Saint Story - Saint Janabai (Edited Biography) in Marathi Motivational Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | संत कथा - संत जनाबाई (सं. चरित्र)

Featured Books
Categories
Share

संत कथा - संत जनाबाई (सं. चरित्र)

                            *संत जनाबाई*

                        -------------------------

गंगाखेड नावाच्या गावात राहणाऱ्या, ‘दमा’ नावाच्या एका श्रद्धाळू विठ्ठल भक्ताची, जनाबाई ही मुलगी. संत जनाबाई हिचा जन्म अंदाजे शके ११८० (इ.स.१२५८) साली झाला. तिच्या घराण्याबद्दल उल्लेख तिच्या अनेक अभंगांतून तिने स्वत: केलेला आहे. दमाला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्या दृष्टान्तानुसार, विठ्ठलभक्त असणार्‍या, पंढरपुरात वास्तव्य करणार्‍या, शिंपी जातीच्या दामाशेट्टींकडे आपल्या चिमुरड्या जनीला सोडून दमा निघून गेला. दामाशेट्टींचं सगळंच कुटुंब भगवद्भक्त होतं. पंढरपूरच्या केशिराजाची पूजा त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदेव हा तर इतका विठ्ठलवेडा होता की तो विठ्ठलाला आपला मित्रसखाच मानत असे.

अशा नामदेवाच्या कुटुंबात जनाबाई आश्रित म्हणून राहिली. आश्रित म्हणून असली तरी, जनाबाई दामाशेट्टीच्या कुटुंबापैकीच एक झाली.

नामदेवाच्या घरात वावरताना त्या दासीचे जग ते केवढे असणार? अंगण, परसू, माजघर, कोठार एव्हढ्याच सीमेत ती वावरत असणार. पण शरीराने इतक्या सीमित जागेत वावरणारी जनी मनानं मात्र असीम अशा परमात्म्याला पहात होती. त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तुळशीवृंदावन, अंगण, रांजण, जातं, शेणी वेचायला जाण्याचं रान अशा स्थळांचे तिच्या अभंगांत उल्लेख आहेत आणि त्या सर्व जागांवर देव तिचा सांगाती आहे. तो कोठीखोलीत तिला दळू लागतो, रानात शेण्या वेचू लागतो, अंगणात सडा घालू लागतो. तेंव्हा जनाबाई म्हणतात

झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी।।

पाटी घेऊनियां शिरी। नेऊनियां टाकी दुरी।।

ऐसा भक्तिसी भुलला। नीच कामें करूं लागला।।

जनी म्हणे विठोबाला। काय उतराई होंऊ तुला।।

वारकरी सांप्रदायामध्ये संत नामदेवाची दासी म्हणून आयुष्यभर संत जनाबाई राहिल्या .त्यांनी जवळपास ३५० रचना केल्या त्या पैकी काही नामदेवांच्या समजल्या जातात.त्यांचे म्हणणे होते की पुनर्जन्म कुठलाही असुदे तो पंढरपुरात असला पाहिजे व त्या जन्माला आलेल्या जीवाला पांडुरंगाची व संत नामदेवांची सेवा करता आली पाहिजे असे त्यांना वाटत असे म्हणून त्या म्हणतात

देवा देई गर्भवास। तरीच पुरेच माझी आस।।

परी हे देखा रे पंढरी। सेवा नाम्याचे द्वारी।।

करी पक्षी का सुकर। श्वान,श्वापद मार्जार।।

ऐसा होत माझे मनी। म्हणे नामयाची जनी।।

           अख्यायिका - 1

 जनाबाई स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेई. नामदेवाच्या घरातील छोटी मोठी कामे करीत जनाबाई विठ्ठलाची निरंतर भक्ति करीत असायची. प्रत्येक काम करतांना जनाई त्या कामात विठ्ठलाला पाहत असत. जनाई साठी श्रीविठ्ठल स्वतः राबत असें. एक वेळी इतर बायकांच्या गोवऱ्याच्या ढिगाजवळच असलेल्या जानाईच्या गोवऱ्याच्या ढिगातून गोवऱ्या चोरीस गेल्या. भांडण सुरु झाले. हा वाद मिटविण्याचे काम कबीरदासाकडे आले. कबीरपुढे प्रश्न पडला की जनीच्या गोवऱ्या कशा ओळखायच्या? हा पेच जनाबाईने सोडविला. त्या कबीरांना म्हणाल्या ' गोवरी कानाला लावली कीं विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी आला ती जनाईची व जिच्यातून आवाज आला नाही ती दुसऱ्याची समजायची. यावरून चोरी गोवऱ्या अचूक निवडल्या. व भांडण मिटलं.

जनाबाईं बद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. तिचा जिवलग विठ्ठल दिवसभर काम करून दमलेल्या जनाबाईशी गुजगोष्टी करायला येत असे.एके दिवशी परत जाताना विठ्ठल तिच्या घरी त्याचे पदक विसरला आणि ते पदक जनाबाईने चोरले असा आळ तिच्यावर घेऊन तिला सुळावर चढवायची शिक्षा फर्मावली जाते. चंद्रभागेच्या वाळवंटात सूळ उभा केला जातो.जनाबाई विठ्ठलाचा धावा करते आणि त्या सुळाचे पाणी होते. या कथेवर प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांनी *माळ पदक विठ्ठल विसरला भक्ताघरी* हे सुंदर गाणे लिहिले आणि माणिक वर्मानी ते गायले आहे.

           अख्यायिका - 2

     

   संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ ( इ.स.. १३५० ) या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या.

          ----------0---------- समाप्त -----------0----------

                          मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर

                         भ्रमनध्वनी क्र. 8830068030.