोय की नजर ठेवायचं काम चालू ठेवायचं आहे की बंद करायचं.”
“ त्याला परत बोलावून घे.पोलिसांनी धुरी ला पकडलं तर तुझा माणूस त्याला दिसायला नको.”  पाणिनी म्हणाला. आणि कनक ने फोन वरून त्याच्या माणसाला तिथून निघून जायची सूचना दिली.पाणिनीने धुरीच्या घराचा फोन लावला.
“ अरे कुठे गायब झाला होतास? किती वाट बघत होतो तुझ्याशी संपर्क होत  मी नव्हता.”
“ गायब म्हणजे काय? मी व्यावसायिक कामासाठी बाहेरगावी गेलो होतो.माझा मुलगा,बायको हे ही माझ्या सोबत होते.काय झालाय एवढं? ”
“ पुलाखालून बराच पाणी वाहून गेलंय.एवढं सगळं फोनवर सांगणं धोकादायक आहे आणि मला वेळही नाही. मी लगेच तुझ्याकडे येतोय.मी आल्याशिवाय जायचं नाही तिथून पुन्हा.”
“ पण काय भानगड आहे?” धुरीने पुन्हा विचारलं.
“ उगाच निरागस आणि निष्पाप असल्याचा अभिनय करू नकोस.”  पाणिनी म्हणाला. आणि फोन बंद केला.लगेच सौंम्याला फोन करून  आपल्याबरोबर यायला सांगितलं.ती लगेचच तयार झाली. गाडीत बसल्यावर पाणिनी ने तिला म्हंटलं,
 “ सौंम्या, काळ वेळ न बघता हक्काने मी तुला काम सांगतो.तू कधीच नाही म्हणत नाहीस. तुझ्या सारखी सेक्रेटरी  मिळण्यासाठी कित्येक जण मरत असतील अक्षरशः”
“ आणि तुम्ही?” मिश्कील पणे सौंम्या म्हणाली आणि उत्तरा दाखल पाणिनीने तिच्या हातावर आपला हात ठेवला.
पाणिनी,तारकर,कनक,सौंम्या हे सर्व वर्ग मित्र. अगदी जिगरी. पाणिनीने वकिली चालू केली आणि सौंम्याला आपल्या व्यवसायात सामावून घेतलं.तारकर पोलिसात गेला तर कनकने स्वत:ची गुप्तहेर फर्म चालू केली. एकमेकांनी मैत्री आणि कर्तव्य एकमेकांच्या आड येऊ दिले नाही कधीच. पाणिनी आणि सौंम्या यांचं एकमेकांवर प्रेम होतं पण दोघेही ते एकमेकांसमोर व्यक्त करू शकले नाहीत. कोर्टात साक्षीदारांची उलटतपासणी घेऊन भंभेरी उडवणारा पाणिनी, या बंबतीत धैर्य दाखवू शकला नव्हता.पण क्वचित प्रसंगी दोघेही अशा बारीकशा देहबोलीतून आपल्या भावना व्यक्त करायचे.
 गाडीत बसल्यावर पाणिनीने सौंम्याला सर्व वृत्तांत सांगितला.
“ आपण त्याला भेटल्यावर काय करणार आहोत? ” सौंम्याने विचारलं.
“ तो प्रथम आपला अशील आहे न याची खात्री करून घ्यायची आहे मला.त्याने आपल्या ऑफिसात येऊन त्याची कथा सांगितली फक्त.पण माझं वकीलपत्र घ्या असं कुठे सांगितलं त्याने? मी माझ्याच पदराचा पैसे आणि वेळ खर्चून माहिती काढतोय.”  पाणिनी म्हणाला.
“ त्याच्याकडून वकीलपत्र घेतल्यावरच तुम्ही पुढची हालचाल करायला हवी होती नाही का?” –सौंम्या.
“ कायदेशीर दृष्ट्या आणि प्रॅक्टिकल विचार केला तर ‘हो’ पण मी तसा वकील नाहीये ना सौंम्या ! इतरांसारखा. मला जुगार खेळायला आवडतो.आधीच हालचाली करून समोरच्या माणसाच्या वर्मावर घाव घालायला आवडतो मला.”
बोलता बोलता ते धुरीच्या घराजवळ पोचले पाणिनीने आपली गाडी जवळ उभी केली.खाली उतरून दाराची बेल वाजवली. आत बेल चा आवाज आला पण काही प्रतिसाद मिळाला नाही.
“ एक एक क्षण वाया चाललाय आणि हा माणूस दार उघडत नाहीये.” वैतागून पाणिनी म्हणाला.
“ कदाचित घरात कोणी नसेल.”
“ अध्या तासापूर्वी तिघेही, म्हणजे, तो बायको आणि कियान, बाहेरून  आलेत असा मला कनकने सांगितलं.मी धुरीशी बोललो आणि मी येतोय बाहेर जायचं नाही असं निक्षून सांगितलं तरी हा कुठे गेला? कसा काय गेला? ”
“काय करायचं मग आता परत जाऊया आपल्या ऑफिसला?” 
“नको त्यात पुन्हा वेळ वाया जाईल. काही झालं तरी मला धुरीला भेटायचं आहे. तो माझ्यावर असं इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करतोय की तो फार मोठा एक्झिक्यूटिव्ह आहे आणि तो स्वतःचा विचार स्वतः करू शकतो. त्याला वाटतंय डॉक्टर बंब बद्दल मला काहीच माहिती नाहीये. त्याला बहुतेक असं वाटत असावं की पेट्रोल कॅन घेऊन जाणाऱ्या मुलीला त्यांने लिफ्ट दिली वगैरे जी कपोल कल्पित कथा त्यांने आपल्याला सांगितली त्याच्याबद्दल मी त्याला उभं आडवं घेणार आहे. आपण एक काम करूया, सौंम्या, आपण गॅरेज मध्ये बघू या. 
ते त्याच्या बंगल्याच्या गॅरेज मध्ये गेले तीन कार राहतील एवढे मोठे गॅरेज होतं तीन वेगळी दारं होती. पण सर्व दारांना लॉक लावलेलं होतं. 
“सौंम्या आपण आपल्या कार मध्ये जाऊन थोडा वेळ वाट बघत बसू. कोणीतरी येईल. तो हे वाक्य म्हणाला, एवढ्यात मागच्या बाजूने एक मोठा आवाज आला आणि पाणिनीने पटकन वळून मागे बघितलं. तीन गॅरेज पैकी एका गॅरेजचं दार वर उघडलं गेलं होतं आणि आत मध्ये  एक रिकामी जागा होती बाकीच्या दोन गॅरेजमध्ये कार लावलेल्या होत्या. 
“अरेच्चा! हे दार कसं काय उघडलं गेलं आपोआप ?” सौंम्या म्हणाली.
“ ये इकडे माझ्याबरोबर सौम्या.” पाणिनी म्हणाला आणि ते गॅरेजच्या दिशेने जायला लागले
“ काहीतरी रिमोट कंट्रोलने  किंवा यांत्रिक क्लुप्ती वापरून नियंत्रण केलं जात असेल त्याच्यात. आपण इथे येत असल्याचं मी धुरी ला सांगितलं होतं त्याच्या आत त्याला कुठेतरी जाऊन यायचं असावं. त्याचा अंदाज असेल की आपण यायच्या आत तो जाऊन येईल.” 
त्यांनी दार उघडलेल्या गॅरेज मध्ये प्रवेश केला आपल्या गाडीचा नंबर बघून पाणिनी उद्गारला, “ हीच गाडी धुरी परवाच्या रात्री चालवत असावा. आणखीन एक स्पोर्ट्स गाडी आहे इथे आणि एक रिकामी जागा आहे, जिथे गाडी नाही. ते बोलत असतानाच तिन्ही गॅरेजचे दार हळूहळू खाली सरकायला लागलं आणि बंद झालं. 
“आपण आत आलो तेव्हा बहुदा कुठली तरी कळ आपल्या हातून म्हणजे आपल्या पायामुळे दाबली गेली असावी. आणि त्यामुळे दार आपोआप बंद झालं असावं. अशीच काहीतरी रचना आत येताना, आणि आत आल्यावर केली गेली असावी.” पाणिनी म्हणाला 
“हो. पण याचा अर्थ आपण आता आत अडकलो?” सौम्यानं घाबरून विचारलं. 
“नाही तसं काही नाही. तो बघ तो एक दरवाजा घराकडे जातो तो उघडला जातो का पाहू.”
सौंम्या त्या दाराच्या जवळच होती. तिने मूठ फिरवली. 
“हो उघडाच आहे ”  दार उघडून ती म्हणाली. “ हा एका पॅसेज मध्ये जातोय घराकडे जाणाऱ्या ” ती म्हणाली. 
“ठीक आहे. परवा रात्री जी गाडी धुरीने चालवली असं मला वाटतंय त्या गाडीकडे मला जरा नीट नजर टाकू दे. जरा तपासायची आहे मला ती.” पाणिनी म्हणाला आणि त्यानं त्या गाडीचे दार उघडलं. 
“ओह!” तो उद्गारला. 
“काय झालं सर?” सौंम्यानं विचारलं. 
“पेट्रोलचा कॅन ! ” गाडीच्या आतला पेट्रोलचा कॅन हातात धरत पाणिनी म्हणाला. 
“म्हणजे आपल्या कथेला पूरक असा पुरावा निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे तर!” सौंम्या म्हणाली. 
गाडीच्या आतला कप्पा पाणिनीने बटण दाबून उघडला. आतून एक कागदाची चिट्ठी सारखी स्लिप बाहेर आली. “आपला हा क्लायंट जास्तच हुशार आहे त्याने पेट्रोल पंपावरून फक्त हा कॅनच आणला असं नाही तर तो खरेदी केल्याचं बिल पण आणलं. फक्त तो इथे ती गाडीतच विसरला.”   पाणिनी म्हणाला.
“काय तारीख आहे त्याच्यावर?” 
“कालच्या तारखेचं आहे. माझ्याबरोबर ची भेट झाल्या झाल्या बहुदा लगेचच तो गेला असावा हे खरेदी करायला.” 
“आता काय करणार आहात तुम्ही त्याचं ?”-सौंम्या.
“कॅन खरेदीची ही स्लीप मी माझ्या खिशात ठेवणारे आणि हा पेट्रोलचा कॅन जिथे होता तिथेच ठेवणारे. जेव्हा आपल्याला धुरी भेटेल आणि मोठ्या झोकात सांगेल की पेट्रोलचा कॅन त्याच्या गाडीतच होता पण तो पुढच्या सीटच्या खाली गेला होता त्यामुळे त्याच्या ते लक्षात आलं नाही, त्यावेळेला मी त्याला विचारेन की दुसऱ्या कॅन चं काय झालं? तेव्हा तो मोठं आश्चर्य चेहऱ्यावर आणून म्हणेल की दुसरा कॅन म्हणजे काय म्हणायचंय मला? त्यावेळेला मी माझ्या खिशात असलेलं बिल बाहेर काढून त्याला दाखवीन. त्याच्या पुढे नाचवत त्याला विचारेन या दुसऱ्या कॅन बद्दल बोलतोय मी ”  पाणिनी म्हणाला.
“त्याला आश्चर्यच वाटेल आपण हे कसं शोधून काढलं याबद्दल.” सौम्या म्हणाली. 
“त्याला जरा विचार तर करू देत.” पाणिनी म्हणाला 
तुम्हाला काय वाटतं सर? धुरी असा विचार करेल, की आपली बायकोच याच्यात अडकली असेल आणि तिनेच या कारच्या कप्प्यात.....”
“बरोबर आहे तुझा मुद्दा सौम्या, कारण....”
पाणिनीचं वाक्य अर्धवट राहिलं कारण तिन्ही गॅरेजचे दरवाजे हळूहळू वर सरकून उघडू लागले होते आणि बाहेर एक गडद निळ्या रंगाची कार उभी होती.
एक छान दिसणारी तरुणी ड्रायव्हिंग सीटवर होती. तिने सराईतपणे आपली गाडी उघडलेल्या गॅरेज मधून आत आणली. समोर एकदम पाणिनी आणि सौम्याला बघून ती चमकली. 
“ कोण आहात तुम्ही? आणि काय करत आहात तिथे? ” ती ओरडली. 
“ माझी ओळख करून देतो मी, मी अॅडव्होकेट पाणिनी पटवर्धन आणि ही माझी सेक्रेटरी सौम्या सोहोनी ”  पाणिनी म्हणाला.
“मला वाटतं तुम्ही मिसेस धुरी?” सौंम्याने विचारलं.
“हो. लीना धुरी.” 
“आम्ही इथे तुमच्या नवऱ्याशी बोलण्यासाठी आलो होतो आणि खूप तातडीचं काम आहे एक एक मिनिट महत्त्वाचं आहे.” 
“अहो मग घरी जाऊन का बोलला नाहीत त्याच्याशी?” 
“याचं कारण दोन-तीनदा बेल वाजून सुद्धा कोणीच दार उघडलं नाही. म्हणून आम्ही इथे गॅरेज पर्यंत आलो. गॅरेजही बंद होतं. मग आम्ही आमच्या कार मध्ये बसून वाट बघण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात गॅरेज ची दारं आपोआप उघडली गेली म्हणून आम्ही आत आलो.”  पाणिनी म्हणाला. 
ती एकदम मोकळेपणाने हसली. 
“म्हणजे आमच्या घरात तुमचा आदरतिथ्य झालं नाही, स्वागत झालं नाही पण आमच्या गॅरेजमध्ये झाल तर!”
“मला वाटतंय तुमचा नवरा घरी नाहीये.”   पाणिनी म्हणाला.
“नाही, नाही इथेच आहे तो. त्याची कार पण इथेच आहे ना. त्यांनं मला सांगितलं की तुमचा फोन आला होता आणि तुम्ही येणार आहात. तो तुमची वाटच बघत होता.मी कियानला शाळेत सोडायला गेले होते.” 
“पण मग बेल वाजून सुद्धा दार उघडलं का गेलं नाही?”  पाणिनीने विचारलं.
“कदाचित बाथरूम मध्ये वगैरे असेल तो.चला, आपण घरी जाऊ. पण तुम्ही इथे का आलात मिस्टर पटवर्धन? म्हणजे ज्या कारणासाठी नवरा तुम्हाला भेटला होता त्या विषयात काही प्रगती झाली का ?” लीना धुरी ने विचारलं.
“खूपच झाल्ये पण नकारात्मक दृष्ट्या. कालपासून मी तुम्हाला सतत फोन करतोय दुपारपासून.”  पाणिनी म्हणाला.
“आम्ही ट्रीपला बाहेर गेलो होतो. काही गंभीर घडलय का?” 
“ खूपच गंभीर घडलंय. तुम्हाला ते वेगळं सांगण्यापेक्षा मिस्टर धुरी शी बोलताना तुम्हाला कळेलच.” 
“ठीक आहे चला घरी जाऊ.” ती म्हणाली गॅरेज पासून घराकडे जाणाऱ्या पॅसेज मधून ते घरात आले. एका प्रशस्त हॉलमध्ये तिने स्वागत केलं आणि बसायला सांगितलं. आणि आपल्या नवऱ्याला जोरात हाक मारली पण काही प्रतिसाद आला नाही. 
“तुम्ही बसा आरामात मी काहीतरी चहा पाण्याचं बघते. निनाद नक्कीच वरच्या मजल्यावर असेल. आंघोळ करत असेल कदाचित.” मग एकदम हळू आवाजात तिने पाणिनीला विचारलं, “निनाद ने तुम्हाला सांगितलेली पेट्रोलच्या कॅन वाल्या मुलीची गोष्ट खरी वाटते तुम्हाला?” 
“हो.” तुटक पणे पाणिनी म्हणाला 
तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. 
“तुम्हाला सुद्धा त्याने गंडवलं म्हणजे. तुमचाही विश्वास बसला त्या गोष्टीवर?” 
“नाही माझा विश्वास नाही बसला त्यासाठीच मला त्याला भेटायचं काही गोष्टी विचारायचेत काही गोष्टी दाखवायच्या आहत. त्याला बोलवाल का खाली?”  पाणिनीने विचारलं.
“बोलावतेच मी त्याला.” ती म्हणाली आणि जिने चढून वर गेली. ती येईपर्यंत पाणिनी आणि सौम्या आकर्षक रीतीने सजवलेल्या त्या हॉलमधील विविध पेंटिंग्स आणि रॅकवर ठेवलेली पुस्तक बघत बसले. अधून मधून तिने नवऱ्याला हाक मारण्याचे आवाज खाली ऐकू येत होते. थोड्यावेळाने ती खाली आली आणि थोड्याश्या काळजी युक्त स्वरात म्हणाली,
“पटवर्धन काहीतरी गडबड झाल्ये इथे.” 
“का? काय झालं?”  पाणिनीने विचारलं. 
“निनाद नाहीये वरती.” 
“ कुठे गेला असू शकतो तो?”   पाणिनीने विचारलं.
“बाहेर कुठेच गेला असायची शक्यता नाही. कारण त्याची कार आहे गॅरेजमध्ये” 
“वरती व्यवस्थित शोधून झालं तुझं ?”  पाणिनीने विचारलं.
“सगळीकडे बघितलं. सर्व खोल्या, त्याला जोडून असलेल्या बाथरूम,, त्याची स्टडी रूम कुठेच दिसत नाही.”  तिचा चेहरा आता एकदम पांढरट पडला. थकलेल्या स्वरांनी ती एकदम म्हणाली, 
“त्याला कपाटातच फक्त बघायचं राहिलं माझं.” 
तिने पटकन पाणिनी कडे बघितलं आणि परत जिना चढून वर जायला निघाली 
“आम्ही दोघं खाली शोधतो त्याला.”  पाणिनी म्हणाला.
पाणिनी आणि सौम्याने तळमजल्यावरच्या बेडरूम, नोकरांसाठी असलेल्या खोल्या, तळघर, स्वयंपाक घर, सगळीकडे शोधलं. कपड्यांच्या कपाटाची दारं सुद्धा उघडून बघितली. पुन्हा ते हॉलमध्ये आले तेव्हा मिसेस धुरी हॉलमध्ये आली होती. 
“तो अक्षरशः अदृश्य झालाय या घरातून !” ती म्हणाली. 
“ठीक आहे. या सगळ्याला एकच उत्तर आहे, त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध कोणीतरी बाहेर घेऊन गेलं असावं.”  पाणिनी म्हणाला.
“कोण नेणार पण त्याला बाहेर? ” लीना म्हणाली.
“ पोलीस .”  पाणिनी म्हणाला.
“अहो काय बोलताय तुम्ही !” 
“हे बघ तुला ते सगळं सांगायला आता वेळ नाही मला. पटकन माझ्या दोन-तीन प्रश्नांची उत्तर दे. आणि एकदम पटकन दे. जर का त्याला पोलिसांनी उचलून नेलं असेल आणि त्याला जर प्रश्न विचारले तर तो पोलिसांना मला सांगितलेलीच कथा सांगेल का?”  पाणिनीने विचारलं. 
“मला वाटतं सांगेल. तुम्ही त्याच्या कथेतली चुका दाखवून त्याच्या अति आत्मविश्वासाला धक्का दिला असणार हे मला माहिती आहे.”
“ पण त्याच्या प्रतिक्रिया काय असतील हे समजण्यासाठी तुम्हाला निनाद च व्यक्तिमत्व समजून घ्यावे लागेल. माझ्या माहितीप्रमाणे त्याचा आज तुम्हाला भेटायचा विचार होता आणि  त्यांनी तुम्हाला जी काही स्टोरी सांगितली होती ती कशी खरी आहे हे तो तुम्हाला पटवून देणार होता.”
“जर पोलिसांनी त्याला सापळ्यात पकडायचा प्रयत्न केला तर तो नेमकं काय करेल असं तुला वाटतं? म्हणजे तो त्याची स्टोरी तशीच खुलासा देत सांगत राहील की वकील या नात्याने माझ्याशी बोलल्याशिवाय मी काहीही सांगणार नाही असं ठामपणे पोलिसांना सांगेल?, की पोलिसांना खुलासा करत बसेल?”  पाणिनीने विचारलं.
“मला भीती वाटते की तो खुलासा करत बसेल. कारण तो हाडाचा विक्रेता आहे. अनेक वेळा तो मिटिंग घेतो कोणी काही प्रश्न विचारले तर त्याचा खुलासा करायची खूप सवय जडली त्याला.” लीना म्हणाली. 
“हीच मला भीती वाटत होती. चल सौम्या.” पाणिनी म्हणाला.
“कुठे निघालाय तुम्ही?” 
“तुमच्या नवऱ्याचं एकंदरीत वागणं बघता ते आत्ताच त्याच्यावर आरोप ठेवतील असं मला वाटत नाही आधी त्याला ते सरकारी वकिलांकडे नेतील आम्ही आता तिथेच जातोय.” 
 पाणिनी म्हणाला.
(प्रकरण ६ समाप्त )