प्रकरण १०
मिसेस धुरी पाणिनी पटवर्धन ला भेटून गेल्यानंतर सौम्याने आपली खुर्ची पाणिनीच्या टेबल जवळ घेतली आणि काळजी युक्त स्वरात म्हणाली,
“सर मला काळजी वाटते आहे. हे सगळं आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?”
“सौम्या मला अजूनही खात्री नाही की मी नक्की कुणाचा वकील आहे. वरकरणी मी निनाद धुरीचा वकील आहे पण त्याला असं वाटतंय की मी कियान साठी सर्व काही करावं. आपल्याकडे आत्ता जो काही पुरावा आहे त्या आधारे निनाद धुरीला मी या लफड्यातून बाहेर काढू शकतो. पण ज्या क्षणी मी हे करीन त्या क्षणी त्याच्या बायकोवर खुनाचा आरोप येऊ शकतो.
सर तुम्ही निनाद धुरीला सांगणार आहात की त्याची बायको डॉक्टर बंब यांच्या क्लिनिक मध्ये गेली होती आणि तिने काय पाहिलं ते?”-सौंम्या”
“इथे खरी कायदेशीर अडचण आहे सौम्या. म्हणजे वकील या नात्याने मी माझ्या अशीलाला सांगितलं पाहिजे, मला काय समजले ते. पण आता या प्रकरणात मी ते सांगणे योग्य आहे की नाही हेच मला ठरवता येत नाहीये .”
“सर मला काळजी वाटते ती त्या डायरीची.”
पाणिनी एकदम उठून उभा राहिला आणि म्हणाला,
“तुझ्याकडे आहे ती डायरी?”
“मी तुम्हाला स्पष्ट शब्दात तसं सांगितलं नाहीये की माझ्याकडे आहे म्हणून.”
“आधी सांगितलं नसेल तर आता सांग. आहे का तुझ्याकडे डायरी ?”
“हो. आहे.”
“दे ती माझ्याकडे.”
“वेळ लागेल त्यासाठी.”
“जा घेऊन ये ती.”
सौम्या उठली. बाहेर गेली. आणि पाच मिनिटांनी एक रजिस्टर वजा डायरी घेऊन आली. पाणिनीने ती आपल्या हातात घेतली आणि कोटाच्या खिशात टाकली.
“ काळजी करू नकोस सौम्या. इथून पुढे मी बघीन याचं काय करायचं ते.”
“सर तुमच्या ताब्यात आता अशी डायरी आहे की ज्याची चोरी झालेली आहे. प्रज्ञा पांडव ने डायरी दिलेली आहे. आणि ती तिने चोरलेली डायरी आहे. खांडेकर या सगळ्यातून काय आरोप करतील तुमच्यावर माहिती आहे? की खुनाच्या खटल्यात महत्त्वाचा असा एक पुरावा तुम्ही तुमच्याकडे ठेवून घेतलात. पोलिसांना न कळवता. तो पुरावा सुद्धा खुनाशी संबंध असलेल्या पण तुमचं अशील नसलेल्या एका व्यक्तीने चोरलेला पुरावा होता.”-सौंम्या
“तुला भीती वाटते हे मी समजू शकतो सौम्या, पण ज्या वेळेला एका वकिलाला वाटतं की तो जे काही करतो आहे ते बरोबर आहे त्या वळेला तो कायद्यातील तरतुदींचा किंवा त्यातील काही त्रुटींचा फायदा घेऊ शकतो, आपल्या अशिलाच्या हिताच्या दृष्टीने.”
“ही डायरी तुम्ही पोलिसाला देणार आहात ?”
“पुढची शंभर वर्षे तरी नाही”
“तर मग तुम्ही चांगलेच अडचणीत येणार आहात सर.”
पाणिनीने तिच्या प्रश्नाला उत्तर दिले नाही आपल्या पॅन्टच्या खिशात दोन्ही हात घालून तो फेऱ्या मारायला लागला.
त्याच्या डोक्यात त्या डायरी व्यतिरिक्त वेगळेच विचार चालू होते अचानक तो सौम्याला म्हणाला,
“डॉक्टर बंब यांचं ते अपॉइंटमेंटचं रजिस्टर. त्याच्यावर फक्त धुरी असं नाव लिहिलं होतं ते नाव निनाद धुरी साठी नव्हतं तर लीना धुरी साठी होतं .त्याच्यावर दुसरं नाव पांडव अस लिहिलं होतं. मी असं गृहीत धरत होतो की निनाद धुरी आणि प्रज्ञा पांडव यांनी एकत्र अपॉइंटमेंट घेतली होती पण आता माझ्या लक्षात येतय की ती एकत्र अपॉइंटमेंट नव्हती वेगवेगळ्या वेळी भेटण्यासाठी होती.” पाणिनी म्हणाला.
“सौम्या आपल्याला धुरी म्हणजे निनाद धुरी वाटला पण प्रत्यक्षात ती अपॉइंटमेंट लीना साठी होती. त्याचप्रमाणे पांडव या नावाची अपॉइंटमेंट आपण प्रज्ञा साठी गृहीत धरतोय पण प्रत्यक्षात ती मुलाच्या वडिलांसाठी तर नसेल?”
“माय गॉड!” सौम्या उद्गारली
“पण सर, वडील तर सहा वर्षांपूर्वीच गेलेत.”
“सौम्या पटकन कनक ला फोन लाव त्याला सांग या पांडव फॅमिली ची सर्व माहिती काढ. उगाचच आपण चुकीच्या गृहीतावर आधारित काही निर्णय घ्यायला नकोत.”
सौम्याने कनक ला फोन लावला आणि पाणिनीने दिलेला निरोप त्याला दिला
“सर तुम्हाला त्या चोरीची डायरीचं काय करायचं हे सतावतंय, माझ्या डोक्यात एक उपाय आहे तुम्ही दुसऱ्या एखाद्या वकिलाचा सल्ला का घेत नाही?”
“मी स्वतः वकील असताना दुसऱ्या वकिलाचा का सल्ला घेऊ?”
“तांत्रिकदृष्ट्या दाखवण्यासाठी. म्हणजे तुम्ही दुसऱ्या एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या की माझ्याकडे अशी एक चोरलेली डायरी आली आहे तर त्याचं मी काय करू मग तोच वकील तुम्हाला सल्ला देईल की ती पोलिसांकडे देण्याची गरज नाही.”
“म्हणजे तुम्हाला आपोआपच कायदेशीर दृष्ट्या संरक्षण मिळाल्यासारखं होईल तुम्ही म्हणू शकाल की माझ्या वकिलाने मला सल्ला दिला म्हणून मी पोलीस सांगून तरी ती डायरी दिली नाही.”
तेवढ्यात इंटर फॉर्म वाजला सौम्याने फोन उचलला बोलणं झाल्यावर तिने फोनवर हात ठेवून पाणिनीला सांगितलं,
“बाहेर वेधस कर्णिक नावाची व्यक्ती आली आहे आणि त्यांना तुम्हाला तातडीने भेटायचंय खूप महत्त्वाचे आहे असं तो म्हणतोय.”
“वेधस कर्णिक ! बार असोसिएशन मधला अत्यंत हुशार पण’ पहुचा हुआ’ असा क्रिमिनल लॉयर आहे. हा आता ह्याला माझ्याकडून काय हवं असेल ? ”
“काय योगायोग आहे बघा ! मीच तुम्हाला दुसऱ्या वकिलाचा सल्ला घ्यायला सुचवलं आणि एक हुशार वकील आपल्या दारात हजर आहे. तर आता त्याचा सल्ला घ्या मी म्हणते त्या कारणासाठी.” -सौंम्या
पाणिनी हसला. “तू म्हणतेस तसं होणार नाही सौम्या. ती डायरी माझ्याकडे ठेवावी पोलिसांना देऊ नये असा सल्ला तो मला देणार नाही.”
“का नाही देणार?”
“कारण तो माझ्यासाठी स्वतःची मान नाही अडकवून घेणार. तो अत्यंत पोचलेला आणि हुशार पण नीच असा वकील आहे. आत पाठव त्याला सौम्या.”
कर्णिक आत आला.तो एक छोट्या देहयष्टीचा पण तुडतुडीत असा माणूस होता आत आल्यावर त्यांनी पाणिनीला शेक हँड केला. “कसे आहात मिस्टर पटवर्धन?”
“मी छान. तुम्ही कसे आहात? आज अचानक काय काम काढलं?”
“खास असं काम नाही. या इमारतीत माझे काम होतं. तर मला आठवलं की तुमचं ऑफिस या बिल्डिंगमध्ये आहे. तर विचार केला की यावं आणि आणि भेटून जावं. तशी आपली भेट वरच्यावर कधीच होत नाही पण मी तुम्ही लढवलेल्या केसेसचा अभ्यास करतो मला खूप रस असतो त्यात तुम्ही असे समजू शकता अप्रत्यक्षरीत्या मी तुमच्या शिष्यच आहे. थोडा वेळ जरी मी तुमच्याबरोबर घालवला तरी मला बरंच काही नवीन शिकता येईल.”
पाणिनीनं यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही तेव्हा कर्णिक पुढे म्हणाला,
“तुमची सेक्रेटरी मिस सोहोनी हिच्या समोरच आपण मला जे काही बोलायचे आहे ते बोललो तरी चालेल ना?”
“काही हरकत नाही. माझी ती सेक्रेटरीच आहे, आणि माझी कामाची पद्धत अशी आहे की इथे येणाऱ्या अशीला बरोबर माझी जी काही चर्चा होते ती तिला पुन्हा सांगत बसण्यापेक्षा, मी तिला चर्चेतच उपस्थित राहायलाच सांगतो.. आपल्यातली सर्व चर्चा ती गोपनीय ठेवते त्याबद्दल तुम्ही काळजीच करू नका.”
“नाही मला त्याबद्दल काळजी नाहीये, म्हणजे ती इथे उपस्थित राहण्याची मला भीती नाहीये मला भीती वाटते ती तिच्या पेन्सिल आणि डायरीची. तिला सवय आहे ना की जी काही चर्चा होईल ती लगेच शॉर्टहँड मध्ये लिहून ठेवायची.” कर्णिक म्हणाला.
“म्हणजे तुम्ही असं काही मला सांगणार आहात का, की जे तिने लिहून घेऊ नये अशी तुमची इच्छा आहे? ” पाणिनीने विचारलं.
“हो.”
“म्हणजे तुम्ही असं काही सांगणार आहात का, की जे नंतर तुम्ही नाकारू शकता?”
कर्णिकने थोडा वेळ विचार केला नंतर पाणिनीच्या डोळ्याला डोळा भिडवत तो म्हणाला,
“ हो.”
पाणिनी मोकळेपणाने हसला आणि सौम्याला उद्देशून म्हणाला,
“ कर्णिक यांचा हा मोकळेपणा मला आवडला सौम्या. तुझी पेन्सिल खाली ठेव आणि इथे माझ्या शेजारीच बस. काहीही लिहून न घेता .”
“आपल्यात जे बोलणं होणार आहे ते कुठल्याही साक्षीदारासमोर होऊ नये ” –कर्णिक
“असं म्हणून आपल्यातल्या बोलण्यात साक्षीदार असावा ही माझी इच्छा अजून तीव्र केलीत तुम्ही.” पाणिनी म्हणाला.
कर्णिकचा एकदम नाईलाज झाला.
“ हो ठीक आहे तर. तुम्ही म्हणता तसेच होऊ देत. राहू दे सौम्याला इथे उपस्थित. मला बोलायचं होतं ते डॉक्टर बंब यांच्या प्रकरणात.”
“काय बोलायचं होतं?” पाणिनी म्हणाला. आपल्या बोलण्यात आणि चेहऱ्यावर कुठलेही भाव येणार नाहीत याची त्यांना काळजी घेतली.
“मी प्रज्ञा पांडवचा वकील म्हणून नेमला गेलोय. ती माझ्याकडे आली आणि तिने मला वकील पत्र दिलं. मला असं समजलं की तुम्हीच तिला एखादा वकील बघ म्हणून सांगितलं होतं. खर तर तुमचे आभारच. तुम्ही मला हा एक प्रकारे नवीन क्लाइंट मिळवून दिला म्हणून.”
“मी तिला विशेषत्वाने तुमचं नाव सुचवलं नव्हतं. मी तिला एवढंच सुचवलं की एखादा वकील बघ म्हणून.” पाणिनी म्हणाला.
“तरीसुद्धा तुमच्यामुळेच मला हा नवीन क्लाइंट मिळाला त्याबद्दल धन्यवाद आहेतच. तर मी तुम्हाला उगाचच इकडच्या तिकडच्या वायफळ गप्पा न मारता डायरेक्ट विषयालाच हात घालतो. ही प्रज्ञा पांडव माझ्याकडे आली खरी तिची वकिली मी घ्यावी म्हणून, पण मला देण्यासाठी तिच्याकडे पैसेच नाहीयेत.”
“ मग तुम्ही वकिली नाकारा सरळ.” पाणिनी म्हणाला
“ तसं नाही तिच्याकडे आत्ता पैसे नाहीयेत, पण येणार आहेत .”
“कसे काय येणार आहेत तिच्याकडे?”
“ तुम्हीच देणार आहात ते मला मिळवून.”
“मी?” पाणिनीने आश्चर्याने विचारलं.
“अर्थात तुम्ही. तुम्हाला तुमच्या अशिला कडून मिळतील. आणि तुम्ही ते मला द्याल .” कर्णिक म्हणाला.
“किती रक्कम असणार आहे ही ?” पाणिनीने विचारलं.
“हे बघा मी माझी सगळी कार्डस् टेबलावर ठेवतो. तुमचं अशील हा एक श्रीमंत अशील आहे. एका खुनाच्या प्रकरणात तो अडकला आहे. एका विशिष्ट प्रसंगी आणि एका विशिष्ट वेळेला माझी अशील प्रज्ञा पांडव त्याला त्या आरोपातून मुक्त करू शकते. ती असं सांगू शकते की तो स्वतः डॉक्टर बंब यांचा खून झाला त्यावेळेला बाहेरच होता. दुसरीच कुठली तरी स्त्री खुनाच्या जागी हजर होती. कर्णिक म्हणाला.
“न्यायाधीशांनी या म्हणण्यावर विश्वास ठेवायला हवा.” पाणिनी म्हणाला
“मी जेव्हा प्रज्ञाला शिकवीन पूर्ण तयार करीन त्या वळेला सरकारी वकील आणि न्यायाधीश दोघेही विश्वास ठेवतील. पण मला सांगायचे ते हे नाही. मला वेगळंच काहीतरी बोलायचे तुमच्याशी महत्त्वाचं.” कर्णिक म्हणाला.
“ काय ?”
“एका डायरी बद्दल जी डायरी प्रज्ञा पांडवनी तुमची सेक्रेटरी मिस सोहोनी हिला दिली आहे .”
“असं कोण म्हणतं?” पाणिनीने विचारलं.
“ माझी अशील .”
“ काय म्हणते ती डायरी बद्दल ?” पाणिनीने विचारलं.
“ ती डायरी म्हणजे एक महत्त्वाचं रेकॉर्ड आहे. त्या डायरीमध्ये या शहरातल्या सर्वात श्रीमंत परंतु एका मोठ्या स्कॅम मध्ये अडकलेल्या लोकांचं रेकॉर्ड आहे. ज्याच्याकडे ती डायरी आहे तो माणूस त्यातल्या कुणालाही फोन करून कितीही पैसे मिळवू शकतो. इतके पैसे की भविष्यात त्याला वकिली करायची सुद्धा गरज नाही. थोडक्यात एक सोन्याची खाण आहे ती डायरी म्हणजे. खरं म्हणजे आपल्या दोघांसाठी सुद्धा ती सोन्याची खाण आहे.”
“तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये.”
“ओह मिस्टर पटवर्धन ! तुम्ही उगाचच सगळं समजून, समजत नसल्याचा आव आणू नका. मोकळेपणाने बोला. तुमचं बोलणं रेकॉर्ड केलं जाईल असा कुठलाही उपकरण मी माझ्याकडे दडवलेलं नाहीये. तपासा हवं तर ” कर्णिक म्हणाला.
“तुमच्या आणि माझ्या विचारातच खूप फरक आहे मिस्टर कर्णिक .” पाणिनी म्हणाला.
“ माहित्ये मला. तुम्ही तुमच्या अशिलाची वकिली घेता आणि त्याला आरोपातून बाहेर काढता कारण तो निर्दोष असतो म्हणून. मी माझ्या अशिलाची वकिली घेतो याचं कारण प्रतिस्पर्ध्याच्या म्हणजे सरकारी वकिलाच्या केस मध्ये कुठेतरी काहीतरी खोटेपणा असतो. केस जिंकण्यासाठी तुम्ही तुमची बुद्धी कामाला लावता आणि मी मात्र फारशी बुद्धी कामाला न लावता इतर काय खेळी खेळायची ती खेळतो माझा हेतू हा पैसे कमावणे हाच आहे आणि पैसे तुम्हालाही मिळतात.”
पाणिनी काही न बोलता कर्णिक काय बोलतो ते उत्सुकतेने ऐकत राहिला. तो ऐकतो आहे असे पाहून कर्णिक रंगात आला आणि पुढे बोलायला लागला .
“आपल्याला ब्लॅकमेल वगैरे काही करायचं नाहीये. आपल्याला एवढेच करायचंय, त्या डायरीतल्या कुठल्यातरी एका बापाला फोन करून सांगायचं आहे की त्याचा मुलगा किंवा मुलगी ही डॉक्टर बंब यांच्या अनाधिकृत दत्तक योजनेतला एक भाग आहेत. त्या बदल्यात आपण पैशाची वगैरे काहीच मागणी करायची नाही. त्याला फक्त एवढंच सांगायचं की आम्हालाही माहिती आहे पण आम्ही इतके दयाळू आहोत की ही बातमी बाहेर पडू नये म्हणून जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही करू. लक्षात घ्या पटवर्धन डायरीतली नावं अत्यंत श्रीमंत अशा बापांची आहेत. त्यांचे स्वतःचे मोठमोठे व्यवसाय आहेत. आपण त्यांना पैसे मागायचे नाहीत. मग ते काय करतील? ते त्यांच्या व्यवसायासाठी पॅनल विधान सल्लागार म्हणून आपली नेमणूक करतील , आपल्याला कन्सल्टेशन केल्याबद्दल फी देतील.आपल्याला मोठाल्या क्लब मध्ये ऍडमिशन देतील. एकूण समाजातली आणि बार असोसिएशन मधली आपली पत वाढेल. आपल्याला राजकारणी नेत्यांकडून काम मिळतील असा लॉन्ग टर्म मध्ये आपला फायदा होईल.”
पाणिनीने हे आपल्याला काहीच पटत नसल्याचे कर्णिकला ठामपणे आणि निक्षून सांगितलं
“अहो आदर्शवादी मिस्टर पटवर्धन,” कर्णिक उपहासाने म्हणाला. “एक चोरलेली डायरी तुमच्याकडे आहे. मला एवढेच करायला लागणार आहे, माझ्या अशिलाला म्हणजे प्रज्ञाला मी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात योग्य वेळी उभे करीन आणि सरकारी वकिलांना टीप देईन की प्रज्ञाने ही डायरी तुमच्याकडे दिली आहे.”
“तुम्ही खरंच तसं करणार आहात?” पाणिनीने विचारलं.
“मला पैसा हवाय पटवर्धन. मला फी हव्ये.”
“आणि नंतर?” पाणिनीने विचारलं.
“नंतर त्या डायरीचा ताबा घ्यावा असं माझ्या डोक्यात आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण दोघेही त्यामुळे श्रीमंत होवू. तुम्ही मला डायरी दिली तर तुमच्यावर कुठलाही आरोप न करता उलट पक्षी मला मिळणाऱ्या पैशातला निम्मा वाटा मी तुम्हाला देईन.” कर्णिक म्हणाला.
“ हे सगळं मला ब्लॅकमेल सारखंच वाटतं. तुम्हाला आत्ता नक्की काय हवंय?” पाणिनीने विचारलं.
“मला आत्ताच्या आत्ता अडीच लाख रुपये रोख स्वरूपात अॅडव्हान्स हवाय.”
“त्याबदल्यात तुम्ही काय करणार आहात?” पाणिनीने विचारलं.
“त्या बदल्यात मी प्रज्ञा पांडवचा वकील म्हणून काम करणारे.”
“काय करणार तुम्ही नेमकं वकिली घेऊन?” पाणिनीने विचारलं.
“मी तिची केस अशा प्रकारे हाताळणारे की ती कशातही अडकणार नाही. एवढेच नाही तर तुमचं अशील निनाद धुरी याला सुद्धा काही त्रास होणार नाही आणि त्याचा मुलगा कियान याच्याबद्दल सुद्धा कुठलीही माहिती बाहेर येणार नाही.”
“आणि समजा तुम्हाला पैसे नाही मिळाले तर?” पाणिनीने विचारलं.
“मूर्खपणा करू नका पटवर्धन. मी काही तुम्हाला कुठल्या धमक्या दिलेल्या नाहीत किंवा तुम्हाला कुठलीही हमी दिलेली नाही. मी तुम्हाला एवढंच सांगितलं की मी प्रज्ञा पांडवची वकीली घेतोय आणि तिच्याकडे पैसे नसल्यामुळे तिच्या वतीने निनाद धुरी ने मला पैसे दिले तर त्यालाही कुठलाही त्रास होणार नाही आणि त्याच्या मुलाची कुठलीही बातमी बाहेर येणार नाही.”
“त्यासाठी तुम्हाला रोख अडीच लाख हवेत?” पाणिनीने विचारलं.
“हो.”
“आणि त्यानंतर?” पाणिनीने विचारलं.
“नंतर मी म्हटल्याप्रमाणे आपण त्या डायरीतली नाव शोधून काढू आणि त्यातल्या काही लोकांना फोन करु.”
“तुमचा निरोप मी माझ्या अशीलापर्यंत पोहोचवतो.” पाणिनी म्हणाला.
“ओ,पटवर्धन आता वेळ काढून पणा करू नका लगेच फोन लावा तुमच्या अशीलाला.”
“माझं अशील सध्या कस्टडीमध्ये आहे.” पाणिनी म्हणाला.
“ते माहिती मला. त्याच्या बायकोला फोन लावा. ती तुम्हाला अडीच लाख रुपये देते की नाही बघा.”
“एवढी माहिती कुठून मिळाली तुम्हाला?” पाणिनीने विचारलं.
“तुमच्याच क्लायंट ने माझ्या क्लायंटला सांगितलं.”
“ते काही असलं तरी मला माझ्या क्लायंटशी बोलावं लागेल.” पाणिनी म्हणाला.
“कधी बोलणार तुम्ही तुमच्या क्लायंटशी?”
“ते सांगू शकत नाही मी.” पाणिनी म्हणाला.
“त्या डायरीचं काय?” कर्णिकने विचारलं
“त्याबद्दल मात्र मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो.”
“सांगा लवकर”
“तुम्ही म्हणता तशी डायरी माझ्याकडे किंवा माझ्या सेक्रेटरीकडे असेल किंवा भविष्यात असे काही प्रसंग घडले की ती डायरी माझ्याकडे किंवा माझ्या सेक्रेटरीकडे आली तर ती डायरी तुमच्याच काय कुणाच्याही हातात पडणार नाही याची मी दक्षता घेईन.” पाणिनी म्हणाला.
कर्णिक इतका भडकला त्याच्या तोंडून शब्द फुटेना त्याने प्रचंड रागाने आपल्या उजव्या हाताची मूठ पाणिनी पटवर्धनच्या टेबलवर जोरात आपटली.
“माझ्या टेबलावर तुम्ही अशी आदळ आपट करण्याचे कारण नाही. तुमचा आवाजही वाढवायचं कारण नाही आणि तुमचा महत्त्वाचा वेळ इथून पुढे माझ्याशी बोलण्यात वाया घालवायचे ही कारण नाही. तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते तुम्ही मला सांगितलंय. मला जे काही सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं. बाहेर जाण्याचा रस्ता तो आहे मिस्टर कर्णिक” दाराकडे बोट दाखवत पाणिनी म्हणाला.
“माझी फी देण्याबंबत तुमच्या क्लाइंटला तुम्ही सांगणार आहात का?” त्याही परिस्थितीत कर्णिकने निर्लज्जपणे विचारलं.
“याबाबत मी विचार करीन आणि माझ्या क्लायंटशी बोलेन पण वरकरणी मला असं वाटतंय की प्रज्ञा पांडवचा वकील या नात्याने तुम्हाला माझ्या क्लाइंटने फी द्यावी हे शहाणपणाचे ठरणार नाही आणि कायदेशीरही ठरणार नाही.” पाणिनी म्हणाला.
“ठीक आहे माझ्याकडे प्लॅन बी तयार आहे.” कर्णिक म्हणाला. “तुमचं अशील निनाद धुरी याला ब्लॅकमेल करून मी पैसे घेऊ शकतो त्याच्या मुलाबद्दल म्हणजे कियान बद्दल मला सर्व माहिती आहे.”
“माहिती असेल तुम्हाला पण तुमच्याकडे पुरावा काही नाही. प्रत्यक्ष उपलब्ध रेकॉर्ड प्रमाणे निनाद धुरी आणि त्याची बायको लीना धुरी यांच्या लग्न संबंधातूनच कियानचा जन्म झाला आहे.” पाणिनी म्हणाला.
“शेवटी नाईलाजाने मला प्रज्ञा पांडवना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं करून त्या डायरीची सगळी हकीगत सांगायला लागावं लागेल.” कर्णिक भडकून म्हणाला.
“हे तू मगाशी सांगितलं आहेस मला.” पाणिनी एकेरीवर येत म्हणाला.
“आणि यावर तुझे उत्तर?” कर्णिक ने पण एकेरीवर येत विचारलं.
“तेही तू मगाशी ऐकलं आहेस माझ्याकडून.” पाणिनी म्हणाला.
कर्णिक काही न बोलता धाडकन दार उघडून बाहेर पडला.
हे सगळे संवाद ऐकतान सौम्या घाबरून गेली होती
“ बापरे! काय करणार आहात तुम्ही सर?”-सौंम्या
“मी आता फार वेळ वाट न बघता असा आग्रह धरणार आहे की सरकार पक्ष विरुद्ध धुरी हा खटला तातडीने सुरू करण्यात यावा. धुरीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्याच्याशी चर्चा करायला मी लगेच जातोय सौंम्या, तू खांडेकरांना फोन करून मी धुरीला भेटायला येत असल्याचं कळव ” पाणिनी म्हणाला.
त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात पाणिनी पटवर्धन निनाद धुरीच्या समोर बसला होता आणि कर्णिक आणि त्याच्यात झालेल्या संवादाचा तपशील त्याला सांगत होता.अर्थात त्याने त्या डायरी बद्दल धुरीला काहीच सांगितलं नाही. खुनाच्या आरोपातून मुक्तता आणि कियानच्या अनधिकृत दत्तक विधानाचे गुपित बाहेर न येणे यासाठी प्रज्ञा पांडव मदत करत असेल तर कर्णिकला हवे असलेले अडीच लाख रुपये द्यायची तयारी धुरीने दाखवली.पण पाणिनी ला ते मान्य नव्हतं,त्याच्या दृष्टीने ते ब्लॅकमेल होतं. त्यावरून दोघांचे खूप वाद झाले.इतके की पाणिनीने धुरीला सांगितलं की तू दुसरा वकील बघू शकतोस.शेवटी धुरीने शरणागती पत्करली आणि पाणिनीने त्याला हवं ते करावं म्हणून सांगितलं.आपण हा खटला लौकरच चालू व्हावा म्हणून आग्रह धरणार असल्याचं जेव्हा पाणिनीने सांगितलं तेव्हा धुरीला आश्चर्य वाटलं.
“ आपण खर तर हा खटला लांबवायला हवा ” तो म्हणाला.
“ तू मला खरं काय ते सांगितलंस तर माझ्या पद्धतीने मी खटला जिंकण्याची संधी निर्माण करू शकतो.” पाणिनी म्हणाला.
“ बोला काय विचारायचं आहे?” धुरी म्हणाला.
“ तू खरंच डॉ.बंब यांच्या घरात गेला नाहीस?” पाणिनीनं विचारलं.
“ बिलकुल नाही. मी बाहेरच थांबलो होतो.प्रज्ञा एकटीच आत गेली होती.”
“ या तुझ्या विधानावर विश्वास ठेऊन मी माझा बचाव आखला तर तुझी सुटका होवू शकते पण तू हे खोट बोलत असशील तर तुला मीच काय परमेश्वर सुद्धा वाचवणार नाही.” पाणिनी म्हणाला.
धुरीने पाणिनीचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, “ तुम्ही चालू करा खटला पटवर्धन, मी खरंच सांगितलंय तुम्हाला.”
(प्रकरण १० समाप्त.)
वाचक हो माझी ही रहस्य कथा आपल्याला आवडत असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींनातलग घ्या नाही वाचायला सुचवा तुम्ही स्वतःही फक्त लाईक न करता कॉमेंट्स करा.