Revolver - 9 in Marathi Fiction Stories by Abhay Bapat books and stories PDF | रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9

Featured Books
Categories
Share

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9


प्रकरण ९  

दुसऱ्या दिवशी दुपारी अडीच वाजता सौंम्या पाणिनीला घाई घाईत सांगत आली, “ बाहेर कामत आलाय.”

“ वडील?”

“ मुलगा.”—सौंम्या म्हणाली.

“कसा आहे ? म्हणजे देहबोलीवरून काय वाटतंय?” पाणिनीने विचारलं.

“ मला तेच सांगायचं होतं. खूप भडकलाय. तुम्ही एकतर त्याला अत्ता भेटू नका किंवा कनक ला बोलावून घ्या तुमच्या मदतीला.” सौंम्या म्हणाली आणि पाणिनीने मानेनेच ठाम पणे नकार दिला.

“ तो खूप आडदांड आहे, तुम्हाला माहितीच आहे त्यात तो.....” सौंम्या ने समजावण्याचा प्रयात केला पण पाणिनी ठाम होता.

“ तू विसरल्येस सौंम्या बहुतेक, आपण ज्या कॉलेज ला शिकलोय त्या कॉलेजचा मी बॉक्सिंग चँपियन होतो. तशीच वेळ आली तर मी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो पण मला वाटत नाही ती वेळ येईल.त्यातून हे कायदेशीर युद्ध आहे.मी इथे कनकला बोलावलं तर त्याला वाटेल की मी घाबरलोय.” पाणिनी म्हणाला. सौंम्याला ते पटलं नाही पण नाईलाजाने ती बाहेर गेली आणि कामत ला आत घेऊन आली.

“ काय चालवालयस तू हे पाणिनी?” दारातूनच कामत ओरडून म्हणाला.पाणिनीने त्याला बसायची खूण केली.पण तो बसला नाही. “ माझ्या बायकोला या भानगडीत ओढून तिचं नाव खराब करायचे अधिकार तुला कोणी दिले पाणिनी?” पुन्हा तो ओरडला.

“ मी जे काही करत होतो ते माझ्या अशीलासाठी, तुझ्या बाबांसाठी.तुझी बायको यात गोवली जाईल असं मला वाटलंच नव्हतं” पाणिनी म्हणाला.

“ तुला सोडून सगळ्यांना याची कल्पना होती.” तो म्हणाला.

“ तुझी बायको गोवली जाईल असं मी नेमकं काय केलंय पण?”

“ चांडकच्या खुनात मुख्य संशयी म्हणून तिच्याकडे पोलीस पाहायला लागलेत.माझी रिव्हॉल्व्हर ऋताला देण्याच्या मिषाने .... जाऊदे मला बोलायला लावू नको.तू जे काही केलंयस, त्याच मला समाधानकार स्पष्टीकरण मिळालं नाही तर इथून जाण्यापूर्वी तुझी हाडं जाग्यावर ठेवणार नाही मी.” कामत म्हणाला.

“ त्याची परिणीती तुझा सुद्धा जबडा मोडण्यात होईल.” त्याच्याकडे करड्या नजरेने बघत पाणिनी म्हणाला. “ पण विषय असा आहे की मला मारून तुझ्या बायको वरचा संशय कमी होणार आहे का? वर्तमान पत्र वाल्यांना एक खाद्य मात्र मिळेल.”

“ पण मला मानसिक समाधान मिळेल.” कामत म्हणाला.

“ आणि ते समाधान तुझ्या बायकोला अटक झाली तरी टिकून राहील?” पाणिनीने विचारलं.

कामत काही बोलला नाही.म्हणजे बोलायला गेला पण काय बोलायचं ते न सुचून गप्प राहिला.

“ तू आता खाली बसून शांतपणे सविस्तर सांग.विशेषत: तुझ्या बायको बद्दल.म्हणजे पोलिसांनी तिला संशयित म्हणून धरण्याचे कारण काय?” पाणिनीने विचारलं.

“ निशांगी जयस्वाल, माझी बायको, तिने देवनार मधे काम केलंय.चांडक आणि तिची ओळख होती.”

“ फक्त ओळख?” पाणिनीने विचारलं.

“ मैत्री आणि नंतर प्रेम.एकत्र फिरायचे ते.” कामत म्हणाला.

“ तो आता या आपल्या शहरात आलाय हे तिला समजलं होतं?”

“ माहित होतं तिला.आमच्या लग्नाची बातमी पेपरात आली होती ती त्याने वाचली आणि तिला फोन केला,शुभेच्छा द्यायला.”

“ त्यात चूक काय आहे?” पाणिनीने विचारलं.

“ चांडकच्या घरात त्याच्या डायरीत निशांगी चा फोन नंबर लिहिलेला पोलिसांना सापडला.” कामत म्हणाला.

पाणिनीने आपले खांदे उडवून त्यात फार काही महत्वाचं नाहीये असं भासवलं. कामतला त्यामुळे अजूनच राग आला.

“ पटवर्धन, याहून वाईट म्हणजे पोलिसांनी निशांगीची झडती घेतली तेव्हा तिच्या डायरीत चांडक चा नंबर सापडला.”

“ आणखी काय?” पाणिनीने विचारलं.

“ मंगळवारी म्हणजे जेव्हा चांडकचा खून झाला त्या दिवशी एका डीलर बरोबर माझी मिटिंग होती.एक व्यवहार होणार होता आमच्यात.त्याच्या कडचा सेकंड हँड कार चा एक लॉट तो मला स्वस्तात विकणार होता.त्याच्याकडच्या गाड्या विकल्या जात नव्हत्या म्हणून मला तो कमी किंमतीत देणार होता.” –कामत

“ किती वाजता होती अपॉइंटमेंट?” पाणिनीने विचारलं.

“ त्याची काळजी करू नका पटवर्धन. प्रत्येक क्षणाचा हिशोब माझ्याकडे तयार आहे.”

“ जातांना तुझी रिव्हॉल्व्हर घेतली होतीस?” पाणिनीने विचारलं.

“ नाही ती ड्रॉवर मधेच ठेऊन गेलो होतो.”

“ अच्छा आणि तुझी बायको कुठे होती?” पाणिनीने विचारलं.

“ कुठे असणार अशावेळी बायको? घरीच होती.आम्ही नवपरिणीत जोडपे आहोत.तिला सोडून मी धंद्याच्या गोष्टी करायला बाहेर गेलो म्हणून साहजिकच तिला राग आला .”-कामत

“ तू परत आलास तेव्हा ती तिथेच होती?”पाणिनीने विचारलं.

“ अर्थातच.”

“ तू आलास कधी परत?” पाणिनीने विचारलं.

“ साडे नऊ ते दहाच्या दरम्यान.”

“ आणि या संपूर्ण वेळेत तुझी रिव्हॉल्व्हर तुझ्या ड्रॉवर मधेच होती?”

“ आमची मिटिंग चालू असे पर्यंत ड्रॉवर मधेच होती.मिटिंग झाल्यावर मी तिथून घेतली आणि घरी आणली.” कामतम्हणाला.

“ तुझ्या बायकोकडे ऑफिसची किल्ली असते ?” पाणिनीने विचारलं.

 कामत जरा अडखळला.“ हो म्हणजे असते ”किल्ली तिच्याकडे पण, परतू ती तिने वापरण्याचा प्रसंग आलाच नाही.ती घरीच होती मी आलो तेव्हा.पण असं आहे ना पटवर्धन, ती घरीच होती त्या काळात हे ती सिद्ध नाही करू शकत. कारण तिला घरी पाहणारा कोणी नाही.”

“ ते सिद्ध करायची गरज तिला नाही.जर कोणाला तिच्यावर आरोप करायचे असतील तर त्याला ते सिद्ध करावे लागेल की ती घरी नव्हती म्हणून.” पाणिनी म्हणाला.

 पाणिनीच्या या उत्तराने खरं तर कामतला आनंद व्हायला हवा होता तसा झाला नाही.“ यात एक दुर्दैव आड येतंय पटवर्धन.” तो म्हणाला.

“ काय?”

“ मी तिला फोन लावला होता आमच्या मिटिंग च्या दरम्यान. मला काहीतरी माहिती हवी होती म्हणून.माझ्या घरी ठेवलेल्या एका डायरीत ती होती.म्हणून फोन लावला होता.तिने तो उचलला नाही आणि.....” कुमार कामत म्हणाला.

“ हे, तू कोणाला सांगायची गरज नाही.”

“बहुदा मी चुकीचा नंबर फिरवला असेल आणि...”

 “ एकदाच नंबर फिरवून झाल्यावर सोडून दिलंस?”

 “ नाही मी दोन वेळा पुन्हा प्रयत्न केला.”-कामत

“ दोन्ही वेळा घेतला नाही फोन?” पाणिनीने विचारलं.

“ नाही.”

“ दोन फोन मधे किती कालावधी गेला असेल साधारण? की लागोपाठ केलेस?” पाणिनीने विचारलं.

“ दहा मिनिटांनी. पण मी सांगतो पटवर्धन, माझ्या हातून चुकीचा नंबर फिरवला गेला असायची शक्यता जास्त आहे.ती खरंच बाहेर गेली असती तर तसं मला सांगितलं असतं तिनं. त्या दृष्टीने ती एकदम फटकळ आणि स्पष्टवक्ती आहे.”

“ ज्याच्या बरोबर तू व्यवहाराची मिटिंग करत होतास,त्याला तू घरी फोन केल्याची कल्पना होती?” पाणिनीने विचारलं.

“ ती एक विचित्र गोष्ट आहे.म्हणजे माझ्या हातून चुकीचा नंबर लागलाय हे त्याला कळायला काही मार्गच नव्हता.त्यालाच काय मलाही कळलं नव्हतं.”

“ पण त्यांच्या दृष्टीने तू फोन केलास आणि पलीकडून उत्तरं दिलं गेलं नाही. बरोबर?”

“ बरोबर.”

“ तुझी बायको घरी असणार अशीच तुझी अपेक्षा होती त्यामुळे ती फोन उचलत नाही ही गोष्ट तुला विचित्र वाटली आणि ही गोष्ट तू समोरच्या माणसाला बोलून दाखवलीस?” पाणिनीने विचारलं.

“ बहुतेक बोललो असेल. आठवत नाही.” कामतम्हणाला.

“ किती वाजता फोन केलेस?”

“ मला वाटतं, नऊ वाजता, साधारण.”

“ तू घरातून बाहेर कधी पडलास?”

“ संध्याकाळी. आणि ते डील झाल्यावर लवकर यायचं आणि बायकोला घेऊन बाहेर खायला जायचं असं ठरवलं होतं.पण यायला उशीर झाला.”—कामत

“ मग? बायको भडकली?” पाणिनीने विचारलं.

“ चांगलीच. एकतर मी बाहेर निघालो तिला एकटीला सोडून म्हणून ती चिडली होती, त्यातून यायला उशीर झाला म्हणून अजूनच भडका उडाला.”

“ मला सांगण्याजोगं एवढंच आहे?” पाणिनीने विचारलं.

“ एवढंच.तुझ्या त्या बंदुकीच्या स्टंट मुळे सगळंच मुसळ केरात गेलं.पोलिसांचं म्हणणं आहे की ते रिव्हॉल्व्हर म्हणजे मर्डर वेपन आहे. जे कधीच शक्य नाही पटवर्धन. आणि ते आता निशांगी ला त्याच्यात गोवतायत अशी बातमी पेपरात येणारे.”

“ तू काहीतरी उलट सुलट केलंस तरच तिचं नाव येईल पेपरात.नाहीतर नाही.पोलिसांना वाटतंय की माझ्याकडे मर्डर वेपन होतं, मी तुझ्याकडे आलो, तुझी रिव्हॉल्व्हर मागून घेतली, त्यातून गोळी झाडली, त्या गडबडीत मी माझ्याकडील मर्डर वेपन तुझ्या रिव्हॉल्व्हर बरोबर अदलाबदल केलं नकळत.नंतर तुला घेऊन ऋता कडे आलो आणि तिला तुझ्याकडील रिव्हॉल्व्हर द्यायला लावलं, ते तुझं रिव्हॉल्व्हर नसून मर्डर वेपन होतं.” पाणिनी म्हणाला.

“ तुला काय माहिती पोलिसांना तुझा संशय आहे म्हणून?” कामतने विचारलं.

“ कारण इथे ते आले होते आणि मला धमकावून गेलेत अटक करू म्हणून. ” पाणिनी म्हणाला.

“ बापरे! मला कल्पनाच नव्हती. पण खरंच पटवर्धन, तू ही अदला बदल करू शकत होतास नक्की. तरीच मी मनात म्हंटलं की दुसऱ्या बॅलॅस्टिक एक्सपर्ट ची जो माणूस त्रेधा तिरपिट उडवतो, भर कोर्टात, त्याच्या हातून ‘चुकून’ गोळी कशी उडेल! ”

“ आता प्रश्न हा आहे की मी ज्या रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडली ते रिव्हॉल्व्हर नक्की कुठलं होतं? तू तुझ्या ड्रॉवर मधून काढून मला दिलंस ते की माझ्याकडचं मर्डर वेपन?” पाणिनीने विचारलं.

“ मी तुला जे ड्रॉवर मधून दिलं ते.” आत्मविश्वासाने कामत म्हणाला.

“ नक्की?”

“ शंभर टक्के. मला तुझी प्रत्येक हालचाल लक्षात आहे.तू तुझ्या उजव्या हातात माझ्या कडून रिव्हॉल्व्हर घेतलंस.ते हातात किंचित उडवून त्याचं वजन तोलून पाहिलंस. तू ते दोन तीन वेळा केलंस.आणि तिसऱ्यांदा करत असतांना तू त्यातून गोळी उडवलीस माझ्या टेबलावर.”-कामत म्हणाला.

“ तुझ्या रिव्हॉल्व्हर मधून?” पाणिनीने विचारलं.

“ माझ्याच.”

“ मग ते करताना माझ्या कडची रिव्हॉल्व्हर कुठे होती? जी मी बदलली?” पाणिनीने विचारलं.

“ अरे तू गोळी उडवताच ऑफिसातले सगळेच आवाज ऐकून घाबरून आत आले. सर्वांनी बघितलं तेव्हा तू तुझ्या हातात रिव्हॉल्व्हर धरून उभा होतास! देवारे ! तू केलंच असणार तसं. ”

“ आता मला सांग कामत, असं मी केलं असेल तर पोलीस तुझ्या निशांगीला का धरतील?”पाणिनीने विचारलं.

कामत एकदम खुष झाला. “ तू आहेस खरा हुशार.आणि सज्जन सुद्धा.आमच्या कुटुंबाचा सच्चा मित्र.” त्याने पाणिनीच्या हातात हात मिळवले आणि बाहेर जायला निघाला.दारातून बाहेर पडण्यापूर्वी म्हणाला,

“हे जे काही केलंयस, त्यासाठी माझ्या कडील कारवर तुला खास सवलत मिळेल. कुणालाच दिली जात नाही एवढी. विचार कर.”

“ मला नाही रस, कार खरेदी करण्यात.” पाणिनी म्हणाला. “ अरे तुला विचारायचं होतं, तुझ्या शिवाय तुझ्या ऑफिसच्या किल्ल्या कुणाकडे असतात?”

“ आमचा स्वच्छता करणारा माणूस, माझी बायको, सेक्रेटरी आणि माझे वडील. वडलांच्या आणि माझ्या ऑफिसची चावी एकमेकांकडे असते. पण प्रत्यक्षात वापरायची वेळ आली नाही.”

“ ठीक आहे मला जाणून घ्यायचं होतं. ” पाणिनी म्हणाला.

“ निघतो मी पटवर्धन.मग कार नक्की नाही न घ्यायची? ” जाता जाता पुन्हा कुमार म्हणाला आणि बाहेर पडला. पाणिनी पुन्हा आपल्या खुर्चीत येऊन बसला. सौंम्या आत आली.

“ कनकला सांग देवनार मधे त्याची माणसं पाठव.निशांगी जयस्वाल ची जास्तीत जास्त माहिती काढ.लौकरात लौकर.”

( प्रकरण ९ समाप्त)