Teen Jhunzaar Suna - 19 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 19

Featured Books
Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 19

              तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

 

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

यमुना बाई                      श्रीपतरावांची बायको

प्रताप                          श्रीपतरावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपतरावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपतरावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपतरावांची मुलगी

सरिता                          प्रतापची बायको.

वर्षा                           निशांतची बायको

विदिशा                         विशालची बायको.

वासुदेवराव सुळे                   वर्षाचे वडील

विजयाबाई                       वर्षांची आई.

शिवाजीराव                      विदिशाचे  वडील

वसुंधराबाई                      विदिशाची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीकराव                       शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

रघुवीर आणि त्यांची गॅंग            परदेशी मजूर.

 

 

 

भाग १९     

भाग १८  वरून पुढे वाचा .................

निशांत आणि विशाल बाबांजवळ बसले होते. काय चाललं आहे हे काही त्यांना कळतच नव्हतं. त्यांनी बाबांच्या कडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. पण बाबांनी खांदे उडवले. त्यांनाही काही माहीत नव्हतं. पण आता ते सरिताच्या कार्यपद्धतीवर पूर्ण समाधानी होते त्यामुळे काही बोलले नाहीत.

सरिता आणि वर्षा पुन्हा येऊन बसल्या.

“काय करता आहात?” निशांतनी विचारलं.

“सांगते. जरा थांबा.” सरितानी म्हंटलं.

पाचच मिनिटांत सर्वच कामगार गोळा झाले. सरितानी बोलायला सुरवात केली.

“आपल्याला आज पासून संपूर्ण ३० एकर शेती सांभाळायची आहे. तुम्हा सर्वांची तयारी आहे का ? काम खूप पडणार आहे.”

“वहिनी साहेब,” बारक्या बोलला “वहिनी साहेब, हे तर खूपच छान झालं. पण असं असेल तर आपण कुठली पिकं घेणार आहोत हे कळलं तर त्या प्रमाणे जमीन तयार करता येईल.?”

“बरोबर आहे. आपण आज जेवण झाल्यावर सगळे बसू. सगळे मिळून विचार करू आणि ठरवू. पिकांप्रमाणे जमिनीची सुद्धा आखणी करावी लागणार आहे. पण माझा विचार असा आहे की औषधी पिकं जास्ती आणि बाकीची गरजे प्रमाणे घ्यावीत.” सरिता म्हणाली. निशांत आणि विशाल आश्चर्याने त्यांच्याकडे पहात होते.

जेवणं झाल्यावर निशांत, विशाल, वर्षा आणि विदिशा घरी गेले.

ते गेल्यावर जरा उशीरच झाला होता, रात्र बरीच झाली होती, तरी पण सर्व मजूरांबरोबर सरिता आणि बाबा बसले.

पुढे कसं काय करायचं यांचा विचार चालू असतांना एक जण म्हणाला की

“वहिनीसाहेब, आपल्याला शेताचा ताबा कधी मिळणार आहे ?”

“का रे असं का विचारतो आहेस ?” सरिताने विचारलं.

“आमचा त्या रावबाजी वर मुळीच विश्वास नाहीये. आपल्याला शेत मिळायच्या अगोदर जर तो मशिनी घेऊन गेला तर काय करायचं ?” – एक मजूर

“म्हणजे तो ट्रॅक्टर, मळणी यंत्र वगैरे शेता बाहेर काढेल म्हणून असं तुला वाटतंय का की आणखी काही ?” – सरिता

“हो वहिनी साहेब, असंच.” – मजूर

“हो आम्हाला पण असच वाटतंय” बारक्यानी पण सहमती दर्शवली.

“हूं. मग काय करायचं, तुमच्या मनात काय आहे ?” सरितानी विचारलं.

उत्तरप्रदेशी मजुरांचा जो म्होरक्या होता, रघुवीरसींग, तो म्हणाला

“वहिनीसाहेब, जर ३० एकर शेती करायची असेल तर जास्तीची माणसे लागतील. आपण असं करू शकतो, की मी माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतो. मग आम्ही शेतात जावून बसू आणि आम्ही तिथे असतांना त्यांना काहीच वेडं वाकडं करता येणार नाही. त्यांना आम्ही सरळ बाहेरच काढतो बघा.”

“दंडेली करायची ?” – सरिता

“सरिता,” बाबा म्हणाले “आज सकाळी ज्या रीतीने रावबाजी निशांतशी  बोलला त्यावरून असं दिसतंय की तो सहजा सहजी शेत खाली करणार नाही. निशांत त्याच्याशी भांडणार होता पण त्यांची माणसं तयार होती आणि ते विशालनी बघितलं म्हणून त्यानी निशांतला मागे ओढलं. आता जसास तसं उत्तर द्यावच लागेल. शेराला सव्वा शेर बनावच लागेल. त्या शिवाय हा तिढा सुटणार नाही.”

“पण आता यांची १० माणसं घ्यायची म्हणजे किती खर्चाची सोय करावी लागेल ते बघावं  लागेल, एकदम कसं सांगणार वर्षा पण इथे नाहीये.?”

“एक काम कर,” बाबा म्हणाले, “फोन कर आणि निशांतला  म्हणावं की पुन्हा शेतावर या म्हणून. मग वर्षा आल्यावर सांगेल काय करू शकतो ते.”

“बाबा, बरीच रात्र झाली आहे. उद्या सकाळी वर्षा येईलच तेंव्हा बोललं तर चालणार नाही का ?” – सरिता

“चालेल न, पण असं बघ, आता शेतीचा आकार वाढला म्हणजे तुला जास्तीची माणसं घ्यावीच लागणार आहेत. आता रघुवीरची आणि त्याची माणसं, यांच्याशी, जी बोली झाली आहे त्याच  बोली  वर यायला तयार असतील तर माझ्या मते काही अडचण येणार नाही.” बाबांनी त्यांचा विचार बोलून दाखवला.

“काय रे रघुवीर, काय म्हणतोस ?’ बाबांनीच रघुवीरला विचारलं.

“त्यांची तयारी आहे. त्या लोकांनी किती तरी वेळेला हे बोलून दाखवलं आहे विचारा बारीक रावांना.” रघुवीर म्हणाला.

“मग ठीक आहे. केंव्हा बोलावतोस ?” बाबांनी विचारलं. बाबांनी आता सूत्र आपल्या हातात घेतली होती.

“मी तर म्हणतो की आत्ताच सांगावा धाडू त्यांना” – बारीक राव.

“ठीक आहे बोलवा.” – बाबा

तासाभरात रघुवीर त्याच्या १० पैकी ८ लोकांना घेऊन आला. दोघे जण गावी गेले होते. मग पुन्हा एकदा चर्चा झाली. सर्वांचा असाच सुर होता की ज्या अर्थी आज सकाळी निशांत आणि रावबाजी मधे बोलाचाली झाली आहे त्या अर्थी रावबाजी आज रात्रीच काही तरी गडबड करेल.

“मग काय करायचं ? काही विचार आहे का मनात ?” – सरिता.

कोणी काही बोललं नाही. तेंव्हा शेवटी सरिताच म्हणाली

“मला वाटतं की आपल्या पांच माणसांनी जावून गेट वर रात्रभर पहारा द्यावा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, रावबाजीने काही हालचाल करायची ठरवली असेल तर तुमच्या लक्षात येईलच. जर कुठलीही संशयास्पद हालचाल दिसली तर लगेच बारीक रावांना फोन करा. ते मग बाकीच्या लोकांना घेऊन येतील. कसंही करून त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही. बाकी मग उद्या सकाळी निशांत आल्यावर बघू..”

बाबांनी आणि बाकीच्या मंजुरांनीही मान हलवून या बेताला मान्यता दिली.

ठरल्या प्रमाणे पांच माणसं गेट वर जाऊन बसली.

त्यांना रात्री भूक लागेल म्हणून बायकांनी चिवडा करायला घेतला. झाल्यावर चिवडा आणि चहा कोणीतरी पोचवून दिला.

ज्याची शक्यता वाटत होती तसंच घडलं. रात्री दीड दोन वाजता रावबाजी जीप घेऊन आला. त्यानी गेट वर बसलेल्या माणसांना बघितलं. खाली उतरला आणि त्यांना बाजूला व्हायला सांगितलं. माणसांनी गेट सोडायला नकार दिला. एकानी मोबाइल वरून बाकीच्या मजुरांना सूचना दिली.

“अरे गेट सोडा म्हणतो आहे न ? व्हा बाजूला. कोणाची माणसं आहात तुम्ही ? आणि गेट अडवून का बसला आहात ? रावबाजीने विचारले.

“कोणाच्याही सांगण्यावरून गेट उघडायचं नाही अशी ऑर्डर आहे.” – रघुवीर.

“कोणी दिली ही ऑर्डर ?” रावबाजी चिडून म्हणाला.

“वहिनी साहेबांनी.” – रघुवीर.

“कोण वहिनी ? मी नाही ओळखत. बऱ्या बोलाने बाजूला हो.” - रावबाजी.

आता जीप मधून अजून ४-५ माणसं उतरली. आणि समोर आली.

“हे बघ जा तुझ्या वहिनीला जाऊन सांग रावबाजी आला होता म्हणून. हे शेत आमचं आहे.” रावबाजीचा आवाज आता चढायला लागला होता.

पण सरिताची माणसं गेटवरून हलायला तयार नव्हती. ती तिथेच बसून राहिली.

“गेट उघडणार नाही. वहिनी साहेबांची ऑर्डर आहे.” रघुवीरनी पण जरा कडक स्वरात सांगितलं.

“अरे कोण ही वहिनी, मी नाही ओळखत, आता गेट सोडा नाहीतर..” रावबाजीचं  वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सरिता तिथे पोचली होती

“मी सरिता प्रताप पाटील. मीच आदेश दिला होता, की रात्री गेट उघडायचं नाही, म्हणून.”

इतक्या रात्री सरिता तिथे येईल, यांची रावबाजीने कल्पनाच केली नव्हती. पण लवकरच त्यांनी स्वत:ला सावरलं. म्हणाला.

“हे बघ, तूच काय ? कोणीही मला शेतात जाण्यापासून अडवू शकत नाही. अजून मी निशांतला ताबा दिलेला नाही त्यामुळे हे शेत माझ्या अखत्यारीत येतं.” आणि मग रघुवीरकडे वळून तो म्हणाला “ चल बाजू हट जा. नाही तर परिणाम चांगला होणार नाही. शेवटचं सांगतोय तुला.”

पण रघुवीर काही बाजूला झाला नाही. उलट ते पाचही जणं हातात लाठी घेऊन उभे राहिले. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी.

आता रावबाजी चवताळला. तो सरिताकडे वळून म्हणाला “ तू अडवणार मला ? हे बघ बाईची जात म्हणून मी शांतपणे बोलतो आहे. बऱ्या बोलाने तुझ्या माणसांना बाजूला व्हायला सांग नाहीतर परिणाम वाईट होतील हे सांगून ठेवतो.”

“रावबाजी,” सरिता शांतपणे बोलली “तू जर कॉंट्रॅक्ट नीट वाचलं असशील तर तुला हे कळायला पाहिजे की तुझी बटाई ची मुदत संपून १५ दिवस झाले आहेत. तू स्वत:च या शेताचा ताबा, आणि ठरलेली रक्कम आम्हाला द्यायला हवी होती. पण तू तसं केलं नाहीस म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. आता मुकाट्याने आत्ता परत जा आणि उद्या सकाळी येऊन काय तुझं सामान असेल ते घेऊन जा.” मग थोडं थांबली, बघितलं की आपल्या बोलण्याचा काहीच परिणाम झालेला नाहीये तेंव्हा पुढे म्हणाली “आणि  जबरदस्तीने काही करण्याचा विचार पण मनात आणू नकोस.”

आतमध्ये रावबाजीची तीन माणसं होती, ती गेट जवळ येऊन थांबली होती. ती आता गेट उघडून बाहेर आली. त्यांना येतांना बघून रावबाजी खुश झाला. जीप मधली चार आणि आतून आलेली तीन अशी ७ माणसं आता त्याच्या जवळ होती. आता तो सहज आतमध्ये जाऊ शकत होता.

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.