प्रकरण ११
“तेव्हा अकरा वाजले होते?” पाणिनीने विचारलं.
“कदाचित पाच दहा मिनिटं पुढे मागे” कार्तिक कामत म्हणाला.
“ठीक आहे काय झालं पुढे?”
“ मगाशी सांगितल्याप्रमाणे मी चांडकच्या घराचा दरवाजा वाजवला काही उत्तर आलं नाही. मी दरवाजा थोडा ढकलून पाहिला तर तो उघडाच होता त्यामुळे मला सहज आत जाता आलं आणि मी गेलो. मी गेलो तेव्हा चांडक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता . मी आजूबाजूला बघितलं, कुठल्यातरी स्त्रीच्या पायाचा हाय हिल्स चा ठसा रक्ताच्या थारोळ्यात बुडून शेजारच्या फरशीवर उमटला होता. तो ठसा बघून माझी खात्री झाली की तो ऋता रिसवडकरच्या बुटांचा असणार पण मला खात्री करून घ्यायची होती म्हणून मी चांडकच्या घरातून दरवाजा तसाच उघडा ठेवून बाहेर पडलो. मी ऋताच्या घरी पोचलो. ती अंथरुणातच होती. ती उठली आणि तिने मला आत घेतलं. मी कुठून आलो होतो आणि मला काय सापडलं होतं याबद्दल मी तिला काहीच बोललो नाही. तिला मी एवढंच सांगितलं की मला प्रचंड नैराश्य आलंय आणि त्यामुळे तुला भेटायची आणि तुझ्याशी बोलायची खूप इच्छा आहे म्हणून मी आलोय.”
“ओके. पुढे काय झालं?” पाणिनीने विचारलं.
“मी तिला सांगितलं की मला तिच्याबद्दल खूप आत्मीयता वाटते आणि तिला कधी काही गरज लागली तर ती मला केव्हाही फोन करून बोलू शकते. मी तिला जी रिव्हॉल्व्हर दिली होती ती तिने उशी खाली ठेवलेली मला दिसली. काहीतरी बनाव करून मी ते रिव्हॉल्व्हर हातात घेतलं आणि तिचं लक्ष नसताना ते उघडून पाहिलं. तेव्हा माझी खात्री झाली की ते मी तिला दिल्यानंतर त्यातून एक गोळी झाडण्यात आली होती. माझं लक्ष तिच्या बुटा कडे गेलं. मी ते नीट निरखून बघितले. त्यातला एक बूट मला ओलसर वाटला सकृत दर्शनी तो नुकताच धुतलेला असावा. तिच्या बुटाला जो तळवा होता तो धातूचा तळवा होता. चांडकच्या घरी मला जो ठसा उमटलेला दिसला होता, हुबेहूब तसाच होता.”
“तू तिला त्याबद्दल विचारलंस?”
“नाही विचारलं त्याबद्दल. मी जवळ जवळ मध्यरात्रीपर्यंत तिथे थांबलो होतो. मी तिच्या मनावर एवढेच ठसवायचा प्रयत्न केला की तिला एका चांगल्या मित्राची गरज आहे आणि मी तिचा चांगला मित्र होऊ शकतो. तिला कधीही गरज वाटली तर मला बोलवावं. नंतर थोड्या वेळाने मी तिथून गेलो” कामत म्हणाला.
“पुन्हा तू चांडकच्या घरी गेलास?”
“हो पुन्हा त्याच्या घरी गेलो. आणि ऋता रिसवडकर च्या विरोधात जर काही पुरावे तिथे शिल्लक राहिले असतील तर ते नष्ट करण्यासाठी मी बराच वेळ तिथे थांबलो.”
“तू काय काय केलस तिथे ?”
“मी आता मलाच दोष देतोय पटवर्धन, एक सुवर्णसंधी मी घालवली. मी जेव्हा ऋता रिसवडकरच्या घरी होतो तेव्हा माझ्या खांद्याला दुसरे रिव्हॉल्व्हर होतं त्याच वेळेला मी ते तिला आधी दिलेल्या रिव्हॉल्व्हर शी बदलून टाकायला हवं होतं पण मी त्यावेळेला एवढा विचार करण्याच्या परिस्थितीत नव्हतो .”
“ तू माझ्याशी खोटं तर बोलत नाहीयेस ना कार्तिक? तू खरोखरच बंदुकांची अदलाबदल केली नाहीस ना?”
“खरोखर नाही केली पाणिनी,तुला एकदम खरं सांगतो. मी तिला ते रिव्हॉल्व्हर दिल्यापासून मी परत तिच्या घरी जाईपर्यंतच्या कालावधीत त्याच्यातून एक गोळी झाडली गेली होती.”
“ठीक आहे तू चांडकच्या अपार्टमेंट मध्ये काय केलस नेमकं?”
“त्या परिस्थितीत जे करायला हवं होतं तेच मी केलं. ऋताच्या बुटाचा जो ठसा उमटला होता तो वाळला होता.. सुरुवातीला मी विचार केला की तो ठसा पुसून टाकावा पण त्यात मला धोका वाटला एक तर तो ठसा पुसण्यात खूप वेळ गेला असता आणि मला त्या प्रेता बरोबर बराच वेळ थांबायला लागलं असतं. आणि दुसरं म्हणजे ते ठसे पूर्णपणे पुसले गेले नसते त्याचे काही अवशेष शिल्लक राहिले असते मी भराभर विचार केला आणि मी माझा स्वतःचा बूट त्या रक्ताच्या थारोळ्यात बुडवला. बुटाचा तळवा पूर्णपणे रक्तात माखला गेला याची खात्री केली आणि ती खात्री झाल्यावर तो तळवा ऋता ने उमटवलेल्या बुटाच्या ठशावर दाबला. ऋता खुनात गुंतवली न जाता ते आरोप माझ्यावर यावे त्यासाठी जे काय आवश्यक आहे अशा बऱ्याच गोष्टी मी केल्या. माझ्यावर संशय येईल असं वागून मी मुद्दामच या शहराच्या बाहेर निघून गेलो जेणेकरून पळून गेलो या आरोपाखाली पोलिसांना माझ्यावरच संशय येईल पण त्याच सुमारास तू माझ्या कुमारच्या कडील रिव्हॉल्व्हरची आदलाबदल करायचा प्रयत्न केलात आणि गोंधळ अजूनच वाढला. त्याचा तुमच्यावर संशय आला आणि त्यामुळे मी ठरवलं की कुमारला समक्ष भेटून हे सर्व समजावून सांगावं पोलिसांनी माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचे गुप्तहेर नेमले होते ते मला पकडतील अशीच मी व्यवस्था केली . इथे त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर मी त्याला स्पष्ट सांगितलं की माझे वकील पाणिनी पटवर्धन हजर असेपर्यंत मी कुठलही विधान करणार नाही.”
“ठीक आहे, तर कार्तिक, आता जी काही परिस्थिती उद्भवले त्याला आपण तोंड देऊ. उत्तर देताना मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जे काही सुचवेन ते चतुराईने जाणून तुझं बोलणं चालू ठेव. वर्तमानपत्रात तुझ्याबद्दल च्या बातम्या येणार आहे त्याची तयारी ठेव किंबहुना त्या याव्यात अशीच ते व्यवस्था करतील अप्रत्यक्षरीत्या ते त्यांचा रिव्हॉल्व्हरच आहे तुझ्याविरुद्ध. आहॆ त्या स्थितीला आता तोंड दे. कोणतीही काळजी करू नकोस पाणिनी म्हणाला आणि त्याला घेऊन पुन्हा अॅडव्होकेट खांडेकरांच्या समोर येऊन उभा राहिला. खांडेकरांनी पाणिनीला रक्ताळलेल्या बुटा चा फरशीवर उमटलेल्या ठशाचा एक फोटो दाखवला.
“बोला खांडेकर काय हवंय तुम्हाला?” पाणिनीने विचारलं.
“आम्हाला हे जाणून घ्यायचे की हा ठसा कार्तिक कामतच्या बुटाचा आहे का” खांडेकर म्हणाले.
कार्तिकने पाणिनी कडे पाहिलं. पाणिनी ने हसून नकारार्थी मान हलवली .
सर्व प्रश्नांची उत्तरं कार्तिक,पाणिनीला विचारल्या शिवाय देणार नाही हे खांडेकरांनी बरोबर ओळखलं त्यांचा चेहऱ्याचा रंग एकदम बदलला. रागाने ते लालेलाल झाले. नीट ऐक, मिस्टर पटवर्धन, परस्परावरील विश्वासाने आपण हा विषय पुढे नेतोय. कामतने आम्हाला सांगितलं होतं की पटवर्धन यांच्याशी संपर्क झाल्यानंतर आणि ते इथे आल्यानंतर मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन आम्ही ती संधी त्याला उपलब्ध करून दिली. आता एक तर तुम्ही लोक बोला किंवा बोलू नका.”
“आणि समजा आम्ही बोललो नाही तर?” पाणिनीने विचारलं.
“ तर मग तुम्हाला दोघांनाही पश्चाताप होईल” खांडेकर म्हणाले
पाणिनी काही बोलला नाही
“मला असे विचारायचे तुम्हाला मिस्टर कार्तिक कामत, की तुम्ही दिवाण स्ट्रीट वरच्या ९१८ नंबरच्या दुकानातून तीन आठवड्यापूर्वी नवीन बुटाच्या जोडीवर रबर हिल्स बसवून घेतल्यात की नाही?”
“उत्तर दिलं तरी चालेल.” पाणिनी त्याला म्हणाला.
“हो” कामत ने कबूल केलं.
“मी तुला आता एक बुटाची जोडी दाखवतो. मला सांग याच बुटावर तू हाय हिल्स बसून घेतलेस की नाही?” खांडेकर म्हणाले आणि त्यांनी ड्रॉवर मधून बुटाची एक जोडी काढून त्याला तपासायला दिली
“तुम्हाला कुठे मिळाले हे बूट?” आश्चर्याने कामत उद्गारला.
“कुठे मिळाले याचा विचार करू नको हे तुझे आहेत का तेवढेच सांग”
कामतने ते बूट तपासले एक निळसर छटा असलेला डाग त्यातील एका बुटाच्या तळव्याला पडला होता.
“हो” कामत म्हणाला.
“तुझ्या माहितीसाठी सांगतो, या बुटाची बेंझाईन द्रवाने तपासणी केली आहे. तुला जी निळसर छटा त्याच्यावर दिसते ती त्या बेंझाईन या द्रव्याची आहे. ही तपासणी बुटावर रक्ताचा अस्तित्व होतं की नाही हे शोधून काढायला उपयोग पडते. आता या पार्श्वभूमीवर तू आम्हाला सांग की तुझ्या बुटाला ते रक्त कुठे लागलं? आणि कसं लागलं?” खांडेकर म्हणाले.
“मला नाही वाटत आत्ता मी याबद्दल काही विधान कराव.” कामत बेफिकिरीने म्हणाला.
“आता मी तुला एक रंगीत फोटो दाखवतो.” खांडेकर म्हणाले आणि त्यांनी पाणिनी पटवर्धन कडे फोटो दिला.
“नीट बघ पटवर्धन आणि सांग मला काय दिसतय तुला”
“मला पायाचा ठसा दिसतोय.” पाणिनी म्हणाला.
“नीट बघ पटवर्धन. जरा अभ्यास कर त्याचा काळजीपूर्वक.” खांडेकर म्हणाले
पाणिनीने तो फोटो काळजीपूर्वक बघितला.
“तुझ्या माहितीसाठी सांगतो पटवर्धन, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ मध्ये जे दिसत नाही ते या रंगीत फोटो तुला दिसेल की स्त्रीच्या बुटाच्या ठशाच्या वरती कामतच्या बुटाचा ठसा उमटलाय.”
“आता मी तुला विचारतो कामत, चांडक ला मारण्यात आल्यानंतर तू चांडकच्या घरी गेलास की नाही? तुला माहिती होतं तो मेला आहे आणि तिथे जे पुरावे उपलब्ध होते ते नष्ट करण्याच्या हेतूने, त्याच्यात संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने तू मुद्दामहून त्या रक्ताच्या थारोळ्यात तुझा पाय ठेवलास की नाही? आणि ते बूट एका स्त्रीच्या बुटाच्या उमटलेल्या ठशावर जाणून बुजून उमटवलेस की नाही?”
“एक मिनिट.. एक मिनिट” पाणिनी मध्येच म्हणाला. “माझ्या माहितीप्रमाणे असं झालं असेल तर तो गुन्हा आहे.”
“कायद्याबद्दलच्या तुझ्या ज्ञानाबद्दल आणि ते ज्ञान आमच्यासमोर उघडं केल्याबद्दल अभिनंदन.” खांडेकर म्हणाले
“माझ्या कायद्याच्या या ज्ञानाच्या आधारे मी माझ्या अशिलाला सल्ला देतो की कुठल्याही प्रश्नाचे उत्तर त्याने देऊ नये.”
पाणिनीचे उत्तर ऐकून खांडेकर यांनी मोठा श्वास घेतला. पाणिनच्या शेरेबाजीकडे दुर्लक्ष करत कामत कडे बघून ते म्हणाले,
“दाराच्या मुठी वर जो ठसा उमटला होता तो आम्ही मिळवला आहे. पण मला सांगायचे ते वेगळंच आहे. कुणीतरी त्या दाराची मूठ कापडाने पुसून त्यावरील सर्व ठसे नष्ट केले आहेत. त्यावरचा एकच ठसा होता, अगदी स्पष्ट होता, तो आम्हाला मिळाला कारण आधीचे ठसे पुसून त्यावर तो एकमेव ठसा मुद्दामच उमटवला गेला आहे. आणि तो दाराच्या मुठीच्या अगदी मधोमध सहज कोणालाही तो सापडावा, पोलिसांना अगदी सहज दिसावा अशा तऱ्हेने तो तिथे उमटवला गेला आहे”.
आणि तो अंगठा निस संशयपणे तुझा आहे कामत या माझ्या अंदाजामध्ये चूक होऊच शकत नाही आता कुठल्या परिस्थितीत तू हा तुझ्या बोटांचा ठसा त्या दाराच्या मुठी वर उमटवलास हे सांग.” खांडेकर म्हणाले.
“एक मिनिट... एक मिनिट...” पाणिनी पटवर्धन मध्येच म्हणाला. “जर का तुमचं म्हणणं खरं असेल आणि कामतनेच दाराच्या मुठी वरचे आधीचे ठसे पुसले असतील आणि त्याचा स्वतःचा एक ताजा बोटांचा ठसा तिथे ठेवला असेल तर तो दोषी ठरू शकतो?”
“हे काय विचारणं झालं पटवर्धन? तो नक्कीच दोषी ठरू शकतो.” –खांडेकर.
“तर मग मी त्याला असा सल्ला देतो की त्यांनी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देऊ नये” पाणिनी म्हणाला
खांडेकर पाणिनीकडे वळले,
“पाणिनी त्याला सल्ला देण्यापेक्षा तू स्वतःला आधी वाचव. तूच स्वतः अश परिस्थिती निर्माण केल्येस की सगळ्यांच्याच मनात गोंधळ निर्माण व्हावा. खुनात वापरलेल्या रिव्हॉल्व्हर मधे तू बरोबर अदलाबदल केला आहेस. तुला मी एक संधी देतोय स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची. तू मला हे सांगायचं की ते खुनात वापरलेलं रिव्हॉल्व्हर तुझ्या ताब्यात कसं आलं.”
“मी जर खरं सांगितलं तर तुम्ही माझ्यावर खटला लावणार नाही?” पाणिनीने विचारलं.
खांडेकरांनी ने थोडा विचार केला आणि म्हणाले,
“मी काही तुला फार मोठे आश्वासन देणार नाही पण तू जे काही सांगशील त्यांनी माझ्या वागण्यात फरक पडेल एवढं नक्की.”
“ आणि समजा,मी म्हणालो की मी कार्तिकच्या कुमारच्या ऑफिसमध्ये गेलो, मी त्याला विचारलं की तुझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे का, त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर होतं, त्यांना मला ते दिलं त्याच्यातून मी एक गोळी झाडली ती त्याच्या टेबला ला लागली. मी त्याला घेऊन ऋता रिसवडकरच घरी गेलो.त्यानं तिच्याकडे रिव्हॉल्व्हर दिल. हे एवढंच सगळं घडलं. आणि मी ते सगळं तुम्हाला सत्य सांगितलं आहे. आता काय करणार आहात तुम्ही?” पाणिनीने विचारलं.
“मला म्हणायचंय की तू तिथे रिव्हॉल्व्हरची आदलाबदल केलीस त्यामुळे कामत च्या कुमारच्या हातून खुनात वापरलेली रिव्हॉल्व्हर ऋता रिसवडकरला दिली गेली.” खांडेकर म्हणाले
पाणिनी पटवर्धन कामत कडे वळून म्हणाला, “बघितलस ? खांडेकरांच्या आश्वासनाला किती महत्त्व द्यायचे ते. तू त्यांना काहीही सांगितलंस आणि ते त्यांच्या तत्वात बसत नसेल तर खांडेकर म्हणणार की ते असत्य आहे म्हणजे त्यांना जे फायदेशीर आहे आणि त्यांना जे ऐकायचं आहे तेच आपण सांगितलं तरच ते त्याच्यावर विश्वास ठेवतात.”
खांडेकर भडकून काहीतरी बोलायला गेले पण गप्प बसले तेवढ्यात इन्स्पेक्टर तारकरने मध्यस्थी केली. तो खांडेकरांना म्हणाला, “खांडेकर साहेब, मी एक प्रश्न विचारू शकतो का?”
खांडेकर यांनी परवानगी दिल्यावर तारकर पाणिनी पटवर्धन ला म्हणाला,
“एक वैयक्तिक संबंधातून तू मला एक आश्वासन देतोस का पाणिनी, की तू रिव्हॉल्व्हर अदलाबदल केली नाहीस?”
“हो मी खात्री देतो तुला.” ठामपणे पाणिनी म्हणाला.
एवढा खात्री पूर्वक निर्वाळा दिल्यानंतर तारकर चा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला. तो पुन्हा खांडेकरांकडे वळला.
“ तुम्हाला मी सांगतो खांडेकर साहेब, आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा हे प्रकरण खूप रहस्यमय आहे. मला वैयक्तिक काहीही कारण दिसत नाही पटवर्धन यांनी रिव्हॉल्व्हरची आदलाबदल करण्यास. पण आता पटवर्धन यांनी रिव्हॉल्व्हर बदलली नसल्याचा निर्वाळा दिल्यामुळे रिव्हॉल्व्हर ची अदलाबदल झाली नाही आणि कामतच्या कुमारच्या ताब्यात असलेले रिव्हॉल्व्हर हेच खुनामध्ये वापरलेलं रिव्हॉल्व्हर होतं या गृहितावरवर मी वैयक्तिकरित्या पुन्हा एकदा नव्याने “तपास करू इच्छितो.”
“असं असू शकत नाही.” खांडेकर म्हणाले.
“त्रयस्थ नजरेने आपण पुन्हा एकदा तपास करू, जरी तुम्हाला तसं वाटत नसलं तरी .” तारकर म्हणाला, “रिव्हॉल्व्हर ची आदलाबदल करण्यात पाणिनी पटवर्धन चा काही हेतू असेल असं मला वाटत नाही.”
“ठीक आहे तुला हवं ते कर. आपण इथे माहिती घेण्यासाठी आहोत माहिती देण्यासाठी नाही.हे लक्षात असू दे. जे काय करायचे ते सावधपणे कर आणि इथून पुढे तुला जर काही म्हणायचं असेल तर ते पाणी पटवर्धन हजर असताना माझ्याशी बोलू नकोस खाजगीत मला काय ते सांगत जा.”
पाणिनी उठून उभा राहिला “तर मग मी आता असं समजू का की आपली ही चर्चा संपली आहे? माझ्या अशिलाने कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायला नकार दिलेला आहे. आणि मी स्वतः तुम्हाला अत्यंत मोकळेपणाने आणि मला जे जे माहिती होते त्या सर्वांचे सविस्तर उत्तर दिलेले आहे अर्थात माझ्या अशीलाच्या विश्वासाला तडा जाणार नाही याचं भान ठेवून मी तेवढं सांगू शकतो तेवढे मी सांगितलं आहे.”
“बाहेर जायचा रस्ता तो आहे मिस्टर पटवर्धन.” दाराकडे बोट दाखवत खांडेकर पाणिनीला म्हणाले
कामतचं काय?” पाणिनीने विचारलं.
“तो आणखीन काही काळ हॉटेलमध्ये राहणार आहे अर्थात त्याचा खर्च आम्ही करू.” खांडेकर म्हणाले
“ठीक आहे तर मग मी निघतो. कामत तू लक्षात ठेव कुठलंही विधान पोलिसांच्या समोर करायचं नाही.”
खांडेकरांनी आपल्या टेबलावरचा फोन उचलला आणि इंटरकॉमवर कोणाला तरी म्हणाले, “ठीक आहे त्या वर्तमानपत्राच्या बातमीदारांना आत पाठवा.”
तिथून निघून पाण्याने पटवर्धन सरळ आपल्या ऑफिसमध्ये आला सौंम्या त्याची वाट बघत होती तिला खूप उत्सुकता होती काय झालं. तिने पोलीस चौकीत काय काय झालं त्याची सर्व खबरबात पाणिनीला विचारली आणि त्याने तिला सर्व माहिती दिली.
“ कामत वर पुरावा दडपल्याच्या आणि पुराव्यात संभ्रम केल्याच्या आरोपा खाली ते आत घेणार आहेत आणि ऋता रिसवडकर वर मात्र खुनाचा आरोप ठेवणारेत”
“तुमचं काय?” सौम्यान काळजीन विचारलं.
“कार्तिक सारखाच माझ्यावर सुद्धा पुरावा दडविणसाठी किंवा पुरावा दडवण्याचा सल्ला दिला म्हणून किंवा त्यासाठी मदत केली म्हणून आरोप ठेवू शकतात.”
“अरे बापरे! मग या सर्वातून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे तुमच्या मनात ?”सौम्यान विचारलं.
“सर्व घटनांचा साकल्याने आणि शांतपणे विचार करायचा. दोनदा- तीनदा- चार वेळा विचार करायचा त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण मगाशी अर्धवट राहिलेलं जेवण पूर्ण करायला त्याच हॉटेलमध्ये जाऊ आणि त्याच पदार्थांची ऑर्डर देऊ” डोळे मिचकावून पाणिनी तिला म्हणाला.” कदाचित आपण निवांतपणे एकत्र घेतलेलं असं हे शेवटचं जेवण असेल.”
(प्रकरण ११ समाप्त)