Revolver - 8 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | रिव्हॉल्व्हर - प्रकरण 8

Featured Books
Categories
Share

रिव्हॉल्व्हर - प्रकरण 8


प्रकरण ८

दुपारीच कार्तिक कामत चा पाणिनीला फोन आला.“ छान काम केलंस पाणिनी.”

“ कशाबद्दल बोलतोयस तू?” पाणिनीने विचारलं.

“ तुला माहित्ये.” –कार्तिक कामत

“ तू आहेस कुठे अत्ता?” पाणिनीने विचारलं.

“ देवनार”

“ तुला कल्पना नाहीये कार्तिक, इथे खूप लफडी झाल्येत.....” पाणिनी म्हणाला.

“ मला सर्व कल्पना आहे.माझ्या तिथल्या माणसांनी मला सर्व माहिती दिल्ये.म्हणूनच फोन केलाय. ”—कार्तिक

 “ तुझ्या कुमारला आणि सुनेला पोलिसांनी चौकशीला ताब्यात घेतलंय माहित्ये का? मी तुझ्या कुमारकडून घेतलेल्या रिव्हॉल्व्हर मधून माझ्या कडून अचानक.....”

“ माहित्ये मला ते पण.” पाणिनीचं बोलणं अर्धवट तोडत कामत म्हणाला. “ हे बघ पाणिनी, तुझं काम ऋताला वाचवणं हे आहे.”

“ मुलगा आणि सुनेचं काय?”

“ तुला जेवढं करता येईल ते करच पण प्राधान्य ऋताला आहे. पोलीस माझ्या सून आणि कुमारला काहीच करू शकणार नाहीत.तपासासाठी जरी त्यांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि त्रास दिला तरी जेव्हा त्यांचा तपास पूर्ण होईल तेव्हा ते एखादा गरम बटाटा हातात घेतला तर हात कसा पोळतो तसं त्यांना होईल आणि ते त्यांना सोडून देतील. ” कामत म्हणाला.

“ आणि तुझं काय?”

“ मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे.मला फक्त माझ्या अधिकाराबाबत सल्ला हवाय.” कार्तिक म्हणाला.पाणिनीने भुवया उंचावून काय म्हणून विचारलं.

“मी इथे माझ्या नावानेच हॉटेल मधे राहिलोय.मला समजा पोलिसांनी प्रश्न विचारले तर मी नकार देऊ शकतो का, या कारणास्तव की पोलिसांना उपयोगी पडेल अशी कोणतीही माहिती माझ्याकडे नाही.आणि माझा वकील हजर असेल तरच मी बोलेन.” कार्तिक ने विचारलं.

“ कायद्याने तू करू शकतोस पण पोलिसांमध्ये आणि समाजात तुझ्या बद्दलचं मत वाईट होईल.आणि जराशी संधी मिळाली तर पोलीस तुला अडकवण्याचा प्रयत्न करतील.” पाणिनी म्हणाला.

“ तू इथे मला भेटायला येऊ शकतोस?”

“ मला जरा इथे कामं आहेत दुसऱ्या खटल्यातली.” पाणिनी म्हणाला.

“ मला वाटलंच होतं.मला हे जाणून घ्यायचय की माझ्याशी ते कितपत कडकपणे वागतील?”

“ तू दुसऱ्या राज्यात आहेस.तुझ्यावर खुनाचा आरोप ठेऊन ते तुला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील.” पाणिनी म्हणाला.

“ करू दे.”

“ एव्हाना त्यांनी ऋताची झाडा झडती घ्यायला सुरुवात केली असेल.”

“ तिच्या बरोबरीने माझ्या कुमारची आणि सुनेची सुद्धा केली असेल. पण पाणिनी, तू मस्त काम करून ठेवलं आहेस.त्या दोन रिव्हॉल्व्हर मधे घोळ घालून पोलिसांचा गोंधळ उडवला आहेस.” कामत म्हणाला आणि आपल्याशी संपर्क करायचा झाला तर कसा करायचा ते पाणिनीला सांगून त्याने फोन बंद केला.तेवढ्यात दाराच्या की होल मधे किल्ली घातल्याचा आवाज आला आणि सौंम्या आत आली.

“ हे काय तुला मी घरी जा म्हणून सांगितलं होतं ना? पुन्हा का आलीस इथे?” पाणिनीने विचारलं.

“ माझी तब्येत उत्तम आहे खालच्या केमिस्ट कडून मी डोकं दुखीवरचं औषध घेऊन आल्ये. माझ्या मनात सारखा विचार येत होता की कामत आपल्याला सेकंड हँड कार घ्यायचा किती आग्रह करत होता आणि तुम्ही तो शिताफीने परतवून लावत होतात पण मी विचार करत होते की माझी आत्ताची कार आता बदलायला झाल्ये आणि नवीन कर घेण्याएवढा पगार तुम्ही मला देत नाही तर मग..... ”

“ म्हणून तू त्याच्या शो रूम मधे गेलीस की काय !” पाणिनी आश्चर्याने ओरडला.

“ मी गेले तेव्हा कामत चा मुलगा नव्हता पण आपल्याला पाहिलेला त्याचा एक छान विक्रेता भेटला मला आपण कामत चे जुने मित्र आहोत हे त्याला माहिती होतं.मी त्याला सांगितलं की कामतने जी कार आम्हाला सुचवली होती ती दाखव.” सौंम्या म्हणाली.

“ आणि तू ती खरेदी केलीस?” पाणिनीने विचारलं.

सौंम्या उत्तर देण्यापूवी कनक ओजस चा दारावर टकटक केल्याचा आवाज आला.पाणिनीने सौंम्याला दार उघडून कनकला आत घ्यायला सांगितलं.

“ मला तुझ्याकडे येताना दार वाजवायला लागत,पाणिनी, पण लवकरच तुझ्या ऑफिसात दार न वाजवता आत घुसणारे पाहुणे येण्याची शक्यता आहे.” कनक म्हणाला.

“ पोलीस?” पाणिनी म्हणाला. कनक ने होकारार्थी मान हलवली.

“ पोलीस आपली नखं खात आणि केस उपटत बसलेत.” कनक म्हणाला.

“ का? काय झालं?”

“ कामत च्या कुमारच्या ऑफिसातल्या टेबलात गोळी घुसली असेल हे पोलिसांना आधी लक्षात आलं नाही.ते आल्यावर इन्स्पे.होळकर आपल्या टीम ला घेऊन त्याच्या केबिन मधे गेला आणि त्यांना आढळलं असेल असं तुला वाटतं पाणिनी?”

पाणिनीने आपल्या भुवया उंचावल्या.

“ त्यांना आढळलं की गोळी टेबलात घुसली नाही पण कडेला लागून उडून भितीतल्या प्लास्टर मधे घुसली होती.”

“ सापडली त्यांना ?” पाणिनीने विचारलं.

“ खरी मजा पुढेच आहे.कोणीतरी प्लास्टर मधून अस्खलितपणे गोळी काढून घेतलेली दिसत्ये.”-कनक म्हणाला आणि पाणिनीने चमकून सौंम्याकडे बघितलं.

“ अरे बापरे! कनक, कुणी केलं असावं हे?” सौंम्या म्हणाली. पाणिनीने तिच्याकडे पुन्हा पाहिलं तर तिचा चेहेरा एकदम निष्पाप होता.पाणिनीने मग कनककडे आपला मोर्चा वळवला, “ तुला कसं कळलं हे कनक?”

“ ज्या पत्रकाराने त्याच्या पेपरात तू गोळीबार केल्याची बातमी दिली त्याला साहजिकच त्याच्या पुढे काय घटना घडल्या हे जाणून घेण्यात रस होता त्यामुळे तो लक्ष ठेऊन होताच.त्याच्या कडूनच मला समजलं.” कनक ओजस म्हणाला.

“ ठीक आहे,कनक, हवी तेवढी माणसं कामाला लाव,मला रोजच्या रोज सर्व घटना समजायला हव्यात.” पाणिनी म्हणाला आणि त्याला होकार देऊन कनक बाहेर पडला.

“ तर मग सौंम्या, माझ्या समोर बस आणि खरी हकीगत सांग. तू गाडी खरेदीचं निमित्त पुढे करून तिथे गेलीस....”

दरवाजा धाडकन उघडला गेला आणि इन्स्पे.होळकर वादळासारखा आत घुसला.

“ ही काय पद्धत आहे माझ्या ऑफिसात यायची? ” वैतागून पाणिनी म्हणाला.

“ मी कायद्याचा रक्षक आहे आणि ते करत असतांना कायदा बाहेर वाट बघत बसत नाही.” होळकर म्हणाला.

“ आम्ही एका महत्वाच्या खटल्याबद्दल बोलतोय.” पाणिनी म्हणाला.

“ मला काही फरक पडत नाही त्यामुळे.”

“ काय हवंय तुला?” पाणिनीने विचारलं.

“ तुला माहित्ये ते.”-होळकर म्हणाला.

“ मी मनकवडा वगैरे नाही.आणि माझ्याकडे वेळही नाहीये त्याचा अंदाज बांधण्यात.” पाणिनी म्हणाला.

“ तू कामतच्या ऑफिसात जाऊन रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडलीस.”

“ चुकून उडली ती. त्यातून कोणी जखमी झालं नाहीये आणि मी त्याच्या टेबलाचं जे नुकसान झालंय ते भरून द्यायला तयार आहे.यात पोलिसांनी हस्तक्षेप करावा असं काही नाहीये.” पाणिनी म्हणाला.

“ आम्हाला मधे पाडाव लागतंय कारण ज्या रिव्हॉल्व्हर मधून तू गोळी झाडलीस ते खुनी हत्यार आहे. म्हणजे ते रिव्हॉल्व्हर वापरून खून झालाय.आणि ते तुला कुठून मिळालं ते आम्हाला हवय.”

“ कामतनेच मला ते दिलं.म्हणजे त्याच्या कुमारने. मी त्याला विचारलं की तुझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे का तर तो म्हणाला की आहे कारण या सेकंड हँड कर विक्रीच्या धंद्यात रोख व्यवहाराचं प्रमाण जास्त असतं.त्यामुळे संरक्षणासाठी म्हणून मी बाळगतो जवळ. माझ्या माहिती नुसार त्याच्याकडे त्याचं परमिट असणार.आता पोलीस या नात्याने ते आहे की नाही हे तूच सहजपणे शोधून काढू शकतोस, माझ्यापेक्षा.” भाबडा चेहेरा करत पाणिनी म्हणाला.

“ म्हणजे कामत ने तुला त्याच्याकडचं रिव्हॉल्व्हर दाखवलं?”

“ दाखवलं म्हणण्यापेक्षा त्याने ते माझ्या हातातच दिलं. मी ते सहज हातात घेऊन पेलून बघत होतो तेवढ्यात माझ्या हातून चाप दाबला गेला आणि गोळी उडली.मला कामत बोलला नव्हता की ते रिव्हॉल्व्हर भरलेलं आहे म्हणून.” पाणिनी म्हणाला.

“ पुढे काय झालं?”-होळकर म्हणाला.

“ कामतची मैत्रीण,ऋता रिसवडकर माझी अशील आहे.तिच्या वडलांचा खून झालाय आणि तिला स्वत:लाही धोका आहे म्हणून मी कामतला सांगितलं की तिला तुझं हे रिव्हॉल्व्हर दे. ” पाणिनी म्हणाला.

“ म्हणजे पटवर्धन, कामत कडून तू जे रिव्हॉल्व्हर घेतलस आणि ऋता ला द्यायला लावलंस ते रिव्हॉल्व्हर चांडकला मारण्यासाठी वापरण्यात आलेलं नाहीये हे तुला माहित होतं तर ! ” होळकर म्हणाला.

“ तुला याची खात्री वाटली यातच आनंद झाला. पण पोलिसांनाच ते खुनी हत्यार आहे असं खात्रीने वाटत होतं आणि त्याच्या विरोधात माझ्याकडे पुरावा नव्हता म्हणून मी गप्प बसलो.” पाणिनी म्हणाला.

“ भोळेपणाचा आव आणू नकोस.मला काय म्हणायचंय ते तुला चांगलंच कळलंय.तू रिव्हॉल्व्हर ची बदला बदली केलीस!खुनात वापरलेलं रिव्हॉल्व्हर तुझ्याकडे होतं.तुझ्याच अशिलाने तुला ते दिलं होतं.तू कामतला भेटायला गेलास तेव्हा ते कुठेतरी दडवलं होतंस.तू कामत कडून त्याचं रिव्हॉल्व्हर मागून घेतलंस आणि त्यातून गोळी झाडलीस. त्या गोंधळाचा फायदा घेऊन तू तुझ्याकडचं रिव्हॉल्व्हर बदललंस ” होळकर म्हणाला.

“ म्हणजे आता तुझं असं म्हणणं आहे की कामत चं रिव्हॉल्व्हर हे खुनी हत्यार नाही?” पाणिनीने विचारलं.

“ हो.”

“ आणि माझ्याकडे खुनी हत्यार होतं, त्याची मी कामत च्या रिव्हॉल्व्हर शी अदलाबदल केली?” पाणिनीने विचारलं.

“ माझी खात्री आहे तशी.कारण खरेदीच्या रेकॉर्ड वर कार्तिक कामत चे नाव आहे.त्याने एकसारख्या तीन रिव्हॉल्व्हर खरेदी केल्या दोन स्वत:कडे ठेवल्या आणि एक कुमारला दिली. कुमारनेच आम्हाला सांगितलं तसं.” होळकर म्हणाला.

“ जे रिव्हॉल्व्हर मला कुमारने दिलं ते वडलांनी त्याला दिल्याचं रेकॉर्ड दाखवतंय, बरोबर? ” पाणिनीने विचारलं.

“ ज्या रिव्हॉल्व्हर ने खून झाला ते रिव्हॉल्व्हर म्हणजे कार्तिक ने खरेदी केलेल्या ३ रिव्हॉल्व्हर पैकी एक आहे असं रेकॉर्ड दाखवतंय.आम्हाला ही खात्री पटल्ये की तुला कुमार कडून मिळवलेल्या रिव्हॉल्व्हर ने खून झालेला नाही.”—होळकर

“ कशावरून?”

“ कारण ज्या संध्याकाळी खून झाला त्या वेळी रिव्हॉल्व्हर कुठे होते या बद्दल प्रत्येक मिनिटाचा हिशोब कार्तिक देऊ शकतोय. ”

“ तर मग ते खुनी हत्यार असू शकत नाही.” पाणिनी म्हणाला.

“ तेच तर मी म्हणतोय.”—होळकर म्हणाला.

“ तुझी उलट सुलट विधान तपासून घे.आधी तुझं म्हणणं होतं ते खुनी हत्यार आहे,आता तू म्हणतोयस तसं नाही.” पाणिनी म्हणाला.

“ मला काय म्हणायचं आहे तुला बरोबर समजलंय.तू खुनी हत्याराची अदलाबदल केलीस.तुला माहिती होतं की खुनात वापरलेलं रिव्हॉल्व्हर हे वडिलांनी खरेदी केलं होतं.त्याने ते ऋता ला दिलं होतं.तिने ते वापरून चांडकचा खून केला.तुला तिने मदतीला बोलावलं.तू तिच्या कडून ते रिव्हॉल्व्हर घेतलंस आणि ते घेऊन कार्तिक कामत च्या कुमारच्या ऑफिसात गेलास.त्याच्याकडून त्याची रिव्हॉल्व्हर घेऊन त्यातून अचानक गोळी झाडलीस.त्यात जो गोंधळ झाला,त्याचा फायदा घेऊन रिव्हॉल्व्हर ची अदलाबदल केलीस, आणि त्याला तू ऋता कडे घेऊन गेलास आणि बरोबर ते खुनी हत्यार तिच्यापर्यंत नेण्याची व्यवस्था केलीस. ” होळकर म्हणाला.

“ असं करायचं एकतरी कारण सांगू शकशील तू? म्हणजे मुद्दामच ते पोलिसांना मिळेल असं मी का करेन?”

जरा विचार केल्यासारखं करत होळकरने आपल्या हनुवठीवरून अंगठा आणि तर्जनी फिरवली आणि म्हणाला,

“ कारण नाही सांगता येणार मला पण तू हे केलंस हे नक्की.आणि तू यात अडकला आहेस हे ही नक्की कारण आम्हाला मिळालेल्या वैद्यकीय अहवालानुसार तू त्याच्याशी बोलत होतास त्याच वेळी त्याचा मृत्यू झालाय.”

“ याचा अर्थ मी मारलं त्याला?” पाणिनीने विचारलं.

“ शक्यता असू शकते असं मला म्हणायचंय. म्हणजे तू त्याला ठार मारण्यासाठीच भेटायला गेलास अशा प्रकारचा तू माणूस नाहीयेस पण त्याच्या बरोबरच्या भेटीत तुमच्यात काही खटके उडाले असू शकतात,चांडकने तुला दम दिला, किंवा त्याच्याजवळची रिव्हॉल्व्हर तुझ्यावर रोखायचा प्रयत्न केला आणि त्याची परिणीती म्हणून तू पटकन तुझ्याकडच्या रिव्हॉल्व्हर ने त्याच्यावर गोळी झाडलीस असं झालेलं असू शकतं. ”

पाणिनी हसला. “ मला अडकवण्यासाठी तुला यापेक्षा चांगला तर्क लढवावा लागेल होळकर आणि त्याला पुरावे द्यावे लागतील.मी त्याला भेटायला गेलो तेव्हा तो जिवंत होता.अगदी धड-धाकट.भेटून निघून गेलो तेव्हासुद्धा तो उत्तम होता.त्याला कोणीतरी भेटायला येण्याची तो अपेक्षा करत होता. एखादी गूढ व्यक्ती. ”

“ ऋता रिसवडकर?” होळकरने विचारलं.

“ तिच्याशी भेट नंतर ची होती.जो कोणी येणार होता तो तिच्या आधी.आणि त्याने फोन करून भेट ठरवली होती आधीच.”

“ कशावरून? तुला काय माहित?”—होळकर

“ त्यानेच मला सांगितलं की तो कुणाचीतरी वाट बघतोय आणि मला जायला सांगितलं ” पाणिनी म्हणाला.

“ आणि तू गेलास?” होळकर च्या प्रश्नात अविश्वास होता.

“ हो.”

“ म्हणून तू इमारतीच्या मागच्या बाजूला थांबलास? एखादी स्त्री धापा टाकत मागच्या जिन्याने उतरेल आणि आपण तिला सोबत घेऊन जाऊ शकू म्हणून? ” –होळकर

“ मी असं केलं?” पाणिनीने विचारलं.

“ अगदी असंच केलंस तू.ती गूढ स्त्री म्हणजे खुनी होती, तू तिला संरक्षण द्यायचा प्रयत्न करतोयस. ती धापा टाकत मागच्या जिन्याने उतरली.तिनं तुला सांगितलं की तिनं चांडक ला मारलंय, तुझ्या हातात तिने खुनाचे हत्यार जबरदस्तीने घुसवल आणि तुझा सल्ला मागितला. तू तिला काळजी करू करू म्हणून सांगितलंस, तू म्हणालास की मी खुनी हत्याराची अशी काही विल्हेवाट लावीन की सगळी गुंतागुंत वाढवून ठेवीन.”—होळकर.  

“ खरंच की काय?” पाणिनीने विचारलं.

“ तू इमारतीच्या मागच्या दारात उभा असताना, त्या मुलीला तुझ्या बरोबर गाडीत बसून जातांना पाहणारा साक्षीदार आम्हाला मिळालाय.या शिवाय, तुझ्याकडे खुनात वापरलेलं रिव्हॉल्व्हर असल्याचं आणि त्यातूनच तू कामतच्या टेबलाच्या दिशेने गोळी झाडल्याचं पाहणारा साक्षीदार मिळालाय.”—होळकर.

“ अच्छा! ते खुनी हत्यारच होतं हे कसं सिद्ध करणार आहेस तू?”

“ गोळी वरून.म्हणजे तुला माहितीच आहे की गोळी बंदुकीतून बाहेर पडताना प्रत्येक गोळीवर नळीच्या विशिष्ठ खुणा उमटतात. सर्वांवरील खुणा सारख्याच असतात. आम्ही त्याच रिव्हॉल्व्हर मधून आणखी एक गोळी मारू आणि त्यावरच्या रेषा किंवा खुणा आणि तू मारलेल्या गोळीवर उमटलेल्या खुणा यांची तुलना करू.त्या सारख्या निघाल्या की हे सिद्ध होईल की तेच खुनी हत्यार आहे.समजा खुणा जुळल्या नाहीत तर त्याचा अर्थ होईल की तुझी गोळी खुनात वापरलेल्या रिव्हॉल्व्हर मधून उडवलेली नाही म्हणजेच हे सिद्ध होईल की तू कामत च्या ऑफिसातच रिव्हॉल्व्हर ची अदला बदल केलीस.” होळकर ने वरकरणी योग्य खुलासा केला.

“ तुझ्या या तर्कानुसार काहीही झालं तरी मी अडकतोच आहे.” पाणिनी म्हणाला.

“ मग काय चुकीचं आहे त्यात? तू आम्हाला सत्य सांगितलंस तर काहीतरी मार्ग काढू आम्ही तुझ्यासाठी.नाहीतर टेबलाला चाटून भिंतीत घुसलेली गोळी आम्ही काढू आणि ती तुझ्या ताब्यात असलेल्या रिव्हॉल्व्हर मधून मारल्ये का ते शिधून काढू.”-होळकर म्हणाला. सौंम्या विशिष्ठ हेतूने खोकली पाणिनी च्या लक्षात आलं.तो होळकरला म्हणाला,

“ मी तुला एकच खात्री देतो, मी बंदुकींची अदला बदल केलेली नाही.जे रिव्हॉल्व्हर मला कामत ने दिलं, त्याच्या टेबलाच्या ड्रॉवर मधून काढून, तेच मी त्याच्या तर्फे ऋता ला द्यायची व्यवस्था केली. ”

होळकरला ते पटलेलं दिसलं नाही. चिडून तो निघून गेला. तो गेल्यावर पाणिनीने सौंम्याला विचारलं.

“ तू भिंतीत शिरलेली गोळी काढून घेतलीस?”

“ तुम्हाला का वाटतंय तसं?”

“ या मुद्द्यावर होळकर मला अडकवायचा प्रयत्न करत होता.” पाणिनी म्हणाला.

“ मी तसं केलं असेल तर खूप गंभीर आहे हे?”—सौंम्या

“ खूपच.”

“ आणि मी ते केलं असेल आणि केल्याचं तुम्हाला सांगितलं असेल तर तुमची स्थिती खूपच अडचणीची करीन मी? ” सौंम्याने विचारलं.

पाणिनी हसला. “ होवू दे तुला वाटतंय तसं.”

( प्रकरण ८ समाप्त)