प्रकरण ४
थोड्याच वेळात त्रिकुट ऋता च्या घरी हजर झालं.कामत येणार याची कल्पना नसल्याने तिला एकदम आश्चर्य वाटलं.
“ सर, अभिनंदन ! सून मुख पाहिलंत की नाही?”
“ नाही मी कामासाठी बाहेर गेलो होतो.आणि त्याचा स्वभाव तुला माहितीच आहे, त्याने बाहेर गावी जाऊनच रजिस्टर लग्न केलं.” थोड्याशा विषादाने कामत म्हणाला.
“ बरं बसा तुम्ही, मी मस्त पैकी कॉफी करून आणते.” ऋता म्हणाली.
“ नको.आपण इथे कामासाठी जमलोय आणि तेच करू.मी थेट विषयावर येतो. तुझ्या वडिलांबद्दल बोलूया.मी देवनारला होतो आणि तिथे माझे काही माहितीचे स्त्रोत आहेत, त्या आधारेच मी तुला सांगतोय पण पोलिसांना लागतील ते पुरावे अजून माझ्या कडे आले नाहीयेत , पण सत्य हे आहे की चांडक हाच तुझ्या वडिलांचा खुनी आहे.”
“ मला हे अत्ता कळायच्या ऐवजी संध्याकाळीच समजलं असतं तर बरं झालं असतं.” ऋता म्हणाली.
“ तू आमच्या कुटुंबाचा एक भाग होशील अशा हेतूने मी त्या हॉटेल कंपनीचे शेअर्स घेतले होते.अत्ता ते हॉटेल ज्या पद्धतीने चाललंय त्या पद्धतीने पुढे चालवणे फायद्यात नाही, म्हणजे त्यातून फारसे काही उत्पन्न मिळणार नाही.या जागेच्या दक्षिणेकडील मिळकत ज्या बिल्डर कंपनीची आहे त्यांनी या हॉटेलची जागा खरेदी केली तर त्यांचा प्लॉट मोठा होईल आणि ते तिथे मोठी इमारत बांधतील.त्यामुळे हॉटेल चालवण्यापेक्षा ही जागा विकायचा निर्णय घेणे उचित ठरेल.”
“ मला ही तेच वाटतंय.” ऋता म्हणाली.
“ चांडक हा त्या बिल्डर कंपनीचा माणूस आहे असं मला नाही वाटत.तो स्वतंत्रपणे हा व्यवसाय करत असावा.काहीही असलं तरी बिल्डर कंपनी ही एकतर चांडक कडून जागा खरेदी करेल किंवा आपल्याकडून.त्यांना जागा हवीच आहे.माझा डाव असा आहे की आपण थेट कंपनीला भेटू चांडक ला टाळून आणि जाणून घेऊ की ते जास्तीतजास्त किती किंमत देताहेत. आता तसं करायचं तर मला तू सांग की तुझ्या हिश्यापोटी किती रक्कम हवी आहे तुला. ”
“ मला चांडकने तीस लाखाची ऑफर दिली होती.आणखी मिळणारच नसतील तर मी तेवढ्याला तयार आहे,पण ही रक्कम तशी कमीच आहे.” ऋता म्हणाली.
“ मला दहा दिवस मुदत दे. तुझा हिस्सा ऐंशी लाखाला विकायचा प्रयत्न करतो.त्याहून जास्त आले तर तो नफा आपण निम्मा निम्मा वाटून घेऊ. त्याच वेळी माझा हिस्सा सुद्धा मी त्याच प्रमाणात विकायला काढीन. आणि आपण त्या कंपनीशी सौदा करू. जास्त येणारी रक्कम आधी अर्धी वाटून घेऊ. कसं वाटतंय हे?” कामत ने विचारलं.
“ छान आहे हे पण माझ्या शेअर ला तुम्हाला ऐंशी लाख मिळणार नाहीत.” ऋता उत्तरली.
“ इथे टाईपरायटर आहे?” ऋता च्या शंकेकडे दुर्लक्ष करत कामत ने विचारलं.
“ मी आणलाय” सौंम्या म्हणाली.
“ पाणिनी, अत्ता मी जे म्हणालोय तसा एक कराराचा मसुदा तयार करून दे मला.आम्ही आताच तो सही करतो.” कामत म्हणाला.
पाणिनीने भराभर सौंम्याला मसुद्यातील महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.सौंम्याने मसुदा तयार केला.एक प्रत पाणिनीला वाचायला दिली,एक कामत ला आणि एक ऋता ला दिली. पाणिनी पटवर्धन ने ती काळजी पूर्वक वाचली.
“ ठीक आहे,हवंय ते सर्व आलंय यात.” पाणिनी म्हणाला.
त्या दोघांनी लगेचच त्यावर सह्या केल्या.
“ कामत,उद्या सकाळी भेटूया आपण?” पाणिनीने विचारलं.
“ शक्यतो जमवू.”
“ तुझं काय ऋता?”
“ मला फोन करा तुम्ही.”
सौंम्याने पाणिनीला खूण केली आणि लक्ष वेधून घेत म्हणाली, “ मला उशीर झालाय सर,घरी गेलं पाहिजे ”
“ मी सोडतो तुला ” पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे निघा तुम्ही पाणिनी. आणि ऋता, मला आता जरा कॉफीची गरज आहे.” कामत म्हणाला.
पाणिनी आणि सौंम्या बाहेर पडले तेव्हा पाणिनी म्हणाला, “ चांडक ने मला पंधरा टक्क्याच्या हिश्यासाठी तीस लाखाची ऑफर दिली असतांना चांडक ने चाळीस टक्के हिश्यासाठी तीस लाखाची ऑफर दिल्याचं ऋताने ठासून का सांगितलं असावं?” पाणिनीने विचारलं.
“ नाही काही कल्पना.” सौंम्या म्हणाली.
“ मला खात्री आहे की त्याला तो फोन आला नसता तर त्याने मला ऋता च्या चाळीस टक्के हिश्यासाठी ऐंशी लाखाची आणि कामत च्या पंधरा टक्के साठी तीस लाखाची ठोस ऑफर दिली असती. ” पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे तुमचं म्हणणं आहे की त्या फोन मुळे त्याचा निर्णय बदलला?” सौंम्या ने विचारलं
“ काहीतरी झालं खरं” पाणिनी म्हणाला.
“ किंवा कोणीतरी भेटलं त्याला
“ पण त्या फ़्लॅट मधे कोणीच आलं नाही अपवाद फक्त....... पण ते जाऊदे उद्या पर्यंत वाट बघू काय घडतंय याची.कामत भेटला की आपल्याला बरंच काही कळेल. ”
*************************************************
दुसऱ्या दिवशी आपल्या ऑफिसात येताना पार्किंग मधे गाडी लावतानाच सौंम्या खाली त्याची वाट पहात असतांना दिसली. पाणिनीला आश्चर्यच वाटलं कारण ती अशी कधीच त्याला भेटायला खाली आली नव्हती या आधी.
“ काय झालं सौंम्या?” त्याने विचारलं.
“ इन्स्पे.तारकर तुम्हाला भेटायला ऑफिसात आला होता. तुम्ही नाही म्हंटल्यावर तो गेला पण इमारतीच्या बाजूलाच कुठेतरी तो उभा असणार आणि तुम्ही येताच तुम्हाला गाठणार म्हणून तुम्हाला आधीच सावध करायला मी खाली आल्ये.”
“ काय हवं होतं तारकरला?” पाणिनीने विचारलं.
“ चांडक मेलाय ! ”
“ काय !!! ”
“ होय सर.त्याच्या घरात येणाऱ्या मोलकरणीने दार उघडलं तर जमीनीवरच खाली कोसळलेला दिसला.त्याच्या छातीला गोळी च्या आकाराचं भोक पडल होतं.”
“ कधी?” पाणिनीने विचारलं.
“ सकाळी आठ ला.मी बातम्या लावल्या होत्या आणि....”
“ तसं नाही, मला म्हणायचं मृत्यूची वेळ काय असावी?” पाणिनीने विचारलं.
“ ते अजून समजलं नाहीये.” सौंम्या म्हणाली.
“ पण मला तू इथे गाठलंस ते बरं झालं सौंम्या.आपण आता टॅक्सी करू आणि आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तर द्यायला लागण्यापूर्वी,जरा काही माहिती मिळवता येते का ते बघू. ” पाणिनी म्हणाला.
ते दोघे बाहेर पडले आणि टॅक्सी केली. टॅक्सी ला त्रिकाल अपार्टमेंट चा पत्ता सांगितला.
“तुझ्या माहितीसाठी सांगतो,सौंम्या, काल रात्री साडे आठचे सुमाराला कार्तिक कामत हा चांडक ला भेटला होता.त्याने मला या भेटी बद्दल काहीच सांगितलं नाही.त्यामुळे मी ते कोणाला सांगितलं नाही.अजून एक गंमत सांगतो, जेव्हा ऋता काल रात्री साडे आठ चे सुमारास चांडक शी बोलली, तेव्हा तिच बोलणं एका प्रेता बरोबर होत होतं.तिला विचारलं गेलं होतं की तिला तिच्या शेअर साठी किती किंमतीचा प्रस्ताव देण्यात आलाय म्हणून.तिला काहीतरी काल्पनिक आकडा सांगावा लागला.आता मला लक्षात आलं की चांडक ने कामत च्या हिश्या साठी मला सांगितलेली रक्कम आणि तिला तिच्या हिश्यासाठी कितीचा प्रस्ताव असल्याचं तिने मला सांगितलं यात का फरक पडला ते. ” पाणिनी म्हणाला. टॅक्सी त्रिकाल जवळ येई पर्यंत ते गप्प बसून होते.
“ तू इथेच थांब जरा ” पाणिनी ड्रायव्हर ला म्हणाला. “ आम्ही जरा जाऊन येतो नंतर आपल्याला इतर काही ठिकाणी जायचय.”
ड्रायव्हर ने मान हलवून हो म्हंटलं.पाणिनी आणि सौंम्या दोघेही ऋता च्या त्रिकाल अपार्टमेंट मधे गेले.लिफ्ट ने तिच्या मजल्यावर पोचले आणि दार वाजवलं.
“ कोण आहे?” आतून ऋता चा आवाज आला.
“ पाणिनी पटवर्धन”
“ एकटेच आहात की.....”
“ सौंम्या आहे बरोबर. ”
आतून दाराची कडी काढल्याचा आवाज आला आणि ऋता ने दार उघडलं.
“ मी काहीच आवरलं नाही माझं. तो पर्यंत मी काहीतरी करते, तुम्ही काय घेणार? चहा की कॉफी?” तिनं विचारलं.
“ माहिती.” पाणिनी म्हणाला.
“ एवढ्या लौकर सकाळी सकाळी आलाय म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार.” ऋता म्हणाली.
“ जेव्हा आम्ही काल रात्री इथून गेलो तेव्हा कार्तिक कामत आला होता?” पाणिनीने विचारलं. तिने मान डोलावून होकार दिला.
“ किती वेळ होता?”
तिच्या चेहेऱ्यावर तीव्र संताप उमटला. “ तुमचा काहीही संबंध नाही या गोष्टीशी. ”
“ नक्कीच आहे ऋता. कारण चांडक त्याच्या अपार्टमेंट मधे आज सकाळी मृतावस्थेत सापडलाय.” पाणिनी म्हणाला.
“ बसा.” ऋता म्हणाली. पाणिनीने बसण्यापूर्वी पलंगावर नजर टाकली.चादरी चुरगळलेल्या आणि उशा अस्ताव्यस्त पसरल्या होत्या.त्या बाजूला सारून तो बसायला जागा करायला गेला आणि जे दिसलं ते पाहून बसायच्या ऐवजी पटकन उडी मारून उभा राहिला. उशा हलवत असतांना त्याला त्याखाली एक छोट्या नळीचं रिव्हॉल्व्हर दडवलेलं दिसलं.
“ काय आहे हे?” पाणिनीने विचारलं.
“ तुम्हाला काय वाटतंय? टुथ ब्रश आहे हा?” ऋता ने उर्मट पणे प्रतिप्रश्न केला.
“ माझ्या माहितीनुसार कार्तिक कामतने त्याच्या खांद्याला जे रिव्हॉल्व्हर लावल होतं, काल रात्री, त्याच्याशी खूप साधर्म्य असलेले हे रिव्हॉल्व्हर आहे. ” पाणिनी म्हणाला.
“ माझ्या सुरक्षेची कार्तिक ला काळजी होती. ”-ऋता म्हणाली.
“ तुला असं म्हणायचंय की त्याने तुला हे दिलं?” पाणिनीने विचारलं.
“ बरोबर.”
पाणिनीने ते हातात घेतलं.नळी नाकाला लावून हुंगलं. सिलेंडर उघडला, “ एक काडतूस रिकामं आहे यात.”
“ तुम्हाला म्हणाले ना मी, मला काल रात्री हे कार्तिक ने दिलंय.मला नको होतं ते आणि नको आहे अजूनही.” ऋता म्हणाली.
“ पण तू ते उशीखाली लपवलंस?”
“ तुम्ही कुठे ठेवलं असतं ?” तिने पुन्हा प्रतिप्रश्न केला.
पाणिनी अचानक खुर्चीतून उठला आणि ते रिव्हॉल्व्हर होतं तिथे पुन्हा ठेवलं.
“ आता काय पुढे?” तिने विचारलं.
“मी तुझी वकिली करत नाहीये.मी पोलीसही नाहीये,त्यामुळे तुला प्रश्न विचारायचा हक्क मला नाहीये पण मला जाणून घ्यायचंय की काल रात्री तुला आम्ही भेटून गेल्यावर तू बाहेर गेली होतीस का? ” पाणिनीने विचारलं.
“ नाही.मी बाहेर पडलेली नाहीये आपल्या भेटी नंतर.”
पाणिनीने सौंम्याकडे बघून मान डोलावली.
“ ठीक आहे.” ऋता म्हणाली. “ माझ्या वडलांना मारणाऱ्या चांडक चा खून झालाय. तुमची काय अपेक्षा आहे? मी एकदम कोसळून जावं? हताश होवून आणि मला भोवळ वगैरे यावी?”
पाणिनी काही उत्तरला नाही.शांत राहिला.ऋता पुढे म्हणाली, “ तुम्ही माझे वकील नाही कार्तिक चे आहात.त्याला वाचवण्यासाठी तुम्ही मला बळी द्याल.”
“ माझ्या व्यवसायाचे आणि वृत्तीचे अत्यंत चुकीचे वर्णन आहे हे.पण ठीक आहे.सौंम्या,चल निघू या. ” पाणिनी म्हणाला आणि सौंम्याला घेऊन बाहेर पडला.
“ कुठे जायचय आता?” तिने विचारलं.
“ पोलिसांनी भेटायच्या आत आपण कार्तिक कामत ला शोधायला हवं. ऋताने पोलिसांना रिव्हॉल्व्हर बद्दल सांगितलं असेल तर ते त्याच्या मागावर असतील.” पाणिनी म्हणाला.
“ती सांगेल रिव्हॉल्व्हर बद्दल? ”-- सौंम्या
“ ती चतुर असेल तर नक्की सांगेल.विचार कर सौंम्या,त्या रिव्हॉल्व्हरने खून झाला असेल तर त्याचा अर्थ काय होईल ”
“ सर,तुम्ही ते तुमच्या बरोबर घ्यायला हवं होतं. ”
“ नाही तो धोका मी पत्करू शकत नव्हतो.” पाणिनी म्हणाला.
खाली येऊन ते पुन्हा आपल्या टॅक्सीत बसले. पाणिनीने ड्रायव्हर ला कार्तिक कामत च्या ऑफिस चा पत्ता सांगितला.
“ तो भेटेल आपल्याला तिथे?”
“ भेटेल किंवा आपण कुठे आहे याची माहिती घेऊ.यावेळी आपण त्याच्या त्या स्मार्ट सेक्रेटरीला फार किंमत द्यायची नाही. ” पाणिनी म्हणाला.
टॅक्सीने त्यांना अपेक्षित ठिकाणी उतरवलं.दोघे खाली उतरले. “ थोडावेळ थांबून रहा,आम्हाला फार वेळ नाही लागणार. ” पाणिनी म्हणाला.
लिफ्ट ने दोघे वर गेले आणि कार्तिक कामत गुंतवणूक सल्लागार असं लिहिलेल्या दारासमोर आले.पाणिनीने दाराची मूठ फिरवली आणि आश्चर्यच वाटलं.दार चक्क बंद होतं. “ अरे ! तो किंवा त्याची सेक्रेटरी कोणीतरी असायला पाहिजे होतं इथे यावेळी.” पाणिनी उद्गारला.
“ आठवतंय का? कामत म्हणाला होता तुम्हाला की त्याची सेक्रेटरी ज्या पद्धतीने वागली तुमच्याशी,त्यावरून मी तिला चांगल सुनवीन. त्यावरून इथे मोठ नाटक झालं असाव आणि कदाचित ती त्याला सोडून निघून गेली असावी किंवा त्याने तिला हाकलून दिल असावं.” सौंम्याने अंदाज केला.
“ असेल तसंही तरीही इथे कोणीच नाही हे मला पटत नाही. जरा फोन लाव कार्तिकला.” सौंम्याने फोन लावला पण कोणीच उचलला नाही.
“ त्याच्या कुमारला लाव.” पाणिनी म्हणाला.
फोन लागला.
“ आम्ही इथे तुझ्या बाबांच्या ऑफिसात आलोय.पण ऑफिस बंद आहे.तातडीने भेटायचं होतं.” पाणिनी म्हणाला.
“माझं जुन्या कार विकायचं ऑफिस माहिती आहे? तिथे या प्लीज.मी तिथेच आहे. ” कार्तिक चा मुलगा म्हणाला.
दोघे पुन्हा टॅक्सीत बसून तिथे पोचले.
“ बाबांचं ऑफिस बंद आहे?” पाणिनीला पाहताच कुमार म्हणाला. “ आद्रिका अभिषेकी तिथे असायलाच हवी.”
“ माझ्या माहिती नुसार ती तुझ्या बाबांकडे नोकरीला नाहीये आता. ” पाणिनी म्हणाला.
“ मला हे काहीच माहित नाही.मी हनिमून वरून आल्यापासून माझी आणि बाबांची भेट झालेलीच नाहीये.खर म्हणजे आम्ही दोघांनी ज्या परिस्थितीत लग्न केलंय ते बाबांना आवडलेलं नाहीये.त्यांचं म्हणण आहे की आम्ही तरुण लोक हल्ली आततायी पणाने निर्णय घेतो. खर तर या जुन्या पिढीलाच आम्हाला समजून घेता येत नाही. माझ्या बाबांचं आणि आजोबांचं सुद्धा पटत नव्हत.”
“आद्रिका अभिषेकीचं काय? म्हणजे ती ऑफिसात नसेल तर कुठे असेल?” पाणिनीने विचारलं.
“ मला वाटत तिच्या घरीच असावी.”
“ तिचा पत्ता आणि फोन आहे?” पाणिनीने विचारलं.
कार्तिक च्या कुमारने तिचा पत्ता आणि फोन दिला.
“ मला वाटतंय पटवर्धन, ती ऑफिसातच असणार, नेमकी तुम्ही गेलात तेव्हा ती नुकतीच बाहेर गेली असावी.पण आता आली असेल पुन्हा.ती खूप हुशार आणि तत्पर आहे कामात.मीच तिची शिफारस बाबांना केली होती.”
“ ठीक आहे बघतो भेटते का ती.दरम्यान तुझा बाबांशी संपर्क झाला तर सांग त्यांना की मला त्यांच्याकडे तातडीचे काम आहे. ” पाणिनी म्हणाला.
कार्तिक चा मुलगा त्यांना सोडायला टॅक्सीपर्यंत आला. पाणिनीने ड्रायव्हरला आद्रिका च्या घराचा पत्ता सांगितला.
“ सर, ऋता रिसवडकर बरोबर आपला मुलगा ज्या पद्धतीने वागला,ते कार्तिक ला पसंत नसावं म्हणून त्याचं आणि कार्तिक कामत चं वाजलं असाव का?” सौंम्याने विचारलं.
“ त्यापेक्षा आद्रिका अभिषेकी चं या लग्नाबद्दल काय मत आहे ते ऐकणं उत्सुकतेचं ठरेल. ” पाणिनी म्हणाला.
“ सर, आपण तिला भेटायला जाण्यापूर्वी एकदा पूर्व कल्पना द्यावी असं मला वाटत कारण बायकांना सकाळी किती गडबड असते हे मी अनुभवाने......” सौंम्या म्हणाली.
“ समज तिला फोन केल्यावर ती म्हणाली की मला इच्छा नाहीये भेटायची तर?” पाणिनीने सौंम्याचं बोलणं अर्धवट तोडत विचारलं.
“ तसं झालं तर आपली पंचाईत होईल.” सौंम्याने मान्य केलं.
“ म्हणूनच म्हणतोय मी की आपण थेट तिला न कळवता आपण जायचं. ” पाणिनी म्हणाला.
थोड्या वेळाने पाणिनीने आद्रिका अभिषेकी च्या दारावरची बेल वाजवली होती.दोन तीनदा वाजवली तरी दार उघडलं नाही म्हणून पुन्हा त्याने बटणावर बोट दाबायला हात वर केला तेवढ्यात जोरात दार उघडलं गेलं आणि उघडता उघडता आतून आद्रिका चे शब्द कानावर आले, “ जरा थांबा, धीर नाही का...” दारात पाणिनी पाहून तिचे वाक्य अर्धवट राहिलं.
“ तुम्ही! मला वाटलं दुसरं कोणीतरी आहे....” असं काहीसं अर्धवट बोलत तिने खुलासा करायचा प्रयत्न केला.
“ मला मिनिटभर बोलायचं आहे.आत येऊ?” पाणिनीने विचारलं. “ ही माझी सेक्रेटरी,सौंम्या.”
“ मला वेळ नाहीये.एके ठिकाणी अपॉइंटमेंट आहे....बाहेरच निघाल्ये मी...” आद्रिका म्हणाली.
“ फार वेळ नाही घेणार ” पाणिनी म्हणाला.
नाईलाजाने ती दारातून बाजूला झाली आणि त्यांना आत यायला तिने जागा करून दिली. “ तू आता कामत कडे नोकरी करत नाहीयेस?” पाणिनीने विचारलं.
“ तुम्हाला धन्यवाद त्यासाठी. सोडल्ये मी नोकरी.”
“ आम्हाला कशाला धन्यवाद?” पाणिनीने विचारलं.
“ कामत चं म्हणणं होतं की त्यांचा ठाव ठिकाणा मी तुम्हाला सांगायला हवा होता.पण खरं तर त्यांनीच मला सांगितलं होतं की कोणालाही ते सांगायचं नाही. ”
“ यावरून तुमच्यात गैरसमज झाले?” पाणिनीने विचारलं.
“ हे संपूर्ण कामत कुटुंबच विचित्र आहे.बाप,लेक दोघेही सारखेच. कामत देवनारहून आले ते फणफणत. घरी न जाता थेट ऑफिसात.आल्या आल्या मला थांबायला सांगितलं.मग आपल्या केबिन मधे बराच वेळ घालवला. मग बाहेर आल्यावर माझी खरडपट्टी काढली.मी त्यांना सांगितलं की माझं वागण कसं योग्य आहे ते.त्यांची सूचना मी तंतोतंत पाळली होती.तिथेच मी त्यांना सांगून टाकल की मी राजीनामा देते आहे. ” आद्रिका म्हणाली.
“ कामतची काय प्रतिक्रिया होती?” पाणिनीने विचारलं.
“ ते म्हणाले करायचं ते कर मला काही फरक पडणार नाही. असं म्हणून ऑफिसच्या बाहेर निघून गेले.” —आद्रिका
“ किती वाजता घडलं हे?” पाणिनीने विचारलं.
“ ते आले तेव्हा सकाळी पावणे नऊ झाले असतील.” —आद्रिका
“ आणि तुझी खरडपट्टी काढली ते कधी?”
“ आल्यावर थोड्याच वेळाने.”—आद्रिका
“ आणि ते आल्यावर त्यांनीच सांगितलं की देवनार वरून आलोय असं?” पाणिनीने विचारलं.
“ ते म्हणाले तरी तसं.” —आद्रिका
“ ते विमानाने आले की गाडीने?” पाणिनीने विचारलं.
“ माहित नाही.”
“ देवनारला किती दिवस होते ते?”
“ दोन दिवस.” —आद्रिका
“ आता काय करणार आहेस पुढे?” पाणिनीने विचारलं.
“ माझी मॉडेलिंग आणि रंगभूमीवरची हौस भागवून घेणारे.आणि आता तुम्ही कृपा करून जाल का? अजून काय माहिती लागली तर कामत ना विचारा.” —आद्रिका
“ मला तुझी बाजू ऐकून घ्यायची होती.”
“ मला सांगायचं ते सांगून झालंय.हा कामत चा मुलगा सहा महिने सुद्धा त्या मुली बरोबर टिकणार नाही,लिहून घ्या.आणि तुम्ही आता जा.” त्याला हात जोडून ती म्हणाली.
“ गाडी आहे जायला तुला?” पाणिनीने विचारलं.
“ मी टॅक्सी ने जाईन.”
“ कुठे निघाली आहेस?”
“ एका स्टुडीओ मधे स्क्रीन टेस्ट द्यायला.”
“ तुझी हरकत नसेल तर आमच्या टॅक्सी मधून ऑफिस पर्यंत ये.तीच टॅक्सी करून पुढे जा.” पाणिनीने सुचवलं.
“ तुमच्यात एवढं औदार्य असेल हे खरंच वाटत नाहीये.”
तिच्याकडे लक्ष न देता पाणिनीने टॅक्सी चं दार उघडलं, ते आणि सौंम्या मागे बसले.पाणिनी पुढे ड्रायव्हर शेजारी बसला.आपलं ऑफिस आल्यावर पाणिनीने ड्रायव्हरला पैसे देताना आद्रिकाच्या स्टुडीओ चा पत्ता सांगून तिला तिथे सोडायला सांगितलं आणि तिथ पर्यंत किती भाडं होईल तेवढे अंदाजाने पैसे ड्रायव्हरला दिले.टॅक्सीतून उतरल्यावर रस्ता ओलांडून जात असतांनाच इन्स्पे.तारकर त्यांना आडवा आला.
(प्रकरण ४ समाप्त)