खूप वेळ रांगेत उभं राहावं लागलं, पण शेवटी ग्रंथालयाचं सभासद कार्ड मिळालं....
कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन जवळपास एक महिना उलटून गेला होता, पण अजून कार्ड मिळालेलं नव्हतं. आज अखेर ते हाती लागलं!
आठवड्यात फक्त एकच पुस्तक घेता येईल, अशा ग्रंथालयाच्या नियमामुळे "सुरुवात एखाद्या अभ्यासाच्या पुस्तकाने करावी" असा विचार करून मी ग्रंथालयात शिरलो. पण ती मोठी-मोठी तांत्रिक संदर्भ पुस्तकं आणि त्यांची जाडजूड, गंभीर कव्हरं पाहून मी थोडा विचारात पडलो – “ही पुस्तकं खरंच आत्ताच घ्यायला हवीत का?”
मनात विचार आला – “कॉलेज तर नुकतंच सुरू झालंय, अजून खूप वेळ आहे. ही पुस्तकं नंतरही घेता येतील... आत्ताच घाई करायचं काही कारण नाही."
असं स्वतःशी बोलत-बोलत मी मराठी विभागाकडे वळलो. तिथे कविता, गोष्टी आणि कादंबऱ्यांची पुस्तकं दिसू लागली – जणू ती माझीच वाट पाहत आहेत, असं क्षणभर वाटलं.
बराच वेळ पुस्तकं चाळत असताना, एका पुस्तकाच्या कव्हरकडे अचानक माझं लक्ष गेलं. मी ते उचलण्यासाठी हात पुढे केला... आणि तेवढ्यात, कानावर पैंजणांचा एक मधूर आवाज पडला. मी वळून पाहिलं... आणि ती माझ्यासमोर उभी होती.
क्षणभर माझ्याकडे पाहत, हसऱ्या चेहऱ्यानं तिने विचारलं–
“हे पुस्तक तुला हवं आहे का?”
तिचे सुंदर, पाणीदार डोळे जणू काही कमलनयन... वळणदार केस, चंद्रासारखा तेजस्वी चेहरा आणि गालावर उमटलेली ती मोहक खळी… त्या डोळ्यांतल्या मोहिनीपुढे माझा श्वासच अडकून गेला होता.
तिने परिधान केलेला लाल रंगाचा चुडीदार ड्रेस तिच्या सौंदर्याला इतका साजेसा होता की, क्षणभर मला स्वतःला स्वप्नात असल्यासारखं वाटू लागलं. हातातल्या बांगड्यांचा नाजूक खणखणाट, केसांत सजवलेलं ते गुलाबी फूल… सर्व काही अपूर्व वाटत होतं. जणू मी तिच्या सौंदर्यातच हरवून गेलो होतो… आणि माझ्याकडे शब्दच उरले नव्हते.
माझी नजर तिच्यावर स्थिरावली होती... आणि ती नजर परत घ्यावी, असं मनातसुद्धा आलं नाही.
ती इतकी सुंदर दिसत होती, की क्षणभर खरंच शंका आली — "हे स्वप्न तर नाही ना?"
तिच्या अस्तित्वातून एक वेगळाच आत्मविश्वास आणि सौंदर्यसंपन्न माधुर्य झळकत होतं.
त्या क्षणी कानात केवळ एक मधुर संगीत वाजत होतं...
आणि मनातून काही शब्द ओठांवर येण्यासाठी धडपडू लागले –
“ती दिसली... आणि सगळं थांबलं,
हसणं तिचं... मनात खोल शिरलं.
न नाव, न ओळख, तरीही जुळलं,
पहिल्याच नजरेत... घडू नये ते घडलं"
त्या क्षणी माझ्या मनात एक प्रीतीची बाग फुलली होती
मी अजूनही त्या क्षणात अडकलेलो असताना, तीने पुन्हा विचारलं –
"मी हे पुस्तक घेऊ का? तु वाचलं आहेस का?"
मी फक्त तिच्याकडेच बघत राहिलो… आणि नकारार्थी मान हलवली.
माझं संपूर्ण लक्ष तिच्या चेहऱ्यावर होतं.
ते पुस्तक माझ्या हातातून कधी तिच्या हातात गेलं, हेही मला जाणवलं नाही.
शेवटी, ती हसतहसत निघून गेली.
त्या गडबडीत तिचं नाव विचारायचंच राहून गेलं.
ती नजरसमोरून दिसेनाशी झाल्यानंतर,
मी त्या सौंदर्याच्या बागेतून बाहेर आलो खरा,
पण तिचा सुवास अजूनही मनात दरवळत होता…
आणि मन बाहेर यायला तयारच नव्हतं.
नंतर समोर दिसेल ते एक पुस्तक उचललं
आणि रजिस्टरवर नोंदणी करण्यासाठी पुन्हा रांगेत उभा राहिलो.
रजिस्टरमध्ये नजर फिरवत होतो,
तेव्हा एक अगदी आखीव-रेखीव अशी सही माझ्या नजरेस पडली.
तिथं फक्त कार्ड नंबर आणि पुस्तकाचं नाव होतं…
आणि त्याच्या समोर होती, सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली सही.
पहिल्याच अक्षरावरून इतकं समजलं –
हिचं नाव "प" या अक्षराने सुरू होतं.
आता ती "प्राजक्ता" असेल? की "पायल"?
हे कोडे मात्र मला काही सोडवता आले नाही.
एका महिन्यानंतर पहिल्यांदाच वाटलं –
आपलं कॉलेज खऱ्या अर्थानं आज सुरू झालंय.
संध्याकाळी पुस्तक हातात घेतलं,
पण डोळ्यांसमोर सतत तीच नजर, तोच चेहरा…
कितीही प्रयत्न केला, तरी बाजूला होईनाच
तिचं ते गोड हसणं,
गालावर आलेले केस तिनं अलगद हाताने बाजूला करणं,
आणि त्या पुस्तकाबद्दल विचारलेले दोन साधे प्रश्न –
सगळं अजूनही मनात गुंजत आहे.
पुस्तकाच्या ओळी वाचताना,
शब्दांच्या गर्दीत मी फक्त एका अक्षरात अडकलो होतो – "प".
मनात हे सगळे तरंग, आणि प्रेमाच्या लाटांनी मन भरून आलं होतं.
अचानक माझे मित्र दंगा करत रूममध्ये शिरले.
माझा चेहरा पाहून त्यातलाच एकजण म्हणाला –
"आज इकडे कोणी गुलाबी रंग लावला का चेहऱ्याला?"
सगळे जोरजोरात हसले.
"अरे, एवढं काय हसतो आहेस? काय आहे त्या पुस्तकात?"
"हे तर प्रेरणादायक पुस्तक दिसतंय… पण तुझा चेहरा मात्र अगदी स्वप्नाळू!"
"असं काही नाही रे… पुस्तक चांगलं आहे, वाचत होतो,"
असं म्हणून मी वेळ मारून नेली.
मित्र हसत हसत रूममधून बाहेर पडले,
पण जाताना त्यातलाच एकजण थोडा थांबून म्हणाला –
"अरिजित, अभ्यास कर रे…
नाहीतर आयुष्यभर अशीच पुस्तकं वाचत राहशील!
ती रात्र काही केल्या संपत नव्हती...
मी मात्र खिडकीत बसून, एकटक त्या चंद्राकडे पाहत होतो.
इतक्या वर्षांनंतर, जणू तो चंद्रही काहीतरी सांगत होता.
आणि त्या शांत रात्री, मनात उमललेली एक सुंदर कल्पना...
ते तर एक स्वप्नच होतं — मोहक, शांत... पण अनोळखी.
मन कल्पनेने फुलून गेलं होतं,
पण त्या भावनेला शब्दांत गुंफायला, शब्दच जवळ नव्हते.
जणू माझी नजर आणि माझे शब्द — दोन्ही तिच्यातच अडकून गेले होते.
"तिला परत एकदा भेटलंच पाहिजे..."
या विचारानेच झोप लागली.
सकाळी कॉलेजला जाण्याआधी,
मी पुन्हा एकदा ग्रंथालयाच्या इमारतीसमोरच्या झाडाखाली जाऊन बसलो.
हातात एक पुस्तक होतं —
पण ते वाचणं केवळ एक सोंग होतं.
डोळे मात्र सतत येणाऱ्याजाणाऱ्यांवर…
कदाचित ती दिसेल का, या आशेने.
खूप वेळ गेला…
पण ती काही दिसली नाही.
शेवटी, थोडी निराशा मनात घेऊन,
मी आमच्या डिपार्टमेंटकडे निघालो.
...आणि तेवढ्यात —
सायकल स्टँडजवळ ती पुन्हा दिसली.
पांढराशुभ्र ड्रेस,
चेहऱ्यावरील तेज आणि आलेली गुलाबी छटा,आणि तिचे केस लहरींमधून वारा शीळ घालत होता.
मनमोहक, शांत आणि खोल नजर…
फुलांच्या पाकळ्यांसारखे तिचे नाजूक ओठ.
साधेपणातही किती सुंदर!
एका क्षणाला असं वाटलं – जणू समोर एखादी राजहंसिनी उभी आहे... सौंदर्याचं स्वरूप धारण करून ती माझ्यासमोर आली आहे.
तिचा सुगंध प्राजक्ताच्या फुलांसारखा, मनात भरून गेला.
जणू निसर्गानेच तिला त्याच्या कलेतून आकार दिला असावा!
ती आणि तिच्या मैत्रिणी गप्पा मारत हसत होत्या.
सारं काही बहरलेलं होतं – जणू बागेतली फुलं उमललेली,
आणि त्या हास्याच्या गंधात मी हरवून चाललो होतो.
पण माझी नजर मात्र फक्त त्या एकाच फुलावर होती.
या नजरेनेच तर सगळा घोळ केला होता…
कधी नव्हे तो चंद्रही इतका जवळचा वाटायला लागला होता,
आणि त्या चांदण्याही जणू तिच्याच मैत्रिणी.
ते आकाश, ते क्षण… सगळं काही माझं वाटायला लागलं.
आणि त्या दिवसानंतर, माझ्या आठवणीत, माझ्या कल्पनेत, आणि माझ्या प्रत्येक शब्दात – ती कायमची 'राजहंस' बनून राहिली
पुढचे कितीतरी दिवस, माझा हाच दिनक्रम झाला होता –
रोज सकाळी लवकर उठायचं, आणि ग्रंथालयाच्या इमारतीसमोरच्या त्या झाडाखाली बसून तिची वाट पाहायची.
ती नेहमीप्रमाणे तिच्या मार्गाने जात असे… आणि मी माझ्या.
ती चालत असताना, तिच्या पायातील पैंजणांचा तो मंजुळ आवाज —
जणू एखादं गाणं वाऱ्याच्या सुरांमध्ये मिसळून ऐकू यायचं.
आणि तिचे ते लांबलचक केस…
कधी गालावरून लहरणारे, तर कधी वाऱ्याच्या लाटेवर नाचणारे —
मनाला अमृतासारखा वर्षाव करून जात.
ती दिसेनाशी झाल्यावरच, मी माझ्या डिपार्टमेंटच्या इमारतीकडे जायचो.
या सगळ्याचा साक्षीदार एकच होता –
ते झाड,
किती लोकांच्या भावना याने ऐकल्या असतील कोण जाणे,
पण माझ्या त्या अव्यक्त प्रेमाच्या आठवणींचा,
तो नक्कीच एक साक्षीदार झाला होता.
संध्याकाळची ती शांतता मला खूप प्रिय वाटायची.
मन, बुद्धी आणि अंतःकरण – या तिघांमध्ये कुठेच मेळ बसत नव्हता.
बुद्धी म्हणत होती –
“अरे, हे काही खरं नाही. तू स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर ये. स्वतःवर लक्ष केंद्रित कर.
ज्या फुलासाठी तू स्वतःचं सर्वस्व पणाला लावत आहेस,
जिच्या सुगंधासाठी तू व्याकूळ झालायस – त्या मोहात तू तुझी स्वतःची ओळख विसरत चाललायस.
स्वतःची ओळख जपणं आणि स्वतःला विसरू न देणं खूप आवश्यक आहे.”
मन मात्र म्हणत होतं –
“आयुष्य हे स्वच्छंदी होऊन जगण्यात आहे.
सुखाची अभिलाषा बाळगणं जर पाप असेल,
तर माणसाने जन्मच का घ्यावा? आणि मरण तरी कशासाठी यावं?
मनात येणारे विचार, भावना… जर बोलूही शकत नसलो,
तर त्यांचं अस्तित्व तरी काय अर्थाचं?
फक्त एकदाच… एकदाच तिच्यासोबत बोलायला हवं. एवढंच हवं आहे.”
आणि अंतःकरण…
ते तर माझं राहिलंच नव्हतं –
ते कधीच तिच्याकडे निघून गेलं होतं
शेवटी, एक निर्णय घेतला.
किती दिवस असा लपाछपीचा खेळ खेळायचा?
एक चिठ्ठी लिहायचं ठरवलं.
मनात जे काही भावनांचे शब्द होते,
ते हळूहळू कागदावर उतरवले…
ती चिठ्ठी तिच्या सायकलच्या समोर ठेवायचं ठरवलं.
कारण ती दररोज सायकलने ग्रंथालयात येत असे,
आणि तिथून चालत तिच्या डिपार्टमेंटकडे जात असे.
आता ही चिठ्ठी काय करेल?
ती वाचेल का?
वाचली, तर ओळखेल का – ही चिठ्ठी कुणी लिहिली आहे?
हे सगळे प्रश्न मनात घोळत होते.
पण एक मात्र ठरवलं होतं –
"पुढचं पाऊल घ्यायचंच."
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून,
मी ग्रंथालयासमोर पोहोचलो.
पण त्या दिवशी… ती आलीच नाही.
ना ती दिसली, ना तिची सायकल.
खूप वेळ वाट पाहिली… पण
तिची सायकल काही केल्या दिसेना.
शेवटी, पहिल्या तासाची वेळ झाली, आणि
मी हळूहळू निराश होऊन तिथून निघून गेलो….
किती तरी दिवस झाले –
तिची सायकल त्या ग्रंथालयाच्या इमारतीसमोर दिसलीच नाही.
मन अधीर होतं, अस्वस्थ आणि बेचैनही.
डोळ्यासमोर सतत ती नजर…
ती, आणि तिचा चेहरा…
मनात उगम पावलेलं ते प्रेम,
त्या स्वप्नांचं विश्व, आणि वैचारिक गोंधळ …
सगळं पुन्हा पुन्हा मनात दाटून येत होतं.
आणि…
ती परत कधी दिसेल,
हा एकच विचार मनात घर करून बसला होता.
निदान या “फ्रेंडशिप डे” ला तरी चिठ्ठी द्यावी…
आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करावा,
हा विचार मनात पुन्हा जागा झाला होता.
त्या निमित्ताने आमची ओळख व्हावी,
इतकीच एक छोटीशी इच्छा होती.
त्या दिवशी मन खूपच व्याकुळ झालं होतं —
सतत एकच विचार डोक्यात घोळत होता:
"ती चिठ्ठी तिने वाचलीच नाही तर ?"
"वाचली आणि फेकून दिली तर?"
पण लगेच मनाचा दुसरा कोपरा म्हणायचा –
"अजून काहीच घडलं नाहीये…
मग अशा विचारांचे ओझं का बाळगायचं?"
एक आठवड्यानंतर,
सकाळी ग्रंथालयाजवळ,
पुन्हा एकदा ती सायकल दिसली!
त्या दिवशी माझाच आनंद गगनात मावेना, आणि मी एका आनंदाच्या लाटेवर स्वार झालो होतो, जणू जगाच्या साऱ्या गोष्टी माझ्या ताब्यात होत्या. थोड्याच वेळात,
ती आणि तिच्या मैत्रिणी ग्रंथालयातून बाहेर येताना दिसल्या.
पुन्हा तोच सुगंध,
पुन्हा तेच उमललेले क्षण,
पुन्हा तीच बहरलेली बाग डोळ्यासमोर उभी राहिली.
या वेळी मात्र तिच्या हातांवर मेहंदी होती.
कदाचित घरी काही कार्यक्रम असावा.
पण त्या मेहंदीने तिचं सौंदर्य अजूनच खुलून आलं होतं…
तिचं हसणं, तिची नजर, आणि तिचा तो सहजपणा .
सगळं काही मनात खोलवर झिरपत गेलं.
आणि शेवटी… फ्रेन्डशिप डे आला.
मीही मनात धाडस आणि थोडीशी भीती घेऊन सज्ज झालो —
एक चिठ्ठी, एक भावना, आणि एक आशा…
"या क्षणी जर मी धैर्य दाखवलं नाही,
तर हे स्वप्न पण अपूर्ण राहील…"
त्या दिवशी ग्रंथालयासमोर जरा जास्त गर्दी वाटत होती.
सायकली नेहमीप्रमाणे तिथे लावलेल्या होत्या.
मी थोड्याशा धडधडत्या छातीने तिच्या सायकलकडे वळलो –
हातात माझ्या भावनांची शब्दरूपी चिठ्ठी होती,
पण… चिठ्ठी ठेवण्याआधीच
माझ्या नजरेस पडला एक गुलाबी लिफाफा.
ते एक ग्रीटिंग कार्ड होतं.
पण ते फक्त कार्ड नव्हतं —
त्यावरील अक्षरे… माझ्या ओळखीची वाटली.
क्षणभरात…
मनातलं आभाळ कोसळलं.
"तुझाच… शिवम."
हे दोन शब्द वाचले आणि काळजाला भीषण चटका बसला.
माझ्यासाठी ती जागा, ती सायकल, ते झाड –
सगळं केवळ माझ्या आणि तिच्या आठवणींनी भरलेलं होतं.
पण आज कळलं…
मी एकटा नव्हतो.
या बागेत, या वाटांवर, अजून कुणी तरी होतं –
जो माझ्याचप्रमाणे तिच्यावर प्रेम करत होता…
आणि कदाचित…
तिचं मनही त्याच्याजवळ होतं.
खरं तर चूक माझीच होती.
मागील काही महिन्यांपासून मी माझ्या मित्रांपासून दुरावलो होतो.
बाहेरच्या जगात काय चाललंय,
कुणाचं मन कुणावर आहे,
हे सगळं मी विसरलो होतो.
माझ्या वागण्याने मित्र कधी कधी खूप चिडायचे.
का नाही चिडणार? किती तरी दिवस मी एकटाच,
या ग्रंथालयासमोर बसत होतो.
संध्याकाळी पण उशिरा रूमवर जात होतो.
त्या दिवशी मात्र…
मी सायकलजवळ पुन्हा जाण्याची हिम्मतच केली नाही.
एकटाच, त्या झाडाखाली खूप वेळ बसून राहिलो.
विजांचा कडकडाट होत होता, आणि पावसाच्या थेंबांच्या सरी कधी सुरू झाल्या ते मला समजलंच नाही. पावसाचे थेंब गालावरून खाली लोटले आणि त्या पावसात माझं मनदेखील वाहून गेलं.
पण तिकडे, ग्रीटिंग कार्ड पाहून, तिच्या चेहऱ्यावर आनंदाच्या अश्रूंचे आले होते. तिचा चेहरा, बरेच काही सांगून गेला.
माझ्या मनात एकच प्रश्न आला –
हे झाड जर सगळ्याचा साक्षीदार आहे,
तर याला बोलता का येत नाही?
जर याला आवाज असता,
तर कदाचित…
या झाडाने मला सावध केलं असतं.
आपण का प्रेमाच्या त्या वाटेवर जातो,
जिथून परतीची काही अपेक्षाच नसते?
प्रेमात आपण इतके का गुंततो,
की आजूबाजूचं काहीच आपल्याला दिसत नाही?.
पुढचे कितीतरी दिवस
मी ग्रंथालयाच्या दिशेलाही गेलो नाही.
तरीही तिच्या नजरेची एक झलक,
आणि आठवणींचा हळूवार स्पर्श
पुन्हा त्या इमारतीकडे ओढत होता.
...पण नंतर मी तिथं गेलो ते — फक्त पुस्तकांसाठी
ती निघून गेली होती,
पण जाताना मला पुस्तकाची आठवण देऊन गेली
त्या एकटेपणाच्या काळात,
माझ्या मनाचा खराखुरा आधार झाला फक्त दोन गोष्टींचा –
एक म्हणजे पुस्तकं… आणि दुसरं ते झाड.
पुस्तकं माझ्याशी मनमोकळं बोलत होती,
आणि ते झाड…
माझ्या भावना शांतपणे ऐकत होतं,
जणू तेही हळूहळू मला समजून घ्यायला लागलं होतं.
समाप्त