Teen Jhunzaar Suna - 11 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | तीन झुंजार सुना. - भाग 11

Featured Books
Categories
Share

तीन झुंजार सुना. - भाग 11

                तीन झुंजार सुना

श्रेय  

मुखपृष्ठ चित्र               सौ. शिल्पा पाचपोर

लेखनास सहाय्य               डॉ. अनंत बिजवे

                           Adv. आनंद मुजुमदार.           

पात्र  रचना

 

श्रीपति पाटील                    कुटुंब प्रमुख, प्रगतिशील शेतकरी

कमला बाई                      श्रीपत रावांची बायको

प्रताप                          श्रीपत रावांचा मोठा मुलगा

निशांत                         श्रीपत रावांचा मधला मुलगा

विशाल                         श्रीपत रावांचा धाकटा मुलगा

मेघना                          श्रीपत रावांची मुलगी

सरिता                          प्रताप ची बायको.

वर्षा                           निशांत ची बायको

विदिशा                         विशाल ची बायको.

वासुदेव राव सुळे                  वर्षा चे वडील

विजया बाई                      वर्षांची आई.

शिवाजी राव                     विदिशा चे  वडील

वसुंधरा बाई                     विदिशा ची आई  

आश्विन                        प्रताप आणि सरिताचा मुलगा

रावबाजी                        ठेकेदार. बटाईदार.

 

 

 

 

भाग ११   

भाग १० वरून पुढे वाचा .................

“वहिनी, म्हणजे तू या मुद्द्यावर अजूनही ठाम आहेस ?” – निशांत.

“हो.” सरितानी उत्तर दिलं.

“हा एवढा आत्मविश्वास कुठून आला ? मधे तुझा भाऊ आला होता त्यानेच  तुला काही कानमंत्र दिला का ? तो याच्याच करता आला होता का ?”- निशांत.

सरिता, निशांतचा प्रश्न ऐकून हतबुद्ध झाली. वर्षा आणि विदिशा सुद्धा विचारात पडल्या. निशांतनी हे काय मध्येच उपटून काढलं असाच भाव दोघींच्या चेहऱ्यावर होता. सरीता काही बोलण्याच्या आतच निशांत पुन्हा म्हणाला

“तरी मला वाटलच होतं, की कुठेतरी पाणी मुरतंय, उगाच नाही अचानक त्याला बहि‍णीचा पुळका आला. तुझ्या मदतीला येतोय असं भासवून, शेती गिळंकृत करायचा डाव आहे का त्याचा ? पण वहिनी, निक्षून सांगतोय मी, हे होऊ देणार नाही, सांगून ठेवतो.”

“निशांत, तिचा भाऊ दिवाळीत इथे आला होता. भाऊबीज म्हणून, आणि तू हे काय भलतेच आरोप करतो आहेस ? हे मी सहन करणार नाही. मर्यादा सोडून बोलू नका.” बाबांना अतिशय संताप आला होता तरीपण स्वत:वर ताबा ठेवत शक्य तितक्या शांतपणे त्यांनी निशांतला समज दिली.

“निशांत” आता सरिता बोलली “माझ्या दोन्ही भावांना नोकऱ्या आहेत आणि त्यांना शेतीत काडीचाही इंट्रेस्ट नाहीये. आमच्या बागेची सर्व व्यवस्था अजूनही बाबाच बघतात. तुम्हाला पण शेती करायची नाहीये, त्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाहीये. पण मी करते म्हंटल्यावर तुम्ही इतकी टोकाची भूमिका का घेता आहात ? आजपर्यंत तुम्हाला कधी मर्यादा सोडून वागताना पाहीलं नव्हतं, इस्टेटीचा लोभ माणसाला इतक्या खालच्या पातळीवर घेऊन जातो, हे ऐकून होते, पण आज प्रत्यक्षच दिसलं.” सरिता संतापाने लाल बुंद झाली होती. तरी सुद्धा तिने अत्यंत संयमाने निशांतला उत्तर दिलं.

आता विदिशाला राहवलं नाही, ती वर्षांच्या कानाला लागली आणि मग दोघी उठल्या आणि निशांत आणि विशालला घेऊन बाहेर अंगणात गेल्या.

वर्षानेच सुरवात केली. “ अरे निशांत, नेहमीच कशी तू माती खातोस ? अरे जे बोलायला आपण इथे आलो आहोत, त्याच्या ऐवजी तू काय बोललास ? अपमानच केलास वहिनीचा. आपल्या फायद्याचं काम काढून घ्यायचं असेल तर गोड बोलायला पाहिजे ही साधी गोष्ट  कळत नाही का तुला ?”

“निशांत, वर्षा बरोबर बोलते आहे. तू सगळा खेळच  विस्कटून टाकला आहेस. आता वहिनी जर ‘बटईला शेत द्यायचं नाही’ यावर ठाम राहिली, तर आपली पूर्ण योजनाच बारगळते आहे, हे तुझ्या लक्षात कसं येत नाहीये ?” विशाल पण बोलला.

“मग आता काय करायचं?” – निशांतला आता आपली चूक कळली होती आणि तो गोंधळला होता.

“माफी मागायची वाहिनीची. चार चारदा माफी माग. त्याशिवाय गाडी रुळावर येणार नाही. आणि तुमचा कार्यभाग साधणार नाही.” वर्षानी म्हंटलं.

निशांत गप्पच बसला. मग विशालच म्हणाला की “तू आता गप्पच बस. मीच सांभाळतो मोर्चा. तू मधे काहीही बोलू नकोस.” निशांतनी मान हलवली. दूसरा पर्याय नव्हता.

आत आल्यावर विशाल म्हणाला “ वहिनी निशांतला आम्ही चांगलाच फैलावर घेतलं आहे. त्याला त्याची चूक दाखवून दिली आहे. त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. त्यानी असं बोलायला नको होतं. तुम्ही तो जे अचरटासारखा बोलला, ते विसरून जा. त्या करता मी पुन्हा माफी मागतो.” निशांत अरे तू बोल ना.

“वहिनी, माफी तरी कशी मागू मी ? मी तुमचा फार मोठा अपमान केला आहे आणि मला आता त्याबद्दल स्वत:चीच लाज वाटते आहे. मी तुमच्यापेक्षा लहान आहे आणि मी जे काही बोललो ते विसरून मला, मोठेपणाने मला क्षमा करा. प्लीज.” निशांत खाली मान घालून म्हणाला. खाली वाकून सरिताला नमस्कार केला. सरिता काहीच बोलली नाही. ती फक्त निशांत कडे शून्य नजरेने बघत राहिली.

“बाबा, तुम्ही तरी सांगा ना. मला खरंच झालेल्या प्रकारा बद्दल वाईट वाटतंय.” – निशांत.

“ठीक आहे. सरिता तू मोठी आहेस, लहानाचा अपराध मोठ्यांनी पोटात घालायचा असतो. क्षमा कर बेटा त्याला. झालं गेलं विसरून जा.” बाबांनी समजावलं.

“आणखी एक सांगायचं आहे निशांत,” बाबा पुढे म्हणाले. “ती जर म्हणते आहे, की शेत ती कसेल, तर त्याची मला खात्री आहे. अरे, बाबा, ती शेतकर्‍याचीच मुलगी आणि सून पण आहे आणि बायको पण आहे. ती जे काही बोलली ते पूर्ण आत्मविश्वासाने बोलली आहे. माझी खात्री आहे की ती जबाबदारी उत्तम सांभाळेल म्हणून.” बाबांनी निर्वाळा दिला.

“बाबा, यात थोडी जास्त रिस्क आहे.” विशालने ने सुरवात केली. “म्हणून जरा कमी रिस्क चा मार्ग आपण निवडला तर ?”

“तुला नेमकं काय म्हणायचंय ?” बाबांचा प्रश्न 

“बाबा असं आहे, पूर्ण 30 एकर वाहिनीला जर झेपली नाही तर आपण सगळेच आर्थिक दृष्ट्‍या अडचणीत येऊ, त्या पेक्षा मी काय म्हणतो की आपण वहिनीला सांगू की ट्रायल बेसिस वर 5 एकरांचं शेत कसून पहा. जर जमलं, तर पुढच्या वर्षी पूर्ण शेती चा ताबा घे. या वर्षी आपण 25 एकर बटाई ने देवू. म्हणजे पैशांची चण चण भासणार नाही. आणि जर तिला नाही जमलं तर याच माणसाला पूर्ण शेती देवू. कसं वाटतंय ?” विशालनी  अगोदर ठरल्याप्रमाणे माध्यम मार्ग सुचवला.

थोडा वेळ शांतता पसरली. बाबा, आणि सरिता विचार करत होती की ‘यामधे तथ्य तर दिसतं आहे, पण यात अजून काही असं आहे का, की जे आपल्याला कळत नाहीये, किंवा ही लोकं सांगत नाहीयेत.’ बाकी चौघे आशेने त्या दोघांकडे पहात होते.

शेवटी बाबा म्हणाले की “मला तुमच्या म्हणण्यात तथ्य दिसतं आहे. पण मला हे कळत नाहीये की बटाई ने देण्याची एवढी घाई का करता आहात ? जर सरिताला  जमलं नाहीच तर पुढच्या वर्षी द्या. एक वर्ष तुम्हीच कसा शेती. असा काय फरक पडणार आहे ?”

“बाबा असं केल्याने आमच्या फ्यूचर प्लॅन ला धक्का लागतो. आणि सगळंच, एक वर्ष पुढे ढकलल्या जाईल. आता जर बटाई ने दिलं, तर कॅश पैसे हातात येतील आणि घराची काळजी आम्हाला राहणार नाही. मग आम्ही आमचा बिझनेस उभा करण्या साठी पूर्ण वेळ  देऊ शकू.” निशांतनी स्पष्ट केलं.

“ओके. मला जरा यावर सरिताशी बोलू द्या. तशी तुमची योजना पटतेय मला. पण जर तीच, हे सगळं करणार आहे तर तिचं मत पण विचारात घ्यायला लागेल. तेंव्हा आम्हाला अजून एक दिवस द्या. उद्या संध्याकाळी आपण फायनल  निर्णय घेऊ. चालेल ना ?” बाबांनी जरा विचार करण्यासाठी वेळ मागून घेतला.

विदीशाने या दोघांच्या बोलण्याची वाट पाहीलीच नाही. लगेच म्हणाली

“चालेल. चालेल. एवढा मोठा निर्णय घ्यायचा तर थोडा विचार करणं आवश्यकच आहे. आम्ही उद्या संध्याकाळी पुन्हा येतो.”

वर्षाने पण होकार भरला, निशांत आणि विशाल दोघंही आश्चर्याने विदिशा कडे बघतच राहिले. पण काही बोलले नाही.

घरी गेल्यावर विशाल विदीशाला म्हणाला

“निशांत बोलत असतांना मधेच तू म्हणालीस की चालेल म्हणून. काय कारण आहे ?”

“मुद्दामच म्हणाले. कारण निशांत ने 100 फाटे फोडले असते. मग त्यांच्या मनात संशय आला असता, की इतकी घाई का करताहेत म्हणून. आता मी चालेल असं म्हंटलं मग त्यांच्या मनात काही वेगळे विचार येणार नाहीत. बघालच तुम्ही.” – विदिशा. 

रात्री जेवताना बाबा सरितेशी याच विषयावर बोलत होते.

“बाबा मलाही पटतेय त्यांचं बोलणं. एकदम एवढी जबाबदारी घेण्या पेक्षा एक ट्रायल करून बघू.” - सरिता.

“खरं आहे. फक्त उद्या त्यांना विचारायला पाहिजे की मशीनरी आपल्याला हवी तेंव्हा मिळणार आहे का ?” – बाबा

“हो खरंच की माझ्या लक्षातच आलं नाही.” सरिता म्हणाली. “आणि आपली माणसं, त्यांचं काय ? परत दाल मिल कोण बघणार ? हे पण विचारायला हवं. पाण्याची arrangement कशी असणार, ट्रॅक्टर आणि सगळी अवजारं, बाबा, किती तरी गोष्टी आहेत, ज्याचं स्पष्ट उत्तर मिळायला हवं. नाही तर उद्या तो बटाई वाला म्हणायचं की हे मिळणार नाही, ते मिळणार नाही.”

“नाही असं मी होऊ देणार नाही. कारण कॉंट्रॅक्ट वर माझीच सही असणार आहे.” – बाबा. 

“ठीक आहे मग. येऊ द्या उद्या त्यांना.” सरिताचं फायनल उत्तर.

पण दुसऱ्या दिवशीच्या मीटिंग मधे निशांत आपल्या बरोबर रावबाजी म्हणजे ज्याला शेती कसायला देणार होते, त्याला पण घेऊन आला होता. त्याने स्वच्छच सांगितलं की “शेत कसायला घ्यायचं तर सर्व मशीनरी इथलीच घ्यावी लागेल. आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला पण जरूर लागेल, तर असं आहे की आमची २५ एकर आहे तुम्ही फक्त ५ एकर करणार आहात, तेंव्हा आमची जरूर जास्त असणार आहे, ती भागल्या वर तुम्हाला ती यंत्र मिळतील.”

“रावबा,” बाबा म्हणाले “अरे हे काही पटलं नाही. आम्हाला हवी तेंव्हा ती ती यंत्र मिळाली पाहिजे.”

“अहो बाबा,” निशांत म्हणाला, “तुम्हाला सर्व मिळेल. दोन्ही पक्षी सोय पाहून आपण अॅडजस्ट करू. तुम्ही नका एवढं टेंशन घेऊ. मी आहे ना.”

बरीच भवती न भवती होऊन शेवटी रावबाजी कॉंट्रॅक्ट करून गेला. श्रीपत रावांना काही आवडलं नव्हतं पण निशांत आणि विशाल मागेच पडले तेंव्हा सरिताने म्हंटलं “बाबा, जाऊ द्या. बघू आपण काय करायचं ते. निदान निशांत आणि विशाल च्या  मनासारखे होतेय ना. मग होऊ द्या.”

 

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद