..........आम्ही त्या खोलीत गेलो. दाराला किल्ली लावलेली होती. आम्ही आत गेलो. आत कुणाचीही चाहूल नव्हती. अंथरुणावर कोणीतरी झोपल्याच दिसत होतं. म्हणजे बिछाना वापरल्याचं दिसत होतं पण कोणीही नव्हतं.” ....पुढे.....
प्रकरण २
धुरी ने दिलेलं उत्तरं ऐकून पाणिनीला आश्चर्य वाटलं नाही. त्याने पुढे चौकशी चालू ठेवली.
“नंतर काय पुढे?”
“बस एवढंच. हीच सगळी गोष्ट मला सांगायची होती. मला वाटतं ती सकाळी लवकर उठून किल्ली दारालाच ठेऊन निघून गेली असावी. माझ्या बायकोला भीती वाटते की मी कशात तरी अडकलो असणार. त्या रिसेप्शनिस्ट ला सुद्धा आमचा संशय आला असावा असं मला आता वाटतं आहे. पण आता त्याला काही इलाज नाही. काही झालं तरी मला माझ्या घरीच यायचं होतं. त्यामुळे मॅनेजरने सांगितलेली सगळी रक्कम मी देऊन टाकली त्यावर आणखी रक्कम त्याने मागितली असती तरी मी दिली असती कारण त्या मुलीला आसरा देणं महत्त्वाचं होतं पण तिच्यात गुंतून राहायचं नव्हतं मला घरी यायचं होतं.”
“आणि मग?” पाणिनीने विचारलं
धुरीने आपले खांदे उडवले. “जे झालं ते हे एवढं सगळं आहे. याहून अधिक काही सांगण्यासारखं नाही.”
“तुमची गोष्ट म्हणजे फारच विचित्र आहे. म्हणजे एक मोठी साहस कथाच आहे.” पाणिनी म्हणाला. “तुमच्या बायकोचा विश्वास बसलाय का या गोष्टीवर?” पाणिनीने विचारलं
“बसलाय की! का बसणार नाही तिचा विश्वास?”
“तिला हे सगळं संशयास्पद वाटत असावं असं तुम्हाला नाही वाटत?” पाणिनीने विचारलं
“अजिबात नाही वाटत. तिला का संशय येईल माझा? मी जे सांगितले ही वस्तुस्थिती आहे त्यात शंका घेण्याजोगं काय आहे?” धुरी ने विचारलं.
“मग तुम्ही एखाद्या वकिलाचा सल्ला घ्यावा असं तिने तुम्हाला का सुचवलं ?”
“मला संरक्षण मिळावं, काही पुढे... म्हणजे काही लफडं... म्हणजे असं बघा पटवर्धन, त्या हॉटेलमध्ये आम्ही नवरा बायको आहोत असं दाखवून रजिस्ट्रेशन केलं होतं त्याचा फायदा घेऊन त्या मुलीने पुढे मागे काही लोच्या करू नये केला तर मला संरक्षण मिळावं असं माझ्या बायकोला वाटतंय म्हणजे माझ्या बायकोचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी खरं सांगतोय हेही तिला माहिती आहे पण त्या मुलीने काही अडचण निर्माण करू नये म्हणून मी वकील शोधावा असं तिला वाटतंय.” धुरी अडखळत पण विचार करत म्हणाला.
पाणिनीने हेतूपर्वक सौम्याकडे पाहिलं
“मला सांगा धुरी, पहिल्यांदा तुम्हाला ही मुलगी दिसली तेव्हा तिच्या हातात पेट्रोलचा कॅन होता?”
“हो बरोबर”
“पाच लिटरचा कॅन?”
“ हो बरोबर ”
“लालसर रंगाचं पेट्रोल होतं त्यात?” पाणिनीने विचारलं
“हो मला वाटतंय तसं.”
“तिचा ड्रेस कसा होता?”
“ओह ! मिस्टर पटवर्धन मला नाही सांगता येणार. माझे त्यावेळेला तिच्या ड्रेस कडे नाही लक्ष गेलं. तरी पण सांगतो करड्या रंगाचा ड्रेस असावा. आणि पायात तपकिरी रंगाच्या चपला ” –धुरी
“ हाय हिल्स होत्या की साध्या चपट्या हिल्स असलेल्या?” पाणिनीने विचारलं
“थांबा. मला आत्ता जाणवलं. उंच टाचांचे बूट होते तिच्या पायात.”
“तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये आलात तेव्हा स्वाभाविकच पेट्रोलचा कॅन तिच्या सोबत ठेवला नाहीत बरोबर का?” पाणिनीने विचारलं
“बरोबर आहे तुम्ही म्हणता ते तो त्यांनी तिच्याकडे कशाला ठेवीन हॉटेलमध्ये आणि कसं दिसलं असतं ते. की ज्या मुलीकडे स्वतःची पर्स नाही, हॅन्डबॅग पण नाही आणि पेट्रोलचा कॅन ती घेऊन हॉटेलात आली आहे. विचित्र दिसलं असतं ते नाही का?”
“म्हणजेच याचा अर्थ तो पेट्रोलचा कॅन तुमच्या कार मध्ये असणार.” पाणिनी म्हणाला.
“हो बरोबर असणारच. कारमध्येच असणार.” धुरी म्हणाला.
“आता कार कुठे आहे तुमची?”
“खाली पार्किंग मध्ये.”
“चला, आपण खाली जाऊ आणि तो कॅन कार मध्ये आहे का बघू.” पाणिनी म्हणाला.
धुरी कुठून उभा राहिला आणि काहीतरी आठवल्याप्रमाणे अस्वस्थपणे आपले हात डोक्यावरच्या आपल्या विरळ केसावरून फिरवत एकदम उद्गारला,
“मला तो पेट्रोलचा कॅन आज सकाळी कार मध्ये बघितल्याचं आठवत नाही.”
“आठवत नाही!” पाणिनी ओरडून म्हणाला.
“खरंच आठवत नाही.”
“तुमच्याकडे ड्रायव्हर किंवा कार स्वच्छ करणारा माणूस ज्याच्याकडे कारची किल्ली असते असं कोणी आहे? “
“नाही असं कोणी नाहीये.”
“मग तुमच्या कार मधून तो पेट्रोलचा कॅन कोणी काढून घेतला असेल?” पाणिनीने विचारलं
“पटवर्धन तुम्हाला खरंच सांगतो अक्षरशा मला माहित नाहीये त्या पेट्रोलच्या कॅनचं काय झालं ते.”
“ओवी वागळे या नावाने किती कारचं रजिस्ट्रेशन झालं आहे ते मला आधी शोधून काढू दे. त्याच्यावरून ती कार कुठल्या डीलर कडून खरीदली ते कळेल आणि त्या कारचं वर्णनही कळेल.” पाणिनी म्हणाला.
“अहो थांबा पटवर्धन, तुम्ही फारच जोरात आणि लगेचच कामाला लागता आहात या प्रकरणात!”
“तुम्हीच मला वकील म्हणून नेमलं आहात ना या प्रकरणात?” पाणिनीने विचारलं
धुरी पुन्हा अस्वस्थ झाला आपला घसा त्याने खाकरला. मान आणि कॉलर च्या मध्ये आपली बोट घालून कॉलर जरा वर ओढली आणि म्हणाला,
“माझी हकीगत तुम्ही खोटी ठरवायला निघालाय.”
“खोटी कशाला ठरवीन मी? खोटं काय आहे का तुमच्या गोष्टीत?” पाणिनीने विचारलं
“ अजिबात नाहीये पण तुम्ही असं सिद्ध करायचा प्रयत्न करता आहात की एखाद्या खुनाच्या केस मध्ये मी माझी अॅलिबी देण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे खून झाला तेव्हा मी दुसरीकडेच होतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे.”
पाणिनी काही बोलला नाही तेव्हा धुरी पुढे म्हणाला,
“बर तुमच्या भिंतीवरचं घड्याळ बरोबर आहे पटवर्धन?”
“बरोबर आहे.”
“तर मग मला निघायलाच पाहिजे. मला एक महत्त्वाची अपॉइंटमेंट आहे. आधीच मला उशीर झालाय.” धुरी म्हणाला.
“तुमचं घड्याळ बंद आहे तर तुम्ही मला भेटायला अर्धा तास आधीच यायला हवं होतं.” पाणिनी म्हणाला.
“बरोबर आहे तुमचं पण मला इथे यायलाच हवं होतं. तुम्हाला भेटण्यासाठी.बायकोचा तसा आग्रह होता. बरं ते असो आता मी निघतो आधीच खूप उशीर झालाय मी तुम्हाला नंतर फोन करीन. असं म्हणून धुरी पटकन सोफ्यावरून उठला आणि चार ढांगातच त्यांने दार गाठलं आणि बाहेर पडून दिसेनासाही झाला.
सौम्या पाणिनीकडे बघतच राहिली.
“आता हा माणूस पाच लिटर चा पेट्रोलचा कॅन खरेदी करायला जाईल. नंतर त्यात पेट्रोल भरेल. त्याला ते थोडं लालसरही करावे लागेल.” सौम्या म्हणाली
तोपर्यंत त्याच्या लक्षात येईल की त्यांनी आपल्याला सांगितलेली गोष्ट ही टिकणारी आणि कुणाला मान्य होणाजोगी नाही.” पाणिनी म्हणाला आणि त्याने सौम्याकडे पाहिलं. पण ती आपल्या विचारात हरवली होती.
"धुरी..... नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय एवढ्यात." विचाराच्या तंद्रीत सौम्या पुटपुटली.
पाणिनीने शांत राहून तिला विचार करायला अवधी द्यावा असं ठरवलं.
"आठवलं " एकदम किंचाळून सौम्या उद्गारली.
" सर आज ऑफिसमध्ये येताना कार मधील रेडिओ लावला होता, आणि त्यात बातम्या ऐकत होते. बातम्यात असं सांगितलं की डॉक्टर त्रिलोचन बंब नावाच्या एका व्यक्तीवर काल प्राणघातक हल्ला झाला आणि ते बेशुद्ध अवस्थेत एका इस्पितळात अॅडमिट झाले आहेत. शेजाऱ्यांनी एका स्त्रीचा किंचाळण्याचा आवाज ऐकला आणि ठोसा मारण्याचाही आवाज ऐकला आणि एका स्त्रीला घराबाहेर पळून जाताना पाहिलं. पळून जाणाऱ्या या स्त्रीचे वर्णन हे धुरी ला भेटलेल्या स्त्रीशी बरंच जुळतं मिळत आहे." सौम्या म्हणाली.
"या अ शा वर्णनाला फारसा काही अर्थ नसतो सौम्या. असं वर्णन हे फार वरवरचं असतं आणि सगळ्याच तरुण स्त्रियांना ते लागू पडेल असं असतं" पाणिनी म्हणाला.
“ ते माहिती आहे मला सर. पण आत्ता मला नेमकं आठवलं की धुरी हे नाव मी कुठे ऐकलं ते. डॉक्टर बंब यांच्यावर हल्ला झाला तो रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान. हल्ला करणारी स्त्री होती म्हणून पोलिसांनी तपास करताना एवढ्या रात्री डॉक्टर बंब यांनी कुणाला अपॉइंटमेंट दिली होती हे रजिस्टरवरून पाहिलं. एवढ्या उशिरा अपॉइंटमेंट दोन व्यक्तींना दिली गेली होती त्यातल एक नाव मला आता आठवत नाही पण दुसरं नाव धुरी हेच होतं. पोलिसांचा कयास असा आहे की ती स्त्री कुठल्यातरी अमली पदार्थासाठी डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये आली असावी. त्यांच्या डोक्यात काचेचं काहीतरी भांड किंवा जड वस्तू मारून त्यांना बेशुद्ध पाडलं असावं. दवाखान्यातल्या अमली पदार्थाची चोरी केली असावी. वेदना कमी करण्याच औषध म्हणून डॉक्टरांकडे अशा पदार्थाचा साठा असतो.."
"हो माहितीये मला. सौम्या एक काम कर, पटकन कनक ओजस ला जाऊन भेट. त्याला या डॉक्टर बंब यांच्या व्यवसायाबद्दल माहिती काढायला सांग. मुख्य म्हणजे दवाखान्याची जागा कुठे आहे ते शोधून काढायला सांग. जागा जर त्या पेट्रोल पंपाच्या जवळ असेल आणि वर्णन जुळत असेल तर आपल्याला हवी ती व्यक्ती हीच आहे आणि आपलं अशील चांगलंच अडचणीत आहे. कनक ला कामाला लावलस की नंतर आपल्या ऑफिसमध्ये येऊन धुरी शी फोनवर संपर्क कर त्याच्या बायकोशी संपर्क कर तो नसेल तर. तिला सांग की मला तातडीने मिस्टर धुरी शी बोलायचं आहे." पाणिनी म्हणाला.
सौम्याने मान डोलावली आणि ती ऑफिसच्या बाहेर पडली दहाच मिनिटांनी पाणिनीला निरोप मिळाला की धुरी त्याच्या ऑफिसमध्ये नव्हता घरच्या फोनवर सुद्धा संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्याच्या बायकोशी सुद्धा बोलता आलं नाही कनक ओजस ला सूचनेनुसार कामाला लावण्यात आलं आहे.
दुपारी चार वाजता सौम्यानं कनक ओजस करून आलेला अहवाल पाणिनी ला दिला.
डॉक्टर बंब हे ६२ वर्षांचे गृहस्थ आहेत. सर्जन आहेत. आणि मर्यादित स्वरूपात आपली प्रॅक्टिस करतात.,३९६४७ सूर्यदत्त संस्थे जवळच्या रस्त्यावर राहतात. आणि ही जागा ब्युटी रेस्ट हॉटेल म्हणजे ज्या ठिकाणी धुरी ने त्या तरुण मुलीला नेलं होतं त्या ठिकाणापासून अगदी जवळ आहे. रात्री साडेअकरा वाजता डॉक्टर बंब यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने एका स्त्रीचा किंचाळण्याचा आवाज ऐकला. ठोसे मारल्याचा आवाज ऐकला हा आवाज डॉक्टर बंब यांच्या घरातून येत होता वर करणी तिथे मारामारी झाल्यासारखं दिसत होत. बंब यांचा नोकर घराच्या मागच्या बाजूला असलेल्या गॅरेज जवळ राहतो त्याने हा आवाज ऐकला. तो त्यावेळी बाथरूम मध्ये आंघोळ करत होता. आवाज ऐकल्यावर त्यांने पटकन टॉवेल गुंडाळला आणि काय भानगड आहे ते बघायला जिना उतरून खाली गेला. या व्यतिरिक्त पूर्वे च्या बाजूला राहणारी आणखीन एक डहाणूकर नावाची शेजारीण आहे, तिने पण हा आवाज ऐकला होता आणि घरातून बाहेर पडणाऱ्या स्त्रीला पाहिलं. तिने.च पोलिसांना कळवलं पोलीस लगेचच तिथे आले कारण त्याच वेळेला ते त्याच भागातून गस्त घालत होते. पोलिसांनी पाहिलं तेव्हा डॉक्टर बंब बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडले होते फ्लॉवर पॉट सदृश्य काचेची जड वस्तू फुटलेले अवस्थेत शेजारी पडलेली दिसत होती. डहाणूकर ने सांगितलेल्या माहितीनुसार, पळून जाणाऱ्या स्त्रीचे गडद तपकिरी रंगाचे केस होते. तिच्या अंगावरचा ड्रेस धुरी ने वर्णन केल्याप्रमाणे करड्या रंगाचा होता. तिच्या हातात पर्स वगैरे काहीही नव्हतं हात पूर्णपणे रिकामे होते. धुरीशी त्याच्या ऑफिसमध्ये किंवा त्याच्या घरी संपर्क होऊ शकलेला नाही मी दर पाच दहा मिनिटांनी प्रयत्न करतो आहे. डॉक्टर बंब यांनी ठेवलेलं अपॉइंटमेंट चे पुस्तक पोलिसांच्या हाती लागलं आहे. एकूण दोन जणांना अपॉइंटमेंट दिल्या गेल्या होत्या त्यातील एक धुरी आणि दुसरी पांडव. फक्त आडनावच लिहिली आहेत अपॉइंटमेंट पुस्तकात. नाव किंवा नावाची अद्याक्षर नाहीत.
पाणिनी ने रिपोर्ट वाचून संपवला.
"ही आडनाव परत परत आली आहेत का?" पाणिनीने विचारलं.
"ते समजणे अवघड आहे.अपॉइंटमेंट बुक मध्ये प्रत्येक दिवशी वेगळं पान वापरलं जातं."सौम्या म्हणाली.
"तुझी शॉर्ट हॅन्ड ची डायरी आणि पेन्सिल बरोबर घे आपल्याला बाहेर जायचंय. काही झालं तरी धुरी हा आपला अशील म्हणून असणार आहे.” पाणिनी म्हणाला.
( प्रकरण २ समाप्त.)