प्रकरण ९
दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता लीना धुरीचा पाणिनीला फोन आला आणि एकदम तारस्वरात ती ओरडली,
“शेवटी ते झालंच मिस्टर पटवर्धन. पोलीस आले, आणि निनाद ला घेऊन गेले. ते म्हणाले की डॉक्टर बंब यांच्या खुनाच्या संशयावरून आणि पुरावा दडवण्याच्या संशयावरून ते त्याला घेऊन जात आहेत.”
“ठीक आहे, मला अंदाज होताच तो. पण तुला वाटतं ना मी दिलेल्या सूचना तो पाळेल?” पाणिनीने विचारलं.
“माझी मनापासून इच्छा तर आहे की तो पाळेल. शेवटी आमच्या मुलाचं,कियानचं सुख आम्हाला महत्त्वाचं आहे आम्ही त्याचे खरे आई-वडील नाही हे त्याला कळलं तर केवढा मोठा अनर्थ होईल.”
“पण तुला खात्री नाही वाटत आपल्या नवऱ्याबद्दल?” पाणिनीने विचारलं.
“नाही. खात्री देऊ शकत मिस्टर पटवर्धन. मुळात त्याची विक्रेत्याची मेंटॅलिटी आहे. दुसऱ्याला पटवण्यात तो वाकबगार आहे.”
“गाडीत बस आणि जेवढं लवकरात लवकर माझ्या ऑफिस मध्ये येणं शक्य आहे तेवढी ये मी वाट बघतोय. तुझी किती वेळ लागेल?” पाणिनीने विचारलं.
“अर्धा तास.”
“त्यापेक्षा कमी वेळात जमव” पाणिनी म्हणाला. आणि त्याने फोन बंद केला.
“सर आपल्याकडलं ते डॉक्टर बंबचं रेकॉर्ड नष्ट करणे योग्य होईल ना?” सौम्यानं विचारलं.
पाणिनीने नकारार्थी मान हलवली. “आत्ता नको, नंतर कदाचित करू. आजच्या माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल कर. आणि मिसेस धुरी ऑफिसचा आल्या आल्या तिला माझ्या केबिनमध्ये घेऊन ये.”
तो खूप विचारात घडलेला होता अस्वस्थपणे आपल्या ऑफिसमध्ये तो येरझऱ्या मारायला लागला त्याची ही नेहमीच सवय होती. विचारांचा काहूर डोक्यात माजलं की तो अशाच येरझऱ्या मारून आपलं डोकं शांत करायचा प्रयत्न करत असे. जवळजवळ वीस मिनिटे अशीच गेली. सोम्यान दार उघडलं. तिने दार उघडताच ती काय बोलते आहे याचा विचार न करता पाणिनी तिला म्हणाला,
“ घेऊन ये तिला आत.”
“ माझ्या शेजारीच उभी आहे.” सौंम्या म्हणाली
“बस.” सोफ्याकडे बोट दाखवत पाणिनी म्हणाला. “ आणि आता बोलायला सुरुवात कर.”
“म्हणजे?”
“म्हणजे डॉक्टर बंब ना तू ओळखत होतीस कियानच्या जन्माच्या वेळी जो काही फ्रॉड डॉक्टर बंब यांनी केला, त्यात तू सामील होतीस.”
लीना धुरी एकदम थकल्यासारखी झाली
“ सांगते सर्व ” ती म्हणाली.
“ मला मूल होऊ शकणार नव्हतं हे मला समजलं आणि त्याच्या बरोबरीनेच डॉक्टर बंब यांच्या कार्यपद्धतीबद्दलही म्हणजे अनाधिकृत दत्तक पद्धतीबद्दल.
डॉक्टर बंब यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे मी सहा आठवडे आमच्या अगदी जवळच्या नातेवाईकांना खोटेच जाहीर करायचं होतं की मला बाळ होणार आहे आणि या कालावधीत मी पूर्णपणे च्या सर्वांच्या संपर्कातून बाहेर राहायचं होतं. ते मी केलं म्हणजे तुमच्या दृष्टीने त्यांच्या कृष्णकृत्या मध्ये मी सामील होते असं तुमचं म्हणणं असेल तर ती या दृष्टीने.”
“कियानच्या बाबतीत काही प्रॉब्लेम येऊ शकतो हे तुला पहिल्यांदा केव्हा लक्षात आलं?” पाणिनीने विचारलं.
“नाही. माझ्या नवऱ्याने केलेल्या बतावणीतली लूप होल्स तुम्ही सांगितल्यानंतरच लक्षात आलं.”
“त्याची तथाकथित सेल्स मीटिंग संपवून तुझ्या नवरा घरी आला, दुसऱ्या दिवशी त्यानं तुला कॅन घेऊन जाणाऱ्या त्या मुलीबद्दल सगळी हकीगत सांगितली . तुला त्यात काहीतरी गोलमाल वाटली भीती वाटली आणि मी त्याची उलट तपासणी घ्यावी म्हणून तू तुझ्या नवऱ्याला माझ्याकडे पाठवलंस.”
“मग यात चुकीचं काय केलं मी?” लीना धुरीने विचारलं
“सर्वच गोष्टी.”
“मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं ”
“तुला बरोबर समजलय सर्व. नवऱ्याच्या आधी तुला समजलं होतं की कियान चा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर बंब यांच्या ऑफिसात आलेल्या मुलीबद्दल तू मला सांगितलंस, तू म्हणाली होतीस की तिच्या जॅकेटवर मोत्याची बटणं लावली होती.”
“हो. बरोबर आहे ”
“तुला कसं कळलं ते?”
“कसं म्हणजे? माझ्या नवऱ्याने सांगितलं मला .”
“हेच खोटं बोलतेस तू! तुला नवऱ्याने नाही सांगितलं जॅकेटवरच्या मोत्याच्या बटणा बद्दल त्याला काहीही माहीत नव्हतं. त्याला तिच्या कपड्याबद्दल सुद्धा फारसा काही सांगता आलं नाही त्याला. एखादा माणूस स्त्री कडे बघितल्यावर तिचं वर्णन किंवा तिच्या कपड्याचं वर्णन जसे सर्वसाधारणपणे करू शकतो तितकीच माहिती त्यांने आम्हाला दिली. तू मात्र आम्हाला माहिती देताना एखादी स्त्री जेवढ्या बारकाव्याने माहिती देईल एवढ्या बारकाव्याने माहिती दिलीस. विशेषता त्या जॅकेटचं वर्णन करताना. डॉक्टर बंब यांनी सोमवारी रात्री धुरी नावाच्या एका माणसाला अपॉइंटमेंट दिली होती. तुझा नवरा म्हणतो की ती अपॉइंटमेंट त्याने घेतली नव्हती. आणि ज्या पद्धतीने तो हे ठामपणे नाकारतोय त्यावरून मला वाटते की त्याने ती घेतली नसावी. आता धुरी या आडनावाची दोनच माणसं आहेत. एक तो आणि दुसरी तू. आता मला सांग की तू का अपॉइंटमेंट घेतली होतीस डॉक्टर बंब यांची सोमवारी रात्री? ” पाणिनीने तिच्यावर एकदम बॉम्ब टाकला
ती एकदम हताश झाली.
“हो मी घेतली होती अपॉइंटमेंट. माझं अंतर्मन मला सतत सांगत होतो की कियान बद्दल मला काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे. म्हणजे त्याच्या जन्माचे रहस्य फुटण्याच्या संदर्भात. माझा नवरा मला हमी देत होता की तसं काहीही होणार नाही परंतु मला एक अंतर्यामी भीती वाटत होती त्यातून सोमवारी डॉक्टर बंब यांनी माझ्या नवऱ्याला लिहिलेलं एक पत्र माझ्या नजरेला पडल.”
“ कुठे होतं हे पत्र ?”
“घरी होतं. सर्वसाधारणपणे ऑफिस संदर्भातील सर्व महत्त्वाची पत्र नवरा त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावरच मागवतो. तरीही घरी काही पत्र येत असतात. जाहिरात कंपन्यांची किंवा तत्सम पत्र नवरा त्याच्या कडे फारसे लक्ष देत नाही. कारण घरी येणारी पत्र त्याच्या दृष्टीने फारशी महत्त्वाची नसतात.”
“ठीक आहे. हे पत्र नवऱ्याच्या नावाने आलं होतं आणि घरी आलं होतं?” पाणिनीने विचारलं.
“हो.”
“आणि तू ते पाकीट उघडलंस?” पाणिनीने विचारलं.
“हो. त्या डॉक्टरने लिहिलं होतं की काही वर्षापूर्वी घडलेल्या एका घटनेबंबत काही नवीन विषय समोर आले आहेत आणि त्याबद्दल डॉक्टर व त्याची भेट घडणं आवश्यक आहे.”
“नंतर तू हे पत्र तुझ्या नवऱ्याला दाखवलंस?” पाणिनीने विचारलं.
“छे छे असं काही केलं नाही मी. जाळून टाकले ते .”
“नवऱ्याला काहीही न सांगता?”
“ हो.”
“नंतर काय केलंस तू? नवऱ्याच्या ऐवजी तूच डॉक्टर बंबची अपार्टमेंट घेतलीस?” पाणिनीने विचारलं.
“हो कारण नवऱ्या जाऊन भेटून आला असता तरी त्यांनी मला सांगताना बऱ्याच गोष्टी कमी जास्त करून सांगितले असते त्याचा स्वभावच आहे तो प्रत्यक्ष काय भानगड आहे ते मला जाणून घ्यायचं होतं म्हणून मीच डॉक्टरला भेटायचं ठरवलं. डॉक्टरांनी मला रात्री साडे अकरा वाजता यायला सांगितल.”
“सोमवारी?” पाणिनीने विचारलं.
“हो सोमवारी.अनायसे निनादची सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह ची मीटिंग होतीच. त्यादिवशी त्याला घरी यायला वेळ लागणारच होता आणि माझा अंदाज होता की मी डॉक्टरांना भेटून तो घरी यायच्या आत येईन आणि अगदी तो यायच्या आत नाही आले तरी त्याला त्याच काही वाटणार नाही कारण बरेच वेळा मी अशी बाहेर जात असते, जेव्हा त्याची सेल्स मिटिंग असते तेव्हा.”
“ठीक आहे डॉक्टर बंबच्या ऑफिस मध्ये नेमकं काय घडलं मला आता सविस्तर सांग.” पाणिनी म्हणाला.
“डॉक्टर बंब यांच्या घराच्या अलीकडेच एक दोन चौक सोडून मी माझी गाडी पार्क केली आणि चालत त्यांच्या घराकडे गेले. रिसेप्शन रूमच्या दिशेने.”
“दार उघड होतं?” पाणिनीने विचारलं.
“दार उघड होतं. मी आत गेले पण आत प्रवेश केल्यावर त्यांच्याकडे अशी सिस्टीम आहे की खोलीत प्रवेश केला की आतल्या खोली मधील बेल आपोआप वाचते त्याचा आवाज ऐकून डॉक्टर बाहेर आले आणि मला म्हणाले की ठरल्यापेक्षा मी लवकरच आल्ये त्यामुळे मला थोडं थांबायला लागेल. त्यामुळे त्यांनी मला वेटिंग रूम ला बसवलं. ते म्हणले आता मी बिझी आहे हातातलं काम संपलं की तुला भेटतो.मी बराच वेळ वाट पाहिली. मी एकदम नर्व्हस झाले होते. त्या क्षणी मला एकदम जाणीव झाली की बंब यांच्या क्लिनिक मधली माझी उपस्थिती ही सुद्धा माझ्या दृष्टीने खूप अडचणीची ठरू शकते. म्हणजे समजा डॉक्टर बंब यांची चौकशी करायला पोलीस येणार असतील नेमके त्याच वेळेला, किंवा मला ओळखणार कोणी जर तिथे आलं तर ?मी पुरतीच गुरफटून गेले असते या प्रकरणात त्यामुळे मला तिथे वेटिंग रूम मध्ये नुसतं थांबून चालणारच नव्हतं. ते धोकादायकच ठरणार होतं. ऑफिसच्या टोकाला रेस्ट रूम होती मी तिथपर्यंत गेले. दोन दार मला दिसली. एक ऑफिसातल्या बाजूला जाणारं आणि एक बाहेरच्या बाजूला जाणारं. मी त्या खोलीत गेले आणि बाहेरच्या बाजूला जाणार दार किलकिलं ठेवलं, जेणेकरून मला बाहेरचं बघता येईल.”
“थोड्यावेळाने बाहेरचे दार उघडलं गेलं आणि ती मुलगी आत आली.”
“म्हणजे तुझ्या नवऱ्याने वर्णन केलेली मुलगी? कॅन वाली?” पाणिनीने विचारलं.
“हो. बरोबर.”
“तू व्यवस्थित बघितलंस तिच्याकडे?”
“हो”
“पुढे काय झालं ?”
“तर आतल्या ऑफिस मधून एकदम झटापटीचे किंवा मारामारीचे आवाज ऐकू यायला लागले म्हणजे चक्क ठोसे मारण्याचा किंवा काहीतरी आपटल्याचा आवाज. मी आतल्या बाजूला जाणारं दार उघडलं. पाहिलं तर डॉक्टर बंब जमिनीवर पडले होते. माझ्याकडे पाठमोरी असणारी एक व्यक्ती उघडलेल्या तिजोरी समोर बसली होती आणि तिजोरीतली पुस्तक फायली, कागदपत्र हे सर्व त्याच्यासमोर उघड पडलं होतं.”
“तू काय केलंस मग?”
“मला त्या वेळेला दुसरं काहीच सुचलं नाही मी प्रचंड जोरात किंचाळले. अगदी बेंबीच्या देठापासून.”
“मग काय झालं?”
“ती व्यक्ती एकदम दचकली आणि जीव तोडून घराच्या मागच्या दिशेला पळून गेली.”
“त्या व्यक्तीचा चेहरा पाहिलास तू?”
“नाही . माझ्या मनात विचार आला की त्या व्यक्तीमुळे मी जेवढी घाबरले नाही त्यापेक्षा जास्त धक्का त्या व्यक्तीला बसलाय. म्हणूनच ती व्यक्ती पळून गेली त्याच क्षणी माझ्या मनात विचार आला बाहेरच्या बाजूला येऊन बसलेल्या त्या तरुणीचा. अजूनही ती बाहेर बसलेली होती. तिने मला पाहू नये म्हणून मी ही मागच्या दरवाजाने पळून गेले.”
“म्हणजे तुझ्या किंकाळीने जी व्यक्ती बाहेर पळून गेली त्याच दरवाजाने तू ही बाहेर पळालीस?” पाणिनीने विचारलं.
“हो अगदी त्याच मार्गाने.”
“तू बाहेर गेल्यानंतर त्या व्यक्तीचा काही मागोवा तुला लागला का?”
“मला कोणीच दिसलं नाही.मी दमले होते. नंतर थोडीच फिरल्यानंतर त्या घरापासून थोडं लांब बाजू ला मी चालत गेले आणि माझी कार लावली होती त्या दिशेने गेले. आणि घरी येऊन कपडे बदलून सरळ झोपून गेले. रात्री केव्हा तरी उशिरा निनाद आला मी त्याला असं भासवलं की मी गोळी घेतली आहे झोपायची. त्यामुळे गाढ झोपले होते. मी त्याला थोडेफार प्रश्न विचारले मीटिंग कशी झाली वगैरे आणि खूप झोप येते आहे असं त्याला भासवलं प्रत्यक्षात मी टक्क जागी होते.”
“पण तुझा नवरा?”
“तो त्याच्या खोलीत जाऊन झोपला.”
“वेगळ्या खोलीत ?”
“हो. दोघांच्या दोन खोल्या वेगळ्या आहेत पण त्यांना जोडणारी ड्रेसिंग रूम आणि बाथरूम एक आहे. बरेच वेळा माझा नवरा असा रात्री अपरात्री येतो मग मला डिस्टर्ब व्हायला नको म्हणून त्याच्या खोलीत जाऊन वेगळा झोपतो. कारण मला जरा काही खुट्ट वाजलं की जाग येते.”
“आल्यावर पुन्हा तो बाहेर गेला?”
“हो. बहुतेक तीन वाजता पुन्हा तो बाहेर पडला.”
“किती वेळ बाहेर होता तो ?”
“दीड एक तास असेल साधारण.”
“जाताना त्याची कार बाहेर घेऊन गेला?”
“हो”
“त्याबद्दल काही विचारलं नाहीस तू त्याला?”
“नाही विचारलं.”
“नंतर काय केलंस तू?”
“दुसऱ्या दिवशी मला इतकी निराशा आली की खायचीच इच्छा होत नव्हती. तरी मी नवऱ्याला त्याच्या सेल मीटिंग बद्दल प्रश्न विचारले. उशीर का झाला वगैरे. तेव्हा त्यांने कॅन घेऊन जाणाऱ्या बाईची गोष्ट मला सांगितली. मला आधी ती खरीच वाटली. मीच त्याला म्हणाले की अशा असह्य तरुणीला हॉटेलमध्ये सोडून येणं योग्य नव्हतं त्यापेक्षा इथे घरी आणलं असतं तर जास्त बरं झालं असतं. मी.. मी.. त्याला सुचवलं की आपण दोघेही हॉटेलवर जाऊ तिला इथे घरी आलो एकत्र नाश्ता करू .”
“तो तयार झाला या गोष्टीला?”
“आधी आडवेढे घेतले पण नंतर तयार झाला.”
“ तुम्हाला तिथे घेऊन गेला.?”
“ हो.तो खोटं बोलतो आहे असा संशय मला नेमका कधीपासून यायला लागला ते मला सांगता येणार नाही पण मला असं जाणवलं की तो मला तिथे घेऊन जात असतानाच त्याला माहिती होतं की ती तिथे नाहीये. वाटेत तो नेहमीप्रमाणे बऱ्याच बतावण्या करत होता. तेव्हा मला वाटलंच की हा पहाटे तीनला उठून गेला बाहेर तेव्हा तिला हॉटेल मधून तिच्या घरी पोहोचवलं असावं. तरीपण मी काही बोलले नाही. मी त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे बोलू दिलं. पण मी विचार करत राहिले. पण डॉक्टर बंब यांच्या घरी घडलेल्या प्रसंगापासून मी पुरती हताश घेऊन गेले होते. गाडीत मी सतत रेडिओवरच्या बातम्या लावूनच ठेवल्या होत्या. त्यातूनच मला समजलं होतं की पोलिसांनी त्यांच्या घरचं अपॉइंटमेंट पुस्तक जप्त केलं होतं. ज्यात पांडव आणि धुरी अशी दोन्ही नावं होती. मला माहित होतं पटवर्धन, की ते ज्या धुरी बद्दल बोलत होते ती मी होते.पण निनाद च्या चेहेऱ्यावरील भाव बघून मला जाणवत होतं की धुरी म्हणजे तो स्वत:ला समजतोय.”
“ ठीक, आलं लक्षात.तू काय केलंस नंतर?” पाणिनी म्हणाला.
“ मी त्याला विचारलं की तू डॉ.बंब च्या घरात गेला नव्हतास ना?”
“ त्यावर काय म्हणाला तो?”
“ त्यावर तो काही बाही बोलायला लागला,थापा मारायला लागला,म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि सांगितलं की माझ्या नवऱ्याला जरा उलट सुलट प्रश्न विचारा आणि त्याच्या स्टोरीमधलं खरं तत्थ्य शोधून काढा.ती मुलगी त्याला ब्लॅकमेल करत असावी किंवा करेल असं मला वाटत होतं.” लीना धुरी म्हणाली.
“ नवऱ्याला पटवायला त्रास नाही पडला?, म्हणजे माझ्याकडे येण्यासाठी? ”
“ थोडासा पडला पटवर्धन, पण तो आला शेवटी भेटायला तुम्हाला. तर ही माझी सर्वच्या सर्व हकीगत आहे.तुमच्यापासून काहीही हातचं राखून न ठेवता सांगितली आहे.माझ्या कियानला वाचवा.तो आमचा मुलगा नाही हे कधीच समाजासमोर येऊ देऊ नका. तो एवढा लाडका आहे न आमचा की त्याच्यासाठी आम्ही काहीही करू. माझ्या भावना मी शब्दात नाही सांगू शकणार.” लीना म्हणाली.
“ आपण निनाद आणि लीना याचे खरे पुत्र नाही तर दत्तक पुत्र आहोत, ते सुद्धा अधिकृत दत्तक विधानातून नाही तर चोर मार्गाने हे दोन धक्के त्याला एकवेळ सहन होतील पण आता आपले आईबंब खुनाचे संशयित म्हणून पकडले गेलेत हा धक्का फार मोठा असेल त्याच्यासाठी.” लीना रडत म्हणाली.
“ माझ्यावर फार मोठी जबंबदारी टाकल्येस तू. ” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण ९ समाप्त.)