Teen Jhunzaar Suna - 12 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 12

Featured Books
Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 12

            तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

 

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

कमला बाई                      श्रीपत रावांची बायको

प्रताप                          श्रीपत रावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपत रावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपत रावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपत रावांची मुलगी

सरिता                          प्रताप ची बायको.

वर्षा                           निशांत ची बायको

विदिशा                         विशाल ची बायको.

वासुदेव राव सुळे                  वर्षा चे वडील

विजया बाई                      वर्षांची आई.

शिवाजी राव                     विदिशा चे  वडील

वसुंधरा बाई                     विदिशा ची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

बालाजी आणि सदा                शेत मजूर  

बारीक राव                      शेत मजूर

कृष्णा आणि राघू                 शेत मजूर

दाजी, रखमा आणि सुरेश           गोठ्यांची व्यवस्था पहाणारे मजूर.

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

भाग १२   

भाग ११  वरून पुढे वाचा .................

बरीच भवती न भवती होऊन शेवटी रावबाजी कॉंट्रॅक्ट करून गेला. श्रीपत रावांना काही आवडलं नव्हतं पण निशांत आणि विशाल मागेच पडले तेंव्हा सरिताने म्हंटलं “बाबा, जाऊ द्या. बघू आपण काय करायचं ते. निदान निशांत आणि विशाल च्या  मनासारखे होतेय ना. मग होऊ द्या.”

मग श्रीपतरावांनी त्यात काही बदल सुचवले. एक म्हणजे करारात एक वर्षांनंतरची तारीख टाकून त्या तारखेला शेत परत मूळ मालक ताब्यात घेईल आणि त्या बाबत जी काही तयारी करायची असेल ती बटाईदाराने एक महिना अगोदर सुरू करावी आणि जर बटाई ला शेत पुन्हा द्यायचं असेल तर त्याचा विचार त्यानंतरच होईल असं लिहिलं.” दुसरं कलम असं टाकलं की “जर बटाईदाराला त्याचं काही सामान शेतावर आणायचं असेल तर त्यांची यादी बनवून त्यावर निशांत किंवा विशालची सही असणं आवश्यक आहे.” तीन म्हणजे “आमच्या मालकीचं कुठलही सामान आमच्या परवानगीशिवाय बाहेर जाणार नाही.”

रावबाजीला काही हे आवडलं नव्हतं पण त्यांनी करारावर सही केली.

निशांत आणि विशाल रावबाजीला सोडून वापस आले. निशांत म्हणाला-

“बाबा, वहिनी, तुम्ही काळजी करू नका. तो आता जे पैसे देणार आहे, त्यावर आपला एक वर्षांचा खर्च निघून जाईल. वर्षांच्या शेवटी तो जे देईल, तो आपला नफा. या ऊप्पर  वहिनी जे काही करतील आणि त्याचे जे पैसे मिळतील तो बोनस. मग काही चिंताच उरणार नाही.” बाबांचा चेहराच सांगत होता की त्यांना हा व्यवहार काही पटला नव्हता. पण सरिता शांत होती.

दुसऱ्या दिवशी, दोन्ही शेतांमधील बॉर्डर आखल्या गेली. रावबाजी स्वत:चे मजूर आणणार होता त्यामुळे आधीचे सर्व मजूर सरिता कडे आले. गोशाळा सरिताच्याच हद्दीत येत होती ती सुद्धा सरिताकडे आली. सरिताला बऱच वाटलं. तीस म्हशी आणि १० गाई यांची देखभाल त्या लोकांनी धड केली नसती. दाल मिल चे कामकाज विशाल बघणार होता. सरिता कडे फक्त जमिनीचा तुकडा आला. मशागतीला लागणारं  सामान काही मिळालं नाही. तो दिवस तसाच गेला.

बाबा सरितेला म्हणाले.

“आज शांत पणे झोप घे. उद्या पासून तुला श्वास घ्यायला सुद्धा फुरसत मिळणार नाहीये. हातात काही नसतांना तुला विश्व निर्माण करायचं आहे. चिंता करू नको. मी आहे तुझ्या बरोबर.”

“हो बाबा, तुम्ही असतांना मला कसलीच चिंता नाही.” सरिता म्हणाली “उद्या आपण कामाचा आराखडा तयार करू आणि त्या बरहुकूम काम सुरू करू म्हणजे सगळं व्यवस्थित होईल असा माझा विश्वास आहे. उद्या सगळी माणसं येतील त्यांचं पण मत विचारात घेऊ. म्हणजे त्यांना पण हे शेत आपलं आहे असं वाटेल आणि त्यांचा हुरूप वाढेल.”

“एकदम बरोबर. सूनबाई, अगदी प्रतापच्याच वाटेने चालली आहेस. तुला यश नक्की मिळेल.” बाबा समाधानाने म्हणाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी माणसं जमली. सगळे आंगणात बसले होते. काय करायचं हे कोणालाच कळत नव्हतं. थोड्या वेळाने सरिता आणि बाबा पण येऊन बसले. मग विचार विनिमय सुरू झाला.

सगळे म्हणाले की

“वहिनी तुम्ही सांगा. कुठून सुरवात करायची. नांगरणी करायला हवी पण त्याकरता नांगर आणि बैल जोडी हवी. आपल्या जवळ तर काहीच नाही. कुदळ, फावड पण नाहीये. कसं करणार ?”

“हे बघा, सर्व छोट्या मोठ्या गोष्टींची एक यादी बनवा. आपण अगोदर ती सर्व अवजारं घेऊन येऊ.” – सरिता.

“तरी पण वहिनी, नांगरणी वखरणी केल्या शिवाय पुढे काहीच करता येणार नाही. मग कसं करणार ?” - बालाजी.

“बालाजी, तू जाऊन विचारून ये की ट्रॅक्टर केंव्हा आम्हाला मिळू शकेल ते. जा आत्ताच जा.” – सरिता. 

थोड्या वेळाने बालाजी सांगत आला की त्यांची नांगरणी झाल्यावर देऊ असं म्हणताहेत. म्हणजे हप्ता दहा दिवस जातील. एवढा वेळ आपला वाया जाणार, असं दिसतंय.

“वहिनी, रावबाजीला आम्ही सगळे ओळखतो. मला असं वाटतं की काही तरी खुसपट काढून तो आपल्याला पावसाळा सुरू होई पर्यन्त लटकवणार. ट्रॅक्टर आपल्याला देणार नाही.” बारीक राव बोलला.

सरिताने बाबांकडे पाहिलं. म्हणाली -

“तुम्हाला काय वाटतं बाबा ?”

“मी विचारच करतोय. बारक्या म्हणाला त्यात तथ्य आहे असं वाटतंय. आणि..,” बाबा बोलायचे थांबले.

“आणि काय बाबा ?” – सरिता.

“काल पासून मला एक गोष्ट छळते आहे. ती म्हणजे शेत बटाईने देण्याची या लोकांनी एवढी घाई का केली. आणि ते ही इतक्या कमी पैशात ?” – बाबा 

“बाबा, तुम्ही म्हंटलं सुद्धा होतं की अजून एक वर्ष थांबा.” – सरिता. 

“अरे हो न, पण नाही ना थांबले. मी कंटाळून हो म्हणे पर्यन्त पाठ पुरावा करत राहिले. मला असं वाटतं की आपल्याला कुठलीच मदत मिळणार नाही हे गृहीत धरूनच आपल्याला पुढचं प्लॅनिंग करावं लागेल.” बाबा म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती.

“हो खरं आहे तुमचं म्हणण. ह्या दोघांचं काय चाललं आहे हे कळेलच हळू हळू. पण आत्ता तो विचार करून वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये.” – सरिता. 

“काय रे पोरांनो तुमचं काय म्हणण आहे ?” – बाबा.

“नांगरणी वखरणी केल्या शिवाय पुढे काहीच करता येणार नाही. मग कसं करणार ?” बारीकरांव बोलला.

“हे बघा आपल्याकडे अवजारं नाहीयेत. कुदळ फावडं आणि घमेलं बाजारातून घेऊन या आणि सध्या तरी हातांनीच सुरवात करा. तयारी आहे का ? कष्ट करावे लागतील. तयारी नसेल तर सरळ  रावबाजी कडे जा.” – बाबा जरा जरबेच्या सुरातच बोलले. 

“नाय जी मालक, असं कसं बोलता तुम्ही, आम्ही इथेच राहणार.” सर्व एक सुरात बोलले. 

“ठीक आहे . सरिता यांना पैसे दे सामान घेऊन येतील. आणि हे बघा वेळ घालवू नका. पटापटा कामाला सुरवात करा. आपल्या जवळ फार वेळ नाहीये. समजलं का ?” – बाबा.

“हौ जी.”

बालाजी आणि सदा बाजारात गेले. मग सरितानी बारक्याला  विचारलं

“गाई म्हशींची व्यवस्था कोण बघतंय ?”

“दाजी, रखमा आणि सुरेश. तिघं जणं.” – बारीकराव.

“जा त्यांना बोलावून आण.” – सरिता. 

“दाजी, आता वाटण्या झाल्या आहेत हे तुम्हाला कळलंच असेल. आपलं सोडून बाकीचं  बटाईला गेलं आहे हे तुम्हाला माहीत असेलच.” – सरिता.

“हौ जी, सदा कडून माहीत झालं जी.” – दाजी.

“छान. आता हे बघा, रावबाजी किंवा त्यांची माणसं येऊन काही सांगायला लागली तर काहीही ऐकायचं नाही. या पुढे मी म्हणेन तसंच करायचं. समजलं का ?” – सरिता.

“वहिनी साहेब, आम्हाला सगळं माहीत आहे. आम्ही कोणालाही पाऊल पण टाकू देणार नाही.” – दाजी.

“बरं. तुम्ही दूधाची चंदी कोणाकडे लावली आहे त्यांची नाव द्याल माझ्याकडे. आणि पैसे कोण वसूल करतं ?” – सरिता.

“छोटे मालक.” – दाजी. 

“म्हणजे विशाल ?” – सरिता.

“हो.” – दाजी. 

“ठीक आहे त्या सर्वांच्या कडे जा आणि सांग की यापुढे पैसे घ्यायला तूच येशील म्हणून. सरळ सांग, की आता कारभार वहिनीच्या हातात आला आहे तेंव्हा बिलाचे पैसे घ्यायला तुम्ही येणार आहात. आजच जाऊन सांगा.” – सरिता.

“सांगतो जी.” – दाजी.

“ठीक आहे जा तुम्ही.”  दाजी गेल्यावर सरिता बारक्याला म्हणाली “बारीक राव आता तुम्ही बोला. काय करायचं ?”

“मी आता कृष्णा आणि रघुला घेऊन शेतातला सगळा  काडी कचरा साफ करायला घेतो. ते पण एक मोठं काम असतया.” – बारीकरांव 

“ठीक लागा कामाला.” – सरिता. 

बाबा कौतुकानी सरिताकडे पहात होते. म्हणाले “वा सरिता तू तर एकदमच अॅक्शन मध्ये आलीस. छान, चालू दे. आता तुझे फ्यूचर प्लॅन्स काय आहेत ते ऐकव जरा.”

“बाबा सगळ्यात मोठा प्रश्न मला भेडसाववतो आहे तो हा, की जर त्यांनी पाणी बंद केलं किंवा देण्यात चाल ढकल केली तर काय करायचं ?  कारण विहीर त्यांच्या ताब्यात गेली आहे.” सरितानी तिची चिंता व्यक्त केली.

“हं. या बाबतीत निशांतशी  बोलावं लागेल. आपण एक वेगळा पंप बसवून घेऊ विहिरीवर. आजच संध्याकाळी आपण बोलू त्यांच्याशी या गोष्टी वर. पाणी आवश्यक आहे.” – बाबा.

 

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.